मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन – पाण्याच्या योग्य वापर व बचतीसाठी करा मुक्तसंचार गोठा

मित्रांनो , आपणास दुग्धव्यवसाय करावयाचा असेल व आपल्याकडे पाण्याचे प्रमाण कमी असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करा. आपणास सर्वसाधारणपणे  गोठा साफ करणे व गाईना धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

  • गोठा साफ करण्यासाठी पाणी वापर: मुक्तसंचार गोठा पद्धतीमध्ये दररोज गोठा साफ करावयाची गरज नाही. यामध्ये जनावरे एकाच ठिकाणी बधली नसल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा गोठ्याबाहेरील मोकळ्या जागेत बसणे , आराम करणे व फिरणे यामध्ये जात असतो त्यामुळे गोठ्यात जास्त शेण व मुतारी पडत नाही. असे असल्यामुळे गोठा दररोज साफ करावयाची गरज पडत नाही. तसेच शेण व मुतारी वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याने उन्हाने त्यातील ओलसर पणा कमी होतो तसेच गाईंच्या चालण्याने त्याची पावडर होते. अशी पावडर युक्त शेण गोळा करण्यासाठीही सोपे असते. २-३ महिन्यातून एकदा आपण हे सर्व शेणखत एका बाजूला घेऊन काढून घेऊ शकतो. त्यामुळे दररोज गोठा साफ करण्यासाठी लागणारे १०० ते १५० लिटर पाण्याची बचत होते
  • जनावरे धुण्यासाठी पाणी वापर: आपणास माहित आहे कि मुक्तसंचार गोठ्यात जनावरे मुक्त असल्याने ज्या ठिकाणी शेण आहे अश्या ठिकाणी जनावरे बसण्याचे टाळतात. जनावरे कोरड्या ठिकाणी जाऊन बसतात. तसेच उन्हामुळे मुक्तसंचार गोठ्यामध्ये जास्त ओलसरपणा राहत नाही. या गोठ्यात पाचट टाकल्यामुळे शेण व पाचट यांच्या जनावरांच्या चालण्यामुळे पावडर होते व यामध्ये मुतारी शोषली जाते व त्यामुळे गोठ्यास वास येत नाही. बऱ्याच मुक्तसंचार गोठ्यात कोंबड्या सोडल्यामुळे त्या जनावराने शेण टाकले कि त्यातील घटक खाण्यासाठी त्या शेण पायने विस्कटतात व शेण वळण्यास मदत होते. अश्या सर्व परिस्थितीमुळे जनावरे घाणीत बसत नाहीत व त्यांना दररोज धुण्यासाठी जे ५० ते १०० लिटर पाणी लागते त्याची बचत होते. अशी जनावरे धुतली नसली तरी त्यांना ग्रुमिंग साठी ब्रश लावलेले असतात.जनावरे आवश्यकतेनुसार अश्या ग्रुमिंग चा वार करतात.
  • शेतीसाठी सुद्धा पाण्याचे बचत करणारे जिवाणूयुक्त शेणखत: मुक्तसंचार गोठ्यातून तयार होणाऱ्या शेणखतात असंख्य प्रकारचे उपयोगी जीवाणू असतात कि जे योग्य वातावरण मिळल्यावर वाढतात. आपल्या गोठ्यातील पाला पाचोळा हे अश्या प्रकारच्या जिवाणूंचे खाद्य असल्याने व याठिकाणी काही प्रमाणात ओलसर पणा असतो त्यामुळे त्यांची वाढ याठिकाणी चांगली होऊन एक जीवाणू युक्त खताची निर्मिती याठिकाणी होते  असे जिवाणूयुक्त शेणखत शेतात गेले तर ते हवेतून पाणी घेऊन शेतीला देते त्यामुळे जनीन भुसभुशीत होते २० ते २५% पाणी कमी लागते

अश्या प्रकारे आपण जर मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब केला तर आपण ५० ते ६०% कमी पाणी वापरात आपल्या गोठ्याचे नियोजन करू शकतो.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल: मुक्तसंचार गोठ्यात हिरालालने हिरा शोधला


डॉ. शांताराम गायकवाड

सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विकास विभाग
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा