जाणून घ्या… शाश्वत दूध उत्पादनासाठी पशुआहारातील खनिज मिश्रणांचे महत्व

पशुआहारातील खनिज मिश्रणांचे महत्व

सध्या हिवाळा ऋतूचे आगमन होत आहे हा ऋतू निरोगी ऋतू म्हणून ओळखला जातो. या काळात जनावरांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केले  तर पशुधनापासून चांगले व जास्तीचे उत्पादन मिळू शकते. या काळात उसाचा गळीत हंगाम सुरु होऊन जनावरांना मुबलक प्रमाणात ऊस तसेच उसाचे वाडे उपलब्ध होतात. अचानक हिरव्या चाऱ्यामधील बदल आणि जास्त प्रमाणात जनावरांना देण्यात येणाऱ्या वाड्यामुळे जनावरांची पचनसंस्था बिघडते आणि त्याचा दूध उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.उसाच्या वाढ्यामध्ये ऑक्झालेट नावाचा घटक असतो तो सहजासहजी पचल्या जात नाही ऑक्झालेट शरीरातून बाहेर पडताना कॅल्शियम सोबत संयोग पावून कॅल्शियम व ऑक्झालेटबाहेर येतो तसेच कॅल्शियम कमी झाल्याने शरीरातील फॉस्फरस घटक कमी शोषला जातो. परिणामी शरीराला आवश्यक असणाऱ्या क्षारांची मोठ्या प्रमाणात गरज भासते.तसेच पशुधन म्हंटले कि आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे निकामी होतात. असंतुलित खाद्य जनावरांना खाऊ दिल्याने आरोग्यावर व दूध उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. अश्या वेळी पशुपालक जे मिळेल ते खाद्य जनावरांना प्रमाणापेक्षा जास्त पुरवितात त्यावेळी दुधाच्या प्रमाणात खर्चात खूप वाढ होते आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. तसेच संकरित पिके जेवढे जास्त उत्पादन देतात तेवढे जास्त अन्नद्रवे जमिनीतून शोषून घेतात तसेच शेतात सारखी तीच ती पिके घेतल्याने आणि माती परीक्षणानुसार जमिनीत अन्नघटकांच्या कमतरता वेळेवर पूर्ण न केल्याने पिकांची वाढ खुंटते, उत्पादन घटते, चाऱ्याची प्रत खालावते जमिनीत खनिज मिश्रणाचे अतिरिक्त प्रमाण नसल्याने ते चाऱ्यामध्ये येत नाहीत असा निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांनी खाल्ल्यास जनावरे कुपोषित बनतात.

जे पशुपालक नेहमी हिरवा चारा दुसरीकडून खरेदी करतात तेव्हा त्यांना सकस चाऱ्याची हमी नसते त्यांनी जर त्या शेतकऱ्याकडे मातीपरीक्षणानुसार उत्पादित केलेला चारा आम्ही जास्त किमतीला घेऊ अशी मागणी केली तर चाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात खनिजांची कमतरता भासणार नाही. पशुपालकांनी बारकाईने लक्ष दिल्याने खनिज मिश्रणावरचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते त्यासाठी पशुपालकांनी यॊग्य वेळीच खनिज मिश्रणाचे महत्व जाणून घेणे गरजेचे असते.

खनिज मिश्रणे कोणती असतात?

दुभत्या जनावरांच्या शरीरामध्ये खनिज मिश्रणाचे खूप असते. वेगवेगळ्या शरीरक्रियेसाठी बऱ्याच खनिज मिश्रणाचा पुरवठा आहारात असणे आवश्यक असते. उदा. कॅल्शियम, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, सल्फर, सोडियम, पोटँशिअम, क्लोरीन लोह, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन,झिंक आणि सेलेनियम या सारखी खनिजे अत्यल्प प्रमाणात द्यावी लागतात.

दररोज दूध देणाऱ्या जनावरांसाठी लागणारी खनिज मिश्रणे-

प्रतिदिन १०ते१५ लिटर दूध देणाऱ्या गाईंसाठी

(खनिजे) प्रमाण
कॅल्शियम ४८ ग्रॅम
मॅग्नेशिअम १८ ग्रॅम
फॉस्फोरस ४८ ग्रॅम
सल्फर ०.०१९ ग्रॅम
सोडियम १८ ग्रॅम
पोटँशिअम ७२ ग्रॅम
क्लोरीन ३६ ग्रॅम
लोह ०.३६ ग्रॅ
कॉपर ७२ ग्रॅम
कोबाल्ट ०.०१२ ग्रॅम
आयोडीन ०.०१२ ग्रॅम
झिंक ०.३६ ग्रॅम
सेलेनियम १.१२ ग्रॅम

खनिज मिश्रणांचे पशु आहारातील महत्वाचे कार्य

खनिज मिश्रणांना पशुआहारातील महत्वाचा घटक मानला जातो जनावरांच्या सर्वांगीण विकासासाठी जडणघडणीसाठी, प्रजनन क्षमतेसाठी,अधिक दूधउत्पादन अश्या विविध प्रकारच्या शरीर पोषणासाठी खनिज मिश्रणाची मोठ्या प्रमाणात गरज लागते.

कार्य खनिज मिश्रणे
रक्तनिर्मिती फॉलीक अँसिड व्हिटॅमिन-बी १२, लोह
त्वचा आरोग्य झिंक, व्हिटॅमिन-६
थायरॉईड कार्य आयोडीन
हाडे व पेशीमधील दुवा व्हिटॅमिन- क
डोळ्यांचे कार्य व्हिटॅमिन- अ
जीवनसत्व निर्मिती सल्फर, कोबाल्ट
रक्त गोठणे कॅल्शिअम,व्हिटॅमिन-के
स्नायूंचे कार्य कॅल्शिअम फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ड
दातांची वाढ कॅल्शिअम, फॉस्फरस
मज्जासंस्थेचे कार्य पोटॅशियम, व्हिटॅमिन अ, बी-१,बी-६,बी-१२
रोगप्रतिकारक शक्ती सेलेनियम,कोबाल्ट, व्हिटॅमिन- ई आणि क
संप्रेरकाचे घटक झिंक,आयोडीन
विकारांचे घटक कॉपर,आयर्न
वार अडकणे माज जास्त वेळ न राहणे व्हिटॅमिन ई
पचनसंस्था कॉपर, फॉस्फरस,  झिंक, बी कॉम्प्लेक्स
दूध उत्पादन कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडियम आणि व्हिटॅमिन अ
ऑक्सिजन वहन आयर्न
शरीर पाणी संतुलन सोडियम,पोटॅशियम
वंधत्व प्रजनन फॉस्फोरस कोबाल्ट, कॉपर, क्रोमियम, सेलेनियम, झिंक आणि आयोडीन

खनिज मिश्रणाच्या कमतरतेची प्रमुख कारणे?

  1. सतत जमिनीमध्ये घेण्यात येणारे एकच पीक उत्पादन त्यामुळे जमिनीतील खनिज मिश्रणे हळू हळू नाहीशी होतात.
  2. चारा पिकांच्या तसेच मातीपरीक्षण अहवालाच्या आवश्यकतेनुसार जमिनीत अन्नद्रव्याचा पुरेशा प्रमाणात वापर न करणे.
  3. सुधारित पिकांच्या जातींमध्ये अधिक पीक उत्पादन मिळते त्यावेळी भरपूर अन्नांश जमिनीतून शोषला जातो त्यावेळी दुसरे पीक चांगले येत नाही.
  4. सतत जनावरांना हत्तीगवत, ऊस, ऊसाचे वाडे, कडवळ खाऊ घातल्याने खनिज मिश्रणे उपलब्ध होत नाहीत तर ती शेणाद्वारे बाहेर पडतात.
  5. बार्लीचा चारा म्हणून जास्त वापर केल्यास जनावरांना खनिज मिश्रणाची मोठ्या प्रमाणात गरज भासते.
  6. इथेनॉल, बियर, अल्कोहोल, स्टार्च, इत्यादी निर्मितीमध्ये सातु, मका, ज्वारी यासारख्या अन्नधान्याचा वापर होतो. निर्मिती दरम्यान मिळणाऱ्या चोथ्याचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून केल्यास खनिजांची कमतरता भासते.
  7. जनावरांना पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी, चारा खाद्यामध्ये एखाद्या खनिजाचे प्रमाण कमी अधिक असल्यास व त्या खनिजांमुळे इतर काही खनिजांचे जनावरांच्या शरीरात योग्य प्रमाणात शोषण होत नाही त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या खनिजांचा समतोल बिघडत जातो.
  8. जनावरांच्या आजारपणात त्यांची भूक मंदावते या काळात पहिल्या आहारापेक्षा कमी अधिक अन्नग्रहण केले जाते त्यावेळी गरज असूनही खनिज मिश्रणे शरीरात पोहचत नाहीत.
  9. बऱ्याच वेळा पशुपालक दूध उत्पादन चांगले मिळायला लागले कि जनावरांच्या ग्रहण क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात हिरवा चारा खाद्य देतात त्यावेळी जनावरांमध्ये खनिज मिश्रणाची कमतरता जाणवते.
  10. एक गोचीड दर दिवसाला साधारण अर्धा मि.ली रक्त शोषतात तसेच जंत,कृमी,परजीवी किटकांचा योग्य वेळी बंदोबस्त केला नाही तर पचन व शोषण झालेल्या खनिज मिश्रणाचा नाश होऊन कमतरता भासते.

खनिज मिश्रणाच्या अभावाची लक्षणे

  1. वासरांची जलद गतीने वाढ होत नाही.
  2. शरीरावरील केस उभे राहतात, तेज दिसत नाही, त्वचा खडबडीत होते, तसेच त्वचेचे आजार वाढतात.
  3. जनावर पान्हा चोरते, दूध देत नाही, तसेच लवकर आटते
  4. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तसेच डोळ्यातून पाणी गळते.
  5. दुधातील फॅट कमी होऊन दुधाची प्रत कमी होते.
  6. सडावर चिरा पडतात जखमा लवकर बऱ्या होत नाहीत तसेच धार काढताना जनावर लाथ मारते, हलते.
  7. जनावर व्यायल्यानंतर कॅल्शिअम कमी होते त्याची वेळीच पूर्तता झाली नाही तर मिल्क फिव्हर होतो तसेच वेळेत उपचार न केल्यास जनावर दगावते.
  8. गाई-म्हशी विताना वासरू अडकण्याचा संभव असतो तसेच व्यायल्यानंतर वार लवकर पडत नाही अडकून राहतो.तसेच मायांग बाहेर पडते व वेळेत उपचार न झाल्यास जनावर दगावते
  9. गाई-म्हशी तसेच लहान वासरांमध्ये अंधत्व येते.
  10. भाकड कालावधी वाढतो वर्षाला एक वेत मिळत नाही तसेच जनावरांच्या शरीरावर मांस दिसत नाही.
  11. गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते तसेच तात्पुरते किव्हा कायमचे वांझपण येते
  12. जनावर माज वेळेवर दाखवत नाही, माजाचा काळ कमी जास्त होतो तसेच माजाचा स्त्राव घट्ट किंव्हा पातळ शेंबडासारखा पडतो.
  13. गाई-म्हशींच्या सडांची तोंड लवकर बंद न झाल्याने काससुजी तसेच गाभण अवस्थेत किंव्हा व्यायल्यानंतर सडातून दूध सतत टिपकत असते.
  14. नवजात वासराचे वजन कमी भरते तसेच अपूर्ण दिवसाचे वासरू जन्माला येते.
  15. जनावरांच्या पायाची हाडे,खुरे,शिंगे, अपघात प्रसंगी किंव्हा जोरात धडक दिल्यास मोडतात.
  16. जनावराला खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जनावर चप्पल, पिशव्या, रबर, माती, अश्या अखाद्य वस्तू खाते त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन जनावर फुगते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  1. दूध उत्पादन व प्रजनन यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाची खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात आहारात असणे गरजेचे आहे.
  2. खनिज मिश्रणाचा नियमित वापर करावा.
  3. नवीन जातीच्या सकस वैरणी तयार कराव्यात.
  4. जनावरांना जास्त प्रमाणात उसाचे वाढे खायला देऊ नयेत.
  5. आपल्या भागातील जमिनीतील खनिजांची कमतरता ओळखून परिपूर्ण घटक असणारे खनिज मिश्रणे खरेदी करावीत.

वापरण्याचे प्रमाण-(प्रतिदिन /प्रतिजनावर)

  1. लहान वासरांसाठी-२०-२५ ग्रॅम
  2. मोठ्या कालवडीसाठी -५० ग्रॅम
  3. दुभत्या जनावरांसाठी ५०-१०० ग्रॅम

 


प्रा. नितीन रा. पिसाळ

डेअरी प्रशिक्षक,स्किल इंडिया प्रोजेक्ट,
विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.
मो.नं- ८००७३१३५९७, ई-मेल- nitinpisal2312@gmail.com