गायींचे उष्माघातापासून संरक्षण कसे कराल?

ऊष्णतेपासुन गायींचे संरक्षण

एप्रिल ते जुलै महिन्यांदरम्यान भारतातील बहुसंख्य प्रदेशात कमालीच्या उष्णतेला सामोरे जावे लागते. तापमान साधारणत: ४५ सेल्सियस अंशांपर्यंत मजल मारते. अशा उच्च तापमानाच्या काळात गायींचे सभोवतालच्या उष्णतेपासून संरक्षण करणे गरजेचे ठरते, अन्यथा त्यांना हमखास उष्माघाताचा हमखास धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या शरिराचे तापमान वाढून ज्वर वाढतो, श्वसन व संप्रेरकांच्या प्रतिसादात अनावश्यक वाढ होते, विशेषत: कोरडा चारा खाण्याचे प्रमाण घटते आणि त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादन, तसेच प्रजोत्पादनावरही विपरीत परिणाम होतो.

संशोधनाने, गायींसाठी साधारण वातावरणाचे २४ ते ३० संश सेल्सियस एवढे तापमान अनुकूल असल्याचे सिद्ध झाले आहे. तथापि, विदेशी वाणाच्या व संकरीत गायींपेक्षा स्थानिक व देशी गायी या भारतीय तापमानाच्या प्रमाणास साहजिकच सहज सहन करू शकतात. मात्र, नेमक्या अधिक उत्पादनक्षमता असलेल्या गायी त्यांच्या ऊर्जानिर्मितीच्या क्षमतेमुळे तापमानातील वाढीला अधिक सवेदनशील असतात व त्यांच्यात उष्माघाताचा धोका अधिक व लवकर दिसून येतो. त्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी विशेष लक्ष पुरवावे लागते. वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध व विशेष अशी काळजी घ्यावी लागते, त्यासाठी विशेष उपाययोजना करावी लागते. ती करण्याचे मार्ग सांगण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल.

सौर उत्सर्जनपासून संरक्षणासाठी निवारा कसा असावा ?

गायी-बैलांच्या त्वचेच्या रचनेचा अभ्यास करता असे दिसून आले आहे, की वाढत्या तापमानात सूर्यकिरणातील किरणोत्सर्गामुळे त्यांच्या केसाळ त्वचेतून होणार्‍या उष्णतेचे उत्सर्जन / वहन परिणामकारकपणे होत नाही. त्यामुळे त्यांच्या त्वचेतील उष्णता व दाह कायम राहतो. त्यामुळे त्यांचे थेट अंगावर पडणार्‍या सूर्यकिरणांपासून संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी पारंपारिक कुडाच्या छतावरणापासून ते आधुनिक संरक्षक छतापर्यंतचे विविध विकल्प / मार्ग वापरले जातात. ते योग्य असले, तरी छतासाठी वापरलेल्या घटकांची उष्माविरोधी क्षमता व छताची उंची लक्षात घेतली जाणे अत्यावश्यक आहे.

जनावरांच्या प्रत्यक्ष शरिराच्या उंचीहून अधिक उंचीचे छत या दृष्टीने अधिक योग्य असते. त्याचप्रमाणे सूर्यकिरणांच्या उष्णतेपासून बचावासाठी अ‍ॅस्बेस्टॉसचे पत्रे अधिक योग्य ठरतात. याशिवाय, सर्वांत सहज व स्वस्त मिळणारा म्हणजे झाडाची निवांत सावली. त्या दृष्टीने निवार्‍याशेजारी सावली देणारी झाडे असणे अधिक चांगले.

पाण्याचे फवारे मारून त्वचावरण शीतल ठेवणे 

अंगावर पाण्याचे फवारे मारण्याने गायींचे उष्माघातापासून निश्चित संरक्षण होते, असा समज आहे. मात्र, पाण्याच्या फवार्‍यांचा फायदा वातावरणातील केवळ ३०-३१ अंश सेल्सियस एवढ्याच तापमानात होवू शकतो. विशेषत: समशीतोष्ण वातावरणात (म्हणजे भारतीय उपखंडाच्या बहुतांश भागात) केवळ पाण्याच्या फवार्‍यांचा फारसा उपयोग होत नाही. एकतर अंगावरील पाण्याचे साधारणपणे शा मिनिटात ऊर्ध्वपतन होवून त्वचा पुन्हा कोरडी होते. त्यामुळे पाण्याचे फवारे दर सहा सात मिनिटांच्या अंतराने मारले, तरच त्याचा फायदा होवू शकतो. मात्र, एवढ्या सातत्याने पाण्याचे फवारे मारणे सोयीचे तर नाहीच, शिवाय, अगोदरच कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याची नासाडी परवडणे शक्य नाही. शिवाय, अशा सातत्याने ओली केलेल्या त्वचेला विविध रोगांची लागणही होण्याची शक्यता असते. विशेषत: त्वचारोग व स्तनदाहाच्या शक्यता बळावतात. त्यामुळे पाण्याच्या फवार्‍यांनी गायींचा उष्माघाताच्या शक्यतेपासून बचाव करणे हमखास किफायतशीर ठरत नाही.

मात्र, विशिष्ट पद्धत वापरल्यास काही अंशी त्याचा फायदा होवू शकतो.

प्रयोगांअंती असे दिसून आले आहे, की निवार्‍यात प्रवेश करण्यापूर्वी गायींच्या अंगांवर किमान १.५ ते १.८ लिटर पाण्याचा शिडकावा मारल्यास त्यांचे श्वसन व तापमानात साधारणपणे ५० टक्क्यांची बचत होते. उष्णतेचा ताण कमी होतो. याचा अर्थ सूर्यकिरणांनी तापलेली जनावरांची शरिरे केवळ एकदम सावलीत आणणे किंवा त्यांच्यावर थेट थंड पाण्याचे फवारे मारणे, यापेक्षा दोन्हींचा मिश्र प्रभाव अधिक फायद्याचा ठरतो. (म्हणजे निवार्‍यात किंवा छायेत येतानाच हलक्या व कमी पाण्याच्या शिडकाव्याने त्यांचे अधिक सोयीस्कर सरक्षण होवू शकते.)

त्याचप्रमाणे एकदम थंड करण्यासाठी अतिशय शक्तिशाली अशा फवार्‍यांचा वापरही तापमानाच्या अचानक उद्भवणार्‍या बदलाचा धोका निर्माण करू शकतो. तो टाळण्यासाठी सुसह्य दाबानेच पाण्याचा शिडकावा करावा, याचीही दक्षता घेतली गेली पाहिजे. त्यासंबंधीची माहिती www.indiancattle.com संकेतस्थळाच्या नोंदीत मिळू शकते.

पाण्याच्या फवार्‍यांसह हवेचे झोत 

नुसत्या पाण्याच्या फवार्‍यांपेक्षा किंवा नुसत्या पंख्यांच्या हवेपेक्षा पाण्याच्या फवार्‍यांसह ह्वेच्या झोतांच्या एकत्र वापराने गायींच्या त्वचेद्वारे उष्णतेचे अधिक प्रभावी उत्सर्जन होत असल्यामुळे, शरिराचे तापमान त्वरेने आणि योग्य प्रमाणात कमी होवून, या पद्धतीने उष्माघाताचे प्रमाण २ ते ५ पटीने कमी झाल्याचे दिसून आले आहे.

संशोधनातील पाहणीनुसार अशी शिफारस केली जाते, की दर पाच मिनिटांनी पाण्याचा शिडकावा आणि त्याबरोबर ताशी ९.५ ते १२.८ किमी या गतीच्या झोताने हवा पुरवल्यास पुरेशी शरिराचे तापमान कमी होते व उष्णतेचा ताण कमी करता येतो. असेही निदर्शनास आलेले आहे, की याबाबतीत केवळ हवेच्या गतिमान मार्‍यापेक्षा आर्द्र हवेच्या नियंत्रित झोतांचा (स्प्रिंकलर्स) वापर अधिक परिणामकारक ठरतो. त्यामुळे गायींच्या त्वचेची आर्द्रताही राखली जाते.

तात्पर्य, गायींच्या त्वचेवर एक ते दीड मिनिटांच्या अंतराने साधारण एक लिटर पाण्याच्या शिडकाव्यापाठोपाठ चार मिनिटे हवेचे मध्यम झोत, गायींसाठी पुरेशा प्रमाणात अनुकूल शीतलता निर्माण करण्यास उपयोगी ठरतात व उष्णतेचा ताण परिणामकारकरित्या कमी करतात.

प्रभावी बाष्पीभवनाद्वारे घडणारे उष्मानियंत्रण 

वरीलप्रमाणे पाण्याच्या शिडकाव्यांसह हवेच्या वापराने किंवा स्प्रिंकलर्सच्या साह्याने शरिराचे अनुकूल तापमान राखून उष्माघाताचा धोका वा उष्णतेचा ताण टाळता येतो. मात्र, ठराविक तापमानातच. कमालीच्या तापमानात व तीव्र उष्णतेच्या काळात त्याचा आवश्यक तेवढा अपेक्षित परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत त्वचेचे तापमान इतके वाढलेले असते, की त्वचेवर शिडकावा केल्याने साचलेल्या आर्द्रतेचे तात्काळ बाष्पीभवन झाल्यामुळे निर्माण झालेली शीतलता फारच थोडावेळ परिणामकारक ठरते. त्यामुळे उलट दाह कमी झाला, तरी ऊर्जेचा ताण वाढतो.

flipfanlarge

अशावेळी वास्तविकत: वातानुकूलनाची गरज असते. पण ते खर्चिक असून, कुठल्याच दृष्टीने परवडण्यासारखे नाही. अशा परिस्थितीत ताण कमी करण्यासाठी निवार्‍यात फवारलेल्या पाण्याचे बाष्पीभवन फॉगर्सद्वारे घडवून आणले जाते. बाष्पीभवनामुळे ऊर्जेचे उत्सर्जन होवून निवार्‍यातील हवेचेच तापमान कमी केले जाते. त्यामुळे गायींच्या शरिरातील ऊर्जा केवळ शरिराचे तापमान राखण्यासाठी खर्च न झाल्यामुळे ताण आपोआप कमी होतो. त्यामुळे ही पद्धत विशेषत: उष्ण, अति व मध्यम पर्जन्यशील वातावरणात अधिक प्रभावी ठरते.या (कृत्रिम बाष्पीभवन) पद्धतीमुळे शरिराचे तापमान नैसर्गिक तत्वाने राखले जात असल्यामुळे गायींच्या आहार, पचन व उत्पादनात होणारी घट टाळता येते व उलटपक्षी त्यात वाढ होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

मात्र, या पद्धतीत निवार्‍यातील सापेक्ष आर्द्रता वाढण्याची शक्यता असते. सापेक्ष आर्द्रता वाढली, की ताण कमी होण्याऐवजी वाढतो. त्यासाठी सापेक्ष आर्द्रता ७०% हून अधिक होता कामा नये, ही काळजी घेतली, तरच ही पद्धत परिणामकारक ठरू शकते. ती अधिक परिणामकारक होण्यासाठी निवार्‍याचे / गोठ्याचे नियमन करणे गरजेचे आहे. विशेषत: भरपूर जागा आणि मोकळि खेळती हवा असेल, तर ही पद्धत खूपच परिणामकारक ठरते; अन्यथा नाही. इतकेच नव्हे, तर आर्द्रतेत अवास्तव वाढ होवून गायींच्या सुदृढ आरोग्यास हानिकारकच ठरण्याची शक्यता असते.

यास्तव, हे लक्षात घेतले पाहिजे, की बाष्पीभवन पद्धतीने (फॉगर्सच्या वापराने) उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी सापेक्ष आर्द्रता कमी असणे आवश्यक आहे. अन्यथा, ही पद्धत उपयोगी ठरत नाही. सापेक्ष आर्द्रता अधिक असेल, त्या ठिकाणी मात्र फॉगर्सऐवजी स्प्रिंकलर्स उपयोगी ठरतात.

अल्पसाधन शेतकरी / पशुपालकांसाठी किफायतशीर पद्धती 

निवारे, गोठे यांच्यात राखलेली बंदिस्त जनावरे, गायी यांच्यात वाढत्या तापमानामुळे संभाव्य असलेला उष्णतेचा ताण व उष्माघात टाळण्यासाठी आपण वरीलप्र्माणे काही पद्धती, त्यांचे फायदे व मर्यादाही लक्षात घेतल्या. वरील सर्व पद्धतींत कमी अधिक प्रमाणात गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. तथापि, या गुंतवणुकीची बचत करण्यासाठी – विशेषत: ज्यांना ती शक्य नाही अशा अल्पसाधन पशुपालक / शेतकर्‍यांसाठी मुक्तसंचार निवारा / गोठा पद्धत सर्व दृष्टीने किफायतशीर आहे. केवळ गायी ठेवलेल्या जागेभोवती सावली पुरवणारी झाडे व कुडाचे ८ – ९ फूट उंचीचे छत असणारा साधा निवारा ही सर्वात उत्तम सोय आहे. शिवाय, आजुबाजूला गवत व झुडुपांची वाढ असेल, तर गायींच्या निकटच्या परिसरात हवेच्या खेळतेपणामुळे आपोआप थंडावा राखला जातो.

मात्र, या पद्धतीत जनावरे बांधून ठेवता, मोकळी ठेवली पाहिजेत; म्हणजे त्यांच्या गरजेनुसार ती निवार्‍याच्या आत किंवा बाहेर बसू, वावरू शकतील, त्याचप्रमाणे गरजेनुसार, हवे असेल तेव्हा चारा, पाणी घेवू शकतील.

तापमान नियमनासाठी नेमके काय कराल? 

  • तापमानाच्या नियमनासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे – भरपूर उंची असलेल्या आणि भरपूर खेळती हवा असलेल्या निवार्‍याची सोय करावी.
  • अकारण गुंतवणूक व ऊर्जेचा वापर टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या वेळेत तापमान नियमन करावे ते ओळख़ून तजवीज करावी. त्या वेळेतच नियमन पद्धतीचा वापर करावा. उदाहरणार्थ – अगदी आर्द्र वातावरणातदेखील बाष्पीभवन शीतकरणाचा (फॉगर्स) भर दुपारी व नंतरच्या प्रहरात उपयुक्त ठरते. अशा तंत्राचा वापर करण्यासाठी सामुग्री व मार्गदर्शन www.indiancattle.com च्या संकेतस्थळावरील संसाधन रकान्यातून मिळू शकेल.
  • आजूबाजूचे तापमान गायींच्या शरिराच्या तापमानापेक्षा साधारणपणे जाणवण्याइतपत अधिक असेल, तर फॉगर्सचा वापर हमखास परिणामकारक ठरतो. तरीही, सर्व पद्धतीच्या वापराची (नैसर्गिक सावली, हवेशीर निवारा, स्प्रिंकलर्स, फॉगर्स व मुक्त संचार) तयारी व तजवीज ठेवावी. ज्यावेळी जी पद्धत कमी खर्चिक व अधिक किफायतशीर आणि परिणामकारक असेल, त्यावेळी ती पद्धत वापरून आपल्या मौल्यवान गायींचा वाढता तापमानाच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा.
  • तापमानाच्या नियमनासाठी वापरावयाच्या पद्धतीसाठी खर्च व उत्पादन यांचा मेळ लावणे गरजेचे आहे. कमीत कमी खर्चात, परवडेल अशा पद्धतीने तापमान नियमन अवश्य करावे. आपल्या परिसरातील विजेची उपलब्धताही कशा प्रकारची आहे, त्याचा अंदाज घेवून तजवीज करावी.

 


प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

स्वेच्छानिवृत्त विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर