जनावरांना बांधणे वा बंदिस्त करणे क्रौर्याचेच; नुकसानकारकही !

जनावरांची योग्य देखभाल करणे महत्त्वाचे आहे

गायी आणि बैल मूलत: प्रवृत्तीने समाजशील असल्यामुळे, आपापसातील व कळपातील इतर जनावरांशी परस्पर सहवासाच्या आस्थेने राहतात. साहजिकच, ते त्यांच्या कळपातील इतर जनावरांच्या सान्निध्यात अधिक मुक्तपणे व सहजतेने राहतात. वरील छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे अनेक पशुपालक आपली जनावरे जखडून ठेवतात. अशा अवस्थेत या जनावरांच्या बसणे, उठणे या साध्या हालचालीही मुक्तपणे व सहजतेने होवू शकत नाहीत. इतकेच काय, त्यांची निवांतपणे बसून रवंथ करण्याची साहजिक नैसर्गिक गरजही भागवली जावू शकत नाही. वास्तविक पाहता, रवंथ ही या जनावरांची अतिशय महत्वाची शरीरक्रिया असून, त्यांचे पचन व त्यावर अवलंबून असलेल्या इतर क्रियाही पूर्ण होवू शकत नाहीत.

साधारणपणे निरोगी गायींना किमान ६ ते ८ तास निवांत रवंथ करण्यासाठी व १२ तास निवांत विश्रांतीचा अवधी मिळणे आवश्यक असते. तरच त्यांच्या सर्व शरीरक्रिया परिपूर्ण होवून ऊर्जा व दूध निर्मिती होवू शकते. मात्र, बंदिस्त अवस्थेत त्यांच्या या सर्व क्रियांवर मर्यादा येतात. (माणसाप्रमाणेच) प्रत्येक गायीची बसण्या-उठण्याची हालचाल वेगवेगळी असते. त्यासाठी त्यांना त्यांच्या निवार्‍यात मुक्तपणा आवश्यक असतो. तो न मिळाल्यास त्यांच्या या दैनंदिन नैसर्गिक हालचाली सुलभ होत नाहीत. विशेष म्हणजे मुक्त हालचालींचे स्वातंत्र्य दिल्यास रवंथ, पचन, ऊर्जानिर्मिती वाढते व त्यामुळे त्यांच्या आहाराची गरजही तुलनेने कमी होवून आहारावरील खर्चाचे फायदेशीर नियोजन करण्याचा दुहेरी फायदा आपसूक मिळतो.

याशिवाय, स्वच्छ दूधउत्पादनासाठी आवश्यक असलेली स्वच्छता बंदिस्त अवस्थेत राखता येत नाही. बांधलेली जनावरे त्यांच्या मल-मूत्रापासून त्या दूर जावू शकत नसल्यामुळे त्यांना त्याच जागी नाईलाजाने बसावे लागते. त्यांच्या अंगाला ही ओल व घाण सतत लागत असल्यामुळे त्यांच्या त्वचेवर, सडांवर रोगजंतूंची लागण सहज होते. या अस्वच्छतेमुळे कासेच्या, तसेच मायांगांच्याही अनेक जंतुजन्य आजारांचे प्रमाण वाढते. अशी जनावरे या रोगांना अधिक बळी पडतात. सिमेंट कॉन्क्रिटच्या जमिनीवर बांधून ठेवलेल्या जनावारांच्या बाबतीत अशा अस्वच्छते मुळे बळीपडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

अभ्यास व संशोधनातून असेही दिसून आले आहे, की बांधलेल्या अवस्थेतील, सदैव बंदिस्त असणार्‍या जनावरांवर एक प्रकारचा तीव्र, पण अदृश्य असा ताण असतो. अशा गायींच्या रक्तातील तणावजन्य रासायनिक पदार्थांचे (उदा : कॉर्टिसॉल) प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे अशा गायी सततच्या तणावामुळे (आपल्या शरीरक्रिया सुलभपणे पार पाडू शकत नसल्यामुळे) आक्रमक होतात. सततच्या असुरक्षिततेच्या भावनेने त्यांचे वर्तन अधिक साशंक होत असते. विशेष म्हणजे, अनेक पशुपालकांची अशी समजूत असते, की मुक्तपणे वावरू दिलेली जनावरे अधिक आक्रमक असतात. तथापि, संशोधनाने हे सिद्ध केले आहे, की सतत मुक्त संचार करणार्‍या गायी अधिक शांत व पाळीव असतात आणि त्याउलट सतत बंदिस्त केलेल्या गायींमध्ये आक्रमक वृत्ती निर्माण होतात.

अजून एक महत्वाचे म्हणजे, खुलेपणाने वावरू देण्यात आलेल्या गायींच्या प्रजननवृत्ती ठळकपणे दिसून येतात. त्यामुळे मुक्त ठेवल्यास गायींच्या माजाचे निदान तात्काळ व बव्हंशी अचूक होवू शकते. अर्थातच अशा मुक्तसंचार पद्धतीने पालन केलेल्या गायींची प्रजननक्षमता अधिक असल्याचे दिसून आले आहे. अशा रीतीने, गायी बांधून न ठेवता, त्यांना त्यांच्या गरजेनुसार गोठ्यात मुक्तपणे वावरू दिल्यास त्यांच्या अनेक शरीरक्रिया सुलभ व प्रभावी होवून दूधउत्पादन वाढतेच, शिवाय आहार, आजारावरील खर्चातही घट होवून अधिक लाभ मिळतो.

अगदीच अटळ असल्यास गायींना, अपरिहार्य परिस्थितीत बांधून ठेवावे लागले, तरी गायींना त्यांच्या हालचाली सुलभतेने करता याव्यात यासाठी किमान ९ मीटर एवढ्या लांबीच्या दोरीने बांधण्यास हरकत नाही; मात्र कुठल्याही परिस्थितीत गायींना दिवसातून दोन तासांपेक्षा अधिक काळपर्यंत बांधून ठेवणे, म्हणजे त्यांच्या नैसर्गिक शरीरक्रियांवर बंधन घालणे, क्रूर तर आहेच; नुकसानीचे व प्रसंगी धोकादायकही  आहे.

नम्र विनंती आहे की तुमची गाय बांधू नका. त्यांना मुक्तपणे हिंडू द्या


प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

स्वेच्छानिवृत्त विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर