चारा टंचाई दरम्यान जनावरांचे आहार व्यवस्थापन

नैसर्गिक आपत्ती  पूर्वसूचना न देता कधीही निर्माण होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती विविध स्वरूपामध्ये आपल्या समोर येऊन उभी राहू शकते. मुख्यत्वे ही सर्व संकटे ‘ग्लोबल वार्मिंग’ मुळे (जागतिक तापमानातील वाढ) निर्माण होतात. अचानक येणाऱ्या या संकटांमुळे अन्न, खाद्य, चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण होते, ज्यामुळे मानवी शरीरावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. अन्नाची तसेच खाद्याची निर्माण झालेली कमालीची टंचाई यांमुळे कुपोषणास प्रोत्साहन मिळते. आवश्यक ती पोषक मूल्ये शरीरास न मिळाल्याने पशुधनाची उत्पादक तसेच पुनरुत्पादक कार्यक्षमता घटते. म्हणूनच, चारा टंचाई दरम्यान प्रथम लक्ष्य नेहमी पशुधनाला उपासमारीपासून वाचविणे व नंतर त्यांची उत्पादकता टिकवून ठेवणे हे असले पाहिजे. सद्य परिस्थिती लक्षात घेता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पशु खाद्य निर्मितीचा कच्चा माल हा जवळपास दुपटीने वाढला आहे. परिणामी पशु खाद्याचे दर देखील वाढले आहेत.

चारा टंचाई दरम्यान आहार व्यवस्थापन

1. पाण्याची गरज:

चारा टंचाई मध्ये पाण्याची पूर्तता किंवा उपलब्धता करून देणे खूप महत्त्वाचे ठरते. पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच विविध पोषण मूल्ये शरीरातील एका भागातून दुसऱ्या भागात ने आण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. मोठ्या जनावरांना पाणी कमी प्रमाणात किंवा ठराविक वेळेस उपलब्ध करून द्यावे. पाणी नियंत्रीत प्रमाणात दिल्यामुळे जनावर खाद्याचे सेवन कमी करते. खाद्य जास्त वेळेसाठी कोठी पोटामध्ये राहिल्याने खाद्याची कार्यक्षमता व पचनक्षमता यांमध्ये सुधारणा होते. पाणी शरीरात नियंत्रीत प्रमाणात गेल्यामुळे मुत्राद्वारे कमी प्रमाणात बाहेर निघते, ज्यामुळे एकाप्रकारे भूकेवर अंकुश निर्माण होतो. याउलट, पाण्याची टंचाई जास्त प्रमाणात निर्माण झाल्यास जनावर डिहायड्रेशन मध्ये जाऊ शकते. यामध्ये शरीरातील प्रथिनांचे कॅटाबोलिझम होऊन कालांतराने मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते.

2. चाफिंग:

जनावरांना खाण्यासाठी पुरेसा चारा उपलब्ध नसल्यास चाफिंग (कुट्टी) प्रकियेद्वारे एरव्ही वाया जाणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण कमी करता येते. चाफिंग न करता दिलेला चारा किंवा पेंढा जनावरांकडून १५ % ते २० % असाच सोडला जातो. या प्रक्रियेमुळे जनावरांच्या निवडक खाद्य घटक खाण्याच्या सवयीला आळा बसतो. योग्य त्या खाद्य कुंडाचा वापर केल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच कुट्टी करून देण्यात येणाऱ्या चाऱ्यामुळे चर्वण करण्यात कमी ऊर्जा खर्च होते व हि ऊर्जा जनावर शरीराच्या मेंटेनन्स साठी वापरू शकते.

3. निर्बंधित आहार:

आहारावर प्रतिबंध आणल्यामुळे शरीरातील प्रक्रियांचा वेग मंदावतो. यकृतामधून मुक्त मेदाम्लांची जास्त प्रमाणात निर्मिती होते, ज्याचा उपयोग स्नायू ऊर्जेचा स्रोत म्हणून करतात. तसेच शरीरामध्ये उष्णता कमी प्रमाणात निर्माण होते यामुळे जनावर पाणी कमी प्रमाणात पिते. परंतु याउलट खाद्यावर प्रमाणापेक्षा जास्त निर्बंध आणले गेले असता यकृताद्वारे ग्लुटामिन ची निर्मिती जास्त प्रमाणात होते, ज्याचा परिणाम संप्रेरकांच्या मात्रेवर दिसून येतो.

4. साठवून ठेवलेल्या चाऱ्याचा वापर:

दुष्काळ किंवा पूर सदृश परिस्थिती दरम्यान खाद्य आणि चाऱ्याची तीव्र कमतरता निर्माण होते मागणी आणि पुरवठ्यातील ही दरी भरून काढण्यासाठी हिरवा तसेच वाळलेला चारा दुसऱ्या भागांतून मागविला जाऊ शकतो. एरव्ही वाया जाणाऱ्या फळे आणि भाजीपाल्यांचे भाग यांचा देखील उपयोग अशा वेळेस करता येतो. तसेच पारंपारिक किंवा अपारंपरिक चारा पिकांचा वापर करून बनवलेले मुरघास चारा टंचाईच्या काळात फायदेशीर ठरते.

5. मुरघासाचा वापर:

उन्हाळ्या दरम्यान निर्माण होणारी चारा टंचाई लक्षात घेता मुरघासाचे नियोजन करता येते. पावसाळ्यात अतिरिक्त चारा वाळवून ठेवला जातो, ज्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होऊन चाऱ्याची गुणवत्ता खालावते. एकदलीय पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे तसेच साखरेचे प्रमाण जास्त असल्या कारणाने चांगल्या परतीचा मुरघास त्यापासून तयार होतो. याउलट द्विदल पिकांच्या चाऱ्यामध्ये प्रथिने व खनिजांची मात्र जास्त असते.

फायदे:

  • कमीत कमी जागेत जास्त प्रमाणात साठवणूक करता येते
  • अधिक कालावधीसाठी चारा टिकवून ठेवता येतो
  • टंचाई च्या काळात दूध उत्पादन टिकून राहते
  • एकाच वेळी पीक काढल्या मुळे जमीन पुन्हा लागवडीसाठी वापरता येते
  • जनावरे मुरघास आवडीने खात असल्याने चारा वाया जात नाही
  • चाऱ्याची पौष्टिकता टिकून राहण्यास मदत होते
  • पावसाळयात हिरवा चारा वाळवून ठेवणे शक्य नसते. तसेच त्यात बुरशी ची देखील वाढ होऊ शकते, अशा वेळेस तयार केलेला मुरघास वापरता येतो.
  • पशु खाद्यावरील खर्च कमी होतो

चांगला मुरघास कसा असावा ?

  • वास: आंबट गोड किंवा आंबूस
  • रंग: फिक्कट हिरवा किंवा तपकिरी
  • सा. मु.: ३.५ ते ४.५
  • पाण्याचे प्रमाण: ७५ ते ८५ टक्के
  • बुरशीयुक्त नसावा

6. हायड्रोपोनिक चारा पद्धती :

दुष्काळाच्या वेळी निर्माण होणारी हिरव्या चाऱ्याची तीव्र कमतरता हायड्रोपोनिक चाऱ्याद्वारे पूर्ण करता येते. कमीत कमी जागेत तसेच कमी पाणी वापरून हायड्रोपोनिक चाऱ्याची निर्मिती करता येते. हायड्रोपोनिक युनिट मध्ये विशिष्ट प्रकारच्या ट्रेझ चा उपयोग करून चारा निर्मिती केली जाते.

फायदे :

  • कमी जागेत व कमी पाण्यात उत्पादन घेता येते
  • चारा टंचाईच्या काळात पोषण मूल्यांचा उत्तम स्रोत
  • रासायनिक खतांचा वापर नसल्यामुळे नैसर्गिक चारा
  • दुधाच्या गुणवत्तेमध्ये चांगला फरक दिसून येतो
  • प्रथिने, सूक्ष्म अन्नद्रव्ये व जीवनसत्त्वांचे चांगले प्रमाण
  • पशु खाद्याची बचत

7. अपारंपरिक खाद्य घटकांचा आहारात समावेश :

यामुळे निर्माण झालेली खाद्याची कमतरता कमी होण्यास मदत होते. तसेच मिळणारे उत्पन्न आर्थिकरीत्या फायदेशीर ठरते. अपारंपरिक खाद्य घटकांचा आहारात समावेश त्यांच्या ठरलेल्या मर्यादेनुसार करावा. जास्त प्रमाणात वापर केल्यास त्यामधील अपोषक तत्त्वे किंवा विषारी घटक जनावरांसाठी घातक ठरू शकतात.

8. युरिया मोलासीस मिनरल ब्लॉक (UMMB):

यामधून जनावरांना नैसर्गिक आपत्ती दरम्यान ऊर्जा, प्रथिने आणि खनिज पदार्थ मिळतात. कोठी पोटातील सूक्ष्म जीवांचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे किण्वन प्रक्रिया नीट होऊन ‘व्होलाटाईल फॅटी ऍसिडस्’ आणि सूक्ष्मजीवांद्वारे तयार होणाऱ्या प्रथिनांचे (मायक्रोबीएल प्रोटिन्स) प्रमाण वाढते.

  फायदे :

  • पाइका विकाराचे प्रमाण कमी होण्यास मदत
  • जनावरांची तब्येत चांगली होऊन शरीरावर चमक येते
  • उत्पादन तसेच प्रजोत्पादन क्षमता चांगली होते

 9.  निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यासाठी यूरिया प्रक्रिया :

पद्धत :

पिकांचे अवशेष, निकृष्ट दर्जाचा वाळलेला चारा, गव्हाचा किंवा तांदळाचा पेंढा, उसाचे पाचट इत्यादी गोष्टी आपण वापरू शकतो.

  • प्रथमतः चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी
  • स्वच्छ व कोरडी जागा निवडून तिथे पोती टाकावीत. यांनतर कुट्टी केलेला चारा यावर पसरावा.
  • १०० किलो चाऱ्यासाठी ४ किलो यूरिया ४० लिटर पाण्यामध्ये मिक्स करावा. नंतर यामध्ये १ किलो मीठ मिसळावे.
  • तयार झालेले द्रावण चाऱ्याच्या प्रत्येक थरावर शिंपडून एकत्र करून घ्यावे.
  • प्रत्येक थरामध्ये युरियाचे द्रावण टाकताना त्यावर दाब देऊन त्यामधील जास्तीची हवा काढून टाकावी.
  • प्रक्रिया झाल्यावर प्लास्टिक किंवा ताडपत्री चा उपयोग करून २१ दिवसांसाठी हवाबंद करून ठेवणे.
  • २१ दिवसांनंतर तयार झालेला चारा आपण जनावरांसाठी वापरू शकतो.
  • उघडल्यावर २ ते ३ तास मोकळ्या हवेत ठेवावा, ज्यामुळे त्यातील अमोनिया वायू निघून जाण्यास मदत होईल.
  • सहा महिन्यांखालील वासरांना देऊ नये.

10. खाद्यपूरकांचा आहारातील वापर :

चारा टंचाई च्या काळात हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण होते. द्विदलीय चारा पिकांमध्ये प्रथिनांचे व खनिजांचे प्रमाण जास्त असते, तसेच एकदलीय चारा पिकांमध्ये कर्बोदके आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. परिणामी जनावरांना या काळात ऊर्जा तसेच प्रथिने पुरेशी प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी आपण विविध खाद्य पूरकांचा आहारामध्ये समावेश करू शकतो. खाद्य पूरकांची आहारातील मात्रा व प्रमाण पशुवैद्यक किंवा पशुआहार तज्ञ यांच्या सल्ल्याने ठरवावी.

11. बायपास फॅट किंवा संरक्षित वसा:

  • फॅट मध्ये कर्बोदकांपेक्षा २.२५ पटीने जास्त ऊर्जा असते. उन्हाळ्यात जेव्हा खाद्य पदार्थांचे सेवन घटते, अशा वेळेस फॅट हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो. जास्त ऊर्जा असल्या कारणाने आहारातील ऊर्जेची घनता वाढते व याचा परिणाम आपल्याला दुग्धोत्पादनावर दिसून येतो.
  • आहारामध्ये साधारणतः ५ ते ७% पेक्षा जास्त फॅट चा समावेश करू नये. यामुळे जनावरांना पचन संस्थेचे विकार होऊ शकतात व फायबर्स चे पचन नीट होत नाही. यासाठी दुसरा उपाय म्हणून आपण “बायपास फॅट” किंवा संरक्षित वसा वापरू शकतो. सदर फॅट हे रूमेन मध्ये इनर्ट राहते व त्याचे पचन आणि शोषण अबोम्याझम (खरे पोट) मध्ये होते.

12. व्हिटॅमिन्स / जीवनसत्त्वे:

हिरव्या चाऱ्याची कमी असल्या कारणाने जनावरांना योग्य त्या प्रमाणात व्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्त्वे (मुख्यतः जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘इ’) योग्य त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. यामुळे जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊ रोग तसेच विकार बळावू शकतात. सदर गोष्टी लक्षात घेता विटमिन्स ची आहारातून पूर्तता करणे बंधनकारक ठरते.

13. बायपास प्रोटीन चा वापर:

बायपास फॅट प्रमाणेच बायपास प्रोटीन चे पचन आणि शोषण रूमेन मध्ये न होता अबोम्याझम (खरे पोट) मध्ये होते. परिणामतः जनावराला प्रथिने जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. दुधातील एस. एन. एफ. वाढीसाठी प्रथिनांची शरीराला जास्त उपलब्धता करून देणे आवश्यक असते.


डॉ. अक्षय जगदीश वानखडे

एम. व्ही. एस. सी. (पशु पोषण व आहार शास्त्र)
फाईन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई
८६५७५८०१७९