फायदेशीर दुध व्यवसायाकरिता दुधाळ जनावरांतील प्रजनन व्यवस्थापन
जनावरांतील प्रजनन व्यवस्थापन
शाश्वत दुध उत्पादनासाठी जनावरांतील सक्षम प्रजनन व्यवस्थापन फार महत्वाचे आहे. वर्षाला म्हणजेच दर १२ महिन्याला वासरू हे पशुपालकांना घेता येईल. दुधाळ जनावरांतील प्रजनन व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक केले पाहिजे याकरिता वेळोवेळी तंज्ञ पश्वैद्यकाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
प्रजनन व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या बाबी असतात. जसे कि, कालवडीमधील पहिला माज (तक्ता क्र. १ मध्ये दर्शिवल्याप्रमाणे), माजेचा कालावधी, माजेचा प्रकार, योनीतील चिकट स्त्राव, रेतन करणे, रेतानाची वेळ निश्चित करणे, गाभण गायीची काळजी घेणे, संतुलित आहाराचा पुरवठा, गाभण गायीचे वेगळे व्यवस्थापन, विण्याच्या वेळेसची विशेष काळजी, व्याल्यानंतरची काळजी, व्याल्यानंतरचा पहिला माज पाहणे, या व व इतर महत्वाच्या बाबीकडे पशुपालकांनी लक्ष दिले पाहिजे. जन्माला आलेल्या वासरापासूनच प्रजननांवर लक्ष दिले पाहिजे. तरच फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. जनावरांतील माज हा मर्यादित वेळे करीताच असतो त्यामुळे योग्य वेळी गायीमध्ये रेतन करवून घ्यावे (तक्ता क्र. २ प्रमाणे). रेतनाच्या वेळी गायीं ताण विरहीत असणे गरजेचे आहे. गायीतील जास्तीचा ताण हा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो व यामुळे गाय गाभण राहण्याची शक्यता कमी असते.
तक्ता क्र. १. दुधाळ जनावरांच्या वयात येण्याविषयी माहिती
तक्ता क्र. २. जनावरांतील माजाविषयी माहिती
प्रजनन व्यवस्थापनामध्ये यात पारंपारिक पद्धतीने दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. तांत्रिक मार्गदर्शन नेहमीकरिता फायदेशीर ठरते. जनावरांतील प्रजनन संस्था कालवड वयात आली कि कार्यरत होत असते. म्हणजेच संकरित गायीमध्ये किमान वय १८ ते २४ महिने किंवा किमान वजन २५० किलो झाले कि प्रजनन कार्य सुरु होते व तसेच देशी गायीमध्ये २४ ते ४८ महिने लागतात. अतिशय चांगल्या वंशावळीच्या कालवडीचे सुरवातीपासुनच योग्य व्यवस्थापन केले तर माज लवकर येतो.
जनावरे व्याल्यानंतरचा पहिला माज किमान २५ ते ३० दिवसात आला पाहिजे व ती गाय किमान ७० ते ८० दिवसात गाभण राहिली पाहिजे. सर्व सर्वसाधारणपणे, ३ ते ५ % गर्भपात होऊ शकतो, किमान एकून जनावरापैकी ४० ते ५० % गाभण असणे चांगले लक्षण मानले जाते. वंधत्वाचे प्रमाण कमीत कमी असावे. जर एखादी या बाबतची समस्या असेल तर त्वरित पशुवैद्यकाकडून योग्य निदान व उपचार वेळीच करून घ्यावा. गोठ्यातील नेहमी स्वच्छता राखावी. यामुळे अनेक समस्या कमी होतात. जनावंरे बसण्याची जागा स्वच्छ असावी यामुळे जीवाणू व इतर रोग जंतूचा प्रभाव कमी होतो व प्रजनन व्यवस्थित व तसेच सुरळीत चालू राहते. जनावरातील गर्भाशयाचे मुख फक्त दोन वेळेस उघडे असते ते म्हणजे माजाच्या काळात व व्याल्यानंतर. या वेळी जर गोठ्यात स्वच्छता नसेल तर अनेक जंतू गर्भाशयात जातात आणि गर्भाशयातील रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे गर्भाशयाच्या अनेक समस्यांना पशुपालकांना नुकसानीचे ठरू शकते.
संतुलित आहाराचा पुरवठा, क्षार मिश्रणे (५० ग्राम) खाद्यात देणे, हिरवा व वाळलेला चारा व तसेच शुध्द पाणी पुरवठा करणे, वय वाढीनुसार इतर व्यवस्थापन करणे जरुरीचे आहे. कालवडीच्या वयासोबत वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरी जन्मलेल्या कालवडीचे जोपासना करावी. घरी जन्माला आलेले वासरे निश्चित दुध उत्पन्न व प्रजननच्या दृष्टीने चांगले असते. रोगांना लवकर बळी पडत नाहीत व आरोग्य चांगले असते. यात प्रामुख्याने बरेच फायदे आहेत. असे दिसून आलेले आहे कि, पशुपालक वासाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे वासरे दागवले जातात. एकंदरीत वासरे दगावल्यामुळे बरेच आर्थिक नुकसान होते.
कालवड वयात आल्यानंतर पहिला माज पाहणे जरुरीचे आहे. या माजास रेतन करू नये. दुसऱ्या किवा तिसऱ्या माजास रेतन करणे. यावेळी कालवडीचे वय व वजन लक्षात घेणे जरुरीचे आहे. शरीरातील संप्रेरक पूर्ण कार्यरत होते आणि गर्भाशयाची वाढ होण्यास मदत होते. वेळोवेळी पशुवैद्क तज्ञांकरवी गर्भाशयाची तपासणी करून घेणे व त्यानुसार व्यवस्थापन करणे. असे आढळून आलेले आहे कि, गर्भाशयाच्या तपासणीमुळे स्त्रीबीज कार्यरत होते व गर्भाशयाला चालना मिळते. त्यामुळे जनावरे माजावर येणे व गाभणचे प्रमाण वाढलेले दिसून आलेले आहे. सर्व प्रजनन घटनाच्या नोदी ठेवणे गरजेचे आहे. पहिल्या माजापासून ते पुढील व्याल्यानंतरच्या माज, विविध उपचार, व इतर घटनाच्या नोदी ठेवावे. कालवडीतील गर्भ तपासणी, वजनाची खात्री, माजाची पाहणी, वेळेवर रेतन, गाभण काळातील व नंतरची काळजी, संतुलित आहार पुरवठा, तज्ञांचे मार्गदर्शन, नोदी ठेवणे, व इतर व्यवस्थापन केले तर निश्चित प्रजनन सक्षम होण्यास मदत होईल.
गाय रेतन केल्यानंतर पुढील २१, ४२ व ६३ व्या दिवशीच्या माजेवर लक्ष्य देणे गरजचे आहे. जनावरामध्ये सकाळी माज दिसत असेल तर सायंकाळी रेतन करणे किंवा सायंकाळी माज दिसत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करणे. रेतनानंतर २ ते ३ महिन्यांनी गायी गाभण विषयक खात्री करून घ्यावी. अशा प्रकारे जर पशुपालकांनी दुधाळ जनावरांस संतुलित खाद्याचा पुरवठा, योग्य प्रजनन व्यवस्थापन, माजाचे नियंत्रण व गोठ्यातील स्वच्छता केली तर निश्चित शाश्वत दुध उत्पादन घेऊ शकतो आणि फायदेशीर दुग्ध व्यवसाय यशस्वी करू शकतो.
हेही वाचायला आवडेल तुम्हाला: पशुपालकांनो सावधान !! कसे कराल? आपले व जनावरांचे विजांपासून संरक्षण…
डॉ. अनिल पाटील