दुष्काळातील नाशवंत व टाकाऊ पिकांचा चाऱ्यासाठी वापर

हवामान व वातावरणातील बदलामुळे पिकांचे वारंवार नुकसान होण्याचे प्रमाण आपल्या देशात वाढताना दिसते आहे. विशेषत: दुष्काळ, अनावृष्टी यांबरोबरच अवेळी, अवकाळी होणारा पाऊस, अतिवृष्टी, गारपीट – तसेच, पिकांवरील रोग यामुळेही पिकांचे नुकसान होतच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. विमा उतरवलेला असूनही नुकसान सहन करावेच लागते. खूप मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पिकाच्या नुकसानीमुळे कराव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडून त्याचे पर्यवसान राष्ट्रीय हानीत होते व त्यामुळे त्याचा सर्वंकष दूरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो, ते वेगळेच. दुष्काळी वा अन्य तत्सम परिस्थितीमुळे पिकाच्या उत्पादनावर विलक्षण ताण असा अनेक प्रकारे पडत असतो. या बाबीवर बाहेरच्या अनेक देशांत, दर्जा व सुरक्षिततेचे निकष ध्यानात घेवून, अशा टाकाऊ पिकाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केली आहे. अर्थातच, टाकाऊ व वाया गेलेल्या पिकाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापराचा पर्याय स्वीकारताना सर्वात महत्वाची गोष्ट पाळली व पडताळली जाते, ती म्हणजे त्याची चारा वा पशुखाद्य म्हणून त्याची उपयुक्तता वा योग्यता.

अशा पिकात ओलावा शाबूत असेल, तर ते वाळवून त्याचा गरजेप्रमाणे चारा म्हणून वापर करता येतो. त्याचप्रमाणे, पीक जर अपक्व असून त्याच्यात, ६० – ६५ टक्के आर्द्रता असेल, तर त्याची कापणी करून ते मुरघासासाठी वापरता येते. याशिवाय, त्यावर कुठल्या औषधाची, कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे का, हेही पडताळणे आवश्यक असते. शेतातील पिकांना लग्न झालेली असल्यास शेतकऱ्यांनी त्याचा भविष्यात चाऱ्यासाठी होणाऱ्या वापराच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. तो लक्षात घेवूनच फवारणीचा निर्णय, त्याचे प्रमाण ठरवले पाहिजे. जर पिकावर पडलेल्या रोगाचे किंवा प्रादुर्भावाचे फवारणीने निराकरण होण्याच्या शक्यता कमी असतील, तर फवारणी करण्यापेक्षा योग्य वेळी कापणी करून त्याचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी, चाऱ्यासाठी करणे श्रेयस्कर ठरते. अर्थात, फवारणी केल्यावरही १४ – २१ दिवसांनी कापणी करून त्याचा चाऱ्यासाठी वापर करता येतो.

विशेषत: आपल्या देशात सोयबीनची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक सोयबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या उन्हाळ्यात दुष्काळामुळे सोयबीनची कापणी करून त्याचा चाऱ्यासाठी वापर करण्याची तयारी केलेली दिसते. मात्र, याबाबतीत अधिक विचार करणे जरुरीचे आहे. वास्तविकत: सोयबीनच्या पिकाची किंमत आणि चाऱ्यासाठी त्याचा वापर करण्याने होणारी खर्चातील बचत यांचे गणित तपासावे लागेल. अर्थातच, ते सोयबीनच्या प्रतीवर, उगवणीनुसार शेतकऱ्यांना ठरवावे लागेल. शिवाय, विम्याच्या हप्त्यांची भरलेली किंमत, त्याचा मिळणारा परतावा अथवा मोबदला, आपद्कालीनांना देण्यात येणारे साह्य, सोयबीनवर केलेल्या फवारणीमुळे येणाऱ्या संभाव्य मर्यादा यांचाही विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

पोषणमूल्ये (कापणी केलेल्या पिकातील) 

पिकांचे नुकसान झाल्यास अथवा तशी शक्यता निर्माण झाल्यास, पिकांच्या वाढीची वाट पहावी की पीक काढून त्याचा चारा करावा याबाबत साहजिकच शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती होते. पण त्याबाबतीत काही गोष्टी विचारात घ्याव्यात. सर्वसाधारणपणे, अशा संभाव्य परिस्थितीत, किमान ५० टक्के एवढे पान पिकावर असेल आणि फूल (फुलोरा) धरण्याआधी पाऊस पडला, तरीही ते पीक तग धरून वधारण्याची शक्यता असते. मात्र, ५० टक्क्याहून कमी पानवळा असेल (५० टक्के पाने गळून गेलेली असतील) तर अशा पिकाला फुलोराही येणे अशक्य असते व त्यामुळे कणीस किंवा धान्य उगवण्याचे प्रमाण खूपच कमी असते; साहजिकच उत्पादनही कमी होते. अशा परिस्थितीत मात्र, पिकाची कापणी करून त्याचा जनावरांसाठी चारा करणेच किफायतशीर ठरते. साधारणपणे सोयबीनच्या एका एकरातून दीड टन इतका कोरडा चारा मिळायला हरकत नाही. शिवाय, सोयबीन दोन्हीसाठी – वाळवून कोरडा चारा साठवण्यासाठी किंवा मुरघासासाठीही.

त्यांची तुलनात्मक गुणवत्ता खालीलप्रमाणे 

निकष (प्रति शेकडा शुष्कमूल्य) चारा कोरडा चारा धाटे
शुष्कमूल्य २४ ९१.५ ८९.१
क्रूड / स्थूल प्रथिने १५.७ १५.९ ६.९
क्रूड / स्थूल भरडमूल्ये ३१.२ ३३.८ ४४.२
एन डी एफ ४८.१ ४७ ७९.७
ए डी एफ ३७.२ ३४.९ ५९.९
इथर चोथा ४.४ ५.४ ३.५

मुरघास की कोरडा चारा :

अर्थातच, कोरडा चारा करून त्याचे भरे अथवा गठ्ठे साठवण करण्यापेक्षा  कापणी करून त्याचा मुरघास करणे, अधिक श्रेयस्कर व फायदेशीर ठरते, कारण मुरघास प्रक्रियेत सेन्द्रीयता टिकून राहते. मात्र, त्याची कापणीच्या वेळी असलेल्या अवस्थेवर ते अवलंबून असते. मुरघासासाठी अयोग्य असलेल्या, मात्र भरपूर पाने असलेल्या आणि दाबणी व छाटणी करण्यास योग्य असलेल्या धाटांच्या पिकाचा कोरडा चारा करणेच फायदेशीर.

दुष्काळस्थित पिकापासून मुरघास करण्याची पद्धत 

अल्फाल्फा व इतर त्यासारख्या वाणांच्या पिकाप्रमाणेच सोयबीनपासून मुरघास करण्यापूर्वी, त्याच्यात किमान शेकडा ६५ इतकी आर्द्रता टिकून राहील व त्याची छाटणी करता यावी, यासाठी त्याची कापणी न करता शेतात उभेच वाळवले पाहिजे. रीतसर व आवश्यक तेवढी आंबवणी होण्यासाठी त्यातील आर्द्रता आवश्यक असते. आर्द्रता कमी असेल तर अशी धाटे रात्रभर पाण्यात भिजवून मग त्याची ३ ते ८ इंच तुकड्यांची छाटणी करून वापरावे लागते. या आकाराच्या तुकड्यांना अधिक चांगल्या प्रकारे दाबून भरता येते. सोयबीनपासून तयार केलेल्या मुरघासाची गुणवत्ता अल्फाल्फाच्या कोरड्या चाऱ्याइतकी असते. फक्त एकच वैगुण्य म्हणजे, सोयबीनचे मुरघास तितके चविष्ट नसते. त्यामुळे जनावरांच्या दररोजच्या आहारात १५ ते २० टक्केपर्यंतच सोयबीनच्या मुरघासाचा वापर करावा. अन्यथा, जनावरांच्या आहारात घट होवू शकते व त्यामुळे दूधउत्पादनातही.

हेही लक्षात घेतले पाहिजे, की बिया भरण्याच्या स्थितीतल्या सोयबीनच्या चाऱ्यात अधिक तेलकटपणामुळे आंबवणी परिपूर्ण होत नाही व त्याची चविष्टताही कमी होते. त्यामुळे सोयबीनच्या पिकाची चाऱ्यासाठी, मुरघासासाठी कापणी, बिया भरण्यापूर्वी केली पाहिजेत.

कसे खावू घालावे ?

उत्तम व योग्य स्थितीच्या व योग्य प्रतीच्या सोयबीन पिकापासून केलेल्या मुरघासाची पोषणमूल्य गुणवत्ता अल्फाल्फा (लुसर्न / लसून) पासून केलेल्या मुरघासाइतकीच असते आणि ते जनावरांना त्याच प्रमाणात देण्यात येते. मात्र, कोरड्या चाऱ्यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागतो. तसेच, तो इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावा किंवा आधी अन्य कोरडा चारा देवून मग सोयबीन कोरडा चारा द्यावा. याशिवाय, सोयबीन चारा युरिया व अल्कली मिसळून दिल्यास त्याची गुणवत्ता वाढते व त्याचे आहारमूल्य उंचावते.


अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर