अधिक दूध उत्पादनासाठी पंजाबचे पशुपालक करतात बहुउद्देशीय गोठा तंत्रज्ञानाचा वापर

बहुउद्देशीय गोठा तंत्रज्ञानाचा वापर

अलीकडे शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते कि स्वतःचे चांगले घर असावे, गाडी असावी, मुलांनी चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे हि स्वप्ने रंगवण्यासाठी आयुष्यात आपण जितक्या वेळा घोकंपट्टी करतो त्याच्या निम्म्या वेळा जरी आपण दुग्धव्यवसाचे वार्षिक नियोजन करून आपल्या गोठ्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपली सर्व स्वप्न साकार होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. अलीकडच्या काळात दुधाव्यवसायात खूप आमूलाग्र बदल झाले आहेत त्याचाच वापर करून पंजाबचे शेतकरी दूध उत्पादनात खूप पुढे गेले आहेत. तेथील पशुपालकांची एक संघटना असल्याने ते स्वतः दुधाचा दर ठरवतात आणि तेथील गव्हर्नमेंट ते मान्य देखील करतात कारण त्या दर्जाचे दूध ते पशुपालक उत्पादित करतात आणि दुधाचा दर देखील ते तसेच घेतात नवीन आधुनिक तंत्रज्ञान कोणते आले आहे व त्याचा वापर कसा करावा त्यातील बारकावे कसे ओळखावे इत्यादी माहिती पशुपालकांपर्यंत पोहचावी म्हणून तिथल्या संघटना तसेच पशुसंवर्धन, पशुआहार, पशुशल्य चिकित्सक पशु प्रजनन आणि पशुआरोग्य तज्ञ खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यामुळे स्वच्छ व अधिक दूध उत्पादन सहज  शक्य होते.

ग्रामीण भागातील पशुपालक दूध व्यवसाय जोडधंदा म्हणून करत असतात त्याला मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारला तर प्रत्येक शेतकरी चारचाकी गाडीमधून जास्त नक्कीच फिरू शकतो यासाठी लागते ते म्हणजे आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर दूध व्यवसायातील महत्वाचा पाया म्हणजे गोठा उभारणी त्यासाठी लागते ती म्हणजे गोठ्याची जागा आपल्याकडील पशुपालक स्वतःच्या आवडीनुसार शिल्लक राहिलेल्या जागेनुसार  डिझाइन करतात. त्यामध्ये जनावरांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. नवीन गोठ्याचे डिझाइन तयार करताना जनावराचे आरोग्य व शरीर स्वास्थ्य कसे राहील, त्या गोठ्यामध्ये मजूर कसे कमी होतील तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल  कमी खर्चात जास्त टिकावू गोठा कसा बांधता येईल तसेच आपण किती जनावरे पाळू शकतो, भविष्यात गोठ्यातील संकल्पना काय असणार आहेत  अश्या अनेक बाबींचा विचार करणे खूप महत्वाचे असते. आपल्याकडे जनावरांचे शरीर स्वास्थ्य तर सोडाच गावातील कमी पैसे घेऊन चांगले काम करणाऱ्या गवंड्याची निवड केली जाते. ज्याच्या घरी जनावरे किंव्हा गुरांचा गोठा नसतो त्याला त्याचे फायदे व बारकावे माहित नसतात. पशुपालक नवीन असल्याने त्यातील माहिती नसते त्यावेळी खूप खर्चिक, भक्कम, मोठा आणि दिखाऊ गोठा बांधला जातो. खरंतर गोठा हा उत्पादनासाठी नसून त्याचा वापर व्यवस्थापनासाठी केला जातो. व्यवस्थापनासाठीच जास्त खर्च होत असल्याने दुध व्यवसाय परवडत नाही. अश्या व्याख्या पशुपालकांच्या तोंडातून बाहेर पडतात त्यामुळे नवीन पशुपालकांनी खर्चिक तसेच बंदिस्त गोठ्याच्या मागे न लागता बहुउद्देशीय गोठा म्हणजेच मुक्त संचार गोठा पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात गोठ्याची उभारणी करता येईल. त्यामुळे पशुपालकांना कर्जाचे ओझे सोसावे लागणार नाही आणि फायदेशीर दूध व्यवसाय करता येईल.

काय असते पंजाबच्या पशुपालकांचे बहुउद्देशीय मुक्तसंचार गोठ्यातील तंत्रज्ञान.

  1. मुक्त गोठ्यामध्ये कालवडींचे, वासरांचे, दुधाळ गाईंचे तसेच गाभण गाईंचे कप्पे वेगळे असतात.
  2. गाई-म्हशींना विण्यासाठी प्रसूतिगृह तसेच आजारी जनावरांसाठी वेगळे कंपार्टमेंट असते.
  3. २४ तास गोठ्यात स्वच्छ, थंड व गरम पिण्याच्या पाण्याची सोय असते.
  4. स्वच्छ, निर्जंतुक दूध मिळण्यासाठी पशुपालक मिल्किंग पार्लर चा वापर करतात.
  5. दूध काढल्यानंतर गाईंना कासदाह होऊ नये म्हणून टीट डिपींग केले जाते.
  6. उन्हाळ्यात गाईंच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगर प्रणाली वापरली जाते.
  7. हिवाळ्यात जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोणपाटाचे शेडच्या कडेने आच्छादन करतात.
  8. गोठ्याच्या कडेने मऊ व मजबूत कंपाउंड असते जेणेकरून जनावरांना त्यापासून इजा होत नाही.
  9. गोठ्याची दिशा दक्षिण उत्तर असून उंची २५-३० फुटापर्यंत असते त्यामुळे गोठ्यात हवा खेळती राहते.
  10. गोठ्यामध्ये सिमेंटचे पत्रे वापरतात त्यावर चुन्याचा मुलामा दिलेला असतो त्यामुळे गोठ्यातील तापमान नियंत्रित राहते व जनावरे धापा देत नाहीत.
  11. जनावरांना खरारा करण्यासाठी ग्रूमिंग ब्रश चा वापर करतात.
  12. जनावरांचे केस वाढले असतील तर ट्रिमिंग करतात. त्यामुळे शरीराचा मसाज होतो आणि जनावर तजेलदार दिसते.
  13. जनावरांच्या तोंडाला मोरखी, नाकात व्यसन, गळ्यात कंडा तसेच पायात दोरी बांधलेली नसते तर त्याजागी टॅग लावले जातात ज्यामध्ये जनावरांची सर्व माहिती सामावलेली असते.
  14. लहान वासरांच्या शिंगकळ्या लवकरच खुडल्या जातात तसेच वाढलेली खुरे वेळेवर कापली जातात.
  15. जनावरांच्या गोठ्यात विजेची फिटिंग केलेली असते. त्यामुळे शॉक बसण्याचा धोका टाळतो
  16. उन्हाळ्यात गोठ्यातील वातावरण थंड राहण्यासाठी मोठमोठे फॅन लावलेले असतात.
  17. धार काढण्याआधी सर्व जनावरे धुहून मिल्किंग पार्लर मध्ये येतात.
  18. प्रत्येक महिन्यानुसार मुरघासाचे बंकर तयार केले जातात.
  19. खाद्य व्यवस्थापनासाठी वर्षभर पुरेल एवढा मुरघासाचा साठा करून ठेवतात.
  20. पशुआहार तयार करण्यासाठी स्वतंत्र फिड मिलची देखील व्यवस्था असते. जनावरांच्या वाढीनुसार, कालवडींचा, वासरांचा तसेच दुधाळ जनावरांचा सिझननुसार आहार तयार करतात. त्यामुळे अधिक दूध उत्पादनास मदत होते.
  21. प्रजनन व्यवस्थापनामध्ये वीर्य कांड्या साठवणुकीसाठी क्रायोकॅन वापरले जातात.
  22. जनावरांचे वजन करण्यासाठी मोठा वजन काटा असतो.
  23. जनावरांच्या वजनानुसार खाद्य दिले जाते.
  24. किटकनाशकाची फवारणी करण्यासाठी नॅपसॅक स्प्रे पंप वापरले जातात.
  25. सर्व प्रकारचे मेडिसिन,गोळ्या,औषधे, खनिज मिश्रणे साठी सेपरेट विभाग असतो.
  26. दर तीन महिन्याला लसीकरणाची मोहीम राबवतात जे करून गोठ्यात आजार होणारच नाही
  27. दुधाचे फॅट तपासण्यासाठी फॅट मशीन चा वापर करतात.
  28. जनावरांना संतुलित आहार मिळावा म्हणून टोटल मिक्सड राशन पद्धतीचा वापर करतात.
  29. गोठ्याचे आहार नियोजन पशुआहार तज्ञांच्या मार्गदर्शनाने करतात.
  30. जास्त वयाची तसेच सारखी आजारी पडणारी जनावरे विकून टाकतात.
  31. गोठ्याच्या संपूर्ण व्यवस्थपनासाठी फार्म मॅनेजर तसेच मजूर असतात.
  32. गोठ्यातील जास्तीत जास्त कामे मशिनरीच्या साहाय्यानेच केली जातात.
  33. गाईच्या दूध उत्पादनावर गाईंच्या विक्रीचा दर ठरवतात.
  34. नवीन पर्यटकांना आल्यानंतर गोठ्याच्या प्रवेशद्वारावर प्रथम सूचना दिल्या जातात तसेच विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पायात घालण्यासाठी शुकव्हर दिले जाते.
  35. गोठ्यातील कामे सर्व आटोपल्यावर फार्म पाहण्यास सोडले जाते सोबतच डेअरी मॅनेजर वेगवेगळ्या विभागाची माहिती देतात.

बहुउद्देशीय (मुक्त संचार) गोठा पद्धतीचे फायदे-

  1. मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईं म्हशींना बांधले जात नाही.
  2. माजावर आलेली जनावरे लवकर ओळखता येतात.
  3. जनावरे आजारी पडत नाहीत त्यामुळे डॉक्टरांचा खर्च कमी होतो.
  4. सूर्यकिरण अंगावर पडल्याने ‘ड’ जीवनसत्व मिळते त्यामुळे त्वचारोग किंव्हा त्वचेला जखमा होत नाहीत.
  5. जनावरांच्या अंगाला खाज सुटत नाही.
  6. जनावरांचा व्यायाम होते खुरे सदृढ आणि कडक राहतात.
  7. गाई-म्हशी आपोआप वितात व्यायल्यानंतर वार लवकर पडतो.
  8. जनावरांचे पचन चांगले झाल्याने दुधाच्या फॅट मध्ये वाढ होते.
  9. जनावरांचे आरोग्य सुधारते जनावरे तजेलदार दिसतात.
  10. पशुपालकांचे अधिकचे कष्ट कमी होतात.
  11. गोठ्यात जनावरे फिरल्याने आपोआप खत निर्मिती होते.
  12. जनावरांची भूक वाढते.
  13. तणावमुक्त स्वच्छ दूध उत्पादन मिळते.
  14. सांधेदुखी, गुढगेदुखी पासून मुक्तता मिळते.
  15. दिवसातून साधारणतःचार ते पाच तसाच काम करावे लागते.
  16. जनावरे स्वतःहून पाहिजे त्या वेळेस खरारा करतात.
  17. कष्टाचा ताण कमी पडल्याने जास्त जनावरे सहज पाळता येतात.
  18. गाई-म्हशींवरील ताण कमी झाल्याने त्या एकमेकांना मारत नाहीत.
  19. या गोठ्यात जनावरे आजारी न पडल्याने कोणतेही इंजेक्शन दिलॆ जात नाही त्यामुळे अँण्टीबायोटिक मुक्त दूध मिळते.
  20. व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ कमी लागते त्यामुळे मजुरी खर्च कमी येतो.
  21. जनावरे आपल्या आवडीनुसार चारा,पाणी व खनिज मिश्रणे खातात त्यामुळे तंदरुस्त व आनंदी राहतात.
  22. थंडीच्यावेळी जनावरे अधिक वेळ चारा खातात, भरपूर विश्रांती घेतात त्यामुळे रवंतपणा वाढतो पचनव्यवस्था चांगली होते.
  23. जनावरांचा स्थूलपणा कमी होऊन प्रजनन क्षमता वाढते.
  24. गोठ्याची साफ सफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी वेळ कमी लागतो.
  25. मुक्त गोठयामुळे पोटाचे आजार बंद होतात.
  26. गोठा उभारणी साठी खर्च खूप कमी येतो.
  27. जनावरे मुक्त गोठ्यात फिरल्याने शरीरातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो त्यामुळे गाई म्हशी अधिक पाणी पितात.
  28. गोठ्याच्या एकूण क्षमतेपेक्षा दहा ते पंधरा टक्के जनावरे ठराविक कालावधीपर्यंत सामावू शकतात.
  29. गरजेनुसार जनावरे वातावरणाचा उपयोग करून घेतात.
  30. दोन ते तीन महिने शेण काढावे लागत नाही तसेच पाणी पाजावे लागत नाही.
  31. गाई धुण्याची गरज लागत नाही तसेच जनावरांची जागा बदलावी लागत नाही.
  32. जनावरांना आरामासाठी शेणखताची मऊ गादी तयार होते. तसेच गोमूत्र त्यात मुरल्याने अतिशय चांगले शेणखत जमिनीला मिळते.
  33. मुक्त गोठयामुळे शेण व गोमुत्राचा वास येत नाही तसेच डास चिलटे होत नाहीत.
  34. गव्हाणीत शिल्लक राहिलेल्या चाऱ्याची कुट्टी कुजण्यासाठी आपण ती मुक्त गोठ्यात टाकू शकतो त्यामुळे काडी कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
  35. गोठ्यात सीसीटीव्हीचा वापर केल्याने माजावर आलेल्या गाईने दुसऱ्या गाईच्या अंगावर उडी मारलेली चेक करता येते. गोठ्यात चोरी तसेच कामगारांचा कामचुकारपणा, विषाणूजन्य रोगाचे संक्रमण कोणत्या मार्गाने झाले या सर्व बाबींवर नियंत्रण राहते हि प्रणाली थोडी खर्चिक नक्कीच आहे परंतु काळाची गरज आहे.
  36. देशी गाईं तसेच लांब शिंगाच्या म्हशींचा सुद्धा मुक्त गोठा करता येतो फक्त सवय लावावी लागते.

प्रा. नितीन रा. पिसाळ

प्रशिक्षक,(स्किल इंडिया प्रोजेक्ट)
विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.
मो.नं- 8007313597;
ई-मेल-nitinpisal2312@gmail.com