जाणून घ्या… पंजाबच्या पशुपालकांचे शाश्वत दूध उत्पादनासाठीचे मुरघास तंत्रज्ञान…

अलीकडे शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अलीकडच्या काळात दुधव्यवसायात खूप आमूलाग्र बदल झाले आहेत त्याचाच वापर करून पंजाबचे पशुपालक दूध उत्पादनात खूप पुढे गेले आहेत. तेथील पशुपालकांची एक संघटना असल्याने ते स्वतः दुधाचा दर ठरवतात आणि तेथील गव्हर्नमेंट ते मान्य देखील करतात कारण त्या दर्जाचे दूध ते पशुपालक उत्पादित करतात. आणि दुधाचा दर देखील ते तसेच घेतात नवीन आधुनिक तंत्रज्ञान कोणते आले आहे व त्याचा वापर कसा करावा त्यातील बारकावे कसे ओळखावे इत्यादी माहिती पशुपालकांपर्यंत पोहचावी म्हणून तिथल्या संघटना तसेच पशुसंवर्धन, पशुआहार, पशुशल्य चिकित्सक, पशु प्रजनन आणि पशुआरोग्य तज्ञ खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यामुळे स्वच्छ व अधिक दूध उत्पादन सहज  शक्य होते.

ग्रामीण भागातील पशुपालक दूध व्यवसाय जोडधंदा म्हणून करत असतात त्याला मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारला तर प्रत्येक शेतकरी चारचाकी गाडीमधून जास्त नक्कीच फिरू शकतो यासाठी लागते ते म्हणजे आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर दूध व्यवसायातील महत्वाचा पाया म्हणजे पशुआहार जनावरांचे आरोग्य व शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी चारा व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. जर पशुपालकाने वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याचे नियोजन करून ठेवले तर शाश्वत दूध उत्पादनाची हमी मिळते. आपल्याकडे दुध व्यवसाय परवडत नाही फक्त शेणच पाठीमागे उरते अश्या व्याख्या पशुपालकांच्या तोंडातून बाहेर पडतात त्यामुळे नवीन बेरोजगार तरुण या व्यवसायापासून थोडा लांबच राहतो. हा व्यवसाय खूप खर्चिक मोठा आणि मनुष्यबळाचा असल्याने व्यवस्थापन करणे थोडे अवघड जाते त्यामुळे नवीन पशुपालकांनी खर्चिक तसेच बंदिस्त गोठ्याच्या मागे न लागता मुक्त संचार गोठा तसेच चाऱ्यासाठी मुरघास पद्धतीचा वापर केल्यास शाश्वत दूध उत्पादन मिळते अश्या छोट्या मोठ्या बाबींचा विचार करून दुग्धव्यवसाय केल्यास फायदेशीर फायदेशीर ठरू शकतो.

Murghas

मुरघास तंत्रज्ञान म्हणजे काय ?

मुरघास (सायलेज)मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा. म्हणजे  मुरलेला घास भरपूर अन्नद्रवे असलेल्या वैरणी फुलोऱ्यात किंव्हा दाने भरण्याच्या स्थितीत असताना हवाबंद जागेत विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकवतात त्यास मुरघास तंत्रज्ञान म्हणतात.

मूरघास निर्मिती

जाणून घ्या शाश्वत दूध उत्पादनासाठी मुरघासाचे फायदे-

  • जनावरांना वर्षभर एकसारखा  हिरवा तसेच वाळला चारा मिळतो.
  • मुरघासामुळे जनावराची भूक वाढते,चारा जास्त खातात तसेच पाणी जास्त पितात त्यामुळे दुधात वाढ होते.
  • मुरघास लवकर पचतो चारा चावण्यासाठी खर्च होणारा वेळ रवंथ करण्यासाठी वापरता येतो तसेच चारा वाया जात नाही.
  • मुरघासात प्रथिने, कॅरोटिन व लॅक्टिक असिड जास्त असते.
  • मुरघास खायला चवदार असल्याने जनावरे आवडीने खातात.
  • पुरेसा आहार मिळाल्याने जनावरांच्या आरोग्य टिकून राहते.
  • मुरघासामुळे दररोज चारा आणावा लागत नाही.
  • मुरघासाची गुणवत्ता वाळलेल्या चाऱ्यापेक्षा चांगली असते.
  • प्रमाणबद्ध आहारानुसार चारा देता येतो.
  • मुरघासामुळे पशुखाद्यावरील २५% खर्च कमी येतो.
  • एकदाच मुरघास केल्याने मजुरी खर्च कमी येतो.
  • मुरघासामुळे दूध उत्पादनात चढ-उतार होत नाही.
  • मुरघासामधून जनावराला  ६५% हिरवा चारा आणि ३५% वाळला चारा मिळतो.
  • वाळल्या चाऱ्यामुळे जनावराचे पोट लवकर भरते.
  • चारा टंचाईच्या काळात मुरघासाचे खूप फायदे होतात
  • जनावरे आजारी पडत नाहीत वेळेवर माजावर येतात.

मुरघास निर्मितीतील उत्कृष्ट तंत्र

  • मुरघासाठी मका, ज्वारी, बाजरी, हायब्रीड नेपियर, गिनीगवत प्रक्रियायुक्त उसाचे वाडे, गजराज, पॅरागवत, कुरणातील हिरवे गवत, रताळ्याच्यावेली, ताग केळीची पाने, भाजी पाल्याची पाने, ओट इत्यादी तसेच एकदलवर्गीय पासून उत्तम मुरघास बनतो.
  • मका आणि ज्वारीतील जीवनसत्वे मुरघास प्रक्रियेत टिकून राहतात.
  • हिरव्या वैरणीची कुट्टी चांगल्या दर्जाच्या कुट्टी मशीन ने करावी कुट्टीची लांबी १-३ से.मी असावी.
  • हिरव्या वैरणी नेहमी जाड बुंध्याच्या निवडाव्यात कारण खोडात भरपूर शर्करा कर्बोदके असतात.
  • रोगयुक्त तसेच लष्करी अळीचा प्रादुर्भाव असलेला मका किंव्हा इतर चारा मुरघासासाठी शक्यतो टाळावा.
  • वैरणीची कापणी मका व ज्वारीचे दाणे दुधात असताना तसेच गवत/ व्दिद्ल गवताला कळ्या असताना.
  • चाऱ्याला फुलोरा आला असताना कापणी करावी कारण त्यावेळी त्या चाऱ्यात जास्तीत जास्त जीवनसत्वे व अन्न घटक असतात.
  • वैरण कापताना शक्यतो जमिनी पासून अर्धा फूट वरून कापावी त्यामुळे बुरशी वाढण्याचे प्रमाण रोखता येते.
  • मुरघास करताना साखरेचे / गुळाचे / मळीचे / मिठाचे पाणी टाकण्याची तशी गरज नसते परंतु चाऱ्याची प्रत खालावलेली असेल तर योग्य प्रमाणात वापरावे. चाऱ्यातील ऍसिड त्यामुळे मुरघासाला बुरशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • चारा कापल्यानंतर ओलाव्याचे प्रमाण जास्त असेल तर थोडा वेळ चारा सावलीत सुकू द्यावा.
  • दवबिंदू असताना चारा कधीही कापू नये त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण वाढते.
  • कुट्टी केल्यानंतर चारा वाळू देऊ नये कारण त्यातील जीवनसत्वे नाहीशी होतात. म्हणून लगेच तो बंकर किंव्हा बॅग मध्ये हवाबंध करावा.
  • मुरघासामध्ये गव्हाचा, तुरीचा कोंडा टाकून मुरघासाची प्रत वाढवता येते.
  • मुरघास बनण्याची प्रक्रिया २०-४० दिवसात पूर्ण होते तरीही मुरघास ४५-५० दिवस हवाबंद राहील याची खबरदारी घ्यावी.
  • बंकर बनवताना त्याची लांबी, उंची त्याची क्षमता गोठ्यापासूनचे अंतर इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात.
  • बंकरला उतार १ फुटाचा असावा कारण दबलेल्या चाऱ्यातून निघालेले पाणी पुढे निघून येते आणि तळाचा मुरघास खराब होत नाही.
  • मुरघास शक्यतो बंकर मधेच करावा. कारण चारा भरण्यास, दाबण्यास, काढण्यास व देखरेखीसाठी सोपा जातो.
  • मुरघासाचे बंकर ताडपत्रीने बंद करावे व ताडपत्रीला उतार द्यावा जेणेकरून पावसाचे पाणी निघून जाईल.
  • ट्रॅक्टरने मुरघास तुडवताना ट्रॅक्टर चे टायर चिखलाने भरलेले नसावेत.
  • हवा आत जाऊ नये म्हणून तोंडाला शेण मातीचा लेप द्यावा जेणेकरून भेगा पडणार नाहीत तसेच त्याच्यावर वजणदार विटा ठेवाव्यात.
  • मुरघास तयार झाल्यानंतर त्याचे सॅम्पल लॅब ला चेक करून घ्यावेत.
  • मुरघासाचे बंकर उघडल्यानंतर ४५- ६० दिवसात वापर करावा व नंतर झाकून ठेवावा.
  • मुरघासाला आगीपासून संरक्षित करावे.

जनावरांना मुरघास किती प्रमाणात द्यावा ?

  • जनावरांना चारा देताना त्यांच्या वजनानुसार कमी जास्त प्रमाणात द्यावा.
  • गाई (देशी ) – १२-१४ किलो.
  • गाई (होलस्टिन फ्रिशियन) – २०-२५ किलो.
  • म्हैस-१५-२० किलो
  • शेळ्या (४०-४५ किलो वजन) – १-१.५ किलो प्रति शेळी .
  • मेंढ्या (४०-४५ किलो वजन) – १-१.५ किलो प्रति मेंढी.
  • सुरवातीला मुरघास जास्त प्रमाणात न देता हळू हळू तो वाढवत न्यावा.
  • ज्या जनावरांना आपण मुरघास देत आहोत त्या जनावरांना दररोज ५० ग्रॅम खा.सोडा द्यावा त्यामुळे पोटफुगी होत नाही.
  • मुरघासातील कमी जास्त आम्लाच्या प्रमाणामुळे जनावरांना अँसिडिटी होते.

चांगला मुरघास कसा ओळखाल

  • मुरघासाचा दर्जा त्याच्या रंगावरून, वासावरून, चवीवरून स्पर्शावरून ओळखता येते.
  • रंग -चांगल्या मुरघासाचा रंग फिकट हिरवट-पिवळ्या किंव्हा सोनेरी रंगाचा असतो.
  • वास- चांगल्या प्रतीच्या मुरघासाचा आंबट गॉड वास येतो. सडका, कुबट सहन न होणारा वास खराब मुरघासाचे निर्देशक आहे.
  • चव – मुरघासाची चव आंबट असेल तर तो चांगल्या दर्जाचा मानला जातो.
  • बुरशी – काळसर,पांढऱ्या रंगाची बुरशीची वाढ तेव्हाच होते जेव्हा भरतेवेळी पाण्याचे प्रमाण जास्त असेल तसेच मुरघास व्यवस्थित दाबला गेला नसेल तेंव्हा होतो.
  • सामू – चांगल्या मुरघासाचा सामू ३.५ -४.५ असावा.
  • टीप – दुधाळ जनावरांना धारा काढल्यानंतर मुरघास द्यावा त्यामुळे मुरघासाचा वास दुधात मिसळत नाही.

बुरशीयुक्त मुरघास जनावरांना मुळीच देऊ नये त्यामुळे जनावरांची पचनशक्ती बिघडते परिणामी न पिण्यायोग्य दूध तयार होते.

 

Read: जाणून घ्या… हिवाळ्यातील थंडीमुळे पशुधनावर होणारा विपरीत परिणाम


लेखक

प्रा. नितीन रा. पिसाळ

प्रशिक्षक, (स्किल इंडिया प्रोजेक्ट)
विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.
मो. नं- 8007313597;
ई-मेल-nitinpisal2312@gmail.com