उन्हाळा ऋतू मध्ये गायींचे केस कमी केल्यास त्यांच्या खाद्य खाण्यात व दूध उत्पादनात वाढ होते.

उन्हाळा जवळ आला असतानाच ग्रामीण भागातील पुरुष आणि तरुण मुले आपले केस लहान करण्यासाठी, केस कापण्यासाठी किंवा पूर्णपणे मुंडन करण्यासाठी न्हाव्याच्या दुकानात गर्दी करतात. असा विश्वास आहे की, यामुळे उन्हाळ्याची तीव्रता कमी जाणवते. हे सत्य असल्याचे गायींमध्ये दिसून आले आहे. आखूड केसांच्या स्लीक (slick) गुणसूत्र वाहणार्‍या गायीमध्ये सरस उष्णता असहिष्णुता (सौम्य वाढदेखील असह्य होणे) असते, हा बोध घेऊन संशोधकांनी हा मुद्दा शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध करण्याच्या अभ्यासासाठी घेतला.

आर. एम. मेजिया आणि पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी आणि होंडुरासमधील झॅमोरानो युनिव्हर्सिटीमधील इतरांनी एक साधा प्रयोग केला. या प्रयोगात लांब केस असलेल्या, दुभत्या गायी दोन गटात विभागल्या गेल्या. त्यापैकी, पहिल्या गटातील गायींचे त्वचेच्या लगत केशकर्तन करण्यात आले आणि दुसऱ्या गटातील गायींचे केश कर्तन न करता प्रमाण मानण्यात आल्या. दोन्ही गटातील गायींना समान खाद्य आणि समान व्यवस्थापनासह एकाच निवाऱ्यात राखले गेले. दररोज दुपारी २ वाजता गायींचे तापमान नोंदविण्यात आले. गायींचे केश कर्तन केल्यानंतर १४० दिवस दूध उत्पादन नोंदविले गेले. त्यानंतर दोन गटांमधील फरक समजण्यासाठी विश्लेषण केले गेले. निकालांनी हे सिद्ध झाले, की केशकर्तन केलेल्या गायींमध्ये, लांब केस असलेल्या गायींपेक्षा आहार खाण्याचे प्रमाण चांगले होते. त्याचप्रमाणे, केशकर्तन केलेल्या गायींचे सरासरी तापमान प्रमाण गटाच्या तुलनेत कमी होते. तसेच केशकर्तन केलेल्या गायींचे दूध उत्पादनही लांब केस असलेल्या गायींपेक्षा जास्त होते. अशा प्रकारे प्रयोगाने पुष्टी केली, की लहान किंवा केस कर्तन केले असलेल्या गायी उबदार हवामानात स्वस्थ राहतात व अधिक सक्षमतेने कार्य करतात आणि उन्हाळ्याच्या महिन्यांत लांब केस असलेल्या गायींमध्येही हा परिणाम होऊ शकतो.

सुदैवाने देशी (झेबू) गायींना लहान, चकाकणारा आणि चमकदार केसांचा कोट असतो जो सूर्याच्या किरणांना प्रतिबिंबित करण्यास मदत करतो आणि ज्यामुळे गायी थंड राहतात.

भारतीय शेतकऱ्यांसाठी सूचना : गुरांची निवड करताना लहान केसांचा गायींचा शोध घ्या आणि लांब केस असलेल्या प्राण्यांना टाळा. उष्ण, दमट हवा प्राण्यांच्या शरीराचे तापमान वाढविते म्हणून त्या लोकरी कोट असलेल्या गायींची निवड करू नका.


अनुवादक

डॉ. नाज़िया शकील पठान
पशुवैद्यकिय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग