आपण गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देऊ शकतो का ?? किती द्यायला पाहिजे
१९७० मध्ये गायींना चाऱ्याऐवजी ऊस देण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीस उन्हाळी हंगामातच त्याचा वापर करण्यात आला. हळूहळू भारत आणि अमेरिकेत लोक चारा देण्याऐवजी ऊसच देऊ लागले. बऱ्याचदा हे लक्षात आले आहे की शेतकऱ्यांना गायींचे अन्न आणि खाद्यात पुरविल्या जाणाऱ्या पोषणा बद्दल माहिती नसल्यामुळे ते अजाणतेपणी चालू असलेल्या चुकीच्या प्रथांचे अनुकरण करतात. त्यामुळे गायींच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सर्वप्रथम, हे समजणे महत्त्वाचे आहे, की जर इतर चाऱ्याऐवजी गायींना फक्त ऊस दिला, तर नुकसान होऊ शकते आणि पशुवैद्यांनी पशुपालकांना ही माहिती द्यायला हवी.
जास्त दूध देणाऱ्या गायींना ऊस देऊ नये; विशेषत: जेव्हा त्या दूध देण्याच्या कमाल टप्प्यामध्ये असतात. गाईच्या आहारात उसाचा वाटा ४० ते ४५ टक्केपेक्षा अधिक असू नये. दुधात प्रथिने वाढवण्यासाठी सोयाबीन आणि युरिया (१० ग्राम / कि.ग्रा. पोषक आहार) दिला जातो, जेणे करून आपल्याला दुधामध्ये प्रथिने जास्त मिळू शकतात. जर लुसर्न गवत असेल, तर यूरिया देण्याची गरज नाही. उसामध्ये प्रथिने कमी आणि तंतुमय पदार्थ (फायबर्स) जास्त प्रमाणात असल्यामुळे उसाचा उपयोग कमी दर्जाच्या चाऱ्याचा स्वरूपात केला जातो.
क्युबामध्ये ‘सैखरीना’ नावाचे एक उत्पादन उपलब्ध आहे, ज्यात १४ टक्के कच्ची प्रथिने आणि ९० टक्के शुष्कमय पदार्थाचा (डीएम) समावेश असतो. १ टन चिरलेला ऊस आणि १५ किलो युरिया आणि ५ किलो खनिज मिसळून तयार करतात. नंतर विक्रीपूर्वी मिश्रणसुकवले जाते.
शेतक-यांना शिक्षित करण्याची गरज आहे; जेणेकरून त्यांना समजू शकेल, की सुयोग्य आहार गायींच्या कोठीपोटातील लाभदायी जंतूंना (रूमेन मायक्रोफ्लोरा) पोषक असलेल्या प्रथिने, खनिजं आणि जीवनसत्वे यांच्या पूरकतेमुळे संभाव्य दुष्परिणामांवर मात करता येते. उत्तम व संतुलित आहाराचे मिश्रण उसाचा प्रतिकूल परिणाम कमी करू शकते. एक महत्वाचे तत्व असे आहे, की जर गायींच्या आहारामध्ये ऊस असेल तर कोठीपोटातील लाभदायी जंतूंना (रूमेन मायक्रोफ्लोराला) पोषक नायट्रोजन (अमोनिया, युरिया) आणि पोषक घटकांची अल्पमात्रा (पेप्टाइड्स, एमिनो एसिड, खनिज आणि जीवनसत्वे) असा आहार देण्यात यावा.
युरिया २ – ३ टक्के पोषक किंवा खाद्य धान्याच्या भागापेक्षा अधिक प्रमाणात देवू नये आणि ते एकूण आहाराच्या १% पेक्षा कमी असावे. काही देशांमध्ये दर टन उसामध्ये १० कि.ग्रा. यूरिया टाकला जातो आणि खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रोपियोनेटसह आहार तयार केला जातो. मात्र यूरियाचा समावेश करताना सावधगिरीची एक सूचना – टप्प्याटप्प्याने यूरियाच्या पातळीत वाढ केली तरच गायीच्या कोठीपोटातील लाभदायी जंतूंना एनपीएन प्रथिनबाह्य नत्राचा सक्षमतेने वापर करता येतो.
सल्ला
जेव्हा परंपरागत चारा मिळत नाही त्या परिस्थितीत मध्यम दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायींना उस देऊ शकता. परंतु आहारचे संतुलन करणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा: केळींच्या सालीपासून दुभत्या गायींसाठी पर्यायी आहाराची सोय
माजी डीन व संचालक महाराष्ट्र
पशु व मत्स्य विद्यापीठ, नागपूर