दुग्ध ज्वर किंवा मिल्क फिव्हर मधील आहाराचे व्यवस्थापन

अयोग्य आहार किंवा आहाराचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे गाई आणि म्हशींमध्ये काही रोग / विकार बळावतात तसेच काही अवस्था निर्माण होतात. ‘दुग्ध ज्वर’ किंवा ‘मिल्क फिव्हर’ हि अशीच एक अवस्था आहे. गर्भधारणेच्या कालावधीत आणि व्यायल्यानंतर आहाराच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे किंवा आहार देण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे हि अवस्था निर्माण होते. जास्त उत्पादन देणारी जनावरे या अवस्थेला लवकर बळी पडतात. खाद्यामधून कमी प्रमाणात कॅल्शियम शरीरात गेल्यामुळे, तसेच दुधामधून कॅल्शियम जास्त प्रमाणात जात असल्या कारणाने मिल्क फिव्हर चा धोका ऊद्भवतो. सरासरी १० लिटर कोलोस्ट्रम मधून सुमारे २३ ग्रॅम कॅल्शियम जाते. यामध्ये रक्तातील सीरम कॅल्शियम ची मात्रा ६.५ मिग्रॅ/डीएल च्या खाली जाते. (सामान्य मात्रा ८-१० मिग्रॅ / डीएल इतकी असते) तसेच मिल्क फिव्हर मध्ये आवश्यक ती काळजी व आहाराचे योग्य व्यवस्थापन न केल्यास जनावर “डाऊनर्स काऊ सिन्ड्रोम” मध्ये जाते, ज्यामुळे व्यवस्थापनाचा खर्च अधिक वाढतो,

प्रिपार्टम (विण्याच्या आधी) कालावधीमध्ये कॅल्शियम चा वापर कमी करणे :

जनावरांमध्ये अनेक कार्य करण्यासाठी कॅल्शियम हे उपयुक्त खनिज आहे. मिल्क फिव्हर ला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, कॅल्शियम विण्या अगोदर देऊ नये. तसेच आहारातील कॅल्शियमची (दररोज सुमारे २० ग्रॅम इतकी) पातळी देखील कमी असावी ‘व्हिटॅमिन डी’ आठवडा भर किंवा विण्या अगोदर जनावरांना दिल्यास ते पाचन नलिकेतून कॅल्शियम शरीरामध्ये शोषण्यास मदत करते आणि त्यामुळे मिल्क फिव्हर चा धोका टाळला जाऊ शकतो. सामान्यत: जनावरांना दिला जाणारा चारा आणि खुराक यांमधून कॅल्शियम शरीरात जाते. त्यामुळे कॅल्शियमचे कमी प्रमाणात सेवन सुनिश्चित करणे व्यावहारिकदृष्ट्या अवघड जाते. अशा परिस्थितीत ‘झिओलाइट’ (हायड्रेटेड ऍल्युमिनो सिलिकेट) आणि ‘वनस्पती तेल’ जनावरांना खाद्य पूरक म्हणून दिले असता कॅल्शियमचे शोषण शरीरामध्ये कमी प्रमाणात केले जाते.

मॅग्नेशियम चा आहारात समावेश :

मॅग्नेशियम हा शरीरातील आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. शरीरातील जवळपास ७० % मॅग्नेशियम हे हाडांमध्ये आढळते. मॅग्नेशियम हे “मेमब्रेन स्टॅबिलिटी” साठी जबाबदार असते आणि त्यामुळे हृदया मधील स्नायू व्यवस्थित कार्य करतात. जनावरांमध्ये रक्तातील कॅल्शियम ची पातळी नियंत्रित राखण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. सहजपणे पचण्याजोग्या कर्बोदकां सोबत मॅग्नेशियम १५-२० ग्रॅम / दिवसा मागे पूरक म्हणून दिल्याने मिल्क फिव्हर टाळण्यास मदत होते. गर्भधारणेच्या काळामध्ये मॅग्नेशियम ०.४ % इतके (रेशन मधील शुष्क पदार्थांच्या प्रमाणात) दिले गेले पाहिजे.

पोटॅशियम चा आहारात समावेश :

साधारणतः ज्या चारा पिकांवर फर्टीलाझर्स चा जास्त प्रमाणात वापर केला जातो, अशा पिकांमध्ये पोटॅशियमची मात्रा २% ते ३% किंवा त्या पेक्षा जास्त देखील असू शकते. अति प्रमाणात पोटॅशियम शरीरात गेल्यामुळे रक्त अल्कलाईन होते ज्यामुळे रक्ताची पीएच (सा.मु.) पातळी वाढते. यामुळे हाडांमधून कॅल्शियम कमी प्रमाणात मोबीलाईझ (बाहेर निघणे) होते, तसेच आतडे आणि मूत्रपिंडातुन कॅल्शियम कमी प्रमाणात शरीरात शोषले जाते. या कारणांमुळे पोटॅशियम ची मात्रा १.५ ते २ टक्के इतकी असणे गरजेचे आहे.  अन्यथा आपल्या जनावराला  मिल्क फिव्हर चा धोका वाढू शकतो.

रेशन मधील डीसीएडी (डाएटरी कॅटाईन- एनाईन डिफरन्स) :

डीसीएडी म्हणजेच आहारातील ‘कॅटाईन- एनाईन’ मधील फरक. डीसीएडी चा थेट संबंध ‘दुग्ध ज्वर’ किंवा ‘मिल्क फिव्हर’ सोबत आहे. रेशन मधील सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन आणि सल्फर आयन्स चे प्रमाण माहिती असल्यास आपल्याला डीसीएडी ची मात्रा काढता येते.

[डीसीएडी = (Na + K) – (Cl + S)]

जास्त डीसीएडी असलेले रेशन जनावरांना दिल्यामुळे दुग्ध ज्वर होतो याउलट कमी डीसीएडी असणारे रेशन जनावरांना दिल्यास हा त्रास कमी करता येतो. भाकड काळात खुराक तसेच मुरघास देऊन कॅल्शियम चे सेवन कमी केले जाऊ शकते. पण हे खर्चिक ठरते तसेच या गोष्टींमुळे जनावरांना फॅटी लिव्हर, किटोसिस, अबोम्यॅझम डिस्प्लेसमेंट (विस्थापन) हे आजार होण्याची शक्यता वाढते. विण्या अगोदर जनावरांच्या रेशनमध्ये ‘एनीओनिक लवण’ (म्हणजे क्लोराईड, गंधक किंवा फॉस्फरसचे लवण) घालून डीसीएडी कमी करता येतो. साधारणतः गायींच्या रेशनमध्ये १ किलो शुष्क पदार्था मध्ये डीसीएडी ची मात्रा १०० ते २०० meq (मिली इक्विव्हॅलेंट) इतकी असते.

इतर आहार व्यवस्थापन :

  • व्यायल्यानंतर, साधारण २-३ दिवस गाईंचे पूर्ण दूध काढू नये.
  • गर्भधारणेच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये विशेषत: विण्या अगोदर कॅल्शियम ने समृध्द असलेला चारा देऊ नये.
  • खालील फॉर्म्युलेशन चाटण म्हणून सुचविले जाऊ शकते:

१ कप मोलासेस + ४ चमचे लिन्सीड (जवस) तेल किंवा लिन्सीड मिल + २ चमचे मीठ + २ चमचे “कॉस्मॅग’ किंवा “डोलोमिट”.

 

Read: मोलॅसिस चा (उसाची मळी) जनावरांच्या आहारात उपयोग


डॉ. अक्षय जगदीश वानखडे

एम. व्ही. एस. सी. (पशु पोषण व आहार शास्त्र)
फाईन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई
मोबाईल नंबर 8657580179