आहारातील तंतुमय पदार्थांच्या प्रतवारीचे महत्व

आपल्या गायीच्या आहारातील तंतुमय घटकांची कमतरता कशी ओळखावी ?

आपल्या जनावरांच्या गोठ्याच्या अथवा निवाऱ्याच्या सतत प्रत्यक्ष निरीक्षणातून अनेक गोष्टींचा आपल्याला अंदाज व माहिती घेता येते. विशेषत: जनावरांच्या केवळ वर्तनातून आपल्याला आपल्या खाद्य व आहार नियोजनाची स्थिती व प्रतवारी कळू शकते. गव्हाणीच्या आसपास किती गायी रेंगाळत आहेत किंवा चारा खात आहेत, किती गायी नुसत्याच उभ्या अथवा बसलेल्या स्थितीत रवंथ करीत आहेत, किती गायी जमिनीवर पडून रवंथ करीत आहेत, किंवा किती गायी रवंथ न करता जमिनीवर पडून आहेत – अशा सर्व निरीक्षणांची वरचेवर नोंद घ्यावी.

साधारणपणे एकूण गायींच्या २० – ३० टक्के गायी तरी चारा वा खाद्य प्रत्यक्ष खाताना दिसल्या पाहिजेत. उर्वरित व चरत  किंवा चारा खात नसलेल्या सर्व गायी जमिनीवर शांतपणे बसून रवंथ करत असल्या पाहिजेत. रवंथ करणाऱ्या गायींच्या तोंडातून फेस दिसत असला पाहिजे. अशा प्रकारे या प्रमाणात आपल्या गायींच्या गोठ्यातील चित्र नसेल, तर आपण पुरवत असलेल्या आहारात विशेषत: तंतुमय पदार्थांची वा घटकांची कमतरता आहे असे समजावे.

विशेषत: कोरड्या चाऱ्यातून गायींना आवश्यक असलेल्या तंतुमय घटकांची पूर्तता होत असते. मात्र कोरड्या चाऱ्यात प्रथिने कमी प्रमाणात असतात. कोरडा चारा गायींना किती प्रमाणात द्यावा याचा संभ्रम शेतकऱ्यांना नेहमी पडतो. त्याबाबतीत हे लक्षात घेतले पाहिजे, की आरोग्य व उत्पादकता दोन्ही टिकवण्यासाठी गायींना मुबलक प्रमाणात कोरडा चाराच प्राधान्याने आवश्यक असतो. गायींची कोरड्या चाऱ्याची गरज इतर संयुक्त पोटाच्या जनावरांपेक्षा अधिक असते. त्यांच्या अधिक मोठ्या आकाराच्या कोठीपोटात अन्नाच्या वहनाचा कालावधीही अधिक असतो.

आहारातील उपयुक्त तंतुमय घटकांचे प्रमाण तपासण्यासाठी प्रयोगशाळेत दोन प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात. एक म्हणजे, एडीएफ (आम्लविरेचकतंतू) आणि दुसरी म्हणजे एनडीएफ (उदासीन रोधक तंतू) चाचणी. पैकी, एडीएफ चाचणीत सेल्युलोज व लीग्निन या महत्वाच्या दोन शर्करायुक्त तंतुमय घटकांचे प्रमाण मिळते. सेल्युलोज हा पचनीय, तर लीग्निन हा मात्र चाऱ्याचा अपचनीय घटक असतो. त्यामुळे एडीएफ चाचणीद्वारे चाऱ्याचे ऊर्जामूल्य कळून येते तर एनडीएफ चाचणीत याशिवाय हेमीसेल्युलोज या पचनास जड असलेल्या शर्करायुक्त व तंतुमय घटकाचे प्रमाण तपासता येते.

चाऱ्याचे किमान एनडीएफ मूल्य टक्क्याहून कमी असल्यास असा चारा कोठीपोटातील सूक्ष्मजीवांच्या परिसंस्थेच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकतो आणि त्यामुळे गायींच्या आरोग्यास पूरक नसतो. कुरणावर वा मुक्तपणे चरणाऱ्या गायींना त्यांच्या आवश्यकतेनुसार व अनुकूल असा चारा निवडण्याची क्षमताही असते आणि आपल्याला हवा असलेला चारा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे चरताना अधिक आम्लयुक्त चारा मिळाल्यास, त्यावर उतारा म्हणून अधिक तंतुमय व कोरडा चारा गायी निवडतात. तेवढी नैसर्गिक आकलनक्षमता त्यांच्यात अवश्य असते. मात्र, बंदिस्त पद्धतीत त्यांना हे स्वातंत्र्य मिळत नाही व त्यांचा आहार शेतकरी पुरवतील त्यापुरता मर्यादित राहतो. त्यांना त्यांच्या आहाराचे संतुलन राखण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.

दुर्दैवाने, व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध असणाऱ्या पाकिटबंद खाद्याच्या पौष्टिकमूल्यांची  पुरेशी उपलब्ध होत नाही किंवा त्यातील केवळ स्थूल तंतूंपुरती (क्रूड फायबर) मर्यादित माहिती मिळू शकते. मात्र, एडीएफ किंवा एनडीएफ चाचण्यांच्या तत्वानुसार सविस्तर तंतुमय घटकमूल्यांची माहिती देत नाहीत. कोंडायुक्त खाद्यात स्थूल तंतुघटक (क्रूड फायबर) अधिक असतो. एखाद्या खड्यात कोंडा कमी, पण क्रूड फायबर अधिक असेल, तर ते खाद्य कोठीपोटाच्या योग्य हालचाली व योग्य प्रमाणात रवंथ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकत नाही. उलटपक्षी ते या क्रियांसाठी मारक ठरते.

प्रयोगाअंती असेही निदर्शनास आले आहे, की मुरघास किंवा वाळवलेला चारा न पुरवता आलेला नसेल, तर पशुखाद्यात स्थूलतंतूघटकाचे प्रमाण किमान १६ टक्के असले पाहिजे.

तरच त्याची प्रतवारी ही गायींच्या आरोग्यासाठी अनुकूल समजली जाते.

 


डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर