प्रथिनस्रोत युरियाचा गायींच्या आहारात वापर

युरियाचा गायींच्या आहारात वापर

गायींच्या आहारात युरियाच्या वापराबाबत खूप चर्चा आणि वदंता आहेत. वास्तविकत:, मिश्र व संयुक्त पोट असलेल्या जनावरांसाठी युरिया हा नत्राचा (Nitrogen) अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे. अशा जनावरांच्या कोठीपोटातील सूक्ष्मजीव (विशेषत: जिवाणू) अतिशय सक्षमपणे नत्र शोषून घेतात आणि त्याचे रुपांतर अधिक ऊर्जायुक्त अशा प्रथिनांमध्ये करतात. त्यानंतर या प्रथिनांचे जनावरांच्या मूळ साध्या पोटात पचन होते आणि त्यांचा विविध शारिरीक प्रक्रियांमध्ये उपयोग होतो. युरियामधील नत्राचा जिवाणूजन्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रथिनांत रुपांतर होण्यासाठी मात्र विशिष्ट असे वातावरण व घटकांचे जुळणे आवश्यक असते.

वयोवस्था : अशा घटकांपैकी एक महत्वाचा घटक म्हणजे वय किंवा वयोवस्था. गायीच्या पोटाची विशिष्ट अशी संयुक्त रचना जन्मत: तयार न होता ती हळूहळू विकसित होत जाते. पोटाच्या या वाढीसाठी महत्वाच्या दोन गोष्टी घडत गेल्या पाहिजेत.

  •  गायीला कधी / किती लवकर तिच्या मातेच्या दुधापासून वेगळे करून खाद्य खायला दिले जाते.
  • लहान वयात आजूबाजूच्या जनावरांच्या अनुकरणातून चाराकाड्यांच्या चर्वणामुळे, सुप्तावस्थेतील कोठीपोटाच्या पेशींना वाढीसाठी मिळ्णारी चालना. तथापि, या गोष्टींना समांतर असणारी वयोवस्था म्हणजे शरिराचे साधारणपणे २५० किलो वजन झालेली अवस्था. तोवर मात्र युरियाचा खाद्यात समावेश करता येत नाही. कारण, तोवर पोटाच्या रचनेची, विशेषत: कोठीपोटाची वाढ झालेली नसते. त्यामुळे युरियाचे नत्र शोषून त्याचे शक्तिशाली प्रथिनांत रुपांतर करू शकणार्‍या जिवाणूंचीही वाढ झालेली नसते.

आंबवण प्रक्रिया होवू शकणारे पिष्टमय / शर्करायुक्त पदार्थ :

युरियापासून नत्र वेगळा करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारी ऊर्जा जनावरांच्या कोठीपोटातील जिवाणूंना, जनावरांच्या खाद्यांतील आंबवण्यास युक्त असणार्‍या पिष्टमय, अर्थात शर्करायुक्त अन्नपदार्थांतून मिळत असते. त्यामुळे युरिया व अशा प्रकारच्या पिष्टमय पदार्थांच्या उपलब्धतेमुळे उच्च दर्जाची प्रथिने गायीच्या पोटात तयार होतात. मात्र, आहारात तंतुमय पदार्थांच्या प्रमाणाची कमतरता असल्यास युरियाच्या चयापचयावर परिणाम होवून ते अपेक्षितप्रमाणात होत नाही. त्यामुळे, आहारात तंतुमय घटकांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे.

सहसा, आहारतज्ज्ञ साधारण निकृष्ट चार्‍यात प्रथिनांच्या पूर्ततेसाठी युरियाचा वापर करण्याचा सल्ला देत असतात. मात्र, त्यासाठी पुरेशा  व हमखास उपलब्ध  होवू शकणार्‍या कर्बोदकयुक्त (तंतुमय शर्करायुक्त) घटकांचीही अट असते, हे लक्षात घेतले गेले पाहिजे. त्यामुळे यूरियाचा आहारात वापर, त्यासोबत धान्यखाद्याचा किंवा उसाच्या कडब्याच्या चुइट्यांचा अंतर्भाव केल्यास निश्चितपणे प्रभावी ठरतो. धान्यखाद्याचा अंतर्भाव केल्यास, यूरियाचे प्रमाण साधारणत: १.५  ते ३ टक्के, अर्थात आहाराच्य ऊर्जांकानुसार, असावे. तसेही, बाजारात मिळणार्‍या सेंद्रिय पशुखाद्यात ३ ट्क्के यूरिया असतोच, हे पशुपालकांनी लक्षात घ्यावे.

आहारात्तील इतर प्रथिंने

आहारातील नत्र हे शरीरातील अधिकाधिक प्रथिनांच्या वृद्धीसाठी आवश्यक असते. कोठीपोटातील जिवाणूजन्य प्रक्रियेतून चार्‍यातून मिळ्णार्‍या अल्पप्रथिनांचे अमोनिया व नत्रात विघटन होते. युरियामुळेही नत्राची निर्मिती होते व युरिया, तसेच चार्‍यातून निर्माण झालेल्या या नत्राचे समायोजन एकत्र होते. आहारातील युरियाही नत्राचा स्रोत म्हणूनच समाविष्ट करण्यात येतो. मात्र, कोठीपोटात क्षमतेनुसार त्याचे रुपांतर झाले पाहिजे आणि त्याद्वारे रक्तातील अमोनिया वाढणार नाही, इतकेच त्याचे प्रमाण असायला हवे, हे महत्वाचे सूत्र आहे. (म्हणजे ते इतके जास्त असायला नको, की त्याचे नत्रात रुपांतर करण्याच्या कोठीपोटाच्या क्षमतेपेक्षा जास्त ठरेल आणि त्यातून रक्तातील अमोनियाचे प्रमाण अधिक होईल.)

आहार व आहाराचे प्रमाण :अगोदरच नमूद केल्याप्रमाणे तंतुमय घटकांचे प्रमाण असलेल्या चार्‍यामुळे युरियाच्या पचनाचे आणि त्याच्या नत्रातील रुपांतराचा अपेक्षित परिणाम होण्याच्या दृष्टीने, काही चार्‍यांचा आहारात समावेश करणे लाभदायक ठरू शकते. अशा चार्‍यात – मक्यापासून तयार केलेले मुरघास खाद्य, मक्याच्या किंवा ज्वारीच्या धाटांचा समावेश होतो. नत्रायुक्त घटकांचे प्रमाण असलेल्या पाण्यामुळेही नत्राचा पुरवठा होण्यास मदत होते. आहाराच्या खालील काही सूत्रांचा उदाहरणार्थ वापर करता येईल.

अगोदरच नमूद केल्याप्रमाणे युरियाचा आहारात समावेश किती प्रमाणात करावा याचा विचार करने आवश्यक आहे. साधारणत: जनावरांच्या पोटात प्रथिनांचे विघटन करण्याची क्षमता असते, त्यानुसार उपलब्ध प्रथिने व पिष्टमय / कर्बोदकयुक्त घटकांच्या समान युरियाचे प्रमाण असले पाहिजे.

Urea Feeding

जर प्रथिनांचे प्रमाण चार्‍यात अगोदरच असेल, तर आहारातून युरिया किंवा नत्रजन्य पदार्थ देण्याची गरज नाही. मक्याच्या चार्‍यापासून तयार केलेला मुरघास जनावरांना देताना – २५ किलो मुरघासात २०० – २२५ ग्राम युरिया द्यावा. साधा चारा असेल तर मात्र युरिया देताना, किमान १.७५ किलो मका मिसळल्याशिवाय देवू नये. अशा साध्या चार्‍यात युरियाचे प्रमाण १५५ ग्रामपर्यंतच द्यावे.

भारतात उसाच्या मळीचे गट्ठे वा गोळे जनावारांना चाटण्यासाठी तयार करण्याची पद्धत आहे. यात चार्‍याचे तुकडे व युरिया यांचे मिश्रण असते. काही वेळा यात क्षारांचा, खनिजांचाही समावेश करतात. त्यामुळे अशा चाटणगोळ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण बहुगुणी खाद्य बनते. त्यामुळे युरियाचे प्रमाण काटेकोर ठेवल्यास, ऊर्जायुक्त चार्‍याच्या निर्मितीसाठी कराव्या लागणार्‍या खर्चात चांगलीच बचत होते. शिवाय, युरियामुळे जिवाणूजन्य प्रक्रियांच्या क्षमतेतही वाढ होते, त्याचा अतिरिक्त लाभ होतो, तो वेगळा. मात्र, काही वेळा केवळ युरियाच्या सदोष व निष्काळजीयुक्त हाताळणी, साठवणीमुळे काही अनुचित प्रकार व अपघात होतात. ते टाळले, तर युरियाचा सुरक्षित वापर करणे अवघड नाही.

युरियापासून होणारी संभाव्य विषबाधा :आहारात प्रमाणाबाहेर – म्हणजे अगोदर नमूद केल्याप्रमाणे कोठीपोटातील प्रथिनांच्या जिवाणूजन्य विघटनक्षमतेपेक्षा अधिक – युरियाचे प्रमाण देण्यात आल्यास जनावरांना त्याची विषबाधा होवू शकते. त्याचप्रमाणे, आहारातील युरियाचा समावेश अचानकपणे केल्यासही ती होवू शकते. प्रमाणाबाहेर, अति पुरवठा झाल्यास विषबाधेमुळे जनावरे दगावण्याचीही शक्यता असते. या विषबाधेची लक्षणे लगेच दिसून येतात. कान आणि चेहर्‍याच्या स्नायूंचे आखडणे, दात आपटणे, फेसयुक्त लाळ गाळणे, पोटफुगी, पोटदुखी, लघवीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, जड व कष्टदायी श्वासोच्छ्वासात वाढ होणे, अशकतपणा, तळमळ्णे, ओरडणे, हंबरणे, वेदना व कळा येणे, खुरडणे अशी लक्षणे दिसून येतात. जनावरे सहसा युरियाचा साठा असलेल्या जागी मृत पावलेली दिसतात. युइर्या विषबाधेने मृत झालेल्या जनावरांच्या शवविच्छेदनात कोठीपोटात अतिवायू, फेस दिसून येतो. कोठीरस व श्वसनस्त्रावाचा अमोनियायुक्त गंध येतो. या लक्षणांचे निरीक्षण यासाठी आवश्यक आहे, की युरियाच्या विषबाधेच्या निदानासाठी विशिष्ट खात्रीशीर अशी चाचणी नाही. युरिया विषबाधेची शंका असलेल्या किंवा तत्सम लक्षणे असलेल्या जनावरांच्या रक्ताचे नमुने बर्फाच्छादित स्वरुपात, त्यातील अमोनियाच्या प्रमाणाचे निदान करण्यासाठी रक्त काढल्यानंतर ३० मिनिटांच्या आत प्रयोगशाळेत पाठवले गेले पाहिजेत. तथापि, मृत जनावरांचे रक्त या चाचणीसाठी पाठवू नये.

या विषबाधेवर उपचाराचीही फारशी सोय नाही. जनावराला योग्य पद्धतीने नियंत्रित करता येणे शक्य असल्यास, नळीद्वारे पोटातील हवा काढून घेण्यात येते व साधारणपणे ४५ लिटर पाणी व ५ टक्के अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड किंवा विनेगारचे २ – ६ लिटर द्रावण पाजण्यात यावे. त्यामुळे पोटातील तापमान कमी होवून आम्लता वाढते व अमोनियाचे प्रमाण कमी होते. गरज भासल्यास ही क्रिया २४ तासात पुन्हा करावी. काही उत्पादक व मौल्यवान जनावरांत कोठीपोटाची शस्त्रक्रिया करून निचरा करता येतो.

Read: पशु आहारात केळीच्या पानांचा उपयोग


डॉ. संतोष कुलकर्णी

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर