गायींना गोठ्यात किती जागा मिळाली पाहिजे?

गोठ्यात जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी याबाबत बऱ्याच अंशी आणि अनेक ठिकाणी दुर्लक्ष असल्याचे जाणवते. त्यासंबंधीच्या माहितीतही खूप वैविध्य पहायला मिळते. त्याबद्दल खूप गैरसमजही ऐकायला व पहायला मिळतात. अनेक ठिकाणी जनावरांसाठी अत्यल्प जागा असते. अधिक जनावरे असलेल्या गोठ्यात तर अनेकदा त्यांची कुचंबणा होताना दिसून येते. काही ठिकाणी जनावरे इतक्या दाटीवाटीने उभी असतात, कि एकमेकांना घासून त्यांना जखमा होतात. त्यांना गोठ्यात जाणे आणि बाहेर येणेही कष्टप्रद होते. अनेक जनावरांच्या शिंगांची अवाजवी वाढ झाल्यामुळेही जागा अधिक लागते. त्याचप्रमाणे आजारी जनावरे, गाभण जनावरे अशा अवस्थेतल्या जनावरांनाही निरोगी जनावरांसोबतच ठेवले जाते. अशावेळी किमान अंतर राखून जनावरे राहून शकतील इतकीही जागा त्यांना उपलब्ध करून दिली जात नाही.

निरोगी जनावरांना त्यांच्या रोजच्या, नियमित व साहजिक अशा हालचाली करण्यासाठी जागा आवश्यक असते. कुठल्याही जिवाच्या शारीरिक क्षमता त्याच्या हालचालींमुळे निश्चित होतात व साधारण निर्दोष राहतात. जनावरांच्या स्नायूंना, सांध्यांना विशिष्ट प्रमाणात व्यायाम, रक्ताभिसरण होणे आवश्यक असते. अन्यथा, त्यांचे आरोग्य नकळत खालावत जाते. त्याचा परिणाम त्यांच्या हृदयाच्या क्षमतेवर होतो आणि त्यामुळे एकूणच जनावर अक्षम बनत जाते. त्याच्या सर्व शरीरक्रियांना शिथिलता येते. श्वासोच्छ्वास, पचन, मलमूत्र विसर्जन अशा क्रिया सहज करणाऱ्या किडनी, यकृतासारख्या अवयवांच्या कार्यक्षमतेवरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो. त्याशिवाय, त्वचारोगाच्या शक्यता वाढतात. मलमूत्र विसर्जनासाठीही जागा अपुरी असल्यास त्यातून अनेक रोग दाटीवाटीने गोठ्यात राखलेल्या जनावरांना होवू शकतात. अर्थातच, या सर्वांचा परिणाम त्यांच्या प्रजोत्पादन आणि उत्पादन करणाऱ्या शरीरक्रियांना बाधतो. दुभत्या जनावरांच्या बाबतीत तो उत्पादनावर गुणात्मकही परिणाम करू शकतो. एकूण उत्पादनासोबत दुधाच्या घटकांवरही त्याचा परिणाम होवू शकतो. त्यासाठी जनावरांच्या – विशेषत: गायींच्या – सुव्यवस्थित संगोपनासाठी त्यांना आवश्यक असलेल्या वापरता येण्याजोग्या जागेची मर्यादा काय आहे, त्यांची किमान गरज काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

गायींसाठी लागणारी जागा त्यांच्या शारीरिक आकार व हालचाली यांनुसार ठरते. हे लक्षात घेतल्यास साधारणपणे गायीच्या शरीराच्या आकारानुसार म्हणजे अक्षरश: लांबी, रुंदीनुसार सरासरी ४० चौरस फूट (स्क्वेअर फूट) – ८ फूट लांब आणि ५ फूट रुंद इतकी जागा आवश्यक आहे. याशिवाय, त्यांच्या गव्हाणीसाठी, मलमूत्रवाहक पथासाठी आणि दोहन (धार काढणे), चारा टाकणे, स्वच्छता करणे या आपल्या कामांसाठी वेगळी, मोकळी जागा असावी, अशी गोठ्याची रचना केली जाणे आवश्यक आहे. शिवाय, जमिनीपासून किमान १० ते १२ फूट उंची मिळणे आवश्यक आहे. होल्स्तीन-फ्रेशियन, खिल्लार, कांकरेज, साहिवाल अशा धिप्पाड वाणांच्या गायींसाठी त्यात आवश्यकतेनुसार अजूनही काही इंच जागा अधिक असल्यास उत्तमच. याशिवाय, बंदिस्त निवाऱ्याबाहेरही त्याला लागूनच साध्या कुंपणाची (जमिनीपासून ३ फूट उंच) मोकळी जागा असावी. साधारणत: प्रत्येक गायीला किमान ५० चौरस फूट जागा मिळेल अशी मोकळी जागा रवंथ करण्यासाठी, मुक्त फिरण्यासाठी  अशी असल्यास उत्तम.

वातावरणानुसार, प्रत्यक्ष जनावराच्या उंचीनुसार, ऋतूनुसार आणि विशेष म्हणजे छत तयार करण्यासाठी वापरलेल्या साधनांनुसार त्यात बदल करता आले पाहिजेत. गोठा पक्का असो, कि अगदी साधा, कच्चा; त्याचप्रमाणे त्याची रचना संमुख (‘हेड-टू-हेड’ – एकमेकांकडे तोंडे असलेली) असो अथवा संपाठी (‘टेल-टू-टेल’) – त्यात भरपूर – किमान आवश्यक – जागेची पूर्तता केल्यास किमान या क्षुल्लक कारणांमुळे गायींच्या क्षमतेत आणि प्रतिकारशक्तीत कमतरता येण्याची शक्यता दूर होते. गोठ्याच्या साधारण रचनेचा आराखडा चित्रात दर्शवला आहे त्याप्रमाणे असावा. तसेच, विशिष्ट अवस्थांत विविध जनावरांना आवश्यक असलेल्या जागेची माहिती तक्त्यात दर्शवली आहे. मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यासाठीही एकूण गायींच्या संख्येनुसार त्यांच्या मुक्त संचारासाठी मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. मुक्त संचारासाठी बंदिस्त गोठ्यातील जागेच्या दुप्पट जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

गायींना त्यांच्या शारीरिक हालचाली व त्यायोगे साधारण राहणाऱ्या शरीरक्रिया अबाधित राखण्यासाठी असणारी जागेची अवस्था अनेक प्रकारे ठरते. उदा. – बसलेल्या अवस्थेतील गाय उठताना अगोदर आपले शरीर समोर नेते, खाली वाकवते आणि मग वर उठून उभी राहते. या हालचालींमुळे गायीला तिच्या शरीराच्या प्रत्यक्ष आकारापेक्षा २२ – २५ टक्के अधिक जागा लागते. गर्भार अवस्थेत – विशेषत: शेवटच्या त्रैमासिकात – ती जागा अधिक लागते. त्याचप्रमाणे मान, कान, शेपूट हलवून माशा, कीटक अशांसारखे जीव गायी दूर हाकलत, ढकलत असतात. त्या हालचालीही त्यांना मोकळेपणाने करता आल्या पाहिजेत. त्यांच्या चयापचयातही अशा हालचालींचे योगदान असते. अन्यथा, या त्रोटक हालचालींविना त्यांच्यात स्थूलता व शिथिलता येते. शरीराचे किमान तापमान राखण्यासाठीदेखील अशा हालचालींचा उपयोग होत असतो. त्यांची शारीरिक स्थिती (म्हणजे त्यांचा आकार, त्यांचे अवयव इथपासून ते त्यांच्या वय, गर्भार अवस्था, दुभतेपण इ.), त्यांच्या आजूबाजूचे वातावरण, पाऊसपाणी, ऋतू व ऋतुमान यांनुसार त्यांना आवश्यक असलेल्या जागेत जुजबी बदलही करावे लागतात. अर्थातच गायींच्या वयानुसारही त्यांना आवश्यक असलेल्या जागेची गरज बदलते.

वास्तविक पाहता, आपल्या देशात जागेची कमतरता नाही. गावागावात व वावरातही जनावरांसाठी भरपूर जागा मिळू शकते. तथापि, केवळ दुर्लक्ष व अनभिज्ञता यांमुळे आपल्याला दुधासारखे आणि वासरांसारखे बहुमूल्य उत्पादन देणाऱ्या गायींना इतक्या सहज उपलब्ध असणाऱ्या मुलभूत सोयीपासून वंचित ठेवू नये, ही आपली सहजसाध्य जबाबदारी आहे.

आकृती १.

Cow housing layout

आकृती २.

 

 

जनावरे जागेची आवश्यकता (चौरस फूट) निवाऱ्यातील संख्यामर्यादा छताची उंची
बंदिस्त गोठा मुक्त संचार
बैल १३० २६०

 मध्यम अथवा कमी पर्जन्यमानात ७ फूट.

अधिक पर्जन्यमानात,

तसेच उष्ण वातावरणात १० फूट.

 

लोखंडी पत्रे असल्यास

किमान १० – १२ फूट.

गाय ४० ८० ५०
म्हैस ४४ ८८ ५०
प्रसूत गाय १३० २६०
लहान वासरू १० २० ३०
मोठे वासरू २० ४० ३०

तक्ता – नियमित व निर्दोष आरोग्यासाठी जनावरांना लागणारी साधारण जागा.

जागेची कमतरता दर्शवणाऱ्या काही अयोग्य पद्धतीची छायाचित्रे

 


प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

(स्वेच्छानिवृत्त प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर)