प्रसूत झालेल्या गाईचा जास्तीचा चीक (कोलोस्ट्रम) दुसऱ्या गाईंना कधीही पाजू नका

प्रसूत गाईचा चीक (कोलोस्ट्रम) म्हणजे काय?

चीक (कोलोस्ट्रम) म्हणजे प्रसूत झाल्यावर गाईने सतत तीन दिवस पान्ह्यांतून दिलेले दूध. नवजात वासरांसाठी दिलेले “अद्भूत जीवनामृत” हे त्याचे केलेले वर्णन अत्यंत सार्थ आहे. कारण रोगप्रतिकार शक्ती (इम्यूनिटी), वृध्दीचे घटक (ग्रोथ फॅक्टर्स) आणि रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी (इम्यून सेलस्) यांचा ते एक महत्वाचा स्त्रोतच (source) आहे. त्यांत >50 ग्रॅम /लिटर किण्वन करणारी (Fermentation) कार्बोदके (कारबोहायड्रेटस्) >100 ग्रॅम सहजपणे पचन होण्याजोगी प्रथिने आणि रोगप्रतिकारक प्रतिजने (इम्युनोग्लोबुलिनस्-अँटि बॉडीज) असतात. तो (चीक) कॅलशियमनेही अत्यंत समृद्ध असतो. संशोधनाने असे दाखवून दिले आहे की, चिकाच्या संश्लेषणासाठी (सिंथेसिससाठी ) कॅलशियमची हलवा-हालव ( मोबिलायझेशन) शरिरांतील स्त्रोतांपासून करावी लागते आणि कित्येक वेळा ही हालवा-हालवीची प्रक्रिया संबंधित संप्रेरकांच्या (हॉरमोनस्च्या ) कमतरतेमुळे प्रभावीपणे होत नाही. अशा वेळी त्या गाई “दुग्धज्वर” नामक रोगाने आजारी पडतात. पूर्वीच्या काळी दुग्धज्वर टाळण्यासाठी गाईंच्या स्तनांतून संपूर्ण चीक पिळून न काढता ¼ चीक तसाच ठेवून देण्याची प्रथा प्रचलित होती.

त्यामागील तत्व असे होते की, तसाच ठेवून दिलेला चीक रक्तांत पुन्हा शोषला जावून रक्तांतील कॅलशियमची पातळी पूर्ववत व्हावी. जरी या प्रथेमूळे दुग्धज्वराचा प्रतिबंध होतो याचे समर्थन झाले नसले तरी पुष्कळसे शेतकरी संपूर्ण चीक पिळून काढतच असतात. जरी सर्वसाधारणपणे नसले, तरी असे कांही शेतकरी आहेत की जे असा विचार करतात की, वासराला पाजून शिल्लक राहिलेला चीक दुग्धज्वराचा प्रतिबंध करण्यासाठी गाईला पाजावा. मी काही असेही प्रसंग पाहिले आहेत की, जेथे “शिलकी”चा चीक दुसऱ्या वासरांना पाजला जातो. त्यात असे गृहित धरलेले असते की त्यामुळे त्या वासरांना “ऊर्जा” मिळते. ही एक धोका दायक प्रथा आहे की जी टाळली पाहिजे.

चीक आणि दूध प्रौढ गाईंना का पाजू नये?

कारण असे आहे की, प्रौढ गाईंना अती विकसित “रवंथ” करण्यासाठींचे वेगळे जठर असते. त्याला “रूमेन” असे इंग्रजी नाव आहे. त्या “रूमेन” मध्ये रवंथ करून झालेल्या चाऱ्याचे आंबविण्याची प्रक्रिया करणाऱ्या जंतूमुळे पाचन होते. या गाईंना चाऱ्या ऐवजी दूध व चीक पाजल्यास दुध व चीकाचे पाचनही “रूमेन”मध्ये आंबविण्याची प्रक्रिया होवूनच केले जाते. त्यामुळे आम्ल ( ॲसिड ) आणि वायू (गॅसेस)ची निर्मिती होते. काही गाईंमध्ये आम्लाची निर्मिती इतकी तीव्र होते की त्यामुळे मृत्यूही होवू शकतो. “चीका”चे दूध पाजलेल्या गाई कंटाळलेल्या, मलूल आणि अजीर्ण झालेल्या दिसतात.

चीक पाजलेल्या गाईंवरील उपचार 

चीक वा दूध पाजलेल्या गाईंना आंबवण्याची क्रिया आणि आम्लांचे शोषण थांबविण्यासाठी उपचार देण्याची (करण्याची) ताबडतोब आवश्यकता आहे. ही समस्या हाताळण्याचा पहिला मार्ग म्हणजे 250 ते 350 ग्रॅम  रूमेन बफर ( उभयावरोधक ) देणे. यामुळे “आम्ल निर्मिती” रोखली जाते. जर गाय “मलूल” झाली असेल तर पशुवैद्याला बोलावून घ्यावे. तो शिरेवाटे मोठ्या प्रमाणांत द्रव पदार्थ गाईच्या शरीरात पोहोचविण्याची तरतूद करेल. “रूमेन” जठरांतील तीव्र आम्ले तेथील सूक्ष्मजिवाणूंची जमात (मायक्रो फ्लोरा) नष्ट करतात. तेंव्हा दुसऱ्या निरोगी गाईच्या “रवंथ” केलेल्या घांसाचे (Cudfeeding) चारण आजारी गाईला पाजल्यास नवीन सुक्ष्मजीवाणूच्या जमातीची रूमेन जठरांत “पुनऱ्जिविती” (replacement) होते व त्यामुळे गाय पुन्हा निरोगी होते.


 

लेखक 

डॉ. अब्दुल समद,
एम.व्ही.एस.सी., पि.एच.डी.(कॅनडा)
डेअरी कन्सलटंट

अनुवादक 

डॉ. शरदकुमार विष्णू पंडित
जेष्ठ पशुवैज्ञानिक,
निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे