गोचीड निर्मूलन गायीचं कि गोठ्याचं?

गेल्या ३ पिढ्यांपासून आपण दुग्धव्यवसाय करत आहोत आणि गेल्या ३ पिढ्यांपासून आमच्या गोठ्यात गाईंसोबत गोचिडही आनंदाने राहत आहेत हिच खरी आमची व्यथा आहे. या प्रवाहात नक्की आम्ही गाय सांभाळतोय कि गोचीड हा प्रश्न उपस्थित होणंही स्वाभाविकच आहे. गोचीड निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले नाही असं अजिबात नाही, लोकांनी औषध दिली, लोकांनी जनावरे फवारली काहींनी तर जास्त औषध टाकून किंवा फळबागांची काही औषध वापरून किंवा अघोरी उपचार करून एवढी जनावरं फवारली कि त्या फवाऱ्याने त्यांच्या गाई गेल्या पण गोचीड गेले नाहीत हि फार मोठी शोकांतिका. खरं तर गाईकडे असणारा अमृताचा कुंभ सोडून जो गाईचं रक्त शोषण करतो त्याला गोचीड म्हणतात.

एकदा गोचीड गाईचं रक्त प्यायला लागला कि तो दुग्धव्यवसाय आमच्या बळीराजाचं रक्त आटवतो हे वास्तव आहे. सर्व बाजूंनी विचार केला तर देशात आधीच चाऱ्याची टंचाई भरपूर आहे त्याचबरोबर वाळलेला चारा आणि खुराकाची उपलब्धता कमी आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपण खाऊ घातलेला चारा किंवा ती ऊर्जा १५ ते २० टक्के जंत वापरत असतील तर हा ताळेबंद कसा जुळणार, व्यवसाय कसा परवडणार हे न उलगडणार कोडं आहे. म्हणून या भळभळ वाहणाऱ्या जखमा बऱ्या केल्या पाहिजेत पण यासाठी दर महिन्याला गोचीड निर्मूलन करणं किंवा दर १५ दिवसाला गाई फवारण अजिबात योग्य नाही एवढं करूनही ते गोचीड परत तयार होणारच आहेत.
उगाच फांद्या छाटत बसण्यात काही अर्थ नसतो, बुंध्यावर घाव घातला कि कोणत्याही गोष्टीचा समूळ नाश होतो.

गोचीड निर्मूलनात आपण तिथे कमी पडतो.

  • सर्व बाजूंनी विचार केला कि एक गोष्ट लक्षात येते गाईच्या शरीरावर फक्त ४ ते ५ टक्के गोचीड असतात आणि उरलेले ९५ टक्के गोचीड गोठ्यात असतात. आणि मग बहुतेक शेतकरी इथेच चुकतात.
  • शास्त्रानुसार जास्तीत जास्त गोचीड जर गोठ्यात असतील तर खऱ्या अर्थानं गोचीड निर्मूलन हे गोठ्याचं व्हायला हवं.
  • दोन एकर पडीक पडलं तरी चालेल पण बांध कोरायचाचं अशी काहीशी मानसिकता यातून सांगायचं हेच आहे कि यात जसा फायदा २ एकरात असतो पण माणसाचं लक्ष बऱ्याचदा बांधावर असत तसं फायदा गोठ्याचं गोचीड निर्मूलन करण्यात असतो पण आपण नुसतं गाईंवर लक्ष देतो आणि मग या सर्व गोष्टींमुळे जंतांचं पूर्णपणे निर्मूलन होत नाही आणि मग जनावर सुधारत नाहीत किंवा वारंवार त्या जंतांचं निर्मूलन करण्यातच आपला अमूल्य वेळ वाया जातो.

मग जंत निर्मूलन नेमकं करावं तरी कस???

  • जंत निर्मूलन कारण्याआधी गाईला लिव्हर टॉनिक रोज १०० मिली. या प्रमाणे ३ ते ५ दिवस पाजा आणि मग त्यानंतर ४ ते ५ दिवसाने गाईला जंताचे औषध पाजा. (लक्षात घ्या शेतकऱ्यांनो लिव्हर किंवा यकृत जर कार्यक्षम असेल तरच औषधाचा फरक दिसतो)
  • जंत निर्मूलन करताना जंतांचं औषध पोटातील जंत आणि बाह्यशरीरावरील जंत या दोन्ही प्रकारच्या जंतांवर प्रभावी असेल तर त्याचा जास्त फायदा होतो आणि म्हणून जंताचं औषध या प्रकारातील निवडा. हि पद्धत वापरा.
  • सकाळी उठल्यानंतर गाईला कोमट पाण्यातून जंताचे औषध पाजा व थोडा वेळ काहीही खायला देऊ नका.
  • त्यानंतर दुपारी गाईंवर औषधाची फवारणी करा (लक्षात घ्या फवारणी करण्याअगोदर गाय धुवून काढा त्यानंतर तीच शरीर पूर्ण कोरडं होऊद्या आणि मग केसांची ठेवणं जशी आहे त्याच्या विरुद्ध बाजूने गाय फवारून काढा म्हणजे औषध केसांमध्ये जाईल तिथे असणारे सर्व लहानसहान गोचीड मरतील)
  • बरेच शेतकरी गाय अगदी ओलीचिंब करून आणतात आणि मग औषध फवारतात याचा काही उपयोग होत नाही औषध तसंच निघून जातं किंवा त्याचा शरीरावरील पाण्याबरोबर संयोग होऊन त्याची गोचीड मारण्याची क्षमता कमी होतो. म्हणून या गोष्टी गरजेच्या आहेत.
  • गाई फवारल्यानंतर त्यांना दुसरीकडे बांधा व पूर्ण गोठा फवारून घ्या.

गोठा फवारताना औषधाचं प्रमाण वाढवा (बऱ्याचदा शेतकरी गोठा फवारायचं ना मग एवढं औषध कशाला थोडंसं घे असं अजिबात करू नका, जर औषध कमी असेल तरीही खालचे गोचीड किंवा अंडी मरत नाहीत) दावणीला मोठे मोठे लाकडी ओंडके टाकणे, लाकडी खुट्या ठोकणे हे प्रकार अजिबात करू नका या लाकडांच्या भेगेत जास्तीत जास्त गोचीड अंडी घालतात. सिमेंटची गव्हाण असेल तर त्या विटा प्लास्टर केलेल्या हव्यात नाहीतर त्यातही गोचीड अंडी घालू शकतात. वाळलेल्या शेणाच्या पोहाखाली देखील खूप अंडी असतात (चित्रातील पहिला फोटो वाळलेल्या शेणाच्या पोहाखालील आहे) गोठ्याच्या कडेला असे काही वाळलेले शेणाचे पोह आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात. अशा ठिकाणी असणाऱ्या अंड्यांपर्यंत औषधाचा फवारा जात नाही आणि त्याचे पुन्हा गोचीड तयार होतात. म्हणून एकदा गोठा फवारून झाला कि उसाचं पाचट किंवा सरमाड याचा चांगला अर्धा फूट जाडीचा गोठ्यात थर द्या व गोठा जाळून काढा.(ज्यांच्याकडे सपराचे किंवा लाकडी पाचटाचे गोठे असतील तर हा प्रयोग टाळावा किंवा सांभाळून करावा) याव्यतिरिक्त भिंतीच्या भेगा, गव्हाणीच्या भेगा यासाठी एक फायरिंग स्टोव्ह मिळतो त्याची लांब ज्योत तयार होते. त्या स्टोव्हच्या साहाय्याने या भेगातील अंडी जाळून काढावी. लक्षात घ्या एक गोचीड रोज अर्धा मिली रक्त पितो आणि एक मादी गोचीड सुमारे ४५०० अंडी घालते म्हणून गोचीडाबरोबर त्यांची अंडी जाळंण नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून जर हे सर्व उपाय आपण एका दिवशी जर केले नाहीत तर गाईच्या शरीरावरील गोचीड मरतील पण गोठ्यात शिल्लक राहतील, गोठ्यातील मरतील तर परत गाईवर शिल्लक राहतील, दोन्हीकडील मरतील तर त्या भेगांमध्ये शिल्लक राहतील, भेगांमधील मरतील तर वाळलेल्या शेणाच्या पोहांखाली राहतील म्हणून

संपूर्ण निर्मूलनासाठी एकाच दिवशी खालील प्रयोग करणे

१) गाईंना जंतांचे औषध पाजणे/देणे.
२). गाई फवारणे
३). गोठा फवारणे
४). गोठा जाळून काढणे

आणि सर्वात महत्वाचं शेजारी शेजारी गोठे असतील तर हा प्रयोग एकाच दिवशी दोन्ही किंवा जास्त शेतकऱ्यांनी करणे गरजेचे (सामूहिक जंत निर्मूलन) आहे नाहीतर पुन्हा त्या गोठ्यावरचे गोचीड आपल्याकडे येतील आणि ही परंपरेची फवारणी अशीच चालू राहील. ज्यांच्याकडे मुक्त गोठे आहेत आणि गोचीड पण आहे त्यांनी गोठ्यात ४ ते ५ गावरान कोंबड्या सोडाव्यात. या पद्धतीने जर आपण गोचीड निर्मूलन केलं तर आपल्या गोठ्यात कधीही गोचीड दिसणार नाही हि सगळ्यात महत्वाची गोष्ट. दर ३ महिन्याने जनावरांना लिव्हर टॉनिक द्या, दर ३ महिन्याला जनावरांना जंताचे औषध द्या.

(टीप – गाभणकाळात कोणते जंताचे औषध द्यावे यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा) गोठ्यात प्रकाश यायला हवा दिवसाही अंधार असतो अशा बंदिस्त पद्धतीचे गोठे करणे टाळावे व मुक्त गोठे तयार करावेत.


डॉ. के. आर. शिंगल

पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com