जनावरांचे उन्हाळ्यांतील व्यवस्थापन

जनावरांचे उन्हाळ्यांतील व्यवस्थापनाला विशेष काळजी घ्यावी लागते. वायव्य भारतातील उन्हाळे अत्यंत उष्ण आणि लांबलचक असतात. येथे वातावरणाचे तापमान 45 अंश सेल्सीअस पेक्षाही जास्त असते. या हवामानात तणाव खुप वाढतो. दुध उत्पादनाचे कार्य व जनावरांची पचनसंस्था यावर तणावाचा खूप विपरित परिणाम होतो. या मोसमात नवजात जनावरांच्या बाबतीत एखाद्या अनावधानाने केलेल्या जपवणुकीच्या चुकींमुळे त्यांच्या भविष्यांतील वाए, रोगाचा अवरोध करण्याची शक्ति आणि उत्पादन क्षमता क्षीण होवू शकते. पशुपालनांमधे चुकीची काळजी घेतल्यामुळे उन्हाळ्यात जनावर 10 ते 30 टक्के कोरडा चारा कमी खातात व त्यामुळे 10 टक्क्यांपर्यंत त्यांची दुध देण्याची क्षमता कमी होवू शकते. या शिवाय जादा उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या प्राणवायुच्या संयोगाच्या (oxidative) तणावामुळे (stress) जनावरांच्या रोगांशी लढण्याची क्षमताही कमी होते आणि त्यामुळे पुढील पावसाळी मोसमांत वेगवेगळ्या रोगांना ते बळी पडण्याची शक्यता वाढते. अशामुळे उत्पादन आणि पुनुरूत्पादनाची कार्यक्षमता कमी होते. उन्हाळ्यात वळूंची प्रजोत्पादन क्षमता प्रतिकूलपणे प्रभावित होते. वळूच्या वीर्याची प्रत आणि परिमाण घसरते आणि त्यांची कामवासनाही मंदावते. हे परिणाम रेड्यांमध्ये जास्त प्रमाणंत दिसतात कारण त्यांच्या कातडीचा काळा रंग आणि कमी केस यामुळे उष्णतेचे निस्सारण होत नाही (उष्णता शरिरात जास्त शोषली जाते.) त्याशिवाय म्हशींमध्ये धर्मग्रंथी गाईंपेक्षा कमी असतात व त्यामुळे त्यांच्या त्वचेवाटे उष्णतेचे उत्सर्जन कमी होते. गरम हवामानांत गाईंच्या मासिक पाळीची वेळ आणि तीव्रता या दोन्हीमध्ये कमतरता येते आणि त्यांची पाळी बंदही होवू शकते. उन्हाळ्याच्या वाईट परिणांमध्ये उतार पाडण्यासाठी आणि उत्पादकता टिकवून धरण्याला मदत करण्यासाठी तथा पुनरूत्पादनाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी जनावरांसाठी खालील पावले उचलणे आवश्यक आहे.

  1. घसरडे प्रतिबंधक सीमेंट काँक्रिट जमीन, मुत्र व पाणी यांचे निसरण करण्यासाठी उताराची केलेली अशी असलेले स्वच्छ आणि खेळती हवायुक्त निवारा जनावरांना पुरवणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जादा उष्णता निर्मिती टाळण्यासाठी उष्णता निरोधक असलेले छत जनावरांच्या गोठ्याला पुरविणेही आवश्यक आहे. यासाठी ‘ॲसवेस्टॉस’चे पत्रे वापरावेत. अतिशय गरमीच्या दिवसांत 4 ते 6 इंच जाडीच्या गवताने छत शकारावे. हे गवतीथर उष्णता निरोधक म्हणून कार्य करतात व त्यामुळे जनावरांच्या गोठ्यांत आतल्या बाजूचे तापमान कमी राहते. पांढरा रंग दिल्यामुळे किंवा छतावर चकचकीत अल्युमिनियमचे पत्रे लावल्याने सुर्यप्रकाश परावर्तित करण्यास मदत होते.  जनावरांच्या गोठ्याची उंची कमित कमी दहा फूट ठेवल्यास हवा खेळती रहाण्यास व छताच्या उष्णतेपासून जनावरांचे रक्षण होते. खिडक्या, दारे आणि इतर खुल्या जागा ह्या गोठ्यांत पोत्यांनी झांकून त्यावर पाणी मारल्यास आणि तसेंच त्यांत पंखे लावल्यास उपयोग होतो. म्हणून शक्य असेल तर पंखे जरूर लावण्याची सोय करावी.
    गोठ्यांमध्ये जनावरांची गर्दी करून नये. प्रत्येक जनावराला त्याच्या आवश्यकते नुसार जागा पुरेशी मिळावी. प्रौढ गाय आणि म्हैस यांना 40 ते 50 चौ. फुट प्रत्येकी मिळणे आवश्यक आहे. मोकळ्या घरांच्या पद्धतीमध्ये 35 ते 40 चौ.मीटर मोकळी जागा व 7 आणि 8 चौ. मीटर छतयुक्त क्षेत्र गाय व म्हैस यांना मिळावी. प्रगत गरोदर पणाच्या स्थितीतल्या आणि विण्याच्या जवळ पोहोचलेल्या जनावरांना 12 चौ. मीटर झांकलेली व मोकळी जागा पाहिजे. पैदाशीच्या वळूलाही 12 चौ.मीटर झांकलेली व मोकळी आवश्यक आहे की जेथे त्यांच्या पैदाशीच्या सुप्तशक्तीला टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम करण्यासाठी वाव मिळेल.
  2. जर वातावरणांतील तापमान जास्त असेल तर जनावरांच्या आंगावर 3 ते 4 वेळा गार पाणी फवारावे. शक्य असल्यास म्हशींना निवांत डुंबण्यासाठी डबक्यांवर किंवा तलावांवर घेवून जावे. प्रयोगांतून हे सिध्द झाले आहे की, दुपारी जनावरांवर थंड पाणी फवारल्यास त्यांचे उत्पादन आणि पुनरूत्पादक शक्ति यांची वाढ होण्यास मदत होते.
  3. जनावरांचे चारा खाणे उन्हाळ्यात मंदावते. जेव्हा शरिराच्या तापमानापेक्षा बाहेरील वातावरणाचे तापमान जास्त असते तेंव्हा जनावरे कमी कोरडा चारा खातात कारण सुख्या चाऱ्याचे पाचन करण्यासाठी खूप उष्णता निर्मिती होत असते. म्हणून जनावरांना फक्त सकाळी किंवा संध्याकाळी एकदा हिरवा चारा द्यावा. या परिपाठाचे दोन फायदे आहेत, एक म्हणजे जनावरांना हिरवा चारा आवडतो. त्यामुळे ती पुरेसा चारा खातात आणि दुसरे म्हणजे हिरव्या चाऱ्यांत 70 ते 90 टक्के पाणी असते. त्यामुळे वेळोवेळी पाणी पुरवठा आपोआपच होतो. जर जनावरे चारण्यासाठी कुरणावर नेत असतील तर त्यांना फक्त सकाळी वा संध्याकाळी एकदाच न्यावे. उन्हाळ्यांत हिरवा चाऱ्याचा पुरवठा करण्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मूग, मका, चवळी यांची पेरणी करावी. ज्या गोपालकांकडे सिंचनाखालील जमीन नसेल त्यांनी वेळच्या वेळी सच हिरवे कुरण-गवत कापून ठेवून वाळवून साठा करून ठेवावे. हे गवत भरपूर प्रथीनेयुक्त, पचण्यास हलके आणि पौष्टिक असते.
  4. उन्हाळ्यांत जनावराची भूक मंदावते आणि तहान वाढते. त्यासाठी जनावरांना दिवसातून तीन वेळेला पुरेल इतक्या पाण्याची तरतूद करावी. आणखी त्यांत (पाण्यांत) थोडेसे मीठ आणि (धान्याचे) पीठ मिसळून द्यावे. त्यासाठी पाण्याची टाकी सावलीच्या जागी बांधवी. दिवसा पाणी गरम होवू नये म्हणून पाण्याची पाईप लाईन व नळ उघड्यावर सुर्याला (उन्हाला) खुली न ठेवता जमिनीत गाडलेली असावी. जनावरांना गार पाणी पुरवठ्यासाठी मातीचे रांजण वापरावेत.
  5. जनावरांच्या गोठ्यांच्या सानिध्यांत सावलीची झाडे असावीत. झाडे जनावरांना फक्त सांवलीच पुरवित नाहीत तर उन्हाळी गरम वाऱ्यापासून संरक्षणही पुरवितात.

उन्हाळ्यांतील ‘उष्माघात’ आणि उष्माघाताचे निवारण 

उष्माघाताची लक्षणे आणि परिणाम:

उन्हाळ्याचे वाईट परिणाम जरी जनावरांच्या सर्व प्रजातीत दिसत असले तरी गाई, म्हशी आणि कोंबड्या या जास्त प्रमाणांत परिणमीत होतात. कोंबड्यांमध्ये धर्मग्रंथी अस्तित्वांतच नसल्यामुळे आणि शारीरिक तापमान जास्त असल्यामुळे (1070 फॅ.) आणि म्हशींमध्ये काळा रंग, कमी संख्येने धर्मग्रंथी असणे आणि विशिष्ट अंतरस्त्रावांचे प्रमाण यामुळे त्यांच्यामध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते.

उष्माघातामध्ये खालील लक्षणे दिसून येतात.

  1. जनावराची भूक नष्ट होते.
  2. दुधावरील जनावरांमध्ये दुधावरून उडणे.
  3. नाकांतून रक्तस्त्राव होणे व हागवण लागणे.
  4. नाक व डोळे तांबडे होणे आणि ह्रदयाचे ठोके वाढणे.
  5. जनावरांचा श्वास खोलजाणे आणि धाप लागणे. जीभ तोंडा बाहेर लोंबणे. तसेच श्वास मंदावणे (विशेषत: शेवटच्या घटकेला)
  6. जादा लाळ गाळणे आणि तोंडातून फेस गळणे.
  7. जनावराने अस्वस्थता दाखविणे, सांवली शोधणे आणि खाली वसायला त्याला न आवडणे.
  8. मंद आणि मरगळलेली जननक्रिया : उन्हाळ्याच्या ऋतूंत म्हशींची आणि संकरित गाईंची जनन प्रक्रिया मंदावते. त्यांची मासिक पाळीचा काळ लांबतो. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता ही कमी होते.
  9. गाई-म्हशींच्या दुधांतील चरबी व प्रथीनांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता घसरते.
  10. गाई-म्हशींच्या गर्भपातांमध्ये वाढ होते.
  11. जनावरे विक्रत वागणूक दाखवितात.
  12. नर जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते.
  13. वीर्यांतील शुक्राणूंची मर्तुक वाढते.
  14. नर व मादी या दोघांचे पौगंडावस्थेत येण्याचे वय वाढते.
  15. गर्भावस्थेती मृत्यूसंख्येचा दर वाढतो.
  16. सुयोग्य काळजी व उपचारांच्या आभवामुळे जनावराचा मृत्युही होवू शकतो.

उष्माघाताचे प्रतिबंधन:

उष्माघातापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. खाली नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना दुधावरील जनावरे आणि नवजात वासरांचे उष्माघातापासून आणि इतर रोगांपासून रक्षण करण्यासाठी व त्याच प्रमाणे दूध उत्पादन वाढविण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे.

  1.  हवेची हालचाल मोकळेपणे होण्यासाठी योग्य मोकळी जागा सोडून जनावरांचा गोठा बांधणे आवश्यक आहे.
  2. जनावरांचे सुर्यकिरणांपासून तडक संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला खस किंवा तागाचे पडदे लावणे चांगले.
  3. जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पंखे, कुलर्स आणि पाण्याचा छिडकावा करणारे स्प्रिंकलर लावावेत. पंखे आणि कुलर्समुळे तापमान 10 अंश सेंटीग्रेडने कमी होते. गोठ्यांमधील वापराचे पंखे 36 ते 48 इंची पात्यांचे असावेत ते भिंतीवरती जमिनीपासून 5 फूट उंचीवर 30 डिग्री कोनांत बसवावेत. कुलरमुळे 20 चौ. फुट क्षेत्र अत्यंत थंड राहू शकते.
  4. गोठ्याचा सभोवतीच्या मोकळ्या जागेंतील सावलीच्या वृक्षांमुळे तापमान कमी करण्यासाठी उपयोग होतो.
  5. पुरेसे पिण्याचे पाणी नेहमी उपलब्ध असावे. पिण्याचे पाणी सावलीच्या जागेत सांठवावे.
  6. शक्य तर दूध काढून झाल्यावर जनावरांला मिळेल अशी व्यवस्था असावी.
  7. उन्हाळ्यांत 3 ते 4 वेळेस थंड पाणी द्यायची व्यवस्था असावी. जर गोठ्यांत जास्त जनावरे असतील तर निदान 2 ठिकाणी पाण्याची व्यवस्था गैरसोय टाळण्यासाठी करावी. सर्वसाधारण पणे दर तासाला एका जनावराला 3 ते 5 लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते. पिण्याच्या पाण्याच्या पन्हाळी (ट्रक) आणि त्यांतील पाणी नेहमीच स्वच्छ असावे.
  8. पन्हाळी (ट्रक) नेहमी नियमितपणे चुन्यांने स्वच्छ कराव्यात. जनावरांना स्वयंपाकघरातील खरकटे अन्न देवू नये.
  9. जनावरांना पीठ, पाव (ब्रेड), तांदूळ इत्यादी कर्बोदकयुक्त मोठ्या प्रमाणत (कार्बोहायड्रेट युक्त) पदार्थ खाऊ घालू नयेत. धान्य आणि चारा यांचे प्रमाण 40:60 असे ठेवावे.
  10. उन्हाळी ज्वारीमध्ये विषारी द्रव्य जादा असू शकते, जे की जनावरांना बाधक असते. म्हणून पाऊस नसतांना ज्वारीची ताटे 2 ते 3 वेळेस धुवून मगच जनावरांना खाऊ घालावीत.
  11. जनावरांच्या चाऱ्यात 18 ते 19 टक्के विरघळणारा तंतूमय पदार्थ (फायबर) असावा. त्याच प्रमाणे जनावरांच्या खाद्यांत पूरक म्हणून यीस्ट (खमीर) चा समावेश असावा. त्याच प्रमाणे त्यांत ‘ॲस्परजिल्लस ओरायसे’ (e.g. Aspergilus oryzae) सारख्या बुरशीचा आणि ‘नीॲसीन’ (niacin) सारख्या जीवनसत्वाचाही समावेश असावा.
  12. धान्याचा अन्नांतील समावेश उन्हाळ्यांत कमी झालेला असल्यामुळे जनावरांना मोहोरीची पेंड, कपाशीचे बी, सोयाबीनची पेंड, किंवा तेल वा तूप इत्यादी चरबीयुक्त पदार्थ खाऊ घालावेत. जनावरांच्या खाद्यांत 3 टक्के पर्यंत कोरडा पदार्थ असतो. त्या व्यतिरिक्त 3 ते 4 टक्के चरबी अतिरिक्त द्यावी. एकूण 7 ते 8 टक्क्यांपेक्षा जास्त चरबीची टक्केवारी असू नये.
  13. उन्हाळ्यांत दुधावरील जनावरांत 18 टक्के पेक्षा जास्त प्रमाणांत प्रथीनांचा वापर खाद्यांत करू नये. जास्तीची प्रथीने मूत्रावाटे आणि घामावाटे बाहेर फेकली जातात. दुग्धेपादन टिकविण्यासाठी कॅलशियमच्या दगडाचा समावेश खाद्यांत करावा.
  14. जनावरांमध्ये गळाघोटू (H.S.) लाळ्या रोड (FMD) आणि फऱ्या रोग (B.G.) इत्यादी रोगांच्या लशी (Vaccines) उन्हाळ्यांत टोचावीत: म्हणजे पावसाळ्यात या रोगांचा प्रादुर्भाव जनावरांत होणार नाही.
  15. उष्माघात जनावरांत होवू नये म्हणून गुरांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट आहे.

लेखक 

डॉ. मुकेश कुमार श्रीवास्तव
साहाय्यक प्राध्यापक (पशुरोग औषधी विभाग)
पं. दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान
विश्वविद्यालय, मथुरा, उत्तर प्रदेश

अनुवादक

डॉ. शरदकुमार विष्णू पंडित
जेष्ठ वैज्ञानिक, निरंजन बायोटेक, नांदोशी,
पुणे.