दुधाळू जनावरांचे हिवाळ्यातील व्यवस्थापन
आता महाराष्ट्रात सर्वदूर तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशुधनाचा अती थंडीपासून बचाव करावा लागणार आहे. आपल्या पशुंसाठी, हिवाळा ऋतू अत्यंत पोषक आणि हेल्दी असतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, मुबलक चारा, हवेतील मध्यम आर्दता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा हितावह ठरतो. तेंव्हा हिवाळ्याच्या तीन ते चार महिन्यात आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे. प्रजननक्रिया सुलभ व नियमित होणे म्हणजे पुढे मिळणाऱ्या वासरू व दुधाची खात्री असते. हिवाळ्यात प्रजननक्रिया योग्य प्रकारे घडल्यास पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासारख्या कडक व प्रतिकूल ऋतूचा जनावरास विशेष अपाय होत नाही.
ज्याप्रमाणे हिवाळा दूधाळू जनावरांना आणि गाभण जनावरांना पोषक आहे त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये जनावरांना खालील आजारांचा धोका संभावतो. यामध्ये संसर्गजन्य आणि दुध उत्पादकतेशी निगडीत आजारांचा समावेश आहे.
- फुफ्फुसदाह (न्युमोनिया) : दुधाळ जनावरांना जास्त वेळ थंडीमध्ये ठेवणे, जनावरांतील दुग्धउत्पादनाचा ताण, वातावरणातील बदल त्यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हा आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य असून विविध जिवाणू श्वसन संस्थेत शिरकाव करून आजार निर्माण करू शकतात.
- लाळ्या-खुरकत (एफ.एम.डी.) : हा विषाणूजन्य आजार दुधाळ जनावरांसाठी अत्यंत धोकादायक असुन याचा प्रसार थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो. म्हणून हिवाळ्याच्या सुरूवातीला एफ.एम.डी. प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
- दूग्धज्वर (मिल्क फिवर) : हा आजार प्रामुख्याने उत्तम दुग्धउत्पादकता असलेल्या दुधाळ जनावरांत विल्यानंतर २४ ते ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळतो. शरिर व दुग्धउत्पादनासाठी आवश्यक कॅल्शियमचा पुरवठा आहारातून न झाल्यास दूग्धज्वर उदभवतो.
- कितनबाधा (किटोसीस) : जास्त दुध देणाऱ्या गायी म्हशींमध्ये त्यांच्या दुग्धउत्पादनाच्या प्रमाणात ऊर्जा पुरविणारे पिष्टमय पदार्थ हे आहारातुन आणि खुराकातून दिले गेले नाही तर हा आजार उद्भवतो. हा आजार प्रामुख्याने जनावर विल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांपर्यंत आढळून येतो.
- पोट गच्च होणे/दुखणे : थंडीमध्ये कमी तापमान असताना जास्त प्रमाणात सुमार चारा खाल्ला व पाणी पिण्याचे प्रमाण घटले की पोट व आतड्यांची हालचाल व मंदावते, शेण पडणे घटते व जनावरांच्या पोटात दुखण्यास सुरूवात होते.
वरील सर्व आजारांवर तज्ञ पशुवैद्यकांकडूनच उपचार करून घ्यावेत व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याला होणारे दुष्परिणाम :
- अती थंडीमुळे त्वचा रूष्ठ होते व त्वचेचे विकार उद्भवतात.
- गोठ्यात जनावरांच्या अंगाखाली पसरलेला चारा, शेण, मूत्रामुळे जनावरांच्या पायाला चिखल्या, जखमा होवू शकतात. चिखल्यामूळे थंडी वाढते.
- वाढलेल्या खुरामुळे जखमा होवून संसर्ग होतो.
- गाईंच्या आरोग्याकडे दूर्लक्ष झाल्यास दूधउत्पादनावर परिणाम होतो.
- आजारी जनावरांची थंडीमुळे प्रतिकारक्षमता खालावते.
- व्यायाम नसल्यास अडचणी येवू शकतात.
- सडांना भेगा पडतात व दुर्लक्ष झाल्यास जंतुसंसर्ग होवून मोठ्या जखमा होतात.
- अतीथंडीमूळे पाणी कमि पितात त्यामुळे पचनसंस्था बिघडते व दुधउत्पादनावर परिणाम होतो.
- दुधाळ जनावरे हिवाळ्यात “पान्हा” चोरतात.
- जनावरांचे स्नायु आखडतात तर काही जनावरे लंगडतात. अतीथंडीमुळे गायींची वासरे गारठून मृत्यूमुखी पडू शकतात.
उपाययोजना :
- थंडी वाढल्याचे समजता, सर्व जनावरे गोठ्यात, निवाऱ्याला घ्यावीत. शेडच्या चारी बाजुला गोणपट किंवा पोत्याचे पडदे लावावेत.
- शेडमधील स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. सकाळचे उन गोठ्यात येवून गोठा कोरडा व निर्जंतूक राहायला हवा.
- जनावरांची बसायची जागा खडबडीत नसावी. शक्यतो बसण्याच्या जागेवर लाकडाचा भुसा किंवा इतर कोणतेही भूसकट असावे.
- थंडीच्या दिवसात जनावरांना धुणे टाळावे व धुवायचे असल्यास दुपारच्या वेळी धुवावे.
- गोठ्याची रचना शक्यतो उत्तर-दक्षिण अशी असावी. जेणेकरून सकाळचे व सायंकाळचे उन गोठ्यात येईल.
- दुध काढण्यापूर्वी गायीच्या कासेची सडे धुत असताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा व दुध काढून झाल्यानंतर थोडेसे खोबरेल तेल चोळावे.
- हिवाळ्यात शारीरिक तापमान संतुलीत ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त प्रमाणात ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा वापर करावा. व नियमीत लिव्हर टॉनिकची मात्रा द्यावी.
- अती थंडीमुळे जनावरे पाणी कमि पितात अशावेळी जनावरांना शक्यतो दुपारच्या वेळी पाणी पुरवावे.
- अती थंडीमुळे बहुवर्षीय चारा पिकांची वाढ हळूहळू होते. या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन करावे. आहारात वाळल्या चाऱ्याचा समावेश असावा.
- हिवाळयातील उच्च प्रजननक्षमतेमुळे जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे हिवाळ्याच्या पोषक काळामध्ये जनावरांच्या सर्व गोष्टीमध्ये जर व्यवस्थीत लक्ष घातले तर हा हिवाळा आपल्या पशुंसाठी खुपच लाभदायी ठरू शकतो
डॉ. ओंकार थोरात
एम. व्ही. एस. सी., पशुपोषणशास्त्र.
ई-मेल आयडी: onkarthorat1602@gmail.com