कोरोना विषाणु (SARS-CoV-2) – कोविड 19: सद्यस्थिती आणि संभावना

हा प्रदीर्घ लेख आणि माझे इतर सर्वच मराठी लिखाण मी कागदावर उतरवतो. मात्र याचे पूर्ण टंकलेखन (मोबाईल किंवा संगणकावर) करण्याचे मोठे काम माझ्या सुविद्य पत्नी वीणा मांडाखळीकर या गेली कित्येक वर्षे आनंदाने करीत असतात हा कृतज्ञतापूर्वक विशेष उल्लेख येथे करणे अप्रस्तुत ठरु नये.

“Control of a disease takes more than an understanding of the biology of the pathogen. It requires proper Financing, the National will and Strategies for Winning the Public Trust. Disease control also requires Surveillance and Projections of how the infectious agents will spread along with a consistent and equitable application of control measures by a robust health care system.” (Irwin W. Sherman, Univ. California & The Scripps Research Institute, California, In twelve disease that changed our world, Published by American Society of Microbiology Press, @2007)

प्रास्ताविक

प्राणी मानवाच्या परोपजीवी रोगकारक विश्वात सूक्ष्मजीव म्हटले की प्रामुख्याने जीवाणु (Bacteria), विषाणु (Viruses) आणि Prions यांचा समावेश होतो. इतर प्रोटोझोन व परजीवींचा आपण सध्या विचार करणार नाही आहोत, तसेच प्रायाॅन्सही (उदा. मॅडकाऊ डिसीज, स्क्रेपी, सीजेडी इ. रोग निर्माण करणारी जमात) बाजूला ठेवूया. आजच्या काळात बहुतांश सामान्य वैद्यकीय व्यवसायी जिवाणुजन्य रोगांवर ब-यापैकी उपचार करतात कारण त्यासाठी प्रतिजैविके (Antibiotics) उपलब्ध आहेत. लक्षणे स्पष्ट नसलेल्या इतर आजारांचे निदान जर “वायरल” म्हणून झाले तर ताप उतरणारी / वेदनाशामक औषधे, दुय्यम (Secondary) इन्फेक्शन साठी प्रतिजैविके, एलर्जी नियामक औषधे इ. दिल्या जातात. गेली कित्येक वर्षे सर्दीपडसे, एकदोन दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकणारा ताप, अंगदुखी वगैरे इन्फ्लुएंझा ते कोरोना विषाणुंमुळे होणारे आजार हे “वायरल” या गटामध्येच उपचारित केले जात आहेत.

विषाणुंची कार्यपध्दती जीवाणुपेक्षा किंवा इतर सर्व सूक्ष्मजीवांपेक्षा वेगळ्या पद्धतीची असते. ते (विषाणू) एकतर DNA बाळगतात किंवा RNA, पण दोन्ही नाही. त्यांच्याकडे फक्त स्वत:च्या (विषाणुंच्या) अनेक प्रती (Copies) तयार करण्याची माहिती असते (DNA किंवा RNA मध्ये) व या न्युक्लिक आम्लावर एक प्रथिनांचे आवरण असते. काही विषांणुमध्ये या आवरणावर प्रथिने आणि लिपीड यांचे संयुक्तपणे बनलेले अजून एक संरक्षण कवच (envelop) असते. प्रत्येक विषाणुंचे यजमान ठरलेले असतात. वनस्पतींचे विषाणु प्राणी/ मानवात किंवा याउलट जाऊ शकत नाहीत मात्र एका प्राण्यात जाऊ शकणारे विषाणु काही वेळा आपले यजमान बदलून दुस-या यजमान प्राण्यात किंवा मानवात प्रवेश करू शकतात. तेथेही शरीरात घुसण्याचे त्यांचे मार्ग ठराविक असतात तेथे प्रवेश मिळण्यासाठी यजमान प्राणी/ मानवाच्या स्थानिक (Local Immunity) व नैसर्गिक (Natural Immunity) प्रतिकारशक्तीशी त्यांना लढा देऊनच पुढे जावे लागते. ते त्यांच्या यजमानाच्या ठराविक उपयुक्त पेशीत शिरले म्हणजे ते स्वत:च्या अनेक प्रती तयार करण्याच्या मागे लागतात. (यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे) हे करण्यासाठी त्यांच्याकडे जीवाणुप्रमाणे कोणतीही साधनसामग्री किंवा व्यवस्था नसते. फक्त कोडेड माहिती असते.

पेशींची व्यवस्था समजण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण घेऊ या. प्रत्येक पेशी म्हणजे एक घर समजा त्या घराला एक मालक असतो व बाकी काम करणारी मंडळी घरात राहतात फक्त तो मालक स्वयंपाक घरात जात नाही, की त्याला स्वयंपाक करता येत नाही.‌ त्यासाठी तो एक नोकर ठेवतो. त्याचा प्रत्येक निरोप तो ठराविक नोकर प्रत्येक वेळी माजघरात पोंहोंचवतो. या नोकराला पेशीशास्रात messenger RNA (mRNA) म्हणतात. हा विषाणु घरात घुसलेल्या बरोबर स्वत:च्या प्रती तयार करण्यासाठी लागणारी (प्रथिने/ न्युक्लिक आम्ल इ.) सामग्री तयार करण्यासाठी यजमान प्राण्याच्या पेशीतील mRNA चा ताबा घेतो. येणकेन प्रकारेन त्यांचा message बदलून टाकतो व स्वत:ला जे पाहिजे ते त्या पेशींची यंत्रणा वापरून करवून घेतो. हे करतांना काही वेळा गरज असेल तर मूळ पेशींची स्वत:ची उत्पादन क्षमता बंद करून ठेवतो. अशा विषाणुच्या खूप कॉपीज तयार झाल्या म्हणजे एकतर त्या पेशींचे पोट फाडून किंवा त्यातील बाहेर येणा-या नळीवाटे हे नवीन विषाणु बाहेर पडून लगेच दुस-या शेजारच्या पेशीत शिरतात व यजमानाची शरीर यंत्रणा बंद पाडत राहतात.

कोरोना विषाणु पार्श्वभूमी

कोरोनावायरस (येथून पुढे- कोरोना) सुमारे ८० वर्षांपूर्वी (१९४० च्या दरम्यान) प्रथम कोंबड्यांमध्ये सापडला होता. १९६५ मध्ये हा विषाणु मानवालाही घातक असल्याचे सिद्ध झाले. यापूर्वी विषाणुंच्या प्रकारांची माहिती दिली होती. त्याप्रमाणे कोरोनामध्ये फक्त RNA हे न्युक्लिक आम्ल असल्यामुळे याला RNA virus मध्ये वर्गीकृत केल्या गेले आहे. विषाणुंचे वर्गीकरण Order, Suborder, Family, Subfamily, Genus आणि Species अशा क्रमाने केले जाते. त्याप्रमाणे कोरोनावायरिडे ही फॅमिली त्यात कोरोनावायरिने ही सबफॅमिली. यात ४ गट आहेत – अल्फा, बीटा, गामा, डेल्टा या गटांमधून २० हून अधिक विषाणु (कोरोनावायरसेस) आतापर्यंत आढळले आहेत. बीटा गटातील कोरोना विषाणु वटवाघुळाच्या शरीरात राहतात पण त्यांना ते त्रास देत नाहीत. त्यातील ६ विषाणु मानवात रोग उत्पन्न करतात, त्यापैकी ४ हे कमी त्रासदायक असून ते जगभर मानवात सर्दीपडशासारखे‌ श्वसन रोग उत्पन्न करतात. उरलेले दोन सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) आणि मर्स (Middle East Respiratory Syndrome) अती तीव्र श्वसनसंसर्ग आजार निर्माण करत घातक ठरू शकतात. याच गटात हा ७ वा विषाणु आजचा कोरोना आला आहे. सार्स आणि कोरोना सरळ संपर्काने एका व्यक्तिपासून दुस-या व्यक्तिस पसरत जातात. आजचा नवीन कोरोना याला पूर्वी नॉवेल कोरोनावायरस-2019 म्हटले जात होते. त्याला आता WHO ने SARS – Coronavirus-2 ( SARS – Cov-2) असे नांव दिले आहे व यापासून होणा-या आजारास Covid- 19 ( कोरोनावायरस डिसीज- 19) असे म्हटले आहे.

कोविड-१९ चा इतिहास-

चीनमधील एक प्रांत हुबेई ज्यामधे वुहान नावाचे एक शहर आहे जे चीनची राजधानी बीजिंगपासून ७०० किमी दूर आहे.या वुहानची लोकसंख्या १.९० कोटी आणि पूर्ण हुबेई प्रांताची ५.८० कोटी आहे. डिसेंबरच्या सुरवातीपासूनच हुबेई प्रांताच्या दवाखान्यांमध्ये न्युमोनियाच्या ब-याच केसेस येण्यास सुरूवात झाली होती. अधिकृतरित्या पहिला पेशंट १२ डिसेंबर २०१९ ला आल्याचे कळले. डिसेंबरच्या तिसऱ्या – चौथ्या आठवड्यात सार्स विषाणु (जो २००३ – २००५ मध्ये आला होता पण त्यानंतर आढळला नाही) परत आल्याच्या अफवा पसरत होत्या, मात्र वुहान येथे चीनची BSL – 4 level ची मोठी प्रयोगशाळा असूनही वुहानचे अधिकारी गप्प होते. मात्र डिसेंबर अखेर व्हिएतनाम, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि तैवान येथे वुहानहून आलेल्या प्रवाशांमध्ये न्युमोनियाची लक्षणे दिसू लागली तेंव्हा चीनवर दबाव येण्यास सुरुवात झाली.

  1. ३० डिसेंबर २०१९ रोजी वुहान महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने एक Urgent Notice इंटरनेटवरून फिरवली की अज्ञात कारणाने होणा-या न्युमोनियाच्या उपचारांवर सूचना पाठवाव्यात. ३१ डिसेंबरला वुहानच्या दवाखान्यात २७ कसेस व ७ गंभीर अवस्थेत होत्या. आसपासच्या बातम्या, इतर देशांत वुहानचे आजारी प्रवासी आणि प्रसंगाची गंभीरता पाहून WHO ने १ जानेवारी २०२०ला चीन सरकार कडून माहिती मागवली.
  2. २ जानेवारीला वुहान येथील पशुपक्षी मार्केट ( जेथे सापांपासून वन्य प्राण्यांचे अवयवापर्यंत सर्व विक्रीसाठी उपलब्ध असते) बंद करण्याचे व त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले. त्याच दिवशी सिंगापूर सरकारने वुहान येथून येणारी – जाणारी विमानसेवा बंद केली. वुहान येथून पूर्वीच सिंगापूरला गेलेली एक तीन वर्षांची मुलगी आजारी होती. तिला सिंगापूर येथील रुग्णालयाने वुहान न्युमोनियाची केस म्हणून ४ जानेवारीला घोषीत केले.
  3. ५ जानेवारी ला WHO ने घोषित केले की हा रोग एका पेंशटकडून इतर माणसात संसर्गित होत नाही. बर्डफ्ल्यू इन्फ्लूएंझा, सार्स (२००२) ऑडिनोव्हायरस, मर्स (2012) इ. रोग चाचण्या नकारार्थी आल्या होत्या.
  4. तसेच या विषाणुचा उगम पशुपक्षी – मटन बाजाराशी जोडला गेला जेथे वटवाघुळे विकली जात. 7 जानेवारीला एक नवीन कोरोनावायरस चीनच्या अनेक ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌पेशंटस् मधून सापडला आणि हाच विषाणु या रोगाचे कारण आहे असे सांगण्यात आले. मात्र हा रोग आजारी माणसाकडून निरोगी माणसाकडे प्रसारित होण्याची शक्यता कमी आहे व त्यावर अजून संशोधन होण्याची गरज आहे असे सांगण्यात आले.
  5. शेवटी ९ जानेवारीला चायना सेंट्रल टेलिव्हिजन या चीनच्या अधिकृत चॅनल वरून एक नवीन कोरोनावायरस १५ पेशंटस् मधून सापडल्याचे सांगितले गेले.

एवढे होऊन सुद्धा WHO ने वुहानला प्रवासबंदी अथवा चीनमधील व्यापारावर बंधने घालावयाचे ९ जानेवारीपर्यंत नाकारले (WHO does not recommend any specific measures for travelers. WHO Advises against the application of any travel or trade restrictions on China) याउलट त्या रिपोर्टमध्ये चीनची तारीफच केलेली आढळते. (China has strong public health capacities and resources to respond and manage respiratory disease outbreak, Public Health officials (of China) remain focused on continued contact tracing, conducting environmental assessment at seafood market.)

हा कोरोना विषाणु आणि कोविड- १९ एवढ्या लवकर पसरला की यावर संशोधनापेक्षा वृत्तपत्रांचे कव्हरेज जास्त झाले आहे.त्यातील ब-याच गोष्टी अनुमानित, ऐकीव किंवा पूर्वीच्या सार्सच्या तुलनेत बोलल्या जातात. यावरील उपचार आणि प्रतिबंध या दोन्हीबाबत सुरवातीस जे सांगितल्या गेले त्यापैकी बरीच तथ्ये नंतर बदलत गेली. फक्त वृध्दांना होणारा आजार म्हणतांना मुले, तरूण आणि मध्यमवयाच्याही माणसांचा यामुळे बळी गेला. अगदी भारतातल्या राज्यांमधूनही मृत्युदर कोठे खूप जास्त तर काही ठिकाणी खूप कमी आढळतो. प्रतिकारशक्तीबद्दलही असेच आहे. चीनमध्ये एकदा कोविड-१९होऊन गेल्यानंतरही दुस-यांदा त्याच व्यक्तिला पुन्हा कोविड होण्याचेही प्रकार आढळले. आता मिळत असलेल्या माहितीनुसार असे दिसते की दुस-यांदा संसर्ग झाला तरी (चाचणी पॉझिटिव्ह आली) पण विषाणुंचा प्रसार अशा पेशंट्सकडून होण्याची शक्यता नाही.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा विषाणु उन्हाळ्यात राहणार नाही असे म्हणणारे खोटे पडले. इनफ्लूएंझा, स्वाईन फ्ल्यू H1N1, Birdflu H5N9 आणि इतर यांच्या अनुभवावरुन उन्हाळा विषाणुप्रसाराला वर्ज्य नाही हे माहित होते. मुळात संसर्गजन्य विषाणु बाहेर फारसा राहातच नाही तो लगेच यजमानाच्या शरीरात जाऊन बसतो तेथे कसला उन्हाळा अन् कसला हिवाळा. तिच गोष्ट वेगवेगळे केमिकल्स, पीएच् (सामु) आणि वेगवेगळ्या ठिकाणी विषाणु जिवंत राहण्याचा व्हाटसप संदेशाची. पुस्तकी माहिती व्यवहारात उपयोगी पडेलच असे नव्हे. विषाणु केवळ शुध्द स्वरूपात असतांना हे नियम प्रयोगशाळेत तपासलेले असतात. शरीरातील स्राव/ द्रव/ पेशीं बरोबर असतांना त्याचे हे गुणधर्म आपला संसर्ग वाचवू शकत नाहीत. एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवलीच पाहिजे ती ही की हा संसर्गजन्य आजार पूर्णपणे नवा आहे आणि सर्व प्रगत देशांपासून ते WHO पर्यंत कोणालाही याबद्दल फारसे ज्ञान नव्हते आणि ज्या Herd Immunity वर विश्व विसंबून होते ती इम्युनिटी कुठेही कामाला आलेली दिसली नाही. म्हणून माणसांचा संपर्क टाळावा, नाकातोंडाचा अस्वच्छ हाताने स्पर्श टाळावा, कोठेही मळ राहू नये म्हणून शरीराची स्वच्छता ठेवावी, विषाणु एकटा राहतच नाही, तुम्ही मळ, द्रव, धूळ यापासून शरीर (अगदी नखांसहित) स्वच्छ ठेवले की झाले. आपला आहार चौरस असावा, व्यायाम नियमित असावा, व्हिटॅमिन ए, सी आणि डी यांचे प्रमाण वाढवावे म्हणजेच प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी.

कोरोनाविषाणु (SARS – Cov – 2) ची लस –

एकदा COVID 19 या आजाराचे कारण कोरोनावायरस – २ हे नक्की झाले की संशोधन स्तरावर या विषाणुचे सिक्वेंसिंग करण्याची प्रक्रिया जगभर सुरू झाली. सिक्वेंसिंग म्हणजे या विषाणुच्या न्युक्लिक आम्लात (RNA) दडलेली माहिती डिकोड करणे जेणेकरून त्यावरची उपाययोजना योग्य आहे की नाही हे समजते. SARS -CoV-2 याचा पहिला पूर्ण जेनेटिक सिक्वेन्स ११ जानेवारी २०२० ला प्रसिद्ध झाला. या रोगाची ही अभूतपूर्व पसरण्याची क्षमता पाहता एवढी घाई अपेक्षितच होती. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि लस उत्पादक यांची एक सहकारी समिती सीईपीआय (Coalition for Epidemic Preparedness innovation – CEPI) स्थापन करण्यात आली याद्वारे या लस उत्पादकांच्या कार्याचा आणि लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा वेळोवळी घेतला जातो. त्यानुसार ८ एप्रिल २०२० पर्यंतची माहिती उपलब्ध आहे. त्यावेळेपर्यंत एकूण ११५ उमेदवार लशी (Vaccine candidates – म्हणजे पुढे ज्यापासून लस निर्माण होऊ शकते) असल्याचे कळते. त्यापैकी ७८ लशींची कार्यान्वयन प्रक्रिया चालू आहे (तर ३७ लशींबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही) या ७८ पैकी ७३ प्रीक्लिनिकल स्टेजवर आहेत. मॉडर्नाची mRNA-1273, कॅनसिनो‌ बायॉलॉजिकल्स या कंपनीची Ad5-nCoV, इनोवायोची INO-4800 आणि रोनझेन जिनो- इम्युन मेडिकल इन्स्टिट्यूट च्या दोन उमेदवार लशी LV-SMENP-DC आणि Pathogen-Specific aAPC एवढ्या लशी मानवी चाचणी साठी तयार आहे. या लशी (उमेदवार) कशा बनत आ‌हेत ते आपण थोडक्यात पाहू. अगदी पुढे असलेल्या प्रकल्पातील एकूण ४६ लशींची माहिती उपलब्ध आहे त्यावरून २ लशी या पूर्ण विषाणु पण‌ त्याची रोगक्षमता कमी केलेली आहे (Attenuated Virus) आणि १ लस पूर्ण विषाणु घेऊन त्याला मारुन टाकून (Inactivetd Virus) त्यापासून बनली आहे. २२ लशी रिकॉम्बिनन्ट तंत्रज्ञानाने (rDNA Technology) बनवल्या जाताहेत, तर विषाणुचे सुटे भाग (Peptide based, Virus-like particals, RNA etc) वापरुन उर्वरित 21 लशी बनत आहेत.

आतापर्यंतच्या लसीकरणाच्या इतिहासात Attenuated vaccine बहुतेक वेळा यशस्वीरीत्या उपयुक्त ठरतात. तसेच मृत विषांणुपासून बनलेली लस सुद्धा एका मर्यादित (किमान ६ महिने पर्यंत) बचाव करू शकते. rDNA Technology ने बनलेल्या सगळ्याच लशींची खात्री देता येत नाही. फक्त Hepatitis B सारख्या कांही लशी यशस्वी ठरल्या आहेत. पण बरेच शास्त्रज्ञ कोविड-१९ बाबत आशावादी आहेत. प्राथमिक चाचण्यांमध्ये बहुतेक लस उमेदवार सुरक्षित (Safe) असल्याचं आढळले पण त्यांच्या उपयुक्ततेची (Potency) खात्री पटण्यास अजून बरीच विदा (Data) अभ्यासावी लागेल. यातील अनेक लशी या वेगळ्या गटांसाठी उपयुक्त ठरू शकतील. उदा. एखादी लस फक्त म्हाता-या माणसांसाठीच बरी पडेल तर एखादी फक्त मुलांसाठीच, पण आजतरी यावर काही बोलणे श्रेयस्कर ठरणार नाही.

कोरोनाविषाणु सारखा (frequently mutated) स्वत:चे बाह्यरूप बदलणारा विषाणु असल्यामुळे एकदा तयार केलेली लस वर्ष-दोन वर्षात बदलण्याची वेळ येणारच नाही असे नाही. एक लस व्यवस्थितपणे सर्व चाचण्या पूर्ण करून बाजारात येण्यासाठी २-५ वर्षाचा काळ लागतो. कोरोनाची साथ फार मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे कांही महिन्यात लस तयार होते आहे (तरीही डिसेंबर अखेर उपलब्ध झाली तर नशीब) हे चांगलेच पण त्यामुळेच याविषयीच्या सर्व शंकांचे निरसन इतक्या लवकर होणे अशक्य. यापैकी बहुतांश लस उत्पादक हे अमेरिका (36) आणि चीन (14) मधील आहेत,कांही युरोपमध्ये (14) तर कांही आशिया-आॅस्टेलिया (14)मध्ये आहेत. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने आंतरराष्ट्रीय सहकार्याने कोरोना लस उत्पादनात बरीच मजल मारली आहे. आणखीही कांही उत्पादक भारतात लस उत्पादनात उतरले आहेत आणि सध्या सगळ्या जगाचे लक्ष यशाच्या अपेक्षेने सगळ्याच लस उत्पादकांकडे लागून राहिले आहे.

या सर्व बाबीत (भारतात तरी) एक गोष्ट महत्त्वाची आहे. कोविड-19ची आज भीती आहे म्हणून लोक लशीची वाट पहात आहेत, उद्या ही भीती कमी झाली तर तेवढ्या आतुरतेने लस वापरल्या जाईल का? स्वाइनफ्लू लशीचा अनुभव वाईट आहे, त्याची लस आजही उपलब्ध आहे पण बाजारात फारशी मागणी नाही. एका देशात तयार झालेली लस दुसऱ्या देशात परवानगी मिळवण्यासाठी किती वेळ घेईल? लस उत्पादन चालू असतांनाही लस घेणा-याची शारीरिक प्रतिक्रिया (Antibody monitoring) तपासणी आणि त्यावरील संशोधनासाठी खूप प्रयत्न आणि पैसा लागतो. या सगळ्या गोष्टी कोरोनाच्या केसेस कमी झाल्यानंतर होतील का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि काळच त्याचे उत्तर देईल. यानिमित्ताने एक गोष्ट खूप चांगली झाली आहे भारतातील रुग्णालयांना मोठा झटका बसल्यामुळे “काय आवश्यक आहे” याची जाणीव शासनाला (क्रेंद्र व राज्य) झाली आहे. त्यामुळे गेली ७० वर्ष आरोग्य विभागावर केलेल्या गेलेल्या तुटपुंज्या आर्थिक तरतुदीमध्ये आतातरी भरीव वाढ होईल, रूग्णालयांमध्ये अद्ययावतता येईल आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी या दोहोंमध्ये वाढ करण्याची तीव्र जाणीव संबंधितांना होईल अशी आपण आशा करु या.

 

Read: प्रचलित कोरोना व्हायरस ‘कोविद-१९’ ची साथ प्रयोगशाळेतून ?


डॉ. दिवाकर द. कुलकर्णी मांडाखळीकर, परभणी