गाईचा आराम म्हणजे काय?

अनेक पशु विज्ञान सल्लागार गायीच्या आरामासंबंधी सल्ला देत असतात कारण गाईंच्या आरोग्य आणि उत्पादकतेसाठी तो सल्ला महत्त्वाचा आहे. तेव्हा गायीचा आराम ही संकल्पना समजावून घेऊया.

गाईचा आराम Cow comfortआपल्याकडे दूध देण्यासाठी पाळीव गाई असतात. त्यामुळेच त्यांची काळजी घेऊन त्यांना खाऊ घालणे ही आपली जबाबदारी ठरते. गाईचे शरीरशास्त्र, वैयक्तिक आणि सामाजिक वर्तन आणि सर्वसाधारण कल्याण यावर आधारित गाईच्या गरजांनुसार त्यांना पाळणे हे अपेक्षित आहे. गाईचा आराम याचा खरा अर्थ तिचा निवास, आहार आणि इतर सुविधा यांची रचना शेतकऱ्याच्या नव्हे तर तिच्या (गाईच्या) आवश्यकतेनुसार करावयास हवी. दुर्दैवाने भारतात वेगळ्या समजुती आहेत. आपण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे सुविधा निर्माण करतो आणि मग गाईवर त्या लादतो. अंतिम हेतू जनावराच्या वातावरणातील ताण कमी करून त्याची उत्पादक क्षमता कशी उच्चतम होईल हा असायला हवा. गायीवरील ताण तिची उत्पादक क्षमता (दूध उत्पादनाची) आणि आरोग्य यापासून तिला वंचित करतो. साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सुविधा आणि व्यवस्थापन हे गाईवर कमीत कमी ताण देण्यासाठी समर्पित केले जाते तेव्हाच आपण गाय आरामात आहे असे म्हणू शकतो.

शेतकरी पुष्कळ वेळेला सुविधा आणि व्यवस्थापन यांची त्यांच्या स्वतःच्या गरजा आणि आरामाला सोयीस्कर अशा पद्धतीने रचना करतो. अशावेळी गाईच्या आरामाशी तडजोड होते (म्हणजे तिचा आराम दुर्लक्षित होतो). गाय ही एक समाज प्रेमी जनावर आहे म्हणजेच गाईंना कळपात राहणे प्रिय असते. त्या समाज प्रियता आणि एकमेकांमध्ये मिळून-मिसळून राहण्यास उत्सुक असतात. जर त्यांना तोकड्या बंधनात बांधून ठेवले आणि अलग ठेवले तर त्यांचा आराम नष्ट होतो. सर्व काळ त्यांना बंधन मुक्त ठेवणे (फक्त दूध काढण्याची वेळ सोडून) ही त्यांची प्राथमिक गरज असते. जर गायला आराम वाटत असेल तर दूध काढताना सुद्धा तिला बांधू नये. कारण गायीची कास दूधापासून पूर्ण रिक्त केली तर ते गाईच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.

आधुनिक गायी ह्या जास्त दूध देण्याच्या दृष्टीने प्रजनन केलेल्या असतात, त्यामुळे त्या सर्व दिवसभर आणि रात्री ही सतत खाण्यात, पिण्यात आणि रवंथ करण्यात, विश्रांती घेण्यात वेळ व्यतीत करतात, त्याचप्रमाणे समाजात (कळपात) मिसळून राहत असतात. म्हणून शेतकऱ्याने गाईपासून जास्तीत जास्त दूध मिळविण्यासाठी हे निश्चित केले पाहिजे की वर उल्लेखलेल्या सर्व सुविधा गाईंना जास्तीत जास्त कशा पुरवल्या जातील.

गायीच्या आरामाचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गाईचे स्वेच्छा वर्तन (voluntary behaviour) म्हणजेच गाईंना त्यांच्या मनाप्रमाणे जसे वाटेल तसे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना वागू देणे. उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या सोयीप्रमाणे विशिष्ट वेळेत दिवसातून फक्त दोन वेळाच पिण्यास पाणी देणे हे गाईच्या आराम विरुद्ध आहे. पाणी त्यांना ज्या वेळेस तहान लागेल तेव्हाच उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. (जसं माणसाला लागत त्याप्रमाणे) खाद्य सुद्धा गाईला जेव्हा भूक लागते तेव्हाच त्यांच्या आवडीप्रमाणे उपलब्ध करणे आवश्यक आहे. (नियमितपणे ठराविक वेळीच देण्याचा अट्टाहास नको.)

शेतकऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे की गाय ही एक व्यक्ती आहे जिच्या गरजा शेतकऱ्याच्या स्वतःच्या गरजेपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे गाईंना त्यांच्या गरजांप्रमाणे गरजांचा पुरवठा होणे आवश्यकच आहे. शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे नव्हे ह्या लघु लेखांच्या मालिकेत वेगवेगळे लेखक गाईंच्या आराम याविषयीच्या वेगवेगळ्या पैलू बद्दल आणि ते कसे पुरविता येतील (उपलब्ध निधींच्या मर्यादा राखून) याबद्दल लिहणार आहेत.

कृपया असा गैरसमज निर्माण करून घेऊ नये कि गाईच्या आरामासाठी जादा खर्च करावा लागतो. जो निधी उपलब्ध आहे त्यात असा आराम देता येतो. त्यासाठी फक्त तुमची गाय हे डोळ्यासमोर ठेवावे लागते- तुम्ही स्वतःला ठेवायचं नसते. लक्षात असू द्या की गाईचा आराम ही गरज आहे आणि पर्याय नव्हे.

महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांसाठी ‘अल्प खर्चात गाय निवारा’ स्पर्धा

कृपया स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि मित्रांनाही त्यांसाठी उत्तेजित करा.

Low-Cost Cow-Comfort Housing - Indiancattle.com

डॉ. अब्दुल समद
माजी डीन आणि संचालक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ