वासरांचे संगोपन व व्यवस्थापन

वासरांचे संगोपन

वासरांचे संगोपन हे गाय जेव्हां माजावर येऊन लागवड होते तेव्हापासून चालू होते. गर्भधारणा झाल्यानंतर संतुलीत आहार, पुरक आहार, शुध्द व स्वच्छ पाणी, हवेशीर निवारा व आवश्यक लसीकरण या बाबींकडे लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. यावरच पुढील निर्माण होणारी पिढी अवलंबून असते. गाभण काळात संतुलीत आहार व पुरक आहार पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन दिल्यास निरोगी व सशक्त वासरे जन्माला येतात व त्यांची उत्पादन क्षमतासुध्दा चांगली असू शकते.

१) जागा व परिसर

गर्भारपणाचा कालावधी संपल्यानंतर जनावरांस कळा येण्यास सुरुवात होते त्यावेळी गायीस एकांत व हवेशीर ठिकाणी ठेवावे. जागा कोरडी व स्वच्छ असावी. शक्‍य झाल्यास जागा व परिसर निर्जंतूक करावी.

२) वासरांचा जन्म होत असताना घ्यावाची काळजी

वासरु योनी बाहेर आल्यानंतर त्यास हलकेसे आधार देऊन ओढावे व पोते किंवा गोणीवर ठेवावे नाका तोंडामधील चिकट पदार्थ काढून टाकावा व त्यास बैठ्या स्थितीमध्ये गाईसमोर ठेवावे. गाय नव्याने जन्मलेल्या वासराला चाटून स्वच्छ व कोरडे करत असते. त्यामुळे वासराच्या अंगावरील चिकट पदार्थ निघून जातो, त्वचा कोरडी होते व वासराचे रक्ताभिसरण व्यवस्थित सुरु होते. जर कुठे चिकटपदार्थ शिल्लक राहिला तर त्यास स्वच्छ व कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. वासराच्या शरिरापासून ३ ते ५ सेंमी. अंतरावर नाळ बांधावी. लिगेचर खाली साधारण १ ते १.५ सें.मी. अंतरावर नाळ कापून त्या ठिकाणी टिंक्चर आयोडीन, जंतूनाशक द्रावण लावावे व वासराचे प्रथम वजन नोंदवावे. व्यालेल्या गाईच्या जननेंद्रियाचा भाग स्वच्छ, गरम व निर्जुतूक पाण्याने धुवून घ्यावा. तसेच कास व सड धूवून घ्यावेत. हात स्वच्छ व निर्जंतुक पाण्याने धुवावेत.

3) नवजात वासरांना चिक/दुध/कोलस्ट्रम पाजणे

वासरू जन्मल्यानंतर पहिल्या १ ते २ तासात त्यास चिकयुक्त दुध (कोलस्ट्रम) पाजणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रथम वासराच्या तोंडात बोट घालून जिभेची हालचाल करावी. जिभेची हालचाल जाणवल्यानंतर वासराच्या तोंडात गाईचे सड ठेवावे. यावेळी वासरास दुध पिण्याची माहिती नसते तेव्हा सडामधून दोन-तीन स्ट्रीप खाली जमिनीवर टाकून घ्याव्यात व नंतर सड वासराच्या तोंडात द्यावे व चिक पिळावा. वासरू चाटू लागल्यास त्यास चिकयुक्त दुध पिण्यास मदत करावी. या दरम्यान वासरू धडपड करुन उभे राहण्याचा प्रयत्न करते त्यावेळी त्यास उभे करुन दुध पिण्यास मदत करावी. त्यामुळे वासरास चिकयुक्त दुध पिण्याची सवय लागते.

४) चिकयुक्त दुध पाजण्याचे फायदे 

गाय व्याल्यानंतर पहिले चीक/ दुध निघते त्यास कोलस्ट्रम म्हणतात. या चिकयुक्तदुधामध्ये (कोलस्ट्रम) भरपूर प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती असते. त्यामध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेटस, जिवनसत्वे व क्षार असतात. चिकयुक्त दुध पाजल्यामुळे वासराची पचनक्रिया कार्यरत होते, पचलेल्या अन्नघटकांचे शोषण होते व न पचलेले अन्न वा अनावश्यक घटक (चोथा/विष्ठा) बाहेर फेकले जातात. वासराचे दुध पिणे, पचन होणे, मुत्र विसर्जन व विष्ठा बाहेर टाकणे याकडे प्रामुख्याने लक्ष ठेवावे लागते.

वासराचे सुरुवातीचे अन्न म्हणजे आईपासून मिळणारे पहिले चिकयुक्त दूध होय. जन्मल्यापासून पहिले आठ दिवस हे दूध वासरास पाजावे. चिकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये कारण त्यामुळे कधी कधी अतिसार होण्याचा धोका संभवतो. या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती असते. त्यामुळे जंतू संसर्ग होत नाही व शरिराचे योग्य प्रकारे पोषण होण्यास मदत होते. साधारणत: तीन ते चार आठवडेपर्यंत त्याच्या वजनाच्या १ ० टक्के दुध वासरास द्यावे.

५) चारा खाण्यास सुरुवात

अंदाजे तीन आठवड्यानंतर बहुतांशी वासरे गवत, पाला पाचोळा इ. सारखे पदार्थ तोंडात धरुन खाण्याचा प्रयत्न करतात. या कालावधीत ते कार्बेहायड्रेटस्‌ व स्टार्च पचवू शकतात. कमी प्रमाणात दूध मिळत असेल तर इतर पोष्टीक पदार्थ उदा. ताक, दूध, गंजी पातळ करुन खाऊ घालावेत. अगदी सुरुवातीला पाण्याची गरज भासत नाही. मात्र कालांतराने पिण्यासाठी पाणी द्यावे. तीन ते चार आठवड्यानंतर सुकवलेले हिरवे गवत अंदाजे अर्धा ते १ किलोग्रॅम पर्यंत द्यावे व हळू हळू वाढवावे. याशिवाय शेंगाच्या वेलवर्गीय हिरव्या वनस्पती सुकवून देता येऊ शकतात तसेच हळूहळू मुरघास सुध्दा खाद्य म्हणून वापरता येऊ शकते. मुरघास हा मुरलेला चारा असून वासरांना ‘पौष्टिक असतो व वर्षभर उपलब्धद होऊ शकतो तसेच वासरे मुरघास आवडीने खातात.

६) वासरांचे खाद्य : काफ स्टार्टर

साधारणत: तीन महिन्यानंतर वासरे खाद्य खाऊ लागतात. मात्र या वयात वासरांना पुरक आहाराची गरज असते. कारण गवत ब कडबाव्दारे बासरास पुरेसे अन्न घटक मिळत नाहीत. त्यासाठी हळू हळू संतुलित आहार किंवा ‘काफ स्टार्टरचा खाद्यामध्ये समावेश करावा. काफ स्टार्टरमध्ये मुख्यत्वेकरुन शरिराच्या वाढीसाठीची आवश्यक ‘पोषक द्रव्ये असतात (मका, ओटस्‌ ज्वारी, बाजरी सारखे धान्य भरडून त्यामध्ये १०% मोलॅसिस टाकून खाद्य देता येते. काफस्टार्टरमध्ये २२ टक्के सी. पी. व ८० टक्के टी. डी. एन असते. साधारणत: ८ ते १० आठवड्यानंतर वासरांना दूध देणे कमी करुन काफ स्टार्टर व सुकवलेल्या / कोरड्या चाऱ्यावर वाढविले जाऊ शकते. तीन ते चार महिन्यानंतर वासरे आपोआप दुधापासून दूर जातात. मात्र देशी गायींमध्ये काही नर वासरे सहा महिन्यापर्यंत आईसोबत असतात.

७) नवजात वासरांची वाढ

जन्म झाल्यानंतर वासराचे वजन २० ते २५ कि. ग्रॅ. पर्यंत असते. पहिल्या दिवसापासून दर महा वासराच्या वजनाची नोंद ठेवावी. वासराची वाढ योग्य पध्दतीने होते किंवा कसे या कडे लक्ष ठेवावे. दूध पाजणे हळू हळू बंद केले नंतर वासरांना काफस्टार्टर व चारा द्यावा. तसेच संतूलीत आहार द्यावा. हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे, ‘कारण पहिल्या तीन चार महिन्यात वासरांना पुरेसे दुध व संतुलीत आहार न मिळाल्यास ते कुपोषित होतात व इतर संसर्गजन्य रोगास बळी पडतात या कालावधीत साधारणत: २०-२५ टक्के वासरे मृत्यूमुखी पडतात. मात्र याच कालावधीमध्ये वासराची जोमाने वाढ होत असते.

८) जंतनाशके व लसीकरणे

तीन महिन्यानंतर वासरांना जंतनाशके द्यावीत त्यानंतर लाळखुरकूत लस तसेच फऱ्या, घटसर्प ऋतूमानाप्रमाणे नियमीतपणे करावे औषधोपचार व प्रतिबंधात्मक लसीकरण हे नियमीत पणे नोंदणीकृत व तज्ञ पशूवैद्यकाकडूनच करावेत.

९) गोठा बांधकाम 

गोंठ्याचे बांधकाम पुर्व पचिम असावे म्हणजे सकाळचे कोवळे उन मिळू शकेल. गाय व वासरासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. व्यालेल्या अनेक गायी ब वासरे एकत्र ठेवल्यास संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्‍यता असते. गोठ्यामध्ये पुरेसे वायुविजन असावे उन, पाऊस व थंडी या पासून संरक्षण द्यावे.

१०) विविध ऋतूमध्ये घ्यावयाची काळजी

  • पावसाळा – पाऊस लागून वासरे भिजू नयेत म्हणून संरक्षण द्यावे, निवारा कोरडा व स्वच्छ असावा. ओलसर जागी वासरे ठेवल्यास, सर्दी, खोकला व ताप यासारखे आजार होऊन कधी कधी मृत्यू होऊ शकतात. चांगला चारा व स्वच्छ पाणी द्यावे.
  • हिवाळा– थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी निवारा ऊबदार असावा अतिथंड पाणी पिण्यास देऊ नये. निवारा उबदार ठेवण्यासाठी खाली गवताचे बेड किंवा पोते ठेवावे.
  • उन्हाळा – जास्त उष्णता व झळा या पासून संरक्षण मिळणे करिता गोठ्यात पुरेसे वायुविजन / खेळती हवा ठेवावी. पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाणी ठेवावे. डिहायड्रेशन मुळे कुपोषण होऊ नये म्हणून संतूलीत आहार, क्षार व जिवनसत्वे द्यावीत.

११) निकोप वाढीसाठी वासरे निरोगी ठेवणे 

वासरांना जन्मल्यापासून पहिले तीन महिने पुरेसे दूध व संतूलीत आहार द्यावा कारण या काळात वासरांची जोमाने वाढ होत असते. जंतनाशक ओषधे व विविध रोगाचे लसीकरण शेड्युलप्रमाणे करावे. योग्य प्रमाणात हिरवाचारा, वाळलेलला चारा व पुरक आहार द्यावा. यामुळे वासरांना आजार होणार नाहीत व त्यांची निकोप वाढ होऊन ते उत्पादनक्षम होऊ शकतात. कारण आजची वासरे पुढील उत्पादन देणाऱ्या गायी बैल होऊ शकतात. उत्पादनक्षम सदृढ गायी व बैल हे देशाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावू शकतात व देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करु शकतात म्हणून वासराचे संगोपन शास्त्रीय दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे.

Read: ५ जनावराांचा गोठा प्रकल्प अहवाल कसा तयार करावा

 


 

डॉ. के. आर. शिंगल

पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com

 

डॉ. व्हि. एम. भुक्तर

पूर्व पशुसंवर्धन उपायुक्त, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: vmbhuktar55@gmail.com