गायींच्या आहारात मुरघासाचे महत्व

गायींची दूध उत्पादन करण्याची क्षमता आणि त्यावर अवलंबून असलेला फायदा, या दोन्ही गोष्टी पोषणपद्धतीवर व आहारनियोजनावर ठरतात. तथापि, बहुसंख्य पशुपालक गुणवत्ता व प्रमाण राखून चारा पिकाच्या लागवडीच्या बाबतीत संभ्रमात असतात. सहसा, रोजची गरज भागवण्यासाठी रोजच्या रोज ठराविक प्रमाणात चारा कापून आणून तो आपल्या गायींना देण्याची पारंपारिक पद्धतच सगळीकडे अवलंबली जाते. या पद्धतीत तीन प्रकारचे धोके उद्भवतात – १. वरचेवर सारखे लागेल तितकेच चारा पीक कापून आणून वापरण्याने शेताचे क्षेत्रफळ गुंतून पडते. पुष्कळ वेळा महिनाभर किंवा मोठे क्षेत्र असल्यास त्या क्षेत्रावरील संपूर्ण चारा कापणीस अनेक महिनेही लागू शकतात व पूर्ण क्षेत्र रिकामे होईपर्यंत त्यावर अन्य लागवड केली जात नाही. २. वरचेवर शेतात उभ्या असलेल्या चाऱ्याची गुणवत्ता व पौष्टिकता खालावत जाते. ३. अशा पद्धतीवर मनुष्यबळाचा अकारण अपव्यय होत राहतो व यातील दिरंगाईमुळे अनेकदा आहाराच्या वेळेत विस्कळीतपणा येवून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम थेट दूधउत्पादनावर होत राहतो.

हे सर्व धोके व नुकसान टाळण्यासाठी खात्रीशीर व किफायतशीर पर्याय म्हणजे चारा पिकातील अपेक्षित योग्य आर्द्रता, खाद्यघटकानुसार वाढ झाल्याबरोबर पूर्ण कापणी करून घेवून ते गरजेनुसार पुरवत व भविष्यासाठी राखत वापरणे. असे केल्यास दररोजच्या मनुष्यबळाचा, मजुरीचा खर्च वाचतोच. शिवाय, कापणीला लागणाऱ्या वेळेत फरक पडण्याचे कारण उरत नाही व ठराविक वेळेला चारा पुरवता येतो, त्यात बदल होत नाही आणि विशेष म्हणजे अन्य लागवडीसाठी जमिनीचे क्षेत्र मोकळे होते.

कापणी केल्यानंतर चारा एकतर सरळ उघड्यावर सूर्यप्रकाशात कोरड्या चाऱ्याच्या निर्मितीसाठी वाळवता येतो किंवा मुरघासाच्या रुपात हिरवा चारा म्हणूनही सहज घडणाऱ्या आंबवण्याच्या प्रक्रियेने साठवता येतो. ऊर्जा, प्रथिनयुक्त आहार व तंतुमय घटकांच्या पूर्ततेसाठी जगभरातील पशुआहारात मुख्यत्वे करून मुरघासाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

मुरघास चारा कसा तयार करावा ?

मुरघास तयार करण्याचे तत्व व पद्धत अतिशय सहज व सोपे आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर, मुरघास तयार होताना गायीच्या विशिष्ट प्रकारच्या संयुक्त पोटात चाऱ्यावर होणाऱ्या प्रक्रियेची पूर्वतयारीच जणू केली जाते. एक प्रकारे पचनासाठी आवश्यक असलेल्या काही स्थितीची अगोदरच उजळणी चाऱ्यावर केल्यामुळे पचन सुलभ तर होतेच, पण पचनाचा कालावधीही कमी होतो.

बहुतेक चारापिकांत पिष्टमय शर्करेचे प्रमाण अधिक (६ – १० टक्के) असते. या शर्कराघटकावर गायीच्या कोठीपोटातील जीवजंतूंद्वारे आंबवण्याची क्रिया प्राणवायूच्या अभावात केली जाते. मुरघासात हीच प्रक्रिया गायींना हा चारा पुरवण्याअगोदरच बाहेर केली जाते व अगोदरच अशी प्रक्रिया केलेला चारा गायींना पुरवला जातो. प्राणवायूमुळे अशी प्रक्रिया करणाऱ्या जीवजंतूंच्या ऐवजी चारा नष्ट करणाऱ्या जिवाणू व बुरशीजन्य सूक्ष्मजिवांची वाढ होते. त्यामुळे चाऱ्यावर प्राणवायूच्या अभावातच आंबवण्याची प्रक्रिया केली जाते. साधारणपणे पिकात ६५ टक्के आर्द्रता निर्माण होवू लागल्याची – म्हणजे कणसात नुकतेच दाणे भरण्यास सुरुवात झालेली असते, तेव्हाची – अवस्था ही मुरघासासाठी योग्य असते. अशा पिकाची पाने हलकेच चुरगाळल्यास मृदू लागतात व त्यातून ओलावाही जाणवतो. अशा अवस्थेतल्या चाऱ्याची दोन दिवसांत कापणी पूर्ण करावी. यात विलंब केल्यास आर्द्रता कमी होण्याची शक्यता असते. पण कापणी केलेले पीक अपेक्षेपेक्षा अधिक ओलसर असल्यास, त्याचे तुकडे करून ते एक रात्रभर निवाऱ्यात सुकू द्यावे.

साठवण कशी कराल ?

गुंतवणुकीची मर्यादा, आवश्यक ते प्रमाण, गायींच्या संख्येनुसार वारंवार होणारा वापर या सर्वांनुसार, तुकडे केलेले हा चारा विशिष्ट आकाराच्या खास तयार केलेल्या खड्ड्यात, मुरघास खोली, किंवा मुरघास गोणी यांत थराथराने भरावा. त्यातील शक्य आहे तेवढी हवा निघून जाण्यासाठी व्यवस्थित दाबून घ्यावा.

मुरघासात चाऱ्याशिवाय काय टाकाल ?

वास्तविकत: मुरघास तयार करताना त्यात चाऱ्याशिवाय काहीही अतिरिक्त खाद्य वा घटक टाकण्याची आवश्यकता नाही. क्वचित, चाऱ्यामध्ये अपेक्षित शर्करायुक्त घटक नसल्याचे वाटले, तरच मळी किंवा गुळाचे पाणी शिंपडण्यास हरकत नाही. मात्र, अतिशर्कराप्रमाणामुळे मुरघासाचा दर्जा व टिकाऊपण खालावू शकते. काही ठिकाणी काही शेतकरी क्षारमिश्रणाचा अथवा युरियाचा वापर करतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. ते अनावश्यकच ठरते, त्यामुळे ते टाळावे.

मुरघासाची दाबाई का व कशी करावी ? 

चाऱ्यातील हवा निघून जावी व प्राणवायू निर्माण होवू नये यासाठी प्रत्येक थराची शक्य तितकी ठासून दाबाई केली पाहिजे. त्यासाठी मोठे धुम्मस अथवा  हाताने वापरण्याचे तत्सम उपकरण वापरावे. खूप मोठ्या आकाराच्या मुरघास खड्ड्यावर ट्रॅक्टर किंवा रोलर वापरूनही ठासणी करतात. प्राणवायूपासून संरक्षणासाठी मुरघास साठा हा सर्व बाजूंनी प्लास्टिक किंवा ताडपत्री अंथरून बंदिस्त करणे आवश्यक असते. दाब सतत व सारखा राहण्यासाठी मुरघास साठा बंद करून त्यावर जुन्या टायर्सचे अथवा मोठ्या आकाराच्या दगडांचे वजन ठेवावे. छोट्या प्रमाणावर मुरघास करावयाचा असल्यास, बाजारात मुरघासासाठी मिळणाऱ्या मोठ्या पिशव्या, गोण्या मिळतात त्यांचा वापर ५० किलो ते एक टन मुरघासासाठी करता येतो. वापरलेल्या खताच्या पोत्यांचाही वापर करता येतो. त्यात खताचे अवशेष राहू नयेत यासाठी पोती स्वच्छ धुवून, वाळवून मात्र घ्यावीत. विशेष म्हणजे वाहतुकीसाठी छोट्या छोट्या पिशव्या अथवा गोण्यांतून मुरघास चारा तयार करणे अधिक सोयीस्कर असते. शिवाय, मुरघासासाठी त्या पिशव्या किंवा पोती पुन्हा पुन्हा वापरता येतात.

मुरघास तयार करण्यासाठी लागणारा कालावधी

मुरघास तयार होण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो. मुरघास तयार झाल्यावर त्याचा एक विशिष्ट मंद गोडसर असा गंध बाहेर येतो. तो आला की मुरघास तयार झाला आहे असे समजावे.

मुरघासाची प्रतवारी कशी ओळखावी?

  • प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारे स्वरूप, रंग, खाद्यमूल्य छाननी व सूक्ष्मजीव चाचणी करून मुरघासाची प्रतवारी ठरवली जाते.
  • उत्तम मुरघासाला विशिष्ट मंद, गोडसर असा गंध येतो. सडका, तीव्र, उग्र वास येत असेल त्याची प्रतवारी निकृष्ट समजली जाते. त्याचप्रमाणे बुरशी लागल्यास ते काळे पडते.
  • याशिवाय, नजिकच्या खाद्यप्रयोगशाळेतून मुरघासाची तपासणी करून घ्यावी. त्यातील खाद्यसमृद्धता, जिवाणूयुक्तता योग्य असणे आवश्यक असते. किमान त्यात अनावश्यक व हानिकारक जिवाणूंची (लिस्टेरिया, क्लोस्ट्रिडिया इ.) वाढ झालेली नसल्याची खात्री करून घेणे योग्य.

मुरघासासाठी कोणती चारा पिके वापरावीत? 

७ – १० टक्के शर्करा अंश असलेली कोणतीही चारा पिके मुरघासासाठी वापरता येतात. मका, ज्वारी, संकरित नेपिअर किंवा संकरित ज्वारी ही पिके सहसा योग्य ठरतात. त्यासोबत बाजरी, भाजीपाला, फळांचे अवशेषसुद्धा अतिरिक्त घटक म्हणून वापरता येतात. पावसाअभावी वाया गेलेली, वाळलेली पिकेही मुरघासासाठी वापरता येतात. मात्र, त्यांच्यात अपेक्षित योग्य आर्द्रता, पौष्टिकता असली पाहिजे व ती फार साठवलेली, जुनी नसावीत.

मक्यापासून बनवलेल्या मुरघासातील घटक व खाद्यमूल्ये :

शुष्कता घटक 23.5 – 25.0%
भरड प्रथिने 6.5- 8.0 %
भरड तंतू घटक 23.5 – 25.0%
एन डी एफ 49.3%
ए डी एफ 25-27 %
इथर चोथा 2.5-2.6%
क्षार / खनिजे 4.8%
उर्जामूल्य 18.9 MJ / Kg शुष्क पदार्थ
एम. इ 10.5 MJ /Kg शुष्क पदार्थ

 


अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
संपादक मंडळ सदस्य, लातूर