अफलाटॉक्सीन्स: दुभत्या जनावरांना होणारा बुरशीजन्य मायकोटॉक्सीन्सचा प्रादुर्भाव

अफलाटॉक्सीन्स

जैवसुरक्षितता किंवा बायोसेक्युरिटी प्रणाली आपल्या गोठ्यावर लागू करताना गोठ्यात येणारी कुठलीही नवीन गोष्ट हि रोगकारक जीवाणू (बॅक्टेरिया) विषाणू (व्हायरस) किंवा बुरशी (फंगस) ई ची वाहक असू शकते हे लक्षात ठेवावे. खाद्या मधून तसेच चाऱ्याबरोबर सुद्धा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बुरशीयुक्त चाऱ्यामुळे जनावराला मायकोटॉक्सिन्स नावाचा आजार होतो त्यामुळे जनावराचे फुफ्फुस, कास, गर्भाशय, आतडे ई. ना इजा होऊ शकते. आतड्यामध्ये झालेल्या मायकोसीस मुळे अंतर्भागात रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. बुरशीने तयार केलेल्या विषारी घटकांना मायकोटॉक्सीनस असे म्हणतात असे मायकोटॉक्सीनयुक्त खाद्य किंवा चारा जनावरांनी खाल्यामुळे त्यांना त्याची हलकी विषबाधा (Chronic Texocity) होते. याचे परिणाम लगेच दिसत नसले तरी दुध उत्पादनात अनपेक्षित घट, दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम व यकृत (लिव्हर) खराब होणे ई. लक्षणे दिसून येतात. बुरशी युक्त सायलेज ब्र्युअरी वेस्ट (Brewery) किंवा ओले बिअर वेस्ट ई. ज्यादा पाणी युक्त पशुखाद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव लगेच होतो. रवंथ करणारी जनावरे, चारा, कृषि उत्पादनाचे बायप्रोडक्ट्स, प्रक्रिया केलेला कच्चा माल ई. खात असल्यामुळे ते मायकोटॉक्सीनसयुक्त खाद्या मुळे होणाऱ्या आजारांना लवकर बळी पडतात.

विविध प्रकारच्या बुरशी पुढीलप्रमाणे विषारी घटक तयार करतात : ऍस्परजीलस नावाची बुरशी अफलाटॉक्सीन तयार करते, फुसारींयम नावाची बुरशी झीरेलिनोन, टी -२ टॉक्सीन व फुमोनिसीन तयार करते. पेनिसिलीयम नावाची बुरशी ओक्राटॉक्सीन व रोग्यूफोतीन –सी असे विषारी घटक तयार करते. बुरशीने खराब झालेले खाद्य चारा ई. वर एकापेक्षा जास्त बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सदर टॉक्सीनचे अंश दुधावाटेही बाहेर येतात जे मनुष्याला हानिकारक असतात. रवंथ करणाऱ्या जनावरांना अशा बुरशीजन्य रोगांपासून वाचण्यासाठी नैसर्गिक प्रतिकार क्षमता असते, परंतु दुधाचा ताण असणारी जनावरे, वासरे, आजारी जनावरे लवकर बळी पडतात.

मायकोटॉक्सीनसचा जनावरांवर भूक कमी होणे, पचनक्षमता कमी होणे, कोठीपोटातील किण्वन प्रक्रियेला बाधा येणे, अनियमित माज, रोग प्रतिकारशक्ती खालावणे, प्रजनन क्षमता कमी होणे, रखरखीत त्वचा ई. विपरीत परिणाम दिसतात. या परिणामांचे मूळ लवकर सापडत नाही त्यामुळे रोगांचे निदान लवकर होत नाही.

पशुखाद्य किंवा चाऱ्याच्या थोड्याच भागाला बुरशी लागत असल्यामुळे प्रयोगशाळेतील खाद्य विश्लेषणात ती लवकर दिसून येत नाही. बुरशी किंवा त्यांनी तयार केलेल्या मायकोटॉक्सीनसचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या सर्व सामान्य दुध उत्पादकांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. तसेच सर्व प्रकारचे मायकोटॉक्सीन ओळखण्यासाठी चाचण्या अजूनही तयार झालेल्या नाहीत. बुरशीच्या बिजाणूची (स्पोअर्स) संख्या बुरशीची ओळख पटविण्यासाठी सहाय्य करतात.

पशुपोषण व्यवस्थापनातून बुरशी व मायकोटॉक्सीनसचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. कच्चा माल खरेदी करताना ९ % पेक्षा कमी आद्रतेचा (मॉईस्चर) असल्यास उत्तम. खाद्यातून परिपूर्ण प्रथिने, उर्जा, तंतुमय पदार्थ, खनिजे, रोग प्रतिकारक्षमता वाढविणारे आयुर्वेदिक अर्क, सिद्ध टॉक्सीन बाइंडर व बफर यांचा वापर  आवश्यक ठरतो. याबरोबरच पशुखाद्यावर किंवा चाऱ्यावर दिसणारी पांढरी, गुलाबी, राखाडी वा काळी बुरशी, डाग असलेला मका ई. जनावरांना खाऊ घालू नये.

एकूणच वरीलप्रमाणे जैवसुरक्षितता किंवा बायोसेक्युरिटी प्रणाली (Biosecurity Measures for Dairy Farm) आपल्या गोठ्यावर किंवा फार्मवर काटेकोरपणे लागू करावी जेणेकरून आपल्या दुभत्या गाई-म्हशी व इतर जनावरांना बाहेरून होणाऱ्या व आतमध्ये पसरणाऱ्या रोगांची लागण होणार नाही व ते आजारी पडून होणारे नुकसान टाळता येऊ शकेल.

Read: बायपास फॅट तंत्रज्ञान: दुभत्या गायी-म्हशींसाठी वरदान


डॉ. पराग घोगले

एम. व्ही. एस. सी, पशुपोषण व व्यवस्थापन सल्लागार
मोबाइल नंबर – 9892099969