कोविड रुग्णांच्या श्वसनातील ताण कमी करण्यासाठी गाईचा खरवस परिणामकारक 

वासराला जन्म दिल्यांनतर साधारणत: दोन दिवसांनी निर्माण होणार्या गाय किंवा म्हशीच्या दुधाला ‘खरवस’ म्हणतात. (ग्रामीण भागात त्याच्या चिकट अशा स्वरूपास अनुसरून, ‘चीक’ असेही म्हणतात. इंग्रजीत त्याला ‘कोलोस्ट्रम’ म्हणतात.) या दुधाचे रासायनिक आणि भौतिक स्वरूप एरवीच्या दुधापेक्षा सर्वथा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. गायीच्या (व म्हशीच्या) तोवरच्या आयुष्यात संसर्ग झालेल्या सर्व घातक सूक्ष्मजीवांचा प्रतिकार करणाऱ्या प्रतिपिंडांची (प्रतिद्रव्ये, Antibodies) मात्रा या अगदी सुरुवातीच्या दुधात (खरवसात) अनन्यसाधारण प्रमाणात अधिक असते. त्यामुळे हे चिकाचे दूध नवजात वासरांसाठी संजीवनीच असते. सर्वसाधारणपणे संसर्गास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांत साम्य असल्यामुळे वासरांबरोबरच श्वान, वराह आणि मनुष्यप्राण्यांतही या दुधाचा वापर तितकाच फायदेशीर ठरतो. विशेषत: पचनसंस्था व श्वसनसंस्थांशी निगडीत संसर्गजन्य आजारात साह्यभूत उपचार म्हणून या गायी-म्हशींतील चिकाच्या दुधाचा वापर सुचवण्यात येतो. या दुधात मुबलक प्रमाणात असलेले प्रतिक्षमप्रथिने (immunoglobulins – विशेषत: आईजीएफ १), लॅक्टोफेरिन, टीजीएफ-बीटा आणि आयजीएफ १ यांचे मुबलक प्रमाण त्यासाठी कारणीभूत आहे. जन्मल्याबरोबर काही तासांच्या आत वासराला हे दूध पाजणे अत्यंत महत्वाचे असते, कारण या सुरुवातीच्या तासांतच वासरांची पचनसंस्था वेगळी असल्यामुळे त्या मूळ स्वरुपात शोषण करून ते रक्ताभिसरित करू शकते. त्यानंतर जसजसा वेळ जाईल तसतशी वासरांच्या पचनसंस्थेची ही क्षमता कमी होत जाते व अंतत: नष्ट होते. वासरांना या दुधातून मिळालेले हे घटक त्यांचे श्वसन व पचन संस्थांच्या सांसर्गिक रोगांपासून संरक्षण करतात. विशेषत: ज्या सूक्ष्मजीवांचा संसर्ग गायीला प्रसूतीपूर्वी कधीही झालेला असेल, त्या सूक्ष्मजीवांची रोधक प्रतिद्रव्ये अथवा प्रतिपिंडे त्या गायीच्या, प्रसूतीनंतर दोन दिवस निर्माण होणाऱ्या या चिकाच्या दुधात (किंवा खरवसात) असतात. वासरू वयात  गायींना कोरोना विषाणूंचा संसर्ग सौम्य प्रमाणांत हमखास होतो. त्यामुळे अर्थातच कोरोना विषाणूंचा प्रतिरोध करणारी प्रतिद्रव्ये गायींच्या या सुरुवातीच्या दुधात असणे स्वाभाविक असते.

गायीच्या चिकाच्या दुधातील जैवसक्रीय घटक

प्रतिकारक्षम / वृद्धिजन्य घटक प्रमाण

मिलीग्राम / लिटर

इम्युनोग्लोब्युलीन जी १ (IgG1) ४७ – ५०
इम्युनोग्लोब्युलीन  ए (IgA) ३.९ – ४.२
इम्युनोग्लोब्युलीन एम (IgM) ४.० – ४.२
लॅक्टोफेरिन १ – ५
बाह्यत्वचातल वृद्धिजन्य घटक  (EGF) ३० – ५०
संक्रमक वृद्धिजन्य घटक (TGF) ३.२ – ८.४
इन्सुलिनसधर्म वृद्धिजन्य घटक  (IGF) १ – २

नुकत्याच, ‘जर्नल ऑफ रिसर्च इन मेडिकल अँड डेंटल सायन्सेस’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या डॉ. स्वाती खारतोडे  यांच्या शोधनिबंधातही या बाबींना दुजोरा मिळतो. पुण्यातील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २०० कोविड रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, रुग्णांच्या ज्या गटाला नियमित उपचारासह दिवसातून दोन वेळा चिकाचे दूध पुरवण्यात आले होते, त्या गटातील रुग्णांच्या प्रकृतीत, चिकाचे दूध न देता केवळ नियमित उपचार केले गेले त्या गटातील रुग्णांपेक्षा लवकर सुधारणा झाल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार अधिक प्रयोग केल्यानंतर, पुण्यातील इतर रुग्णालयांतील रुग्णांबाबतही अशा प्रकारचा अनुभव  आला. ज्या रुग्णांना नियमित उपचारांसह चिकाचे दूध देण्यात आले, त्या रुग्णांनी श्वसनाच्या ताणावर एकदोन दिवसांतच मात केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही गतीने झाली. अशा रुग्णांची कोविडची लक्षणे तुलनेने लवकर नाहीशी झाली व त्यांची लवकरच हॉस्पिटलअवस्थेतून मुक्तता झाली. ह्या संशोधनातील निरीक्षणांनी माझे लक्ष वेधले.

मनुष्यातील दम्याचा विकार हा दीर्घकालीन विकार आहे. त्यावरील उपचारही दीर्घकालीन असून, ते केवळ लक्षणांपुरते मर्यादित राहतात. मात्र, ७ ते १८ वर्षे वयातील श्वसनी दमा, श्वसनशोथ या व्याधी असलेल्या ३८ मुलांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात, तीन महिने खरवसाचे दूध पुरवल्यानंतर त्यांच्या या व्याधींच्या लक्षणांत, लक्षणीय घट झाल्याचे व त्यांच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले. दूध न दिलेल्या गटातील मुलांच्याबाबतीत मात्र ते दिसून आले नाही. श्वसनसंस्थेतील पेशीभित्तिकांची अभेद्यता राखण्यासाठीही चिकाच्या दुधातील घटकांचा फायदा होत असल्यामुळे विशिष्ट खेळाडूंच्या क्षमतावृद्धीसाठी त्याचा उपयोग केला जातो. इन्फ़्लुएन्झाच्या विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी चिकाच्या दुधाची परिणामकारकता तर अनेक अभ्यासांतून सिद्ध करण्यात आलेली आहे.

एका संशोधनात ३० ते ८० वर्षे वयोगटांतील १४४ निरोगी व्यक्तींचे चार गट करण्यात आले. एका गटातील व्यक्तींना इन्फ़्लुएन्झा लस आणि चिकाचे दूध एकत्र देण्यात आले, दुसऱ्या गटातील व्यक्तींना केवळ चिकाचे दूध, तिसऱ्यात फक्त लस, तर एक गट कुठल्याही उपचाराशिवाय ठेवण्यात आला. इन्फ़्लुएन्झाची लागण व लक्षणे यांच्या तुलनात्मक अभ्यासात असे दिसून आले, कि चीक अथवा चीकासोबत लस दिलेल्या गटातील व्यक्तींत अत्यल्प लागण होत असून त्यांची लक्षणेही अतिशय सौम्य असल्याचे सिद्ध झाले.  त्याचप्रमाणे, या अभ्यासात असेही दिसून आले, कि केवळ लस देण्यात आलेल्या व्यक्तींपेक्षा लस आणि चिकाचे दूध पुरवण्यात आलेल्या हृदयरोगी, श्वसनव्याधी, फुफ्फुसातील रक्तदाब  अशा व्याधी असलेल्या व्यक्तींत फ्ल्यूची लागण कमी होती. अशा फार कमी व्यक्तींना रुग्णालयाची गरज भासली. यावरून विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींत इन्फ़्ल्युएन्झाची लस देताना त्यासोबत चिकाचे दूध देणे फायद्याचे ठरू शकते.

मी स्वत: केलेल्या वासरांवर व श्वान वर्गावर केलेल्या प्रयोगात, रोटाविषाणू, पार्व्होविषाणू व काही जीवाणूंच्या संसर्गामुळे झालेल्या आंत्रदहावरील उपचारात प्रतिजैविकांपेक्षाही, चिकाच्या दुधाची परिणामकारकता अधिक खात्रीची असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

सार्स-कोव्हि-२ हा श्वसन व पचन संस्थांवर अनिष्ट परिणाम करणारा रोग असून त्यावरील किफायतशीर उपचारांसाठी गायींच्या प्रसुतीपश्चात निर्माण होणाऱ्या चिकाच्या दुधाची त्यावरील परिणामकारकता पडताळण्यासाठी जगभर संशोधन होत आहे. कोविड रुग्णांच्याही उपचारांसाठी चिकाच्या दुधातील वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या उपयुक्ततेची अजमावण्याचे प्रयत्न चालू आहेत. विविध विषाणू व जिवाणूंचा प्रतिकार करण्याचे गुणधर्म असलेल्या लॅक्टोफेरिन या सक्षम घटकाचे प्रमाण गायीच्या या अवस्थेतील दुधात अनन्यसाधारणपणे अधिक म्हणजे – २.५ ते ५ मिलिग्राम प्रति मिलीलीटर – असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.  केवळ घातक सूक्ष्मजीवच नव्हे, तर विविध प्रकारच्या अॅलर्जी, विविध व्याधी, शोथ यांवर हे लॅक्टोफेरिन नावाचे द्रव्य प्रभावी औषधीगुण असल्याचे निष्पन्न झाले आहे.  झिका, चिकुनगुन्या व सार्स-कोव्हि-२ या रोगांवरही ते परिणामकारक असल्याचे प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. श्वसन मार्ग व फुफ्फुसांच्या उत्तींतील शोफ (द्रवसंचय – इंग्रजीत Pulmonary oedema) करणाऱ्या सायटोकाईन प्रकर्षाचे निराकरण करण्याची असलेली लॅक्टोफेरिन क्षमता ही त्याच्या या परिणामकारकतेची द्योतक आहे.  वर उल्लेखण्यात आलेल्या, पुणे येथील संशोधनात देखील लॅक्टोफेरिन घटकामुळेच गायीच्या चिकाच्या दुधाची उपयुक्तता कारणीभूत ठरली असल्याची शक्यता असू आहे. त्याचप्रमाणे सार्स-कोव्हि-२ या विषाणूची पेशींवर आघात करण्याची क्षमताही लॅक्टोफेरिन क्षीण करते, असा विश्वास वर्तवण्यात आला आहे. कारण, अजून एका अभ्यासात, निव्वळ लॅक्टोफेरिन असलेल्या द्रव्याच्या वापराने (मात्रा २५६ – ३८४ मिलीग्राम प्रतिदिन), ७५ कोव्हिड रुग्णांमध्ये कोरडा खोकला, डोकेदुखी, हगवण यांची तीव्रता लक्षणीय प्रमाणात कमी होवून, शिवाय स्नायुदुखी, थकवा, निद्रानाश, वार्धक्यसदृश्यता, श्वसनदाह कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्याच अनुषंगाने सकारात्मक कोविड प्रादुर्भाव चाचणी असलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या २५६ व्यक्तींना केवळ १२८ – १९२ मिलीग्राम प्रतिदिन लॅक्टोफेरिनची मात्रा दिली असता, त्यापैकीएकही व्यक्तीत कोविडची लक्षणे निर्माण झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यावरून असेही शास्त्रीय अनुमान करण्यात आले आहे, कि  १५ ते ३० दिवस दररोज ५० – १०० मिली चिक किंवा ५ – १० ग्राम चिकाची पावडर केलेली औषधी गोळी वापरून लॅक्टोफेरिनची प्रभावसदृश्यता निर्माण करता येते. तात्पर्य, अशी मात्रा आणि लॅक्टोफेरिन सारखाच परिणाम साधू शकते.

दुसरे असे, कि कोविडरोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या श्वसनस्त्रावांच्या चाचणीचा अहवाल नकारात्मक येत असतानाही, विष्ठेद्वारे मात्र १५ दिवसांपेक्षा अधिक काळपर्यंत कोरोना विषाणूचे उत्सर्जन होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाद्वारे नोंदवण्यात आले आहे. हि एक गंभीर बाब असून, कोविडमुक्त रुग्णांच्या माध्यमातून होणारा विषाणूचा हा प्रसार चिंताजनक ठरू शकतो. अशा कोविडमुक्त रुग्णांना  50-100 मिली ली चिक किंवा  1.5 – 2.5 ग्राम  चिकाची पावडर  किमान १५ – ३० दिवस दिल्यास पुन:संसर्ग व प्रसार रोखण्याची उपाययोजना केली जावू शकते. गायींच्या चिकाची  प्रतिकारक्षमतावृद्धीकारक मात्रा तयार करणे आता शक्य व सुलभ आहे. प्रयोगशील म्हणून नावाजलेल्या महाराष्ट्रातील ‘चितळे डेअरी’त विषाणू व जिवाणूंचे प्रतिजन (Antigen) समाविष्ट करून असे अतिशय अभिनव चिकाचे दूध स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे.

तथापि, तातडीचा उपाय म्हणून, कोविड झालेल्या रुग्णांना ५० – ७५  मिली (किंवा १.५ – २ मिली पावडर स्वरूपात) रोज देण्याची शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे.

दुधाचे अल्पायुषित्व आणि प्रत्यक्ष अशी मात्रा तयार करताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी निश्चित आहेत. हे खरे असले तरी, प्रस्तुत लेखकाने मुंबईच्या औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या प्रक्रियेतील अडचणी दूर करून किफायतशीर दरात परिणामकारक अशा चिकाच्या दुधाच्या मात्रा तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे नवीन तंत्रज्ञान मायक्रो इनकॅप्सुलेशन वर आधारित असून गायी किंवा म्हशीच्या चिकाला छोट्या छोट्या संपुटिकांत तयार करण्याचा आराखडा व वस्तुपाठ यशस्वीपणे विकसित करण्यात आला आहे.  त्याचा वारंवार वापर निश्चितच फायद्याचा ठरू शकेल असे भाकित आहे. अशा प्रकारच्या मात्रांची निर्मिती अगदी दुध संकलन केंद्रावरच करता येईल असे हे तंत्र निर्माण करण्यात यश आले आहे. त्यामुळे आता दररोज ४०० – ५०० लिटर चिकाची भुकटी तयार करने शक्य झाले आहे. या तंत्रात एरवी प्रयोगशाळेतील रासायनिक प्रक्रियेत संभाव्य असलेला, चिकाच्या दुधातील घटकांच्या विअनशच धोका तर टाळता आला आहेच; शिवाय सेवन केल्यानंतर पोटातील आम्लता व पेप्सीनसारख्या विकरांच्या विघटनापासून, (लॅक्टोफेरिन, इम्युनो ग्लोब्युलीन १, बीटा ट्रायग्लिसराईड मेदाम्ले व इम्युनोग्लोब्युलीन –एफ इ.) प्रतिकारघटक सुरक्षितही राहतील अशी रचना करण्यात आली आहे.

हेही वाचायला आवडेल तुम्हाला : चिकात असते वासरांसाठी रोगप्रतिकारक शक्ती


लेखक

डॉ. अब्दुल समद
एम.व्ही.एस.सी., पी.एच.डी. (कॅनडा)
माजी डीन, पशुवैद्यकीय विज्ञान विद्याशाखा आणि शिक्षण संचालक, एमएएफएसयू

अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
संपादक मंडळ सदस्य, लातूर