भरडा व कडब्याचे गायीच्या आहारातील महत्व

गायींचा आहार (Cattle Feeding)

दशकानुदशकांच्या पशुआहारासंबंधीच्या काही गैरसमजुती आहेत. जसे की,

  • बाजारात मिळणारे पशुखाद्य गायीसाठी अधिक चांगले असते.
  • बाजारातील आयत्या पशुखाद्यामुळे गायीच्या दुशातील स्निग्धांश वाढतो.
  • वावरात तयार करण्यात आलेले पेंड आणि चुनी यांचे मिश्रखाद्य बाजारातील
  • आयत्या पशुखाद्यापेक्षा स्वस्त आणि चागले असते.
  • चारा, गवतापेक्षा बाजारातील आयते पशुखाद्य अधिक चांगले व पौष्टिक असते.
  • जे खाद्य गायी भराभर आणि आवडीने खातात तेच खाद्य चांगले असते.
  • रात्रभर पाण्यात भिजवलेल्या चार्‍याचे अथवा खाद्याचे पचन अधिक होते.
  • गायींना दिवसातून दोन वेळा आहार आणि आहारानंतर पाणी द्यावे.

या समजुतींनुसार बव्हंशी गायींचे पालनपोषण करण्यात येत अस्सले, तरी दुर्दैवाने यांपैकी अनेक समजुती केवळ खोट्याच आहेत, असे नसून त्या घातकही आहेत. वास्तविक पाहता, गायीची पचनसंस्था संयुक्त पोटाची असून, गवत व चारा हेच तिचे नैसर्गिक खाद्य आहे. या खाद्याचा तंतुमय पदार्थांत समावेश होतो. याला ‘भरड खाद्य’ असेही म्हणले जाते. या भरड खाद्याची कमतरता भासत असल्यास व या नैसर्गिक खाद्याची ऊर्जाप्रत, खालावलेली असल्यास लक्षकेंद्रित पशुखाद्य द्यावे लागते. (यालाच रूढपणे इंग्रजीत concentrate feeding असे सहसा म्हणले जाते.)

विशेषत: अधिक दूध देणार्‍या गायींची ऊर्जास्रोताची गरज अधिक असल्यामुळे, त्यांची ही गरज भगवण्यासाठी त्यांच्या दुभत्या काळात हे लक्षकेंद्रित खाद्य (concentrate feeding) त्यांना पुरवण्याची सहसा गरज भासते. तथापि, ते महाग असल्यामुळे दूधउत्पादनाचा खर्चही वाढतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे गायींच्या कोरड्या चार्‍याची गरज लक्षात घेता, अधिकाधिक चाराखाद्यच देवून, या लक्षकेंद्रित आहाराचा गरज असेल तेव्हाच आणि केवळ पूरक खाद्य म्हणून वापर केला पाहिजे, हे पशुपालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय, आयत्या लक्षकेंद्रित पशुखाद्यामुळे (Cattle Feeding) पोटात आम्लमात्रा वाढते व आम्लपित्त होते, हा धोका असतो. विशेषत: या आहारासोबत पुरेशा प्रमाणात कोरडा चारा योग्य व भरपूर प्रमाणात नसल्यास निर्माण होणार्‍या आम्लपितमुळे, वर उल्लेख केलेल्या समजुतीच्या विपरीत, दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण घटते, हे समजून घेणे महत्वाचे आहे.

वास्तविक पाहता, गायीसाठी चर्वण व रवंथ अधिक घडवणारे चांगले असते. या दोन्ही क्रियांची चालना खाद्यकणाच्या आकारावर अवलंबून असते. अर्ध्या इंचाहून कमी लाम्बी- जाडीचे काह्द्यकण अथवा चार्‍याचे तुकडे वापरल्यास रवंथ करण्याचे प्रमाण व त्यामुळे पचनशीलता कमी होते. त्याउलट, चार्‍याच्या एक ते दीड इंच लांबीचे तुकडे चर्वण व रवंथ या क्रियांसाठी अनुकूल व प्रभावी ठरतात. लाळग्रंथींच्या प्रभावी चालनेमुळे अधिक लाळेच्या स्त्रवणाबरोबरच, रवंथ करण्याचे प्रमाण वाढून, चारा व गवताच्या या आकाराच्या तुकड्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण थरामुळे कोठीपोटातील सूक्ष्मजीवजन्य पचनाला अनुकूल असा पोत तयार होतो. म्हणूनच उलट रोज किमान एक किलो, लांब पात्याच्या गवताचाही आहार द्यायला हरकत नाही.

गायीसारख्या संयुक्त पोट व कोठीपोट असलेल्या पचनसंस्थेच्या जनावरांच्या आहाराच्या बाबतीत एक तत्व सर्वात महत्वाचे आहे आणि ते म्हणजे, त्यांच्या आहारात सातत्याने बदल करू नयेत, उलट वर्षभर साधारण समान आहार पुरवावा. त्यातही कोरड्या चार्‍याचेच प्रमाण अधिक ठेवले पाहिजे. उत्तम प्रतीचा कोरडा चारा मात्र जेवढा ही जनावरे अधिक खातील, तेवढा पुरवण्यास हरकत नाही. लक्षकेंद्रित (concentrate feeding) आहारापेक्षा, कोरड्या चार्‍याच्या बाबतीत मात्र, तो जनावरे जेवढा अधिक खातील तेवढा तो चांगल्या प्रतीचा आहे, असे ठरवण्यास हरकत नाही. निकृष्ट आणि उत्तम अशा दोन्ही प्रतींचा चारा समोर ठेवल्यास गायी बरोबर उत्तम प्रतीचा चारा ओळखून तोच निवडून खातात, हे अनुभवावरून दिसून आले आहे.

पौष्टिक घटकांचे अधिक प्रमाण व अधिक ऊर्जांश असलेला चारा हा उत्तम प्रतीचा असतो. योग्य वेळी म्हणजे, किमान ६० – ६५ टक्के आर्द्रता असताना कापणी करण्यात आलेला हिरवा चारा या दृष्टीने उत्तम असतो. साधारण नियम हाही असतो, की एकदा धान्य किंवा कणसाची कापणी केली, की उरलेले धाट हे निकृष्ट्च उरते. त्यामुळे योग्य वेळी कापणी केलेला धान्यपिकाचा चारा, लवकरात लवकर पुरवला तरच तो योग्य ठरू शकतो. एरवी, धान्यपिकापेक्षा केवळ चारा म्हणून लागवड केलेल्या पिकाचा, योग्य वेळी कापणी केल्यास चारा म्हणून अधिक खात्रीशीर फायदा होवू शकतो, कारण त्यात ऊर्जांश अधिक असतो. योग्य वेळी, योग्य प्रतीचा चारा पुरवण्याचे धोरण राबवण्याच्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ती अशी, की रोजच्या रोज कापणी करून चारा देण्याचा प्रघात श्रम आणि वेळ या दृष्टीने अधिक जिकिरीचा आहे. शिवाय, रोज हिरव्या चार्‍याची प्रत दिवसेंदिवस बदलत जाते.

सुरुवातीच्या चार्‍यातून (किंवा लवकर कापणी केली, तर) भरपूर आर्द्रांश असतो, पण अजून त्यात सत्वे तयार झालेली नसतात. पुढे पुढे पीक पक्वता धारण करते तसतसे, (किंवा कापणीला उशीर केला, तर) त्यातला आर्द्रांश कमी होतो, शुष्कांश वाढतो व ऊर्जासत्वेही राहत नाहीत. गायींना साधारणपणे समान प्रतीचा चारा मिळणे गरजेचे असते. अशा द्विधेपासून एक किफायतशीर मार्ग म्हणजे – योग्य स्थितीतल्या चार्‍याची एकदाच कापणी करून तो साठवणे. त्यामुळे रोजच्या श्रम व वेळेतही बचत होते. त्यामुळे अशा पर्यायाचा अवलंब केल्यास जनावरांना, गायींना वर्षभर सारखा व निश्चित चारा पुरवता येतो. असा कोरडा व भरड चारा गायवर्गातील जनावरांना अनेक प्रकारे लाभदायक असतो. त्यामुळे कोठीपोटातील स्नायूंची वाढ होवून त्यांच्या आकुंचन व प्रसरणाच्या क्षमतेत वाढ होते. त्यामुळे कोठीपोटाच्या हालचाली सशक्त होतात.

कोठीपोटातील भरड चार्‍याची योग्य प्रकारे घुसळण, मिसळण झाल्यामुळे त्याचे पचन परिणामकारक रीतीने होते. या हालचालींची जाणीव अनेकदा पशुवैद्यक घेत असतात. त्यावरूनही त्यांना कोठीपोटाच्या कार्याच्या अवस्थेचे निदान करता येते. साधारणपणे या हालचाली दरा ९० सेकंदाला या गतीने किंवा दर तीन मिनिटांत दोन वेळा या प्रमाणात होणे अपेक्षित असते. शरिराच्या डाव्या व मागच्या, खालच्या बाजूला हातांनी दाब दिल्यास या हालचालींचा अदमास घेता येतो. या सशक्त हालचालींमुळे झालेल्या घुसळणीमुळे सूक्ष्मजीवांनी घडवावयाच्या पचानाच्या प्रमाणात वाढ होते.

शिवाय, याच सशक्त हालचालींमुळे कोठीपोटातील अन्न परत तोंडात घेवून त्याचे पुन्हापुन्हा चर्वण, लाळेशी मिश्रण होत राह्ते व रवंथ सातत्याने, त्याचप्रमाणे प्रभावी होते.


डॉ. संतोष कुलकर्णी

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर