गायींसाठी आरामदायी, प्रजननानुकूल व उत्पादनानुकूल निवाऱ्यांची व्यवस्था
गायींना निवारा पुरवताना हे लक्षात घ्या –
गायी आणि मनुष्य ह्यांच्यात काही मुलभूत महत्वाचे फरक आहेत. ते आधी लक्षात घेतले गेले पाहिजेत.
- गायींची त्वचा, त्याद्वारे होणारे उष्णता उत्सर्जनाचे प्रमाण व पद्धती अतिशय वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी, ह्या प्रक्रियांना अनुकूल असे निवारे आवश्यक आहेत.
- गायींची त्वचा जाड – म्हणजे ६ मिमी असते (मनुष्याची ०.७ मिमी). अर्थात, त्यामुळे त्यांचे त्वचावरण व त्यामुळे त्वचेद्वारे उष्णता उत्सर्जन अधिक सक्षम असते. तापमानातील बदलांना त्या मनुष्यापेक्षा अधिक उत्तम प्रकारे प्रतिसाद देतात.
- कळपात राहण्याच्या नैसर्गिक वृत्तीमुळे गायींची आपल्या प्रजातीशी अभिमुखता असते. त्यामुळे एकाकीपणा व बंदिस्तता त्यांच्यात ताण निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो.
मुक्त संचार करण्याची मुभा असलेल्या गायींपेक्षा बंदिस्त गायींच्या रक्तातील, (तणाव निर्माण झाल्यामुळे) तणावनिर्मूलक संप्रेरकांचे प्रमाण तिपटीने वाढलेले असते, असे संशोधन सांगते. तणावाखाली असलेल्या गायींच्या दूध उत्पादन, तसेच प्रजननादी क्षमतांवर अनिष्ट परिणाम होतो. फलनक्रिया व माजाची लक्षणे दिसून येण्यात त्याचा अडसर होतो.
- बंदिस्त असल्यास माजाची व प्रजननसदृश्यतेची लक्षणे (जसे, इतर गायींशी लगट करणे अथवा त्यांच्यावर आरूढ होवून मजवर असलेल्या गायींना ओळखण्याचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मुक्त संचार असलेल्या गायींना हे स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे गायींच्या निवाऱ्यांचे नियोजन त्यानुसार केले पाहिजे.
- चार पायांवर असलेल्या गायींच्या शरीराचे त्यांना खूप वजन पेलायचे असते. त्यामुळे सदोष अशा जमिनीवर सातत्याने उभे राहिलेल्या गायींच्या पायांत अधुत्व येते. त्या लंगडतात. अनेक गुणवत्तापूर्ण गायींना त्यामुळे कळपातून काढायची वेळ येते.
- त्यामुळे निवाऱ्यातील ओबडधोबड, तसेच ओलसर असलेल्या जमीनीमुळेही गायींत अधूपणा निर्माण होतो व त्याचा प्रजनन आणि उत्पादन यांच्यावर अनिष्ट परिणाम होतो.
- त्याचप्रमाणे टणक, सिमेंट-कॉंक्रीटच्या कडक व उघड्या जमिनीमुळेही गायींत खुरांचे, पायांचे दोष उद्भवतात. ती शक्यता संकरित गायींत अधिक प्रमाणात असते.
- सिमेंट-कॉंक्रीटच्या जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होत असल्यामुळे विशेषत: उष्ण, तसेच ध्रुवीय प्रदेशात अशा जमिनी गायींसाठी प्रतिकूल ठरतात.
- त्यामुळे, सिमेंट-कॉंक्रीटऐवजी सध्या मातीच्या सखल व सप्रतल जमिनी गायींसाठी योग्य असतात.
कॉंक्रीटच्या जमिनीवर बांधल्यामुळे गायींना त्यांच्या साचलेल्या मलमूत्रात बसावे लागते. त्यांना धुण्यासाठी पुन्हा पाण्याचा वापर / खर्च होतो. विनाकारण पाण्याची नासाडी होते. शिवाय, खरे म्हणजे सारखे सारखे धुण्यामुळे गायींना त्वचारोग होण्याची शक्यता वाढते. वास्तविक पाहता, गायींना आठवड्यातून एकदा फक्त ब्रश / खरारा केला तरी पुरेसे असते.
गायींना बसण्यासाठी खरे तर स्वच्छ आणि करड्या जागेची आवश्यकता असते आणि ती मातीच्या, सारवलेल्या जमिनीच्या सोयीने मिळते. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे, कि आच्छादन नसलेल्या कॉंक्रीटच्या जमिनीमुळे गायींच्या खुरांच्या, पायांच्या रचनेतच नव्हे, तर कासेच्याही रचनेत दोष निर्माण होवून त्यांना कळपातून काढावे लागते.
कॉंक्रीटच्या जमिनीवर सातत्याने वजन सांभाळत उभे राहिल्यामुळे वरील छायाचित्रात दर्शवल्याप्रमाणे, सांध्यांच्या व्याधी निर्माण होवून गायींच्या पायाच्या रचनेत दोष निर्माण होतो. अशा गायी निकाली काढल्या जातात व त्यांच्यात प्रजनन व उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.
ग्रामीण भागात सहसा वापरले जाणारे निवारे असे सदोष असतात. कमी उंचीचे छत, मातीची, पण ओबडधोबड असखल जमीन आणि सतत बांधलेल्या, बंदिस्त अवस्थेत असलेली जनावरे, गायी – ही पद्धत चुकीची आहे.
बंदिस्त गायींच्या तुलनेत मुक्त गायी –
- प्रयोगांनी हे सिद्ध झाले आहे, कि केवळ दोन तासांसाठी बंदिस्त ठेवण्यात आलेल्या गायीच्या रक्तात, मुक्तअवस्थेपेक्षा ६ – ७ पटीने अधिक कॉर्टीसोल (तणावामुळे निर्माण होणारे संप्रेरक) आढळून येते.
- साध्या मातीच्या जमिनीवर मुक्त संचाराची सोय असलेल्या गायींचे स्वास्थ्य उत्तम राहते व त्यांच्या पचनक्षमता व उत्पादन क्षमता शाबूत राहतात.
- बंदिस्ततेमुळे गायी चिडखोर बनतात व आक्रमक होतात. त्या तुलनेत मुक्तसंचाराची सोय मिळालेल्या गायी अधिक शांत, स्वस्थचित्त व अधिक पाळीव असतात.
- मुक्तसंचाराची सोय असलेल्या गायींच्या माजाची लक्षणे ठळकपणे प्रदर्शित होत असल्यामुळे त्यांच्या प्रजननक्षमतेत बाधा येत नाही. त्यांचे प्रजननवर्तन सर्वसाधारण राहण्यास मदत होते.
- मुक्तसंचार उपलब्ध केलेल्या गायींच्या दुभतेकाळात, उत्पादनात व दुधाच्या दर्जात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
गायीला लागणारे क्षेत्रफळ :
सुव्यवस्थेच्या, स्वास्थ्याच्या व उत्पादनाच्या वाढीसाठी सर्वसाधारण हालचालींसाठी गायींना मुबलक मोकळी जागा असणे आवश्यक आहे. भारतात बहुसंख्य ठिकाणी ह्याचा विचार केला जात नाही. शिवाय, छोट्या पशुपालकांकडे जागेची कमतरताही असते. त्यामुळे सर्वंकष विचार करता, गायींना आवश्यक असणार्या किमान जागेचे खालीलप्रमाणे प्रमाणक ठरवण्यात आलेले आहे.
वयोवस्था | आवश्यक क्षेत्रफळ |
कालवडी व वयात आलेल्या गायी | ६० – १०० चौ. फूट |
१ – २ वर्षे वयातली वासरे | ३० चौ. फूट |
१ महिना ते एक वर्षापर्यंत वासरासाठी | २५ चौ. फूट |
किफायतशीर व स्वास्थ्यकारक अशा काही निवाऱ्यांची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत. आपापल्या प्रक्षेत्रावर असलेल्या सामुग्रीचाच वापर करून निवारे बनवावेत. ते बनवताना गायींच्या स्वास्थ्य व कल्याणाचा विचार प्राधान्याने करून निवारे बनवले जावेत.
ध्यानात घेण्याजोग्या चार महत्वाच्या गोष्टी –
- गायींना नेहमी मुक्त संचारता यावे. हिंडता फिरता यावे. बांधू नये.
- निवाऱ्यातील जमीन टणक, भक्कम, असून मातीने शाकारलेली व समसखल असावी. त्याचप्रमाणे मलमूत्राचा निचरा होण्याची सोय असावी.
- पूर्ण वीटकाम व बांधकाम करून भिंत बांधण्याऐवजी ती केवळ १ – २ फूट उंच असावी व त्यावर बांबू किंवा लोखंडी सळ्या / पाईप वापरून कुंपण करावे.
- अशा मोकळ्या जागेत किमान साधारणत: दोन तृतीयांश जागा सूर्यप्रकाशात व उरलेल्या एक तृतीयांश जागेत सावली असलेली किंवा आच्छादन असलेल्या निवाऱ्याची सोय केलेली असावी.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संस्थेने ठरवून दिएल्या मानकानुसार कमी वा मध्यम पर्जन्यमान असलेल्या ध्रुवीय उष्ण प्रदेशातील पशुनिवाऱ्यासाठी आदर्श व परिपूर्ण असलेला गायींचा निवारा खालीलप्रमाणे असावा. ह्यात भिंतीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट दिसते. अन्न व पाण्याच्या साठ्याची कायम सोय केलेली असल्यामुळे अव्यवस्था, अस्वच्छताही रहात नाही. थेट सूर्यप्रकाश व पाउस यांच्यापासून सुरक्षेसाठी ऐच्छिक प्रकारचे निवारेही उभे करण्यात आले आहेत.
अधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणच्या गायींच्या गोठ्यांचे संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी विभागाने सुचवलेल्या मानकसिद्ध आदर्श गोठ्याची प्रतिकृती वर दाखवली आहे. ह्यातही भिंती उभारल्या नसून केवळ भरीव बांबू, ओंडके, अथवा पोलादाच्या पट्ट्या किंवा तार वापरून केलेले कुंपण आहे.
महाराष्ट्रातीलही काही विचारशील पशुपालकांनी विचारपूर्वक उभारलेल्या काही प्रयोगिक व यशस्वी निवाऱ्यांच्या काही प्रतिकृती खाली दर्शवण्यात आलेल्या आहेत.
ह्यात शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीत आवश्यक मानलेल्या प्रक्षेत्रावरील सामुगीचा विनियोग / वापर, मुबलक जागा अशा सर्व मुलभूत गरजांचा विचार केला आहे. खरे म्हणजे इथे दर्शवण्यात आलेल्या अर्धीच जागा भरपूर ठरली असती. शेणाचा निचरा केवळ ३ महिन्यांतून एकदाच केला जातो. गायींना इथे कधीही आंघोळ घातली जात नाही, कि निवारे धुतले जात नाहीत, त्यामुळे पाणी व श्रम दोन्हींची बचत केली जाते.
याही प्रतिकृतीत भिंतींचा वापर केलेला नाही. शेणाचा निपटारा दर महिन्याला कला जातो. महत्वाचे हे, कि प्रक्षेत्रावरील वृक्षांचा सावलीसाठी वापर केला आहे. जमीन, गायी आकरण धुवून पाणी आणि श्रमाचा अपव्यय टाळला जातो. मुक्तसंचार असल्यामुळे गायींचा वावर मुक्तपणे साध्य होतो आहे. चारा आणि पाणी मात्र सदैव उपलब्ध करून दिल्यास किमान दिवसा ६ – ७ वेळी गरजेनुसार मुक्तपणे ते वापरले जाऊ शकते.
खालील छायाचित्रातली प्रतिकृती तर अतिशय कल्पक आहे. ह्यात उंदीर, कुत्री रोखण्यासाठी नायलॉन जाळीचा वापर केला आहे. त्यामुळे उपयुक्ततेसोबत सौंदर्यदृष्टीही दिसून येते. आवश्यक तेवढी जागाही मुक्तसंचारासाठी उपलब्ध केली आहे. गायी अथवा जमीन धुण्याचा प्रश्न नसल्यामुळे पाणी आणि श्रमाचा अपव्यय टाळला जातो. ६ ते ७ वेळा पाणी आणि चारा वापरून गायी बारा तास रवंथ करत बसतील अशी सोय करण्यात आलेली आहे.
हा निवारा मात्र तसा विशेष नसला, तरी बंदिस्त निवाऱ्यापेक्षा अधिक उत्तम आहे. जागेची कमतरता आणि छताची उंची वाढवता आलेली नाही, हे स्पष्ट दिसते आहे. चारापाण्याचीही सोय आतच करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा गायी स्वस्थपणे संचार करत असताना दिसतात.
हे एक बचतीत केलेल्या, विचारपूर्वक उभारण्यात आलेल्या निवाऱ्याचे उदाहरण मानता येईल. कुठलाही व्यत्य न अंत भर घालता येईल अशा गव्हाणींची बाहेरच्या बाजूने सोय केलेली आहे. शिवाय, सावलीची सोय केल्यामुळे गव्हाणीत असलेला चारा वाळून जात नाही. पाण्याची सोय मात्र बाहेर करायला हवी.
या उदाहरणात इतर जनावरे व भक्षक प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी २.५ ते ३ फुटांचे बांधकाम करून भिंत उभारण्यात आली आहे. आजूबाजूच्या वृक्षांचा वापर नैसर्गिक सावलीसाठी करण्यात आलेला आहे. कुंपण किंवा रक्षक रचनेतच चारा आणि पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. एक महिन्याने शेणाचा निपटारा केला जातो. गायी अथवा जमीन धुण्याची सोय टाळल्यामुळे पाणी आणि श्रमाची बचत याही उदाहरणात केलेली दिसते. विशेष म्हणजे, गायी अगदी शांत व स्वस्थ चित्ताने रवंथ करत असताना दिसून येतात. सदैव उपलब्ध करून दिल्यामुळे गायी दिवसातून किमान ६ / ७ वेळा अन्न व चारा गायी घेतात.
महाराष्ट्रातील शिरवळ इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयाने उभारलेल्या निवाऱ्यांचे हे छायाचित्र आहे. इथल्या गायी व बैलांची शरीररचना पाहता, विशेषत: त्यांची टोकदार शिंगे पाहता, मुक्तसंचाराचे स्वातंत्र्य दिल्यास अशी जनावरे एकमेकांना इजा करू शकतील अशी भीती व्यक्त करण्यात येत असे. मात्र ती खोटी ठरली व गेल्या पाच वर्षात अशी एकही घटना घडली तर नाहीच,पंज पण जनावरे उलटपक्षी अधिक शांत व पाळीव, स्वस्थचित्त असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या धारा काढणे, चारा देणे अशी काही नित्याची कामे उलट सोपी झाली आहेत.
एका पशु मेळाव्यातील प्रदर्शनात केवळ उदाहरणादाखल उभारण्यात आलेल्या गायींच्या निवाऱ्यांचे चित्र इथे दाखवण्यात आले आहे. ह्या निवाऱ्याच्या उभारणीचा खर्च केवळ रु. १००००.०० असून तो निवारा ६ ते ७ गायींसाठी पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. अब्दुल समद, निवृत्त अधिष्ठाता, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.