पशुपालकांनो जरा आपल्याही चुका जाणून घ्या…
दुग्धव्यवसाय हा वर्षानुवर्षे चालत आलेला पारंपरिक व्यवसाय मानला जातो. शेती आणि पशुपालनाच नातं अगदी घट्ट आहे शेतीला सोबत घेऊन चालणारा व्यवसाय म्हणून ह्या व्यवसायाची ओळख आहे. आपल्याकडे शेतीशी निगडीत विविध जोडधंदे आहेत पण त्यामध्ये इतिहास घडवणारा तसेच माणसांची परिस्थती बदलवणारा हा एकमेव असा जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय होय. दुग्धव्यवसाय हा व्यवसाय दुय्यम जरी वाटत असला तरी शेती इतकाच महत्त्वाचा आहे. मानवाच्या दृष्टीने शेतातील चारा, गवत, पिकांचे शिल्लक राहिलेले अवशेष व जनावरांपासून मिळणारे शेण, गोमुत्र हे टाकाऊ पदार्थ आहेत परंतु याच टाकाऊ पदार्थापासून शेती आणि जनावरांची परस्पर गरज भासते म्हणून शेतीशिवाय पशुपालन व्यवसाय नाही आणि पशुपालन शिवाय शेती व्यवसाय नाही दोन्ही व्यवसाय एकमेकावर अवलंबून असून हे मानवाला मिळालेलं निसर्गाची सर्वात मोठी देणगी आहे. दुग्धव्यवसाय करत असताना दुधाचे अर्थशास्त्र खूप महत्वाचे असते. दुधाचा व्यवसाय चांगला कि वाईट हे दुधापासून मिळणारे उत्पन्न आणि दूध उत्पादनावर होणाऱ्या खर्चावर अवलंबून असते. म्हणजे कमी खर्च आणि जास्त उत्पादन असेल तर तो व्यवसाय फायद्याचा आणि जास्त खर्च आणि कमी उत्पादन असेल तर तो व्यवसाय तोट्याचा हि उघड व्याख्या सत्य आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षात भयंकर महागाई वाढली त्यामुळे जनावरांच्या किंमतीत वाढ झाली चारा, पशुखाद्य, औषधाचे व मजुरीचे दर इतके वाढले कि दुधाच्या उत्पादनाच्या मानाने चारा खाद्यावरील खर्चात वाढ झाली त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आणि पशुपालकांच्या तोंडातून हा व्यवसाय परवडत नाही फक्त शेणचं पाठीमागे राहते हे जरी खरे असले तरी त्यावर तोडगा काढत पुढे जाणे खूप महत्वाचे असते दिवस कसेही आले तरी दुग्धव्यवसायाची अत्यंत गरज भासणार आहे हा व्यवसाय अमर आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना खूप मागणी आहे. त्यामुळे आपणही त्यामागचा विचार करून या व्यवसायामध्ये टिकून राहायचे असेल तर त्यातील बारकावे लक्षात घेऊन त्याचे बारीक निरीक्षण करून गरजेनुसार चांगल्या व्यवस्थापनाची तसेच नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. कोणताही व्यवसाय चांगला चालण्या मागे व बंद पडण्यामागे कारणे असतात त्यामुळे नवीन किंव्हा जुन्या उधोजकांनी खचून न जाता हा व्यवसाय करू कि नको या विचारात न गुंतता या व्यवसायामध्ये दररोज नवनवीन बदल होत असतात. त्यामुळे आपले ओझे अजून कमी होत चालले आहे डिजिटल तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे मजुरांवर होणारा खर्च फारच कमी झाला तो खर्च मशिनरींवर लावल्यामुळे व्यवस्थापन व उत्पादन काढणे अगदी सोपे झाले आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आधुनिक दुग्ध व्यवसायाची अंमलबजावणी केल्यास ह्या व्यवसायात नक्कीच इतिहास घडू शकतो.
जाणून घ्या…पशुपालकांच्या कोणत्या चुकांमुळे दुग्धव्यवसायात होतोय तोटा…
- कृषी किंव्हा पशु विषयक नवीन प्रदर्शने न पाहणे.
- पूर्ण गोठा व्यवस्थापन करण्यात मनाची तयारी न दाखवणे.
- दुग्ध व्यवसायाबद्दलचे अज्ञान, समज व गैरसमज लक्षात न घेणे.
- जनावरांच्या नोंदी न ठेवणे अंदाजे नोंदीवर जास्त फोकस करणे.
- गोठ्यामध्ये जास्त गरज नसलेल्या गोष्टींसाठी खूप खर्च करणे.
- एक व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता ढोबळमानाने व्यवसाय करणे.
- माहिती आणि तंत्रज्ञानाचा दुग्धव्यवसायासाठी वापर करायला न शिकणे.
- दुग्धव्यवसायात दिखाऊपणा करणे व चारा व्यवस्थापनात सारखी धरसोड करणे
- दुग्धव्यवसायाचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास न करणे व सारखे प्रयोग करत बसणे.
- नवीन तंत्रज्ञानावर लवकर विश्वास न ठेवणे सर्वानी वापर केल्यावर विचार करणे.
- गोठ्याच्या व्यवस्थापनामध्ये दुसऱ्याच्या व्यवस्थापनानुसार सारखे बदल करणे.
- जनावरांची निवड व शास्त्रीय प्रजनना विषयीचा अभ्यास नसणे किंव्हा माहिती न घेणे.
- तज्ज्ञांचे सल्ले वेळ निघून गेल्यावर घेणे व त्यानुसार अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणे.
- गोठ्याचा वार्षिक नफा तोटा काढता न येणे किंव्हा तज्ज्ञांकडून शिकून घेण्याची वृत्ती न ठेवणे.
- गोठ्यातील लागणाऱ्या बाबींचा हिशोब न ठेवणे व मजुरांवर गोठ्याची सर्व जबाबदारी सोपवणे.
- नवीन पशुपालकांना आपलाच गोठा फायद्यात नसताना चुकीचे सल्ले किंव्हा माहिती देणे.
- आपल्या चुकांचा अभ्यास न करणे तज्ञांकडून चुका समजवून न घेणे किंव्हा अज्ञान लपवणे.
- दुग्धव्यवसायातील कोणत्याही नवीन गोष्टींबद्दलची मला माहिती आहे या स्वरूपातली भावना असणे.
- आदर्श गोठ्यांना जाऊन भेटी न देणे आपल्याच गोठ्यावरील व्यवस्थापन चांगले आहे अशी चुकीची भावना असणे.
- पशुपालनामध्ये नेहमी आहार किंव्हा औषधांसंदर्भात दर्जा लक्षात न घेता स्वस्त व कमी खर्चिक उत्पादनाची निवड करणे.
- व्यवसायाबद्दल नवीन संकल्पना, नवीन मशिनरीची माहिती, प्रशिक्षणे सॉफ्टवेअरचा वापर इत्यादी शिकण्याची जिज्ञासा नसणे.
- व्यवस्थापनातील काही चुकांमुळे जनावरे आजारी पडतात त्याचा सर्व दोष जनावरांवर देणे त्यामुळे जनावरे विकून टाकून पुन्हा नवीन खरेदी करणे.
(टीप- पशुपालन व दुग्धव्यवसाय संबंधित विविध प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन धेनु ॲप डाऊनलोड करा आणि आपला व्यवसाय दुपट्टीने वाढवा.)
हेही वाचायला आवडेल तुम्हाला : अधिक दूध उत्पादनासाठी पंजाबचे पशुपालक करतात बहुउद्देशीय गोठा तंत्रज्ञानाचा वापर
लेखक
प्रकल्प समन्वयक, (डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी, पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com