जनावरांतील लाळखुरकूत रोग

जनावरांमध्ये आढळून येणारा लाळया खुरकूत  रोग हा विषाणुजन्य रोग असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करणारा आहे. विषाणूजन्य रोग असल्याकारणाने या रोगावर उपचार जरी नसला तरी रोग प्रतिबंधक लसीद्वारे तसेच जैवसुरक्षा उपायाद्वारे या रोगाला प्रतिबंध घालता येऊ शकतो. तोंडातील व पायाच्या खुरीमधील जखमा वाढून इतर दुसरी गुंतागुंत होऊ नये म्हणून त्यावर मात्र उपचार करण्यात येतो.

लाळ खुरकूत हा रोग ओआयई (OIE) लिस्टेड असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्रेडमध्ये त्याला महत्त्व आहे.

लाळखुरकूत रोगाचे कारणे

लाळखुरकूत  हा रोग ॲप्थोव्हायरस (Apthovirus) प्रकारातील ‘पिकार्णो नावाच्या विषाणुमुळे होतो.या विषाणुंच्या सिरॉलॉजीकली व इम्युनॉलॉजीकली 7 प्रमुख जाती ‘ओ’. ‘ए’. ‘सी’. ‘आशिया – 1’. ‘SAT-1’. ‘SAT-2’ व ‘SAT-3’ अशा आहेत व 60 पेक्षा जास्त उपजाती आहेत.

विषाणु प्रकारातील हा विषाणु सर्वांत लहान असून प्रामुख्याने तोंडातील व खुरीतील ‘इपिथेलियल टिश्यु मध्ये त्याची वाढ होते.हा विषाणु प्रखर सुर्यप्रकाशामध्ये अकार्यक्षम होतो आणि आम्ल व अल्कलीमुळे नष्ट होऊ शकतो. साधारण तापमानात हा विषाणु 14 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो.थंड वातावरणात अधिक काळ (4 आठवडे पर्यंत) हा विषाणू जिवंत राहू शकतो.

बाधित होणारी जनावरे

लाळया खुरकूत  हा रोग प्रामुख्याने गार्य/म्हैस वर्ग, शेळ्या/ मेंढया. वराह तसेच जंगली प्राणी म्हणजे नील गाय. याक व हरिण अशा दुभंगलेल्या खुर असणात्या जनावरांमध्ये आढळून येतो. विदेशी व संकरीत जनावरांमध्ये या रोगाची लागण मोठया प्रमाणात होते तसेच वयात येणारी वा तरूण जनावरे या रोगाने जास्त बळी पडू शकतात.

प्रसारः

या रोगाचा प्रसार रोगग्रस्त दुषित हवा, चारा, पाणी. वाहने, शरीरा बाहेर पडणारे सर्व स्त्राव (उदा. विष्ठा, मूत्र, दुध, वीर्य तसेच नाकातोंडाद्वारे बाहेर पडणात्या स्त्रावाद्वारे), आजारी जनावरांचा प्रत्यक्ष संपर्काद्वारे होऊ शकतो.तसेच आजारी जनावरांच्या सानिध्यात आलेल्या माणंसाद्वारे सुध्दा हा आजार एका प्रक्षेत्रावरून दुसऱ्या प्रक्षेत्रावर पसरू शकतो. माणसांमध्ये या रोगाची अत्यंत दुर्मिळ 1-2 % लक्षणे आढळतात परंतु त्यांची तीव्रता जास्त नसते.

उद्भवन कालावधी (इंन्क्यूबेशन पिरियड)

या रोगाचा उद्भवन कालावधी साधारणतः 1 ते 7 दिवस राहतो.

लक्षणेः

या रोगाची लागण झाल्यास जनावरांना 2-3 दिवसांमध्ये ताप येणे, अशक्तपणा, तोंड येणे अथवा तोंडात / जिभेवर पुरळ उठणे. दोरीसारखी लांब लाळ तोंडामधून सतत बाहेर पडणे, रवंथ न करणे, जिभेवर तसेच तोंडाच्या आतील भागावर जखमा होणे. सालपट निघणे. लालसर चट्टे दिसणे व त्याचे वृण होणे. तोंडातील/ टाळू वरील जखमामुळे चारा खाता न येणे त्यामुळे जनावरे सुस्त व मलूल होतात.याच बरोबर पायाच्या खुरांमधील मांसल भागावर जखमा होतात. कधी कधी त्यामध्ये किडे पडून त्यामुळे जनावरे लंगडतात, गाभण जनावरे असतील तर कधी कधी गर्भपात होऊ शकतो. दुधाळ जनावरांमध्ये कासेवर/सडांवर फोड/ पुरळ येतात व कधी कधी कासेचा दाह (मस्टायटीस) होऊ शकतो. वयात येणारे व तरूण जनावरे मृत्यु मुखी पडू शकतात जनावरांची विशेषतः बैलांची क्रयशक्ती कमी होऊन उत्पादन क्षमता कमी होते.

शेळ्यामेंढया मध्ये लक्षणे जरी कमी तीव्रतेची असली तरी तोंडात व पायात फोड/ पुरळ येतात, जखमा होतात, अन्नपाणी घेण्यास त्रास होतो. कधी कधी गर्भपात व मृत्युही होऊ शकतो.

डुकरांमध्ये हा रोग कमी तीव्रतेचा जरी असला तरी तोंडात. टाळू व पायांमध्ये /खुरीमध्ये पुरळ येतात व जनावरे लंगडतात. चारा खाण्याची इच्छा होत नाही. वाढत्या वयातील पिलांमध्ये मरतूक होते.

रोगामुळे होणारे दुष्परिणामः

हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे उपचार नाही. त्यामुळे रोग बरा होण्यास बराच कालावधी लागतो.कासेवर पुरळ येतात. जखमा होतात. कधी कासेचा दाह होऊ शकतो. त्यामुळे उपचारास अधिक वेळ लागू शकतो व दुध उत्पादन कमी होते.गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. कधी कधी वंधत्वही येऊ शकते. त्याचा उपचार करावा लागतो. चारा कमी खाण्यात आल्यामुळे व खाल्लेला चारा तेवढया प्रमाणात न पचल्यामुळे तसेच पाणी कमी प्याल्यामुळे जनावरे अशक्त होतात व त्यांची क्रयशक्ती कमी होऊन त्यांच्याकडून विशेषतः बैलांकडून पुरेशा प्रमाणात ओढकाम होऊ शकत नाही. पायांच्या खुरामध्ये जखमा होऊन किडे पडले तर जनावरे लंगडतात अशा वेळी योग्य उपचार न झाल्यास लंगडण्याचा कालावधी वाढतो व उपचाराचा खर्च सुध्दा वाढतो. वाढत्या वयाच्या कालवडी. गोऱ्हे यांची वाढ खुंटते, कालवडीमध्ये वंधत्व येते. पर्यायाने त्यांच्यापासून मिळणारे अपेक्षित उत्पन्न कमी होते.

आजार जास्त दिवस राहिल्यास जनावरे धापा टाकतात.कातडी कोरडी होते व त्यावर केस वाढतात त्यामुळे जनावरांची किंमत कमी होते.या रोगाने बाधीत झालेली जनावरे इतर जिवाणूजन्य रोग व परोपजीवी रोग (Parasitic Infestation) होऊ शकतात. त्यावरील उपचार खर्च वाढू शकतो. हृदय कमकुवत होऊन रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होऊ शकतो.कधी कधी रक्तशय सुध्दा होऊ शकतो. अश्या रीतीने पशुपालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते.

शवविच्छेदन विकृतीः

गायीं/म्हशीमध्ये श्वसन नलिकेवर घाव /विकृती आढळून येतात. ‘मायोकार्डायटीस’ मुळे हृदयामध्ये रक्त साचते. वासरांमध्ये ‘टिग्रॉईड हार्ट’ आढळते. कोकरामध्ये ‘मायोकार्डायटीस मुळे मृत्यु होतो. डुकरांच्या पिलांमध्ये आतडयाचा दाह व मायोकार्डायटीस आढळतो.

प्रयोगशाळा तपासणीकरिता उति नमुनेः

अ) आजारी जनावरांपासून

  1. औषधोपचार करण्याअगोदर तोंड व जिभेवरील फोड कातडीसहीत घासून काढुन घेणे.
  2.  खुरांमधील फोड/जखमा कातडी घासून काढुन घेणे.

वरील दोनही प्रकारच्या उति 50% ग्लिसरिन फॉस्फेट बफर सोलूशनमध्ये काचेच्या बाटलीत गोळा करावेत.

ब) मृत जनावरांपासून

50% ग्लिसरीन फॉस्फेट बफर सोलूशन मध्ये हृदयाचे तुकडे व पॅनक्रियाचे तुकडे गोळा करणे.

क) रक्तजल नमुने

रोगनिदान चाचण्याः

  1. विषाणू वेगळे करणे (Virus Isolation)
  2. सी.एफ.टी (compliment Fixation test )
  3. सँडविच इलायझा (S-ELISA).
  4. व्हायरस न्युट्रलायझेशन टेस्ट (VNT).
  5. बायॉलॉजिकल टेस्ट (Bioligical test in Gini.pigs
  6. दिवा टेस्ट (DIVA)
  7. रिअल टाईम पीसीआर ( rt -PCR).

लाळखुरकूत रोगाचे उपचारः

  • लाळखुरकुत हा विषाणुजन्य रोग असलेमुळे उपचार नाही. तरी परंतु तोंडामध्ये व खुरीमध्ये जखमा होऊ नयेत व इतर काही गुंतागुंत होऊ नये म्हणून तोंडामधील व जिभेवरील जखमा्/घाव 1 ते 2 टक्के (ॲलम लोशन) तुरटीच्या पाण्याने किंवा 4 टक्के खाण्याच्या सोडयाने धुणे व त्यावर दिवसामधून 3 ते 4 वेळा बोरोग्लिसरीन लावणे.
  • पायाच्या खुरीमधील जखमा सॅव्हलॉन. डेटॉल इ.सारख्या जंतुनाशक द्रावणाने धुणे व त्यावर बोरीक किंवा झिंक मलम लावणे.
  • ब्रॉड स्पेक्ट्रम इंजेक्शन इतर जिवाणुजन्य आजार होऊ नयेत म्हणून द्यावेत.
  • 5% ग्लुकोज़ सलाइन रिंजर्स लॅक्टेट सोबत देणे.
  • आजारानंतर पुढे आढळून येणारे परिणाम. लक्षणांप्रमाणे उपचार करणे.

प्रतिबंधक उपाययोजनाः

  • निरोगी कळपातील जनावरांना उत्पादकांच्या सुचनेप्रमाणे वेळेवर योग्य ती शितसाखळी राखून लाळ खुरकूत  रोगप्रतिबंधक लसीकरण करणे.
  • गोठयात स्वच्छता राखणे तसेच प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा उपायांची कडकपणे अंमलबजावणी करणे.

डॉव्हिएमभुक्तर

Retd, I/c. Joint commissioner A, H. WRDDL Pune M, S
माजी अध्यक्ष डीसीप्लिनरी कमिटी, भारतीय पशु चिकित्सा परिषद, नवी दिल्ली
ईमेल आयडी: vmbhuktar55@gmail.com

डॉ. के. आर. शिंगल

पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com