जनावरांमध्ये स्तनदाहाची लक्षणे, प्रतिबंध व उपचार
स्तनदाह किंवा कासदाह म्हणजे पशुंना भेडसावणारा सर्वात भयंकर आजार आहे. यात पशुपालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असते. या आजारात प्रामुख्याने दूध कमी होणे, दुधाचा दर्जा घालवणे तसेच जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतात. सोबत औषध उपचारावर खर्च होतो. गायी व म्हशीमध्ये स्तनदाह हा प्रामुख्याने होणारा रोग असुन तो जीवाणू जन्य रोग आहे. स्तनदाह होण्याची तशी पुष्कळ कारणे आहेत. जशे की जिवाणू, विषाणू तथा बुरशी या सारख्या प्रकारचे जंतु या रोगास करणीभूत असतात. हा आजार म्हशींपेक्षा गायींमध्ये जास्त प्रमाणात होतो, त्यात ज्या गायी जास्त दूध देतात त्यांना स्तनदाह जास्त प्रमाणात होतो. देशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या प्रसुतीपेक्षा नंतरच्या प्रसुतींच्या नंतर कास दाह अधिक होतो. जिथे जनावरांची संख्या जास्त असते तिथे कास दाहाचा संभव जास्त असतो. स्तनदाह या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गाई म्हशींची कास अतिशय कडक होते, म्हणून याला “दगडी” असे संबोधतात.
कासदाहाची कारणे:
सर्वसाधारणपणे दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास अर्धा ते एक तास कालावधी लागतो काही जनावरांमध्ये हा काळ जास्त असू शकतो. याच वेळेस हे जंतू सडाच्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात. यात मुख्यतः खालील प्रकारची कारणे असतात
- जीवाणू कासेला झालेल्या जखमा, दुखापतींमधुन सडांच्या माध्यमातून कासेमध्ये प्रवेश करतात.
- कासेला दुखापत होणे.
- दूध काढणाऱ्याचे अस्वच्छ हात व कपडे.
- जनावरे अस्वच्छ असणे, गोठ्यात स्वच्छतेचा अभाव.
- माशांचा बेसुमारपणा.
- दूध काढण्याची चूकीची पद्धत.
- दूध पुर्ण न काढणे.
- गोठ्याची फरशी ओली असणे व गोठ्यात स्वच्छता नसणे.
- कासदाह जास्त दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त होतो. कारण मोठ्या कासेमुळे सडांना व कासेला दुखापत होण्याची अधिक संभावना असते.
- गर्भाशयाच्या आजारांचा प्रभाव, जार लटकणे (पूर्णपणे न पडणे) किंवा प्रसुतीच्यावेळी झालेला संसर्ग.
- जनावरांच्या कासेचा मलमूत्राशी सतत संपर्क येणे.
कासदाहाची लक्षणे :
कासेत जंतूची जलद गतीने वाढ सुरू होताच
- कास गरम, लाल व वेदनादायक होते, काही वेळाने ताप येतो व काही काळाने कास थंड आणि कठोर होतात.
- कास सूजते.
- दुधामध्ये छीद्रे येतात.
- दूध येणं हळूहळू कमी होऊन तीव्र स्तनदाहामध्ये ते बंद होते, त्याचबरोबर स्राव उत्पन्न होतो. जो सुरुवातीला पिवळा असतो व नंतर रक्तामुळे लालसर होतो.
दिर्घकालीन कासदाह
- कास अधिक कठोर व लहान होते.
- दूध पातळ व पाण्यासारखे येते.
- कास दाबल्यानंतर वेदना होतात.
- अंतिम टप्यात दूध पूर्णपणे बंद होते (सुखून जाते).
रोग प्रतिबंधन :
स्तनदाहासारख्या घातक रोगासाठी उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय केले असता होणारे नुकसान टाळले जाऊ शकते.
- सपूर्ण गोठा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा व दर १५ दिवसांनी जंतुनाशक फवारावे.
- जनावरांस नेहमी पुरेशी स्वछ जागा, खाद्य व हवा मिळेल याची दक्षता घ्यावी.
- स्वछ दूध पद्धतीचा उपयोग करावा
- स्तनांना स्वच्छ धुवावी व कोरडी करावी व दूध काढण्यापर्वी व नंतर निर्जंतुक पाण्याने कासेला धुवून घ्यावी.
- दूध काढताना संपूर्ण हाताचा उपयोग करावा, अंगठ्याने दूध काढू नये.
- दूध काढताना सडांमधून संपूर्ण दूध काढावे.
- गाई व म्हशींना दूध काढल्यानंतर अर्धा तास बसू देऊ नये. दूध काढून झाल्यानंतर जनावरांना हिरवा चारा खायला देणे जेणेकरून जनावरे खाली बसणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या छिद्रामधून जंतूंचा प्रवेश होणार नाही.
- आजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना पाजू नये.
- आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे व त्यांचे दूध शेवटी काढावे.
- वेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची कॅलिफोर्निया टेस्ट पद्धतीने नियमित चाचणी करावी.
- वेळेवरती कासदाहाचा उपचार झाला नाही तर इतर रोगाचे जीवाणू देखील आत प्रवेश करतात व त्यामुळे रोग आणखी गंभीर होतो.
- उपचार सुरू झाल्यानंतर तीन ते पाच दिवस ट्यूब व इंजेक्शन सोडले पाहिजे. एक किंवा दोन दिवसात पूर्णपणे उपचार होत नाही.
- कासदाहाच्या उपचारासाठी प्रतिजैविके पशुवैध्दकाच्या सल्यानुसार द्यावी.
- गायी व म्हशी आटताना चारही सडानंमधून संपूर्णपणे दूध काढावे व प्रत्येक सडामध्ये ट्यूब ने औषधे सोडावीत.
- आजारी जनावरांची नोंद ठेवावी.
डॉ. अमोल आडभाई & ज्ञानेश्वरी भांड
राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, दक्षिणीय विभागीय, बंगळुरु (कर्नाटक)
Mo: 8805660943
Email: amoladbhai.943@gmail.com