भारतात आधुनिक डेअरी फार्म कसे चालवावे

गेल्या १० वर्षांत दुग्धव्यवसायात भारताची आवड वाढली आहे. चांगली उपकरणे आणि पशुंच्या उत्तम जातीसह हजारो नवीन डेअरी फार्म्स नव्याने सुरु झाले आहेत. तथापि, यापैकी अर्ध्याहूनही कमी डेअरी फार्म्स दीर्घकालीन टिकून राहिले. अनेक डेअरी फार्म्स अयशस्वी का होतात आणि आधुनिक डेअरी फार्म्स ची भविष्यात अपयशामागील कारणे कशा दूर करता येतील आणि दुरुस्त केली पाहिजेत, ह्याबाबतचे चिंतन हा या लेखामागील हेतू आहे.

डेअरी फार्मिंग बद्दल माहिती

डेअरी फार्मिंगचा अलिकडील कल पाहता ते चार गटात विभागले जाऊ शकते. प्रथम, काही स्थानिक नवीन डेअरी फार्म्स सुरू करण्यासाठी आर्थिक साधने मिळवितात. दुसरे म्हणजे, असे अनिवासी भारतीय आहेत ज्यांनी शेती क्षेत्रात गुंतवणूक करून आपले जास्तीचे उत्पन्न खर्च करणे निवडले आहे. तिसर्‍या गटामध्ये तरूण शहरी व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना नोकर्‍याबद्दल अशा राहिलेली नाही व त्यामुळे ते शेतीकडे परत जाण्याचा प्रयत्न करतात. शेवटी, चौथा गट पर्यायी व्यवसाय शोधणार्‍या उच्च-मध्यम-वर्गातील बेरोजगार परंतु सुशिक्षित तरुणांचा आहे. यापूर्वी कधीही कोणत्याही गटाने डेअरी फार्मिंगचा अनुभव घेतलेला नाही – आणि ज्यांना आपल्याकडील पशुंची  व त्यांच्या साधारण गरजांची आवश्यक माहिती नसते, तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचे पढीव ज्ञान उपयोगाचे ठरत नाही.

How to start dairy farm

उपजीविका म्हणून फार्म चालवणे

इतर प्रकारच्या शेतीप्रमाणे दुग्धव्यवसाय हा केवळ व्यवसाय नव्हे, तर उपजीविका आहे. शेतीसाठी ज्ञान, धैर्य आणि मोठ्या प्रमाणात उत्कटतेची आवश्यकता असते. नवीन दुग्धशाळेच्या  इच्छुकांनी विशेषत: हे समजून घेतले पाहिजे, की ते जिवंत प्राण्यांशी व्यवहार करीत आहेत, मशीन सोबत नाही. प्रकल्प व्यवस्थापनप्रणाली आणि शेती उपकरणांचे ज्ञान मदत करते, हे खरे आहे; परंतु तेवढे पुरेसे नाही.

मोठ्या प्राप्तीसाठी लहान श्रेणी

बरेच उच्च-तंत्रज्ञान युक्त आधुनिक डेअरी फार्म्स मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची चूक करतात. ते सुरुवातीला मोठ्या प्रमाणात निवारे, शेड तयार करतात आणि मोठ्या संख्येने प्राणी खरेदी करतात. जेव्हा आपण दुग्धव्यवसायात नवीन असतो तेव्हा मोठ्या कळपाच्या समस्यांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. त्यामुळे एकाच वेळी एकदम मोठा कळप विकत घेण्याऐवजी, आपण आपल्या सुरुवातील किमान शक्य तितक्या कमीत कमी जनावरांच्या साह्याने व सातत्याने दरमहा दुधाचे उत्पादन टिकवण्यासाठी धडपड करावी.

पुनरुत्पादक चक्र समजून घेणे 

बरेच नवीन शेतकरी आपल्या गुरांचे जीवशास्त्र समजून न घेता, पूर्णपणे केवळ दूध उत्पादनावर आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्यापैकी बहुतेकांना प्रजनन अवस्था (माज) कशी शोधायची हे माहित नसते किंवा ४ ते ५ व्या महिन्यात प्राण्यांची गर्भधारणा करणे आवश्यक आहे, हे माहित नसते. अनेकवेळा असे निदर्शनास आले आहे कि मोठ्या संख्येने दुभत्या गुरांच्या फार्मवर एकही बैल नसतो आणि कृत्रिम गर्भधारणेसाठी त्यांना स्थानिक सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांवर अवलंबून रहावे लागते. यामुळे ऋतुचक्रकाळ गमावला जाऊ शकतो, ज्या दरम्यान केवळ काही गायी दूध देऊ शकतात. काही फार्म्सवर ९ ते १० महिने जातात आणि एकाही गायीने दूध दिलेले नसते. मोठ्या संख्येने दुधाशिवाय उत्पन्न न देणाऱ्या गायींना नुसताच आहार पुरवठा करणे म्हणजे दीर्घकाळामध्ये नुकसान झेलणे.

अधिक माहितीसाठी: प्रजनन व्यवस्थापन करिता काही महत्वाच्या बाबी

वासरांची काळजी घेणे

बरीच आधुनिक डेअरी फार्म्स अयशस्वी ठरले, त्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे त्या ठिकाणी वासराची काळजी घेतली गेली नव्हती. शेतात १०० पेक्षा अधिक दुभती जनावरे आहेत, परंतु केवळ २०-३० च  वासरे टिकून राहिल्याची प्रकरणे समोर आली आहेत. कळपांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी वासरांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मादी वासरे विशेषत: डेअरी फार्मसाठी मौल्यवान असतात, कारण ते ३-४ वर्षांत दूध देण्यास सुरवात करतात.

डेअरी फार्मचे खाद्य व चारा व्यवस्थापन

दुभतेपणाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच शेतकर्‍यांनी जनावरांना चांगले खाद्य (धान्य) आणि चारा पुरविले. तथापि, ५-६ महिन्यांनंतर दुधाचे उत्पन्न कमी होऊ लागल्याने, आहारामध्ये चारा व धान्याचे प्रमाण कमी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता — त्यामुळे जनावरे झपाट्याने त्याचे आकार निम्म्याने कमी करतात. आवश्यक आहाराचे प्रमाण हे पशुंच्या दुधावर अवलंबून असले तरी ते शरीराच्या वजनावरही अवलंबून असते आणि कोणत्याही कारणास्तव आहारदक्षता  कधीही कमी केली जाऊ नये. कोणत्याही पौष्टिक असंतुलनामुळे दीर्घकाळ आरोग्यासाठी गंभीर आणि वारंवार समस्या उद्भवू शकतात.

दुग्धशाळेसाठी स्वयंचलन आणि कामगार

बर्‍याच नवीन शेतमालकांना त्यांचे शेत पूर्णपणे स्वयंचलित करायचे आहे. हाताने दूध काढणाऱ्या पद्धतीऐवजी यंत्राद्वारे दूध काढणे ही एक ‘चाचणीक्षम’ प्रक्रिया आहे, ज्यासाठी वेळ आणि धैर्य आवश्यक आहे. जेव्हा हे कार्य त्वरित होत नाही, तेव्हा शेतकरी बहुतेक वेळा फक्त दुधाची मशीन खरेदी करतात. ही पैशाची मोठी उधळपट्टी ठरू शकते. यामुळे ते पूर्णपणे मजुरांच्या मर्जीवर अवलंबून आहेत. दुग्धशाळेच्या दीर्घकालीन यशस्वितेसाठी स्वयंचलन आणि कामगार यांच्यात संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे.

डेअरी फार्मवर उपस्थिती

असे निदर्शनास आले आहे, की अनेक डेअरीमालक ज्यांना डेअरी फार्मचे फारसे ज्ञान नाही, ते फार्मची देखभाल करण्यासाठी इतरांवर अवलंबून होते. डेअरी फार्मसाठी दिवसाचे २४ तास, आठवड्यातून ७ दिवस आणि वर्षातून ३६५ दिवस मालकाचे लक्ष आवश्यक असते. इतर जण आपल्यासाठी लक्ष पुरवण्यात आवश्यक तितके दक्ष असणार नाहीत. त्यामुळे आपण आपल्या फार्मवर  स्वत: प्रत्यक्ष वेळ देण्यास तयार होईपर्यंत (किमान डेअरी फार्मवरची कामे व संपूर्ण घडी स्थिर होईपर्यंत) कृपया डेअरी फार्म चालू करू नये.

डेअरी फार्मची दीर्घकालीन वचनबद्धता

बर्‍याच नवीन आधुनिक दुग्धशाळांची सुरूवात अशा लोकांद्वारे केली जाते, ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो व नुकसान झाल्यास ते पचवण्याची क्षमता असते, प्रयोगासाठी काही मर्यादेत पैसा गमावणे त्यांना परवडणारे असते आणि ते पूर्ण-वेळ इतर मुख्यव्यवसायावर अवलंबून राहू शकतात. जेव्हा सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत, फायदा होत नसल्याचे जाणवते – बहुधा दुग्ध व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे होते, तेव्हा ते अचानक डेअरी फार्म बंद करतात (आणि पशुंना विक्रीसाठी किंवा सरळ कत्तल करण्यासाठी पाठवतात). डेअरी फार्म दीर्घकालीन यशस्वी होण्यासाठी, सुरुवातीच्या अडचणींवर संयमाने मात करणे आणि कामकाज करण्यासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे. काटेकोर काळजी, घेणे, त्यासाठी वेळ देणे आणि वरचेवर माहिती घेत ती शक्य तशी अनुसरण्याचे मार्ग शोधणे आवश्यक असते. उपजीविकेसाठी सहज मिळणारी नोकरी शोधणे नक्कीच ठीक पण त्यात वेळ घालवण्यापेक्षा हाताशी असलेल्या साधनांच्या विनियोगाने निष्ठापूर्वक व श्रद्धापूर्वक व्यवसाय करू गेल्यास मार्ग सापडत जातात. शेती असेल तर तो आपला उदरनिर्वाह करण्याचा मुख्य स्रोत आहे, जो आपणास दीर्घकाळासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करण्यात साह्यभूत ठरू शकतो.

निष्कर्ष

दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेळ आणि बराच संयम आवश्यक आहे. या लेखाचा हेतू लोकांना दुग्धव्यवसाय चालू करण्यास मनाई करण्याचा नसून, दुग्धव्यवसायातील होणाऱ्या संभाव्य चुकांपासून ते स्वत:चा बचाव करून भविष्यात यशस्वी होऊ शकतील, यासाठी सामान्य शेतकर्‍यांना शिक्षित करणे, सावधगिरी व दक्षता घेण्यासाठी प्रवृत्त करणे व काही महत्वाच्या सूचना करणे, हा उद्देश आहे.

हेही वाचा: डाऊनर काऊ सिंड्रोम (वेतोत्तर गोपात लक्षण) निदान आणि उपचार

 

अनुवादक

डॉनाज़िया शकील पठान
पशुवैद्यकिय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग


बाजारात उपलब्ध उत्पादने: