गायींना विशेष मेदयुक्त आहार पुरवण्यामागील रास्त मीमांसा
अधिक दूध देणाऱ्या गायींना साहजिकच अधिक व परिणामकारक ऊर्जास्रोतांची गरज असते. उदाहरणार्थ – साधारणत: १५ किलो दूध उत्पादन करणाऱ्या गाईसाठी केवळ दूध निर्मितीसाठीच दररोजच्या आहारातून १५ मेगा कॅलरीची पूर्तता करणे आवश्यक असते. (या दूधनिर्मितीत ३.६ टक्के मेद व ३.३ टक्के प्रथिने असतात.) ऊर्जापूर्तीचे हे प्रमाण भारतासारख्या देशातल्या माणसाच्या गरजेपेक्षा १५ टक्क्यांच्या जवळपास आहे. यापूर्वीच्या लेखांतून गायींच्या मूळ व प्राथमिक खाद्यातील चाऱ्याचे महत्व आपण पाहिले आहे. तथापि, चाऱ्यातील ऊर्जाघटक मर्यादित असतात, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. शिवाय, प्रत्येक गायीच्या आहाराची व त्यातील चारा व ऊर्जायुक्त घटकांचे मिश्र प्रमाण ठरवणे क्लिष्ट आहे.
आहारातील प्रथिनांची पूर्तता करतानाही त्या खाद्याची किंमत हाही वादाचा विषय ठरतो. तरीही, अधिक दूध देणाऱ्या गायींच्या आहाराची गरज भागवण्यासाठी ऊर्जायुक्त मेदाचे प्रमाण राखणे अत्यावश्यक व अनिवार्य आहे. मेदघटकांची ऊर्जाघनता (ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक गुण) पिष्टमय व प्रथिनयुक्त पदार्थांपेक्षा अधिक असते त्यामुळे मेदाचा अंतर्भाव आहारात केल्यास दूध निर्मितीचे प्रमाण राखण्यासाठी त्याचा गायींना निश्चित फायदा होवू शकतो. अर्थातच, त्याचे आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाण कोरड्या चाऱ्याच्या वापराचे प्रमाण घटल्यामुळे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारकही ठरू शकते. त्यामुळे अधिक दूध देणाऱ्या गायींच्या चाऱ्यात कोणत्या प्रकारच्या मेदाचे, नेमके किती प्रमाण व कधी द्यावे हे पशुपालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
तसे पाहता, विशेष अधिक दूधउत्पादक गायींचा अपवाद वगळता, भारतातील बहुसंख्य गायी या मध्यम वा अल्प दूध देणाऱ्या आहेत. अशा गायींना केवळ चारा व कोरडा चारा मुबलक मिळत असेल, तर त्यांना या मेदांशाची विशेष गरज नाही व तो पुरवून विशेष फायदाही होत नाही. आहारातील मेदांशाचा विचार फक्त दररोज २० किलोहून अधिक दूध देणाऱ्या गायींसाठी करावा लागतो. दुभत्या काळात अशा गायींची ऊर्जेची गरज अधिक असल्यामुळे व त्याचवेळी चाऱ्याचे प्रमाण घटल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो व दूध उत्पादन राखले जात नाही. त्यामुळे अशा गायींची ऊर्जायुक्त आहाराची गरज भागवण्यासाठी आहारात मेदांशाचा अंतर्भाव करणे फायदेशीर व किंबहुना आवश्यक ठरते.
गायींना आहारातून वनस्पती तेल द्यावे का ?
गायींना प्रत्यक्ष तेल पाजण्याने ऊर्जा मिळते अशी अनेक पशुपालकांची धारणा आहे. प्रत्यक्षात ते चुकीचे आहे. कारण, गायींच्या पोटाची रचना व शरीरक्रिया पाहता, त्यातील मेदाम्लांचे पचन कोठीपोटातील जंतू करू शकत नाहीत. अनेक मेदाम्ले कोठीपोटातील जंतूंच्या प्रक्रियांना दाद देत नाहीत. त्यामुळे फायदा होण्याऐवजी अपचनाने उलट नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. काही मेदाम्लांच्या विघटनातून तयार होणारे मेदांशाचे प्रमाण वाढल्यामुळे तंतुमय घटकांच्या पचनावर परिणाम होतो. त्यामुळे दुधातील मेदाशांचे प्रमाणही घटते. आहाराच्या केवळ २ टक्के तेलामुळेही हे दुष्परिणाम घडतात, असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे गायींना वनस्पती तेल थेट आहे तसे पाजणे टाळले पाहिजे.
असंतृप्त मेदाचे (ज्यांच्या संरचनेत अधिक ऊर्जायुक्त बांधणी असते व जे आरोग्यासाठी तुलनेने अधिक उपयुक्त असतात) प्रमाण वनस्पती तेलापेक्षा सोयबीन व सरकी या तेलबियांतून अधिक मिळते. याशिवाय, जवस, सुर्यफूल यांच्याही बियांतून ते प्रमाण अधिक असते, मात्र मानवी आहारात त्यांपासून होणाऱ्या तेलांचा अधिक वापर होत असल्यामुळे त्यांची किंमत अधिक असते. अशा बियांची तेलरहित पेंड मात्र जनावरांना, गायींना त्यातील उर्वरित मेदांशामुळे खाद्य म्हणून उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे मद्यार्क काढून झाल्यावरचे उर्वरित धान्य तसेच माशांचे तेल त्यांच्यातील सर्वाधिक म्हणजे १० – १२ टक्के मेदांशामुळे मेदाचा अधिक किफायतशीर व उपयुक्त स्रोत ठरतात.
कोठीपोटातील ‘प्रक्रियामुक्त व संरक्षित’ मेद
अत्याधिक उत्कलन बिंदू असल्यामुळे काही मेदमय पदार्थ कोठीपोटातील प्रक्रियेत न वितळता तसेच राहतात. त्यांच्यामुळे कोठीपोटातील आंबवण्याची प्रक्रियाही सुरक्षित राहते. अशा, कोठीपोटातील प्रक्रियेपासून मुक्त राहिलेल्या मेदांशांना ‘संरक्षित मेद’ किंवा ‘बायपास फॅट’ असेही म्हणतात. अशा मेदांचे पावडर स्वरूपातील प्रकार आता बाजारात मिळतात. जनावरांच्या आहारात मिश्रणासाठी ते सहज वापरता येतात.
विविध पद्धतींनी असे मिश्रणयुक्त मेदमय पदार्थ तयार करण्यात येतात. त्यापैकी वनस्पती तेले व कॅल्शियम यांच्या मिश्रणाने कॅल्शीयमयुक्त मेदाम्ले अधिक सोयीस्करपणे बनवली व वापरली जातात. मानवी आहाराच्या उर्वरित अंशातील पामतेलाच्या वापरातूनही असे कॅल्शियमयुक्त बायपास मेदांश तयार केले जावू शकतात.
तथापि, कोठीपोटातील संरक्षित मेदांशच जनावरांच्या खाद्यासाठी वापरणे अधिक फायद्याचे व सुरक्षित ठरते. पचनक्षमता, दूधउत्पादन व किंमत यांच्यानुसार शक्यतो, प्रत्येक गायीला अशा सुरक्षित (बायपास) मेदांशाचे दररोज २०० ते ६०० ग्राम इतके प्रमाण देता येते. कॅल्शियमयुक्त बायपास फॅट सर्वाधिक पचनशील व ऊर्जायुक्त समजले जातात.
कोणते बायपास फॅट आपल्या गायीच्या आहारासाठी वापरावे यासाठी खालील काही बाबी मार्गदर्शक ठरू शकतील.
- (लिनोलिक व लिनोलेनिक अशा) आवश्यक मेदाम्लांच्या अंशामुळे वनस्पती तेलापासून मिळणाऱ्या नैसर्गिक मेदाम्लांचा वापर अधिक सुरक्षित व ऊर्जायुक्त पर्याय ठरतो.
- अपचनशीलतेच्या दोषामुळे स्तिअरिक आम्ल असलेल्या बायपास फॅटचा वापर टाळावा.
- तेल प्रक्रिया उद्योगातील उपपदार्थ असलेल्या वनस्पती तेलातील पामितिक आम्लाच्या सर्वाधिक (८० टक्के) अंशामुळे दुधातील मेदांशात वाढ होण्यास तुलनेने सर्वाधिक मदत होते.
- कॅल्शियमयुक्त पाम मेदाम्लांच्या उग्र वासामुळे सुरुवातीला गायी असा आहार कदाचित स्वीकारणार नाहीत. त्यामुळे हळूहळू प्रमाण वाढवून त्यांना सवय करवावी लागेल.
- शिवाय, कॅल्शियमयुक्त आहार व खाद्य चांगल्या प्रकारे व अधिकाधिक मिसळले गेले पाहिजे. अन्यथा, आहाराचे प्रमाण राखता येणार नाही.
- अशा (मेदमिश्रित) खाद्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण ७ टक्क्यांहून अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी.
अधिक तापमानात मेदयुक्त आहार द्यावा का ?
उन्हाळ्यात, तापमान वाढल्यास गायींच्या आहाराचे प्रमाण अगोदरच खालावलेले असते. त्यामुळे दूधउत्पादनही साहजिकच घटलेले असते. अशा परिस्थितीत ऊर्जेचे प्रमाण राखण्यासाठी ऊर्जायुक्त, मेदमिश्रित आहाराचा फायदा निश्चितपणे होतोच. मात्र, अधिक ऊर्जायुक्त खाद्य देण्याच्या प्रयत्नात, प्रत्यक्ष तेलबियांचा वापर व तोही अतिरेकी प्रमाणात केला जाऊ नये.
एरवी, संरक्षित (बायपास) फॅटमुळे गायींच्या कोठीपोटातील पचनास आवश्यक असलेली आंबवण्याची प्रक्रिया अबाधित राहत असल्यामुळे, प्रमाणात पुरवठा केल्यास त्या फॅटमुळे शरीरातील एकंदर मेदाचे प्रमाणही वाढत्या तापमानातदेखील राखले जावू शकते.
बायपास फॅट मुळे प्रजननक्षमतेत होणारी वाढ :
दुभतेपणाच्या विशिष्ट अवस्थेत संप्रेरकांच्या परिणामामुळे शरीरातील ऊर्जा आचळांकडे आकर्षित केली जाते व सर्वसामान्य आहाराचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरावस्था वरकरणी खालावते व वजनही घटते. पण प्रत्यक्षात हे स्वाभाविकच असते.
असे निदर्शनास आले आहे की, संप्रेरकांमुळे झालेल्या या प्रभावाचा परिणाम लाभदायक ठरतो व अशावेळी विशेषत: मेदयुक्त आहाराच्या पुरवठ्यामुळे प्रजननक्षमतेत वाढ होते. वजन प्रमाणात राहून प्रसुतीपश्चात ते अजून वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, बायपास फॅटच्या प्रभावामुळे बीजकोष व बीजांडपेशींत वृद्धी होते आणि संप्रेरकांची मात्रा तसेच प्रमाणही राखली जाते. यावर झालेल्या संशोधनाने हेही सिद्ध झाले आहे की, लिनोलिक व इतर (डेकोसाहेक्जानॉइक, ईकोसापेंटानॉइक) विशेष ऊर्जायुक्त आम्लाच्या मुबलक पुरवठ्यामुळे गायींच्या प्रजननक्षमतेत हमखास वाढ होते.