दुग्धोत्पादन क्षेत्रात शीघ्रसाद संकेतावली – अर्थात ‘क्यू आर कोड’ : एक वरदान 

क्यू आर कोड’ : एक वरदान

जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा मनुष्याच्या खाद्यान्नविश्वात महत्वाचा आणि अनिवार्य भाग आहे. अनेक रोगांचा प्रादुर्भाव जनावरांपासूनही होत असल्यामुळे अशा अन्नाबाबत सुरक्षेची शाश्वती हाही अतिशय अनिवार्य विषय आहे. त्याबाबत निर्माण झालेल्या स्वागतार्ह जागरूकतेमुळे कुठल्याही पदार्थाचा स्रोत, त्याचे निर्मितीस्थान यांची माहिती होणे महत्वाचे ठरत आहे. अनेक देशांत त्याबाबतचे कायदे व नियम कसोशीने करण्यात आले आहेत. त्यांद्वारे अन्न व खाद्यपदार्थाचे निर्मितीस्थान, त्याच्या दर्जा व सुरक्षेची हमी यासाठी जोखून घेण्याची सवय ग्राहकांना लागली आहे व त्यामुळे ती माहिती मिळण्याचा हक्कही काही कायद्यांनी मान्य केला आहे. या कायद्यांनी जशी दूध व मांस उत्पादकांवर ती जबाबदारी निश्चित केली आहे, तशी उत्पादकांनाही जनावरांच्या चाराकाह्द्यांच्या बाबतीत, औषधे व लसी तसेच पुरवणी खड्यांच्या बाबतीत विक्रेत्यांकडून हमी हवी असते. एकूण सर्वच उत्पादकांवर आपापल्या मालाच्या बाबतीत दर्जा व सुरक्षा यांच्या बाबतीत खात्री आवश्यक वाटते. तो हक्क आहे. विशेषत: दूध सर्वथा प्राणीजन्य असल्यामुळे ते निर्माण करत असल्यापासून ते ग्राहकांच्या दारात पोचेपर्यंत सर्व घटकांच्या बाबतीत ही माहितीची निश्चितता आवश्यक ठरली आहे.

याबाबतीत प्रत्येक जनावराची ‘ओळख’, प्रतवारी हा या संपूर्ण मालिकेतला सर्वात महत्वाचा व प्राथमिक घटक आहे. ही ओळख त्या जनावराच्या मालकाने, शेतकऱ्याने, पशुपालकाने दिलेल्या खुणेच्या क्रमांकावरून ठरवण्याची प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. भारतातही सरकारच्या पातळीवर ह्याचे महत्व ओळखण्यात आले असून, दुग्धोत्पादक जनावरांच्या खुणेच्या ओळखीसाठी ही प्रणाली पुरस्कृत केली आहे. मागील साधारणपणे वीस वर्षांपासून तंत्रज्ञानातील विकासासासोबत ह्या प्रणालीतही खूप अद्ययातता आली आहे. या प्रणालीद्वारे विविध अभिनव पद्धतींनी जगभरातील पशुपालक, दुग्धोत्पादक आपल्या ग्राहकांना या माहितीने अवगत करत आहेत. त्यामुळे या व्यवसायातही आवश्यक ती पारदर्शकता आपोआपच पाळली जाते आहे. पण तंत्रज्ञानाच्या या विकासाअगोदर, फार पूर्वी ब्रिटनमध्ये लिलाव केंद्रांत माहितीची निकड भासत असे. आपल्याकडील जनावरांच्या बाजाराप्रमाणेच तिथे जनावरांचे लिलाव होत असत व जनावरे खरेदी करण्यासाठी आलेल्या चोखंदळ ग्राहकांची या माहितीसाठी कुचंबणा होत असे.

मात्र, आता कुठल्याही विक्रीला आलेल्या वस्तुमालाची सविस्तर माहिती देणारी शीघ्रप्रतिसाद संकेतावली – म्हणजे क्विक रेस्पोंस कोड – अर्थात क्यू आर कोड – निर्माण करण्यात आले आहेत. हे कोड्स, त्या वस्तुमालाची माहिती जिथे साठवलेली आहे, उपलब्ध होवू शकते अशा एकात्म स्रोत शोधक संकेतस्थळाशी जोडणाऱ्या द्विमितीचे संकेत असतात. विशिष्ट संश्लेषक यंत्राने ही संकेतावली वाचून तिचा स्रोत अक्षरश: सेकंदात जोडता येतो. आता तर अशा यंत्रांचीही गरज नसून आपली मोबाईलवर असलेल्या प्रणालीने ह्या माहिती असलेल्या संकेतस्थळाची खात्री कुणालाही करून घेता येते. गायींच्या बाबतीत अशा प्रणाली व संकेतावलीचा वापर सर्वात पहिल्यांदा २०१० साली ब्रिटनमध्ये करण्यात आला व लिलाव केंद्रावरील चोखंदळ ग्राहकांच्या कुचंबणेवर यशस्वी मार्ग शोधण्यात आला. गायींच्या शरीरावर एका बाजूला अशा संकेतावलीचे चित्र छापून अशी सांकेतिक माहिती उपलब्ध करून देण्यात यश आले. तथापि, संकेतावलीचे असे चित्र गायींच्या शरीरावर छापण्यासाठी विशिष्ट चापाच्या साच्याचा वापर करण्यात येत. प्रत्येक गायीच्या अशा वेगवेगळ्या छापाचा नमुना तयार करून तो त्याच गायीसाठी वापरण्यात येण्यासाठी जतन करून ठेवणे व लिलावानंतर तो धुवून काढणे हे जिकीरीचे आणि वेळखाऊ होते.

२०१२ साली जून महिन्यात बीबीसी या नामांकित वृत्तसंस्थेने लीसेस्टशायर मधील सोमरबी प्रांतातल्या जेम्स बार्न्स नावाच्या एका दूधउत्पादक शेतकऱ्याच्या प्रयोगाची माहिती जगासमोर आणली. उत्तम प्रतीचे चीज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुधाच्या माहितीसाठी त्याने आपल्या गायींच्या शरीरावर ‘क्यू आर’ कोड्स छापून ग्राहकांना प्रक्रियेने अवगत केले. फ्रेंच शेतकऱ्यांनीही त्याचे अनुकरण करून आपल्या गायींना अशा संकेतचिन्हांनी युक्त करून जाहिरातीची बचत केली.

अमेरिकेत त्यावर अजून एक पाऊल पुढे टाकले गेले. अंडी विक्रेत्याने त्याच्या अंड्यांच्या कवचावर सांकेतिक चिन्ह (‘क्यू आर कोड’) छापून देण्याचा एका कंपनीशी आपल्या करार केला. अशी अंडी जाहिरातीसाठी वापरण्यात आली आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यात ग्राहकांसाठी बक्षिसांची संकेतावली छापली. ही कल्पना कमालीची आकर्षक ठरली, मात्र कायद्याच्या मर्यादांमुळे ती फार काळ चालू शकली नाही.

आता मात्र त्यापुढे जावून या संकल्पनेचा विकास होत, जनावरांच्या सांकेतिक माहितीने युक्त असलेल्या (इयर टॅग) कर्णबाळी निर्माण करण्यात आल्या असून त्याचे हक्कही प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यात केवळ किमतीसाठी वापरण्यात येणाऱ्या उभ्या सांकेतिक रेषांची जागा आता अधिक सविस्तर माहिती देणाऱ्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या ‘क्यू आर कोड्स’नी घेतली आहे. हातातील भ्रमणध्वनीमधील उपप्रणालीच्या साह्याने या संकेतांच्या विसंकेतीकरणाद्वारे त्या जनावराशी संबंधित असलेली माहिती, संकेताशी जोडण्यात आलेल्या संकेतस्थळावरून क्षणात मिळवण्याची सोय झाली आहे. या प्रणालीचा अजून एक सर्वात मोठा फायदा हा आहे, की खोटी माहिती भरण्याचा गैरप्रकार टाळण्यासाठी हस्तक्षेप होवू नये म्हणून जनावराची माहिती भरण्यासाठीही विसंकेतीकरण केल्याशिवाय ती भरता येणार नाही अशी सोय केलेली असते. त्यामुळे ह्यात खोट्या माहितीद्वारे फसवणूक करण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा त्या जनावराची माहिती त्याच्या संकेतावलीने भरली की ती कायमची होते व कुठेही, कधीही, कुठूनही ती मिळवण्याची सोय मात्र झाली आहे.

त्यामुळे या सरकारप्रणीत योजनेत सहभागी होवून शेतकऱ्यांनी एकदाच जुजबी शुल्क भरून मात्र आपल्या जनावरांची माहिती अशी नोंदीकृत करून घेतली पाहिजे. दक्षिण भारतातील एका दुग्धप्रक्रिया करणाऱ्या कंपनीने तीन राज्यांतील गायींची अशी नोंदणी केली आहे.

विशेष म्हणजे, अशा नोंदीकृत माहितीचा फायदा केवळ खरेदी-विक्रीसाठीच होणार नसून पशुवैद्यक सेवा, आरोग्य, वंशावळ व जनुकीय सुधारणा व विकासशी निगडीत माहिती, अशा सर्वंकष माहितीसह उत्पादकनवृद्धीच्या नोंदीसाठीही या माहितीचा उपयोग सहजसाध्य होणार आहे, हे महत्वाचे. याशिवाय, आपल्या देशातील बेवारस जनावरे, अनोंदीकृत जनावरे, निर्वासित व स्थलांतरीत जनावरे यांबरोबरच मांसोत्पाद्नासाठी वापर होणाऱ्या जनावरांच्या माहितीसाठी त्याचा विशेष उपयोग होणार आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसायाच्या नियमनासाठी व सुसूत्रीकरणासाठी हे तंत्रज्ञान विनियोग केल्यास वरदान ठरणार आहे.

 


अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर