योग्य आहार व खाद्य व्यवस्थापनातून घाला उष्माघाताला आळा

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसागणिक तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम माणसांप्रमाणेच आपल्या जनावरांवरही दिसून येतो. एका ठराविक तापमानापुढे, शरीर योग्य त्या प्रमाणात उष्मा (हीट) बाहेर उत्सर्जित शकत नाही, परिणामतः या दोन्ही गोष्टींचे संतुलन बिघडते, यामुळे आपली जनावरे उष्माघात किंवा हीट स्ट्रेस या अवस्थेला बळी पडतात. उष्माघात सर्व उच्च तापमानाशी संबंधित तणाव दर्शवितो, ज्यामुळे जनावरांमध्ये थर्मोरेग्युलेटरी बदल होतात. अत्यंत उष्ण आर्द्रता किंवा गरम कोरड्या हवामानात, जनावरांना घाम येणे तसेच पेन्टिंग (जनावर धापा टाकू लागते) द्वारा उष्णता शरीराबाहेर पुरेशा प्रमाणात टाकली जात नाही, त्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. जेव्हा पर्यावरणीय तापमान उच्च तापमानापेक्षा जास्त (विदेशी आणि संकरीत जनावरांसाठी २४ ते २६ से. आणि स्थानिक किंवा देशी गाईंमध्ये ३३ व म्हशींमध्ये ३६ से.) होते, तेव्हा पेन्टिंग आणि घामाद्वारे शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित राखले जात नाही, यामुळे तापमान वाढते आणि जनावर हीट स्ट्रेस किंवा उष्माघाता ला बळी पडते. परंतु योग्य ते आहार व खाद्य व्यवस्थापन केले असता आपण ही समस्या दूर करू शकतो व दुग्धोत्पादनातून योग्य तो नफा मिळवू शकतो.

आर्थिक महत्त्व:

उष्णतेच्या ताणाशी संबंधित सर्व बदलांमुळे उत्पादकता कमी होते, प्रजननक्षमता कमी होते आणि वेळेवर लक्ष न दिल्यास जीवितहानी देखील होते. भारतात दरवर्षी उष्माघातामुळे दुग्धोत्पादनात मोठ्या प्रमाणात तोटा होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. तसेच जनावराच्या प्रजनन क्षमतेवरही याचे परिणाम दिसून येतात.

संवेदनाक्षम जनावरे:

देशी जनावरांच्या जाती अधिक थर्मो-टॉलरन्ट (उच्च तापमान सहन करणाऱ्या) असतात, याउलट जनावरांच्या क्रॉसब्रेड आणि विदेशी जाती उष्णतेच्या तणावासाठी अत्यंत संवेदनशील असतात. त्यातच काळ्या त्वचेमुळे म्हशी उष्मा घात किंवा हीट स्ट्रेस ला अधिकच बळी पडतात. काळी त्वचा आणि कमी घाम ग्रंथी (गायीच्या तुलनेत फक्त 1/6) असल्या कारणाने सौर किरणे जास्त प्रमाणात शरीरात शोषली जातात, ज्यामुळे बाष्पीभवनाद्वारे शरीराबाहेर उष्णता जास्त प्रमाणात टाकली जात नाही.

लक्षणे:

  • कमकुवत नाडी व उथळ श्वास
  • उन्नत हृदय गती, श्वसन दर, गुदाशय तापमान इ.
  • जनावर लाळ गाळते
  • चक्कर येणे / बेशुद्धी येणे
  • त्वचा नितेज आणि थंड असू शकते
  • शरीराचे तापमान १०६ ते १०८ फॅ. पर्यंत वाढते
  • खाद्याचे सेवन कमी होऊन दुधाचे उत्पादन घटते
  • फॅट आणि एस. एन. एफ. वर परिणाम दिसून येतो
  • सोमाटिक सेलची संख्या वाढून तसेच स्तनदाह होण्याचा धोका निर्माण होतो
  • प्रजनन क्षमतेवर परिणाम
  • उच्च वातावरणीय तापमानाचा परिणाम रूमेन सूक्ष्मजीवांवर होऊ शकतो, जे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, अमीनो ऍसिडस् आणि फॅटी ऍसिडस्चे संश्लेषण करतात. याव्यतिरिक्त, डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रेस मुळे रुमेन एपिथेलियममध्ये रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे रवंथ करण्याच्या क्षमतेवर परिणाम दिसून येतो.

उष्मा घात किंवा हीट स्ट्रेस मध्ये खालील लक्षणे दर्शवितात:

  • ब्रिस्केट, पोटा खालील आणि पायांमधील त्वचा लालसर होते
  • जीभ बाहेर काढून श्वासोश्वास करतात
  • डोळे देखील लालसर पडतात
  • गुदाशयाचे तापमान वाढते व शरीराला स्पर्श केल्यास त्वचा गरम जाणवते

पाण्याचे महत्त्व:

  • गायींना मुबलक प्रमाणात स्वच्छ, थंड पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचा शरीराच्या कार्यक्षमतेशी थेट संबंध आहे. गायी प्रत्येकी १ पौंड खाद्यासाठी २ ते ४ पौंड पाण्याचे सेवन करतात आणि प्रत्येक पौंड दुधासाठी अतिरिक्त ३ ते ५ पौंड पाण्याचा वापर करतात.
  • गायींसाठी पाणी सहज उपलब्ध आहे याची खात्री करुन घ्या आणि पुढील गोष्टींचा विचार कराः
  • गायींना कुंडात जागेसाठी स्पर्धा करावी लागते का?
  • उन्हाळ्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा पुरेसा आहे का?
  •  स्वच्छ आणि थंड आहे का? कुंड नियमितपणे साफ केले जातात?
  • खाद्य आणि पाणी गोठ्याच्या जवळ आहे का?
  • सावलीमध्ये ठेवले आहे की पिण्यासाठी उन्हात जावे लागेल?

खाद्यामुळे निर्माण होणारी उष्णता:

  • खाद्य सेवनानंतर चयापचय (मेटाबोलिक हीट) उष्णतेचे उत्पादन वाढते. वेगवेगळ्या खाद्यपदार्थामध्ये उष्मा वाढविणारी भिन्नता असते आणि मध्यम ते उच्च-उत्पादन देणार्‍या दुधाळ गायींमध्ये खाद्य घटकांची उष्णता वाढ एकूण उष्णता उत्पादनाच्या दोन तृतीयांश असू शकते.
  • योग्य फॅट तसेच फायबर्स किंवा तंतूंची मात्रा वापरून तयार केलेले खाद्य किंवा आहार नक्कीच उन्हाळ्यामध्ये फायदेशीर ठरू शकतो.

कॉन्सन्ट्रेट्स आणि फोरेजस:

  • उष्ण तापमानात जनावरांचे खाद्य सेवन कमी होते, त्यामुळे योग्य त्या प्रमाणात ऊर्जा शरीराला मिळत नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन आहारमधील चाऱ्याचे प्रमाण कमी करून आपण कॉन्सन्ट्रेट्स चे प्रमाण वाढवू शकतो. यामुळे ऊर्जेची घनता वाढण्यास मदत होईल.
  • धान्य आणि फायबर युक्त आहार देताना खालील गोष्टी आपण लक्षात ठेऊ शकतो :
  • कॉन्सन्ट्रेट्स ५५ ते ६०% पेक्षा जास्त आहारामध्ये समाविष्ट करू नये
  • नॉनस्ट्रक्चरल कर्बोदकांचे प्रमाण (एन.स.सी) ३५ ते ४०% ड्राय मॅटर (आहाराच्या) इतके असावे.
  • एन.डी.एफ. चे प्रमाण २७ ते ३३ %
  • खाद्य घटकांच्या कणांचा पुरेसा आकार

आहारामध्ये फॅट चा समावेश:

  • फॅट मध्ये कर्बोदकांपेक्षा २.२५ पटीने जास्त ऊर्जा असते. उन्हाळ्यात जेव्हा खाद्य पदार्थांचे सेवन घटते, अशा वेळेस फॅट हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो. जास्त ऊर्जा असल्या कारणाने आहारातील ऊर्जेची घनता वाढते व याचा थेट परिणाम आपल्याला दुग्धोत्पादनावर दिसून येतो.
  • आहारामध्ये साधारणतः ५ ते ७% पेक्षा जास्त फॅट चा समावेश करू नये. यामुळे जनावरांना पचन संस्थेचे विकार होऊ शकतात व फायबर्स चे पचन नीट होत नाही. यासाठी दुसरा उपाय म्हणून आपण “बायपास फॅट” किंवा संरक्षित वसा वापरू शकतो. सदर फॅट हे रूमेन मध्ये इनर्ट राहते व त्याचे पचन आणि शोषण अबोम्याझम (खरे पोट) मध्ये होते.

क्रूड प्रोटीन किंवा कच्ची प्रथिने:

  • आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी असल्यास त्याचा परिणाम आपल्याला साहजिकच दुग्धोत्पादनावर दिसून येतो. परंतु प्रथिनांची मात्रा जास्त असल्यास त्यांचा शरीरासाठी योग्य तो वापर करून घेण्यासाठी ऊर्जा देखील तेवढीच लागते.
  • दुधाळ जनावरांना जेव्हा योग्य प्रथिने युक्त आहार सावलीच्या किंवा थंड ठिकाणी दिला जातो, तेव्हा ते खाद्याचे योग्य त्या प्रमाणात सेवन करतात. यामुळे प्रथिनांचे सेवन वाढते व याचा परिणाम आपल्याला दुग्धोत्पादनावर दिसून येतो.

बायपास प्रोटीन चा वापर:

बायपास फॅट प्रमाणेच बायपास प्रोटीन चे पचन आणि शोषण रूमेन मध्ये न होता अबोम्याझम (खरे पोट) मध्ये होते परिणामतः जनावराला प्रथिने जास्त प्रमाणात उपलब्ध होतात दुधातील एस एन एफ वाढीसाठी प्रथिनांची शरीराला जास्त उपलब्धता करून देणे आवश्यक असते

फायबर्स किंवा तंतूंचे महत्त्व:

रूमेन च्या योग्य कार्यक्षमतेसाठी फायबर्स हा एक अविभाज्य घटक आहे. कॉन्सन्ट्रेट्स सोबत तुलना करता फायबर्स च्या पचनातून निर्माण होणारी ऊर्जा ही जास्त असते. यामुळे जास्त तापमानात जनावरे चाऱ्याचे सेवन कमी करतात. (कॉन्सन्ट्रेट्स उपलब्ध असता) याचा परिणाम पचन संस्थेवर दिसून येतो. ही समस्या सोडविण्यासाठी आपण खालील गोष्टी करू शकतो :

  • चारा कापून टी. एम. आर. मध्ये मिक्स करावा
  • मुरघास चा वापर
  • कोरड्या खाद्यामध्ये पाणी वापरणे, यामुळे खाद्याचे सेवन वाढेल
  • उच्च प्रतीचा आणि पचायला सहज असा चारा उपलब्ध करून देणे

खनिज मिश्रणाचा समावेश:

  • उष्ण तापमानात गाईंमध्ये घामाद्वारे पोटॅशियम (K) जास्त प्रमाणात शरीराबाहेर उत्सर्जित केले जाते. परिणामी पोटॅशियम (K) ची जास्त गरज भासू लागते, तसेच जास्त प्रमाणात सोडियम (Na) चा पुरवठा करणेही महत्त्वाचे असते. पोटॅशियम जास्त प्रमाणात दिले असता मॅग्नेशियम (Mg) चा आहारात समावेश करणे अनिवार्य ठरते. यामध्ये आपण डीसीएडी म्हणजेच आहारातील ‘कॅटाईन- एनाईन’ मधील फरक यावर देखील लक्ष केंद्रित करू शकतो.
  • जास्त तापमाना दरम्यान खनिजांची मात्रा :
  • पोटॅशियम: शुष्क पदार्थांच्या (DM) १.४ ते १.६ %
  • सोडियमः ०.३५ ते ०.४५ % DM
  • मॅग्नेशियम: ०.३५ % DM

व्हिटॅमिन्स चे महत्त्व:

हीट स्ट्रेस मुळे यकृतामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ‘ए’ च्या मात्रेमध्ये ३०% पर्यंत घट होते ज्यामुळे आहारातून त्याची पूर्तता करणे आवश्यक होते. उष्णतेमुळे शरीरात सामान्यत: फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो.

  • व्हिटॅमिन ‘ई’ सारख्या अँटी-ऑक्सिडेंटच्या वापरामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, परिणामी दुधाची गुणवत्ता आणि जनावरांची तब्येत सुधारते.

खाद्यपूरकांचा आहारातील वापर:

यात आपण विविध खाद्य पुरके वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू शकतो :

  • प्रोबायोटिक्स आणि प्रिबायोटिक्स
  • यीस्ट कल्चर
  • बूरशीजन्य उत्पादने इत्यादी

यामुळे रूमेन मधील वातावरण नियंत्रित राहते उदा. रूमेन चा सा.मु., फायबर्स चे पचन इ.

बफर्सचे काम:

  • उष्णतेमुळे त्रस्त असणाऱ्या गाईंसाठी अल्कलाईन आहार जास्त सोयीचा ठरतो. सोडियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम ऑक्साईड सारख्या बफर्सचा वापर विशेषत: कमी फायबर व जास्त कॉन्सन्ट्रेट असलेल्या आहारात करावा.
  • आहारामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भर घातल्याने रुमेनचे पी.एच. (सा. मु.) नियंत्रित राहते, तसेच शुष्क पदार्थांचे सेवन वाढून दुधाचे उत्पादन वाढते.

इतर आहार व्यवस्थापन:

  • खाद्यामध्ये किंवा आहारामध्ये अचानक बदल करू नये करावयाचा असल्यास टप्प्याने करावा
  • खाद्याचे सेवन दिवसाच्या थंड प्रहरी करावे. उदा. सकाळ किंवा संध्याकाळ
  • आहाराची तसेच खाद्याची घनता वाढवावी, जेणेकरून कमी सेवन केले असता जास्त ऊर्जा मिळेल
  • खनिज मिश्रणाचा समावेश योग्य त्या प्रमाणात करावा
  • मुरघास बुरशीविरहीत असावा
  • खाद्य घटकांचा वास येत असल्यास ते देऊ नये
  • कणांचा आकार (पार्टीकल साईझ) व्यवस्थित असावा. आकार जास्त असल्यास अधिक ऊर्जा चर्वण करण्यात वाया जाते
  • टी. एम. आर. असल्यास सर्व घटकांचे योग्य त्या प्रमाणात मिश्रण करावे व ते मिक्स झाले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी
  • खाद्य घटक तसेच चारा चांगल्या प्रतीचा असावा
  • जनावरे एखादा विशिष्ट खाद्य घटक निवडून खात असल्यास त्याकडे लक्ष देणे
  • स्वच्छ आणि मुबलक पाण्याची सोय करावी

हेही वाचा: दुधाळ जनावरांच्या आहारात ‘कॅल्शियम प्रोपिओनेट’ चे महत्त्व


डॉ. अक्षय जगदीश वानखडे

एम. व्ही. एस. सी. (पशु पोषण व आहार शास्त्र)
फाईन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई
मोबाईल नंबर 8657580179