अधिक लाळेचे स्त्रवण – संयुक्त कोठीजठर – सक्षम दूध उत्पादन
लाळेचे स्त्रवण
पचनसंस्थेच्या रचनेनुसार गायीचे वर्गीकरण संयुक्त पोट असलेल्या, रवंथ करणार्या प्राण्यांच्या गटात केले गेले आहे. गायीच्या पचनसंस्थेत पोटाचे चार विभाग असतात. कोठीपोट (rumen), जाळीपोट (reticulum), भंजिका (omasum) आणि मूळ पोट (abomasum). त्यांपैकी, मूळ पोट म्हणजे जठर हे सर्वार्थाने मनुष्यांच्या पोटाप्रमाणे किंवा जठराप्रमाणे असते. कोठीपोट, नावाप्रमाणेच कोठीप्रमाणे, म्हणजे सर्वात मोठा भाग असतो व त्याची क्षमता १५० – २०० लिटर अन्न व पाणी साठवण्याची असते. मनुष्याच्या पोटात विकरांच्या साह्याने अन्नाचे पचन होते, तर गायीच्या कोठीपोटात मात्र आंबवण्याची प्रक्रिया व त्याबरोबरच लाखो सूक्ष्मजिवांच्या साह्याने होते.
साधारणपणे २०० हून अधिक जिवाणू व २० प्रकारच्या सूक्ष्मपरजिवांच्या जाती, प्रजाती गायीच्या कोठीपोटात चारा व गवताच्या खाद्यावर विघटनप्रक्रिया करत असतात. विशेषत: शर्करायुक्त घटक व सेल्युलोज आंबवले जावून त्यांपासून बाष्पक मेदाम्ले व विविध वायूजन्य घटकांची निर्मिती कोठीपोटात होत असते. साधारणपणे ५०० ते १५०० लिटर एवढा वायू या प्रक्रियेतून गायीच्या पोटात निर्माण होत असतो व त्यापैकी २० – ४० टक्के मिथेन नावाचा वायू असतो. अर्थातच आंबवण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणार्या वायूचे प्रमाण अन्नाच्या प्रत व प्रकारावर अवलंबून असते. तंतुमय, साधारण प्रतीच्या व निम्न ऊर्जांकाच्या भरड अन्नापासून अधिक वायूजन्य घटकांची, विशेषत: मिथेनची – निर्मिती गायीच्या कोठीपोटात होते. कर्बोदकांबरोबरच प्रथिनांचेही लक्षणीय प्रमानात विघटन कोठीपोटात होते. मेदयुक्त अन्नघटक मात्र जसेच्या तसे मूळ पोटाकडे विकरांच्या प्रक्रियेने पचनासाठी प्रसृत केले जातात. तथापि, बव्हंशी विघटनक्रिया कोठीपोटात आणि जाळीपोटात होते.
लाळेचे महत्त्व काय?
गायींच्या आहाराची, अन्नग्रहणाची क्रिया अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी असते. प्रत्यक्ष अन्न ग्रहण करत असताना त्याची कोणतीही निवड वा विशेषत: न पाहता, चारा, कडबा खाण्याची या जनावरांत वृत्ती असते. अन्न किंवा चारा ग्रहण केल्याबरोबर तोंडात त्याच्या थोड्याशा चर्वणानंतर लाळेशी त्याला मिसळून त्याचा घास तयार करून गिळला जातो. विशेष म्हणजे प्रथमत: ह्या गिळलेल्या अन्नाचे घास कोठीपोटातून परत एकवार उलट तोंडात घेवून त्याचे पुन:चर्वण व लाळेशी पुन्हा मिश्रण करून परत गिळले जाते आणि ही क्रिया अनेकवार व अनेक तास केली जाते. यालाच ‘रवंथ’ (करणे) म्हणतात. या क्रियेद्वारे अत्यंत तंतुमय, कठीण, भरड, जाड व रुक्ष अशा चारा-कडब्याचे अक्षरश: चर्वण करून प्रत्येक अन्नकणाचा पृष्ठाकार वाढवला जावून, या एरवी पचनास कठीण असलेल्या अन्नकणांवर कोठीपोटातील सूक्ष्मजीवजन्य विघटनाची परिपूर्ण व सखोल प्रक्रिया होण्यासाठी युक्त केले जाते.
हे पभावीपणे होण्यासाठी भरपूर लाळेचे मिश्रण होणे आवश्यक असते. त्यावरच रवंथ क्रियेची उपयुक्तता अवलंबून असते. त्यावरच कोठीपोटातील सर्व प्रक्रिया व कोठीपोटाची सक्षमता ठरते. त्यासाठी दररोज साधारणत: १५० लिटर इतक्या लाळेचे उत्पादन आवश्यक असते. लाळेचे उत्पादनही अन्नाच्या प्रकारावर अवलंबून असते. धान्ये व लक्षकेंद्री खाद्यांमुळे कमी म्हणजे साधारणपणे ५० लिटर एवढ्या लाळेचे उत्पादन होते, तर चारा, गवत, मुर्घास यांच्यामुळे १०० – १५० लिटर लाळेचे स्त्रवण होते (Saliva secretion).
लाळ दोन प्रकारे उपयुक्त असते. महत्वाचे म्हणजे, ती आम्ल-अनाम्लाच्या बाबतीत उभयरोधी (बफर) म्हणून कार्य करते. विशेषत: लाळेतील सोडियम कार्बोनेटमुळे लाळ मुळात अल्कलीक असते (पीएच – ८.२). त्यामुळे कोठीपोटात निर्माण होणार्या आम्ल व वायुमुळे होणारे दुष्परिणाम लाळ टाळू शकते. एकदल धान्ये, कडधान्ये, धान्ये (मका, ज्वारी, बाजरी), बटाटे, बीट, मळी, उसाचे वाडे यांच्या पचनक्रियेतून कोठीपोटात आम्ल किंवा आम्लयुक्त पदार्थांची निर्मिती होते. मात्र पुरेशा लाळेअभावी, पचनक्रियेद्वारे निर्माण झालेल्या आम्लाचे प्रमाण कोठीपोटात वाढून सूक्ष्मजीवजन्य पचनक्रिया मंदावते. त्याचप्रमाणे लाळेमुळे आंबवण्याच्या क्रियेद्वारे निर्माण झालेल्या वायूजन्य फेसाचेही निराकरण होते.
कोठीपोटाच्या रचनेबरोबरच, त्याच्या आतल्या भागात पचनसंस्थेत आलेल्या अन्नघटकांचीही व्यवस्था विशिष्ट असते. कोठीपोटाच्या सर्वात वरच्या थरात एक बारीक अशी जाळी असलेला जाळीदार प्रतल असतो. त्याच्या जाळीत वरचेवर रवंथ करता असताना अन्नाचे कण अडकून बसलेले असतात आणि त्यावर जिवाणू असतात.
रवंथक्रियेत वरच्या थरातील कुड हे परत तोंडात आणून त्याचे चर्वण केले जाते, पुन्हा पुन्हा माळेशी त्याचे मिश्रण केले जाते. असे पुन्हा चर्वण केलेले व लाळेशी परत परत मिसळलेले, त्यामुळे पृष्ठभागात वृद्धी झालेले हे तंतुमय कुड किंवा अन्न परत गिळले जाते. ते कोठीपोटाच्या मागच्या भागात साठवले जाते. तिथे सूक्ष्मजिवांच्या प्रक्रियेद्वारे त्याचे प्रत्यक्ष पचन होते. कोठीपोटाच्या विशिष्ट गती व क्रमाने होणार्या आकुंचन-प्रसरणाने कोठीपोटातील विशिष्ट स्त्राव व घन पदार्थ यांचे आंबवण्यायोग्य योग्य मिश्रण केले जाते. त्याचप्रमाणे या हालचालींमुळे वायूचेही विरेचन होण्यास मदत होते. कोठीपोटाच्या विशिष्ट हालचाली, आकुंचन-प्रसरण यांमुळे स्त्रावादी द्रव घटक तसेच घनरुपातील अन्नाचे योग्य मिश्रण होते, त्यामुळे आंबवण्याची प्रक्रियाही प्रभावी होते. त्याचप्रमाणे निर्माणझालेल, तसेच कुडाच्या जाळीत अडकलेला वायूही उत्सर्जित होण्यास मदत होते. तोंडावाटे ढेकर देत हे वायू, ही हवा बाहेर फेकली जाते. यात बाधा आल्यास हे वायू आणि हवा पोटातच साठून राहते व पोटफुगीसारख्या व्याधी होतात.
कोठीपोटातील कुडाच्या जाळीत अडकलेल्या वायूमुळे फेसही निर्माण होतो व त्यामुळे फेनयुक्त पोटफुगी होते. उजव्या बाजूला सरकलेल्या अन्नाला योग्य दिशा देवून जाळीपोटाकडे त्याचे वहन करण्यासाठीही कोठीपोटाच्या हालचाली साह्यभूत असतात.
या सर्व प्रक्रिया, हालचाली यांसाठीही लाळेची गरज असते.सर्वात महत्वाचे म्हणजे, आंबवण्याची क्रिया कोठीपोतात होत असल्यामुळे तेथील वैशिष्ट्यपूर्ण वातावरण व आम्लांक राखला जाणे अतिशय गरजेचे असते. तरच कोठीपोटाच्या हालचाली, स्त्राव, सूक्ष्मजीव अशा सर्व बाबी व एकूणात कोठीपोटाचे आरोग्य व कार्यक्षमता टिकते. साधारणत: ६ – ६.५ एवढा आम्लांक कोठीपोटात असणे आवश्यक आहे. याच आम्लांकात उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ व त्यांचे कार्य व्यवस्थित होते. अन्यथा, अनेक सूक्सःमजीव मरून जातात व प्रभावी पचन होत नाही. विशेषत: तंतुमय व कठीण अन्नपदार्थांचे पचन करणार्या जंतूंची वाढ खुंटल्यास अन्नपचन होत नाही.त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो.
आहारात धान्याचा वापर अधिक केल्यास आम्लांक वाढतो तर चारा, गवताचा आधिक्याने वापर केल्यास आम्लांक कमी होतो. यासाठी योग्य आहार व मिश्रणे देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे भरपूर लाळोत्पादन व परिपूर्ण रवंथ व्हावी जनावरांना निवांत बसण्यासाठी अनुकूल जागाही उपलब्ध असली पाहिजे. याची काळजी पशुपालकांनी घेतली पाहिजे.
गायीच्या कोठीपोटाच्या साधारण प्रभावी कार्यासाठी कोणती काळजी घ्याल ?
- चारा / कडबा देताना त्याचे लांब-लांब तुकडे करून दिल्यास गायी तो अधिक चावून खातात व त्यामुळे भरपूर लाळेचे उत्पादन होते. त्याचप्रमाणे गायींच्या आहारात लक्ष्यकेंद्रित आहारापेक्षा मुर्घासाचे प्रमाण आवश्यक आहे.
- गायींचा दिवसभराचा आहार १० – १२ वेळेत विभागला जावा व त्यांच्या आहार घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. एकदाच सर्व आहार देण्याऐवजी त्यांच्या वेळा वाढवाव्यात.
- दर दोन-तीन तासांच्या अंतराने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. त्यासाठी भरपूर पाण्याची तरतूद तयार असावी.
- उत्पादक गायी, गर्भार गायी, दुभत्या गायी इ. साठी लक्ष्यकेंद्रित आहार द्यावयाचा असेल, तर तोही केवळ दोनच वेळा ना देता, विभागणीकरून देण्यात यावा. सोबत दिलेल्या आलेखावरून दोनच वेळा आहार दिल्यानंतर आम्लांकावर काय परिणाम होतो हे दिसून येवू शकते. त्यासाठी आहार व चारा सतत उपलब्ध ठेवला, तर गायी आवश्यक असेल, तेव्हा व गरजेनुसार आहार घेत राहतात. विशेषत: दुसर्या आलेखाकृतीवरून मिश्र आहाराचा फायदा दिसून येईल.
- गायींना बंदिस्त ठेवू नये. बांधून, जखडून ठेवू नये. त्यामुळे त्यांच्या बसण्या-उठण्यावर बंधने येवून रवंथ व त्या निमिताने लाळेचे उत्पादन पुरेशा प्रमाणात होते.
- प्रत्यक्ष आहार घेत नसताना, आहार घेत नसताना, चरत नसताना गायी केवळ सुरक्षित व सोयीस्कर जागी शांत व निवांत बसूनरवंथ करत असल्या पाहिजेत. तीच त्यांच्या आरोग्याची खूण आहे; लक्षण आहे.
डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर