प्राण्यांमधील संसर्गजन्य गर्भपात (ब्रूसेलोसीस)
संसर्गजन्य गर्भपात किंवा ब्रू्सेलोसीस हा जीवाणुजन्य रोग असून तो गाय व म्हैस वर्ग, शेळया मेंढया, वराह, कुत्रे, ऊंट तसेच जंगली प्राणी उदा. हरीण इ. यांच्यामध्ये आढळून येतो. हे जीवाणू ग्राम निगेटीव्ह, रॉड शेप, अँरोबीक, नॉन मोटाईल व नॉन स्पोअर फॉर्मींग असतात. या रोगामुळे पशुपालकाचे दुध उत्पादनामध्ये घट व गर्भपात वा जन्मतः वासरू मरण पावणे असे दुहेरी नुकसान होते. हा रोग बाधीत जनावरांपासून मानवास होत असलेमुळे झुनोटिक इंपॉर्टट असणारा रोग आहे.
कारणे: हा रोग “ब्रूसेली” कुटुंबातील ब्रूसेला जातीच्या जीवाणूंमुळे होतो. ब्रूसेल्ला चे १२ वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी ब्रूसेल्ला अबॉर्टस, ब्रूसेल्ला मेलिटेनसीस, ब्रूसेल्ला सुईस, ब्रूसेल्ला ओव्हीस, ब्रूसेल्ला कॅनीस, ब्रूसेल्ला सेटी व ब्रूसेल्ला पिनिपेडियालीस हे महत्वाचे प्रकार आहेत.
प्रसार: आजारी जनावरांच्या संपर्काव्दारे, दुषित हवा, पाणी, चारा, कुरणे, पाणवठे, कातडीवरील जखमेव्दारे, नैसर्गिक/लैंगिक संबंध व वीर्याव्दारे या रोगाचा प्रसार होऊ शकतो.
जनावरांमध्ये ब्रसेलोसीस कसा होतो?
जनावरांमध्ये बाधीत/गाभडलेल्या जनावरांच्या संपर्कामुळे, गर्भपात झाले नंतर मांस पेशी व योनीव्दारे बाहेर पडणार्या स्त्रावाद्वारे (उदा. वार, गाभडलेले/मृत वासरु, गर्भाशयातील व योनीद्वारे बाहेर पडलेल्या स्त्रावामुळे दुषित झालेला चारा व पाणी) जनावरांना नैसर्गिकरित्या भरवीत असतांना बाधीत वळूद्वारे एका मादी पासून दुसर्या मादीस अशा रितीने इतर माद्यांना तसेच वळुंना या रोगाची लागण होऊन प्रसार होऊ शकतो.
मानवास ब्रूसेलोसीस कसा होऊ शकतो?
मानवास प्रामुख्याने ब्रूसेल्ला अबॉर्टस्, ब्रूसेल्ला सुईस व ब्रूसेल्ला मेलिटेनसीस या जीवाणूंमुळे ब्रूसेलोसीस होऊ शकतो. ब्रूसेलोसीसने बाधीत जनावरांच्या संपर्कात आल्यामुळे. गर्भपात होत असतांना निष्काळजीपणे हाताळणी केल्यामुळे व त्यावेळेस हाताला जखम असल्यास पशुपालकांना व पशुवैद्यकांना हवेव्दारे/संपर्काव्दारे हा रोग होण्याची शक्यता असते. तसेच अशा बाधीत जनावरांच्या अवयवांची, वार-मासंल पेशींची तसेच स्त्रावांची प्रयोगशाळेत निष्काळजीपणे हाताळणी केल्यास पशुवैद्यकांस, वा प्रयोगशाळा तंत्रज्ञास या रोगाची बाधा होऊ शकते. या बरोबरच दुषित दुधाची भांडी, उपकरणे, डेअरी कामगार पशुवैद्यक यांचे संपर्काने व श्वासाबरोबर हा रोग पसरतो. बाधीत जनावरे कत्तलखान्यात अनावधानाने हाताळणी झाल्यास तेथील कामगारांना सुध्दा हा रोग होऊ शकतो. याशिवाय बाधीत जनावरांपासून प्राप्त होणारे कच्चे दुध/अनपाश्चराईझडू दुध, दुग्धजन्य पदार्थ, दही, ताक, लोणी, आईस्क्रीम, बटर, चीज इत्यादी पदार्थ खाण्यात आल्यामुळे माणसांना सुध्दा हा रोग होऊ शकतो.
ब्रूसेलोसीसमुळे मानवांत आढळणारी लक्षणे: ताप, थंडी, भूक न लागणे, अशक्तपणा, डोकेदुखी, कधी कधी घाम येणे, अंगदुखी, सांधेदुखी, पाठदुखी इत्यादी लक्षणे दिसून येतात. अशा आजारास अंडुलंट फिव्हर किंवा माल्टा फिव्हर असे संबोधल्या जाते.
ब्रूसेलोसीस जनावरांमध्ये आढळून येणारी लक्षणे: ताप येणे, चारा न खाणे, अशक्तपणा, ४ ते ९ महिन्यांमध्ये गर्भपात होणे, गर्भारपणाच्या शेवटी शेवटी शेळया मेंढयामध्ये गर्भपात होणे किंवा “स्टील बर्थ”, वारंवार माजावर येणे व कधी कधी वंधत्व येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.
शव विच्छेदन विकृती: मादीमध्ये प्रामुख्याने गर्भपात वार (प्लासेंटायटीस) अडकणे व रक्ताळणे, कॉटिलीडॉन्स सुजने व कुजणे तसेच कधी कधी गर्भाशयात रक्तमिश्रीत घाणेरडे रक्त सांचने इत्यादी. वळूंमध्ये प्रामुख्याने इपिडिडायमायटीस, वृषणाचा दाह (ऑरकायटीस) व “हायग्रोमा ऑफ नी जॉईटस्” असे आढळून येतात.
रोगनिदान:
- कल्चर व आयसोलेशन (Culture and Isolation) रक्त व दुधामधून जीवाणू ओळखणे व वेगळे करणे.
- गर्भपाताचे वेळी गाभडलेल्या/मृत वासराच्या प्लिहा, फुफ्फुस, हृदय यामधील रक्त कांचपट्टयांव्दारे (Blood smear/Impression smear)
- बाधीत/मृत जनावरांच्या इंप्रेशन स्मीअर (वार, कॉटीलीडॉन व मुत्र इत्यादी)
- गर्भपात झालेनंतर २१ दिवसांनी रक्तजल्ळ तपासणी
- इलायझा टेस्ट
रोगनिदानासाठी उति गोळा करणे :
अ) गाभडलेल्या जनावरांमधील
- योनीव्दारे बाहेर पडणारा स्त्राव- बर्फावर (काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये बंद करूण.)
- वाराचे तुकडे व २-३ कॉटीलीडॉन्स- बर्फावर (काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये बंद करुण.)
- रक्तजल गर्भपात झालेल्या दिवशी व तद्नंतर २१ दिवसांनी, गोळा करावेत.
ब) मूत वासरांमध्ये
- अँबोमॅझम मधील खाद्य – बर्फावर काचेच्या बाटलीत/प्लास्टिक पिशवीमध्ये.
- हृदयातील रक्त – बर्फावर काचेच्या बाटलीत/प्लास्टिक पिशवीमध्ये.
- प्लिहा, हृदय, फुफ्फुस, यांचे २-४ तुकडे – बर्फावर काचेच्या बाटलीत/प्लास्टिक पिशवीमध्ये.
उपचार: ब्रूसेलोसीस करीता उपचार फार खर्चिक असून त्यास काही आठवडे वा काही महिने असा दीर्घकाळ उपचार करावा लागतो. मरतुक ही १ ते २ टक्के ऐवढी असते तरी परंतु “डॉक्सीसायक्लीन” अथवा ”रिफाम्पीन” यासारखी औषधे प्रभावी ठरु शकतात.
रोग नियंत्रण:
- जनावरांच्या S.T.A.T चाचण्या करणे.
- चाचण्याव्दारे पॉझिटीव्ह आलेली जनावरे कळपामधून काढून टाकणे.
- योग्य ती खबरदारी घेऊन गाभडलेले मृत वासरे व वार खोलवर पुरून टाकणे.
- वासरांना ३ ते ५ महिन्यात ब्रूसेला लस नोंदणीकृत पशुवैद्यकांकडून करून घेणे.
- गोठयामध्ये किंवा फार्मवर जैवसुरक्षा उपायांची कडकपणे अंमलबजावणी करणे.
- स्वच्छपाणी व खाद्य पुरविणे.
डॉ. व्हि. एम. भुक्तर
माजी अध्यक्ष डीसीप्लिनरी कमिटी, भारतीय पशु चिकित्सा परिषद, नवी दिल्ली |
डॉ. के. आर. शिंगल
पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार |