मुरघास चाऱ्याची प्रतवारी व आहारासाठी वापर
वर्षभर हिरवा चारा मिळणे ही भारतात दुरापास्त गोष्ट आहे, कारण भारतात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. यास्तव, मुबलक प्रमाणात उत्पादन झालेल्या हिरव्या चाऱ्याची मुरघास पद्धतीने साठवण हा पर्याय अतिशय महत्वाचा व अभिनव ठरतो. विशेषत: विविध चारापिके जनावरांच्या चाऱ्याची गरज भागवण्यासाठी व दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चात बचत करण्यासाठी उपयुक्त व महत्वाची ठरतात.
मुरघास पद्धतीचे फायदे :
- व्यवस्थित नियोजन केल्यास, गायींसाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याची सोय होते.
- मुरघास चार अतिशय कमी खर्चात तयार होतो.
- चाणाक्ष शेतकरी मुबलक चार असताना मुरघास पद्धतीने तो साठवतात व उन्हाळ्यात तो अधिक किमतीने विकतात.
- मुरघास चाऱ्याची पौष्टिक प्रतवारी वर्षभर कायम असते.
- मुरघास पद्धतीने तयार केलेला चारा चव, स्वाद व खाद्यवृद्धीच्या बाबतीत सरस असतो.
सायलो – अर्थात चारा तयार करण्यासाठी तयार केलेली विशिष्ट रचना
मुरघास चारा तयार करण्यासाठी करण्यात आलेला विशिष्ट आकाराचा खड्डा म्हणजे सायलो. उपलब्ध चाऱ्याचे प्रमाण, मनुष्यबळ अथवा यंत्रसामुग्री या गोष्टींवर किती आकाराचा सायलो करायचा हे अवलंबून असते. साधारणपणे २० – २५ किलो उत्तम प्रतीच्या प्रक्रियेसाठी एका घनफूट आकाराची जागा लागते. शिवाय, चारा जेवढा खच्चून व दाबून ठेवता येईल, तेवढे त्यातील वायूचे प्रमाण निघून जावून उत्तम प्रतीचा मुरघास चारा तयार होतो.
प्रशस्त जागा, भरपूर हिरवा चारा व खड्डा दाबण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध असेल, तर खंदक पद्धतीचा मोठ्या आकाराचा खड्डा घेतला जातो. अर्धा जमिनीत व अर्धा जमिनीच्या वर अशा पद्धतीनेही सायलो करता येतो. मात्र अशा सायलोच्या जमिनीवरच्या भागाला विशिष्ट आकाराच्या लाकडी फळ्या लावून बंदिस्त करावे लागते व चारा दाबण्यासाठी मनुष्यबळ वापरून बाहेरून उपाययोजना करावी लागते. मनोऱ्याप्रमाणे संपूर्ण जमिनीवर कुडाचा आकार करूनही सायलो उभा करता येतो. हल्ली छोट्या प्रमाणावर करावयाचा मुरघास चारा प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये चारा भरूनही करतात, तो साठवण्यासाठी लागणारी जागा व प्रतवारी या दोन्हीसाठी किफायतशीर ठरतो.
मुरघास चारा करावयाची पद्धत
प्रमाण –
उपलब्ध पशुधनानुसार प्रत्येक जनावराची गरज लक्षात घेवून चाऱ्याचे प्रमाण ठरवावे लागते. १० जनावरांच्या दर दिवसी २० किलो चारा या गरजेनुसार दररोज २०० किलो एवढा मुरघास चारा तयार झाला पाहिजे.
यांत्रिक पद्धत –
कापणी यंत्र – (रीपर) –
यंत्रसाह्याने चारा कापणी केल्यास वेळी वाचतो व मनुष्य बळावरील खर्चात बचत होते. ट्रॅक्टरला जोडलेल्या कापणी यंत्राच्या साह्याने एका तासात एका एकरावरील, अगदी बारीक म्हणजे जमिनीपासून १ – २ इंच उंचीचाही चारा कापून गोळा करता येतो.
चॉपर – कापणी यंत्राप्रमाणेच अधिक क्षमतेचे हे यंत्र कमी वेळात अधिक चारा कापण्यासाठी वापरले जाते. ट्रॅक्टरच्या इंजिनाला चॉपरचे मशीन जोडून हव्या त्या आकाराचे पिक वा चारा या यंत्राच्या साह्याने घेता येतो.
चारा पीक –
भरपूर शर्करा व आर्द्रता (३५-४०% कोरडा चारा व ६०-६५ % आर्द्रता) असलेल्या पिकापासून उत्कृष्ट मुरघास बनते. या दृष्टीने मका, ज्वारी, बाजरी आणि ओट यांचे मुरघास उत्तम बनते.
मक्याचे मुरघास –
मका लावल्यापासून ५५ – ६० दिवसांत, धाटांत दुधासारखा पदार्थ व रसाळता निर्माण झालेली असते अशा स्थितीत, धाटांचा तसेच कणसासहित धाटांचाही मुरघास चारा उत्तम व चविष्ट बनतो.
उत्तम मुरघास निर्मितीसाठी आर्द्रता हा अत्यंत महत्वाचा गुणधर्म अथवा घटक असतो. साधारणपणे ६० – ६५ % आर्द्रता असलेल्या अवस्थेतील चाऱ्याचे हमखास अधिक उत्तम मुरघास बनते. त्यासाठी कापणीपूर्वी अथवा प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी एक आठवडा त्या पिकाला पाणी देणे बंद केले पाहिजे. अन्यथा कापणी झालेल्या पिकाची काही दिवस साठवण करून ते योग्य प्रमाणात सुकू दिले पाहिजे.
अशा पिकाचे साधारणत: एक इंच आकाराचे तुकडे करावेत.
दाबाई व आच्छादन –
असा कापलेला व तुकडे केलेला चारा सायलोमध्ये भरून तो शक्य तितका दाबून ठेवावा. प्रत्येक मीटरमध्ये ७०० किलो इतका, एका मिनिटाला एक टन चारा भरता यावा. संपूर्ण चारा शक्य तितक्या त्वरेने एक ते दोन दिवसांत सायलोमध्ये व्यवस्थित भरता आला पाहिजे. तो भरल्यानंतर सायलोवर प्लास्टिकचे आच्छादन त्यावर घालून ठेवावे.
चाऱ्याच्या पौष्टिकतेत वाढ होण्यासाठी विविध प्रकारची प्रसाधने बाजारात मिळतात. त्यांचा मुरघासाच्या गुणवृद्धीसाठी अवश्य वापर करावा.
मुरघास / सायलो उघडण्याची पद्धती
हवेशी संपर्क होवून आंबवण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी मुरघास भरून ठेवलेला सायलो उघडण्याची विशिष्ट पद्धत असते. कोणत्याही एका बाजूने अतिशय छोट्या भागापुरता सायलो उघडा करावा. मुरघासाच्या रंगावरून त्याची परत कळू शकते. मुरघास करड्या रंगाचा नसावा. त्यापेक्षा विनेगारसारखा फिकट रंग असल्यास त्यात असितिक आम्ल असण्याची शक्यता असते. त्याला मंदसा, किंचित आम्लारी असा, अतिशय सौम्य आंबट असा गंध येणे अपेक्षित असते. अशा प्रकारच्या मुरघासात गायींना अनुकूल असे लॅक्टिक आम्लाद्वारे झालेले आंबवण असते.
अशा पद्धतीने तयार झालेले मुरघास सर्व दृष्टीने उपयुक्त व किफायतशीर असते. मात्र, नुसत्या मुरघासाचा आहार देण्यापेक्षा त्याच्याबरोबर कोरडा चाराही देण्यात आला पाहिजे. त्यांचे प्रमाणही योग्य असावे लागते. हिरव्या चाऱ्याच्या या पर्यायामुळे अधिक गायींना आवश्यक असलेले खाद्यघटक, विशेषत: पाणी / आर्द्रता योग्य प्रमाणात देता येते. मात्र, आपापल्या अनुभवांवर त्याची निर्मिती, वापर व नियोजन आखले पाहिजे. त्यासाठी प्रयोगशील राहून व सातत्यपूर्वक निरीक्षणानुसार त्याच्या प्रमाण, प्रतवारी व प्रकारात बदल करत राहून आपल्या जनावरांचे पोषण वर्षभर करता यावे याची तजवीज करावी.
अनुवादक
डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर