देशी गोवंश दुर्लक्षितच!

आपल्या देशात सण आणि महोत्सव साजरे करताना आपण काहीही कमतरता ठेवत नाही. अत्यंत उत्साहाने सर्व सण साजरे करतो, आनंद उपभोगतो आणि तीच आपली संस्कृतीदेखील आहे. दिवाळी सण हा सणांचा राजा. दरवर्षी सलग पाच-सहा दिवस साजरा होणारा हा सण या वर्षी आपण कोविडच्या पार्थ्भूमीवर अत्यंत संयमाने आणि काळजी घेत साजरा करणार आहोत. या मोठ्या सणाची सुरुवात आपल्याकडे गोधन पूजनेने म्हणजे ‘वसुबारस’ने होते. आश्‍विन महिन्यातील वद्य ह्ादशीला गोधन पूजनेने दीपावली सुरुवात होते. घरासमोर रांगोळ्या काढून, महिला मंडळ उपवास करून सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रत्यक्ष गाईची पूजा करतात. जिथे वाढत्या शहरीकरणामुळे गायी उपलब्ध होत नाहीत तिथे मात्र वेगवेगळ्या माती, चांदीच्या प्रतिमा, गाईच्या प्रतिकृती उपलब्ध करून त्यांची पूजा केली जाते. अगदी शेवटी रांगोळी काढून देखील पूजा केली जाते.

अनादिकालापासून गोपालन हे आपल्या देशात केले जाते. भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या उपलब्धतेवर देशाच्या विविध भागांत गोवंशाची निर्मिती होत गेली. पूर्वीच्याकाळी गोधनाच्या संख्येवर कुटुंबाची श्रीमंती मोजली जात होती. गर्ग संहितेत वर्णन केल्याप्रमाणे गो संख्येवरून गोपालकांना पदव्या बहाल केल्या जात असत. पाच लाख गाई सांभाळणारा ‘उपनंद’ दहा लाख गाई सांभाळणारा ‘वृषभानु’ पन्नास लाख गाई सांभाळणारा ‘वृषाभानुवर’ आणि एक कोटी गाई संभाळणारा हा ‘नंदराज’ अशा पदव्या बहाल केल्या जात. महाभारतात पाडवांकडे प्रत्येकी आठ आठ लाख देशी गायीचे कळप होते. विशेष बाब म्हणजे नकुल आणि सहदेव हे पशुवैद्य म्हणून त्यांची देखभाल करत होते, असा सगळा इतिहास आणि माहिती आपण वाचत आलो आहोत.

त्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे केला. आजमितीला जगात ७२५ गोवंश आहेत. आफ्रिका खंडात १२०, युरोप खंडात ३०५ आणि अमेरिका खंडात ११० गोवंश आहेत. आपल्या देशात एकूण ४८ देशी गोवंश आहेत. या गोवंशाचा विचार केला तर सर्व गोवंश हे त्या त्या भागातील हवामान, पर्यावरण, उपलब्ध वैरण त्याला अनुसरून आहेत. म्हणून गीर म्हटल्यानंतर गुजरात, सहिवाल म्हटल्यानंतर पंजाब. राठी म्हटल्यानंतर राजस्थान आणि खिल्लार म्हटल्यानंतर महाराष्ट्र डोळ्यासमोर येतो. म्हणजे त्या त्या भागातील हवामान, पर्यावरण, वैरण त्याच्या प्रगतीला पूरक असल्यामुळे त्यांची वाढ त्या त्या भागात झाली आणि तेथील पशुपालकांनी त्याचा वापर केला.

महाराष्ट्रात देखील खिलार, डांगी, देवणी, लालकंधारी, गवळाऊ या जाती अनुक्रमे सांगली-सोलापूर, नाशिक, लातर. नांदेड. आणि वर्धा हे जिल्हे डोळ्यासमोर येतात. त्याचे ताळमेळ बसेना. या प्रचंड लोकसंख्येला कमी किमतीत पूरक असे अन्न म्हणून दूधपुरवठा करणे आवश्यक होते. त्यामुळे संकरिकरणांचा निर्णय घेण्यात आला. तो प्रचंड यशस्वी झाला आणि आपण दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर पोचलो. संकरिकरणांमुळे देशातील करोडो अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालक हे स्वतःच्या पायांवर उभे राहिले. त्यांच्या एकूणच आर्थिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाले आणि त्यांच्या जीवनात स्थिरता आली हे महत्त्वाचे परिणाम या संकरिकरणामुळे दिसले, याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

भारतासारख्या खंडप्राय देशात अशा प्रकारची योजना राबवताना देशी गोवंशाकडे आणि त्याच्या दूध उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले हे कबूल करावे लागेल. संकरिकरणामुळे काही देशी गोवंशाच्या शुद्धतेवर परिणाम झाला, त्याची संख्या कमी होत गेली. काही श्रीमंत पशुपालक, सेवाभावी संस्था, पांजरपोळ यांचे लक्ष देशी गाईंच्या संवर्धनाकडे वळले आहे. आजही काही प्रमाणात शेतकरी शेती कामासाठी देशी बैल वापरतो. शेणखत, गोमूत्र यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, देशी गाईची रोगप्रतिकारशक्ती, स्थानिक वातावरणाची जुळवून घेण्याची क्षमता, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमामुळे दूध उत्पादन वाढ होण्याची शक्यता आणि पशुपालकांच्या पशुसाक्षरतेमुळे वाढ होण्याची शक्यता आणि पशुपालकांच्या पशुसाक्षरतेमुळे सर्व पशुपालकांनी केलेले व्यवस्थापनातील बदल यामुळे निश्‍चितच येणाऱ्या काळात देशी गाईसुद्धा पशुपालकांच्या दारात मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागतील.

 

Read: जाणून घ्या… शाश्वत दूध उत्पादनासाठी पशुआहारातील खनिज मिश्रणांचे महत्व


Source: The article is extracted from  agrowon.com, November 12, 2020.