दुभत्या गाई व म्हशीमधील थंडीच्या ताणाचे व्यवस्थापन

थंडीच्या ताणाचे व्यवस्थापन

आतापर्यंत आपण दुभत्या गाई म्हशींचे उन्हाळ्यातील ताणापासून होणाऱ्या त्रासापासून तसेच दुध उत्पादनातील तफावत ई. चा अभ्यास करीत आलो आहोत. परंतु थंड वातावरणाच्या परिणामापासूनही दुभत्या गायीम्हशींचे संरक्षण करणे क्रमप्राप्त ठरते. थंड वातावरणामुळे जनावरांच्या नाक व डोळ्यातून पाणी येणे, भूक कमी होणे, कापणे ई. लक्षणे दिसतात. संध्याकाळ होताच त्यांना गोठयाच्या आत बांधावे, व त्यांना वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांना बैठकीच्या ठिकाणी कोरडा चारा किंवा पेंडा टाकावा. जास्त थंडी असल्यास, गोठ्यामधेच सावधानता बाळगून शेकोटी करता येऊ शकते. शेकोटी केल्यास धूर व्यवस्थित बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी.

थंड वातावरणात गाई म्हशी व इतर जनावरांना त्यांच्या शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे उर्जा. उर्जेची कमतरता पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापनाची आपण माहिती घेऊ. जास्त थंड वातावरणात जनावरांच्या शरीराची उर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांचे शरीर काही वेळा थंडीने थरथरताना दिसते. अशा वेळेस जर शरीरावरील केस ओले असतील तर उर्जेची गरज अजून वाढते.

कमी होत जाणाऱ्या तापमानाप्रमाणे खाद्यात उर्जेचा स्त्रोत वाढविला तरच दुभत्या गाई म्हशींना थंडीपासून संरक्षण मिळू शकते. अशा वातावरणात जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण सुमारे १० ते २० % पर्यत वाढते, हे वाढलेले प्रमाण जनावरे शरीर स्वास्थासाठी लागणारी अतिरिक्त उर्जा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे दर्शवते. कोठीपोट (रुमेन) पूर्ण भरलेली जनावरे जास्त उर्जा उत्पन्न करून थंडी पासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. थंड वातावरणात असणारी उर्जेची कमतरता लगेच भरून येत नाही, त्यामुळे खाद्यातील कुठलेही बदल हे अतिशय हळू करावे लागतात. उर्जायुक्त खाद्य घटक जनावरांना दुपार नंतर किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावे जेणेकरून त्यांना पचवून निर्माण होणारी उर्जा रात्रीच्या वेळेस कामी येऊ शकेल. त्यामुळे तापमान कमी होण्याआधी आंबवण किंवा पशुखाद्याव्यतिरिक्त उर्जायुक्त घटक जसे मका एक किलो, बायपास फॅट १०० ग्राम ईत्यादी पशुखाद्यासोबत द्यावेत.

वारा व थंडी पासून बचाव करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गायी म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे. जनावरांना दोन कारणांसाठी उर्जा लागते ती म्हणजे शरीर स्वास्थ (मेंटेनन्स) व उत्पादन (प्रोडक्शन). जर शरीर स्वास्थासाठी लागणारी उर्जा कमी पडली तर उत्पादनासाठीची उर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दुध उत्पादनात किंवा फट व एस एन एफ मध्ये घट दिसून येते. कारण या काळात उर्जेची गरज वाढलेली असते. तापमान कमी झाल्यामुळे जास्त उर्जा वापरली जाऊन वजन, प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) खालावतो. अशा वेळी खाद्यात उर्जेचे प्रमाण अतिरिक्त वाढवून दिले पाहिजे.

थंडीच्या ताणामुळे जनावराच्या शरीराची प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे ई. च्या गरजा बदलत नाहीत. एका अभ्यासानुसार घटत जाणाऱ्या १ डिग्री फरनहाईट तापमानाप्रमाणे १ % जास्त उर्जेची पूर्तता पशु आहारातून केली पाहिजे. हि उर्जेची गरज साधारणतः १० ते २५ % इतकी जास्त असते. जनावरांचे जंत निर्मुलन करावे , तसेच ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. पाणी जास्त थंड असल्यासही गाई म्हशी पाणी कमी पितात व त्यामुळे पोटातील आम्लता (ऍसिडिटी) वाढते. व त्यामुळेही उत्पादन व शरीर स्वास्थ्य ई. वर विपरीत परिणाम होतो. शक्य झाल्यास गाई म्हशींना कोमट पाणी पिण्यास द्यावे.

जास्त थंड वातावरणात जनावरांच्या हृदयाची आणि स्वासोचछवासाची गती देखील वाढलेली असते. वाढलेल्या रक्ताभीसरणाद्वारे जनावरे स्वतः चा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. थंड वातावरणामुळे गाई म्हशींच्या शरीराला, सडाना किंवा इतर भागांना लहान तडे जाऊ शकतात व त्यामुळे जखमा होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो म्हणून अशा जखमा होऊ नयेत व झाल्यास लवकर बऱ्या होण्यासाठी खाद्यात चीलेटेड जस्त (झिंक) व बायोटीन युक्त खनिज मिश्रणाचा समावेश करावा व योग्य ते औषध उपचार करावेत

वासरांची विशेष काळजी यावेळेस घ्यावी, गोठयामध्ये वेळोवेळी स्वच्छता करावी व शक्य झाल्यास जीवाणू व विषाणू नाशक द्रव्याने गोठया मध्ये फवारणी करावी जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत.

अशा प्रकारे थंड वातावरणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून दुभत्या व इतर जनावरांचे संरक्षण आपण करू शकतो.


डॉ. पराग घोगळे- ९८९२०९९९६९

पशुआहार व पशुधन व्यवस्थापन सल्लागार आहेत