पशुपालकांनों!! चारा व्यवस्थापनात कुट्टी मशीनला महत्त्वाचे स्थान

मानवाला दूध जसे जीवनावश्यक असते तसेच जनावरांसाठी चारा देखील खूप अत्यावश्यक असतो. जनावरांच्या शारीरिक वाढीसाठी, प्रजनन क्षमतेसाठी तसेच दूध उत्पादनासाठी सकस व संतुलित आहाराची गरज असते. त्यामध्ये हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य, खनिज मिश्रणे यांचा समावेश असतो. दुग्ध व्यवसायात जवळपास ७० टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावरती होत असतो. प्रत्येक शेतकऱ्याकडे सुरुवातीला एक-दोन गाई म्हशी असतात परंतु त्या विल्यानंतर त्यांची संख्या वाढतच जाते. अशा काळात त्यांच्याकडे व्यवस्थापनासाठी लागणारी सर्वच साधनसामग्री उपलब्ध असते असं नाही जसं की कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, ट्रॅक्टर ट्रॉली, गव्हाण, पाण्याची टाकी, पुरेसे शेड, चाऱ्यांचे कोठार इ. जनावरांची संख्या कमी असल्यावर हया गोष्टी करणे परवडणारे जरी नसले तरी जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व आहारासाठी काही गोष्टी नाकारता येत नाहीत त्यातीलच एकमेव महत्त्वाची सामग्री म्हणजे कुट्टी मशीन ज्याचे दुग्धव्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बहुतांश शेतकऱ्यांकडे पाच पेक्षा जास्त जनावरे नसतात.काही ग्रामीण भागात चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न असल्याने शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या कमी असते त्यामुळे ते चाऱ्याची लागवड बांधावरच करतात.परंतु काही चारा हिवाळ्यामध्ये कमी वाढतो व उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडल्याने उत्पादन घटते तसेच बांधावर चाऱ्याची लागवड केल्याने त्या ठिकाणी मशागत करता येत नाही किंवा खतही घालता येत नाहीत तसेच उन्हाळ्यात शेतातील सर्व पिके निघाल्याने जमीन नांगरलेली असते व बांधाच्या कडेला म्हणजेच त्या चारा पिकाला पाणी देणे अवघड होऊन बसते अशा काळातच चारा टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

अ) जाणून घ्या…काय आहेत? कुट्टी मशीनचे फायदे-तोटे

१) चाऱ्याची कुट्टी केल्यामुळे जनावरांना चारा निवडता येत नाही त्यामुळे आहे त्या परिस्थितीतच तो खावा लागतो.
२) चारा पिकांची कुट्टी केल्यामुळे चिपाडे तसेच काडी कचऱ्याचा प्रश्नच उरत नाही.
३) कुट्टी केलेला चारा वाया जात नाही आणि जरी गेला तरी तो लवकर कुजण्यासाठी मदत होते.
४) जनावरांना त्यांच्या वजनानुसार मोजून चारा देता येतो त्यामुळे जनावरांचे पोट लवकर भरते व परिणामी दूध उत्पादन वाढते.
५) ओल्या व वाळल्या चाऱ्याची सोबत कुट्टी केल्याने उत्कृष्ट खाद्य तयार होते त्यामुळे जनावरांची पचनसंस्था बिघडत नाही परिणामी आरोग्य चांगले राहते.
६) कुट्टी केलेल्या चाऱ्यासोबत दररोज जनावरांना मीठ, खा.सोडा व खनिज मिश्रणे देता येतात.
७) चारा कुट्टी केल्यामुळे कमी जागेमध्ये जास्त चाऱ्याची साठवणूक करता येते.
८) मुरघास निर्मिती ही कुट्टी मशीन शिवाय अशक्य असते.
९) कुट्टी करून जनावराला चारा दिल्यास चाऱ्यातील सर्व पोषणमूल्य जनावराला मिळतात.
१०) कुटी केल्याने जनावराला चारा चावून बारीक करण्यासाठी वेळ कमी लागतो व तोच वेळ रवंथ करण्यासाठी वापरता येतो.

ब) नक्की काय तोटे होतोत? कुट्टी मशीन न वापरल्यास… 

१) जनावरे निवडून चारा खातात त्यामुळे भरपूर चारा वाया जातो.
२) चाऱ्यांच्या देठांतील किंवा चिपाडांमधील पोषकतत्वे वाया गेल्याने ते जनावरांना मिळत नाहीत.
३) जनावरांना चोथा किंवा सुका चारा पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने जनावरांचे पोटही भरत नाही तसेच दुधाला फॅट ही बसत नाही.
४) प्रत्येक जनावरांना त्यांच्या वजनानुसार मोजून चारा देता येत नाही त्यामुळे आहार नियोजन होत नाही.
५) चार्‍यातून निघालेली चिपाडे शिल्लक राहिल्याने ती लवकर कुजतही नाहीत आणि त्याचे लवकर खतही होत नाही.
६) जनावरांना चारा चावण्यासाठी वेळ जास्त लागतो. त्यामुळे रवंथ करण्यासाठी वेळ कमी मिळतो तसेच परिणामी दूध उत्पादन घटते.
७) चारा साठवणुकीसाठी जास्त जागा लागते त्यामुळे शेड व ताडपत्रीचा खर्च अधिक वाढतो.
८) वाळल्या व ओल्या चाऱ्याचे एकत्रित मिश्रण जनावरांना न मिळाल्याने अपचन, पोटफुगी यांसारखे आजार वाढतात.
९) चारा उपलब्ध असूनही मुरघास तसेच टी.एम.आर  करता येत नाही त्यामुळे चारा वाळतो आणि त्याची साठवणूक करावी लागते.
१०) चाऱ्यावर जास्त खर्च झाल्याने दूध विक्रीतून उत्पादनाचा खर्च ही निघत नाही त्यामुळे दुग्धव्यवसाय परवडत नाही.

टीप- पशुपालन व दुग्धव्यवसाय संबंधित आधुनिक माहिती व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन धेनु ॲप डाऊनलोड करा आणि आपला व्यवसाय दुपट्टीने वाढवा.

हेही वाचायला आवडेल तुम्हाला: चारा टंचाई दरम्यान जनावरांचे आहार व्यवस्थापन


नितीन रा. पिसाळ

प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा. लि. भोसरी, पुणे.
मो. नं – 9766678285.
ईमेल-nitinpisal94@gmail.com