गायी-बैलांमधील ‘घाणेरी’ झुडूपांची (लॅटाना कॅमेरा) विषबाधा

उगम : घाणेरीच्या झुडूपांत असलेले “लँटाडेन” नामक विष घाणेरी (लँटाना कॅमेरा) ही झुडूप वर्गीय वनस्पती (बनफुल, पांचफुली) या नावानेही उष्ण कटिबंध आणि समोष्ण कटिबंधीय प्रदेशांत विस्ताराने पसरलेली दिसते.

विशिष्ठ लक्षणे: भूक मंदावणे, प्रकाशीय संवेदनशीलता (फोटो सेन्सेटायझेशन) कावीळीमुळे चामडी व श्लेष्मल त्वचेवर पिवळस झांक येणे, पिवळी लघवी होणे, प्रकाशसंवेदनाजन्य चर्मदाह होणे इत्यादी.

गुंतागुंतीची लक्षणे: प्रचंड मानसिक दडपण, रवंथ करण्याच्या क्रियेची स्थगिती, बध्दकोष्ठा पाठोपाठच हागवण लागणे, त्वचादाह होवून कातडी लोंबणे आणि झडणे, पाण्याचा शोध (डिहायड्रेशन) होणे.

शवविच्छेदनांतील लक्षणे: लक्षणीय काविळ, जल-ऊर भरण (हायड्रोथोरॅक्स) जलोदर (ॲसायटिस), पिवळसर तपकिरी ते नारंगी रंगाचे काळिज (लिव्हर) दिसणे, व ते सुजलेले ही दिसणे, दोन्ही बाजुंची मुत्रपिंडे सुजणे.

प्रयोगशालेय परिक्षणासाठी नमूने गोळा करणे: संपूर्ण रक्त (EDTA युक्त), रक्तजल (सीरम), फॉरमॅलिनमध्ये गोठित काळीजाचा तुकडा (फॉरमॅग्निफिक्स्ड लिव्हर), मुत्रपिंडाचा भाग, आंतड्यांचा भाग, इत्यादी अवयव तुकडे, रवंथिकेमधील (रोमंथिकेतील) म्हणजेच रूमिनल चर्वण केलेला चौथा (100 ग्रॅम, गोठवलेला).

प्रयोगशालेय निदान: रक्तजलांतील “बिलिरूबीन” प्रमाण, काळीजसंबंधित विशिष्ठ वितंचके (इंझाईमस) (G.G.T./जी.जी.टी., SDH/एस.डी.एच., A.S.T./ए.एस.टी., ALT/ए.एल.टी.) सीरम (रक्तजल) प्रथीनांचे प्रोफाईल, रक्तांतील यूरिया नायट्रोजनचे प्रमाण आणि सी.बी.सी. इत्यादी.

विशिष्ठ औषध योजना

  1. जेनेरिक नाव (औषधाचे) मुळ नाव: ॲक्टिव्हेटेड कोळसा (चारकोल) (A.C.) मात्रा प्रमाण (डोस रेट): 1 ते 5 मिली ग्रॅम/शरीराच्या दर किलो वजनामागे पाण्यांत कालवून तयार केलेले द्रावण (स्लरी) तोंडावाटे देणे.

काळजी घेणे व सहऔषध योजने बरोबर होणारी प्रतिक्रिया आणि वर्जता (काँट्राइंडिकेशन): मिनरल तेल (ऑईल) आणि इलेक्ट्रोलाईट बफर द्रावणांबरोबर ह्या औषधाचा उपयोग करू नये. कारण त्यांच्यामुळे ॲक्टिव्हेटेड चारकोल (कोळसा) ची शोषणक्षमता कमी होते. ॲक्टिव्हेटेड चारकोल (A.C.) दिल्यानंतर 3 तास तरी ही दुसरी औषधे देवू नयेत.

इतर दुष्परिणाम: चुकीच्या पध्दतीने दिलेल्या ॲक्टिव्हेटेड चारकोलमुळे जनावराला ठसका लागून कोळशांचे कण श्वसन मार्गात चुकून घुसतात व त्यामुळे शोषण (ऑस्पिटेशन) फुफ्फुसदाह (न्यूमोनिया) होवू शकतो. काही जनावरांना बध्दकोष्ठ आणि हागवण लागते.

  1. जेनेरिक नाव (औषधाचे मूळ नाव) : मॅग्नेशियम सल्फेट

डोसरेट (मात्रा प्रमाण) : 200 ते 500 मिली ग्रॅम/दर किलो शरीराच्या वजना प्रमाणे तोंडावाटे ऑक्टिव्हेटेड चारकोलच्या स्लरीमध्ये मिसळून देणे.

 

सहयोजनेबरोबर होणारी प्रतिक्रिया, काळजी आणि वर्जता (काँट्राइंडिकेशन) :

ज्या जनावरांना हागवण लागली आहे, त्यांना देवू नये.

इतर दुष्परिणाम: नोंद झालेले नाहीत.

आधार देणारी उपाय योजना :

  1. जनेरिक नाव (औषधाचे मूळ नाव) : क्लोरफेनिल अमाईन मॅलिएट.

मात्रा प्रमाण : 10 ते 15 मिली स्नायूंमार्गे (टोचणे) 3 ते 5 ‍दिवस.

इतर दुष्परिणाम : तातपुर्ती सुस्ती, गुंगी किंवा मंदावलेली भूक.

सह योजनेबरोबर होणारी प्रतिक्रिया, काळजी आणि वर्जता (काँट्रोइंडिकेशन) : हायपर थायरॉइडिसम (थायरॉईड हारमोनचा अतिरेक) या लक्षणांच्या जनावरांना वापरू नये.

  1. जेनेरिक (औषधाचे) मूळ नाव : डेक्स्ट्रोज (50%) टोचण्याचे द्रावण.

मात्रा प्रमाण: 1 ते 4 मिली दर किलो शरीराच्या वजना मागे (0.1 ते 0.2 ग्रॅम दर किलो शरीराच्या वजनामागे/प्रति तास) कानांतील किंवा मानेतील शिरेमधून S.O.S.

सहयोजनेबरोबर होणारी प्रतिक्रिया, काळजी आणि व वर्जता (काँट्राइंडिकेशन): हायपर ग्लायसेमिक (जादा रक्त शर्करा असणारे) रूग्ण जनावर

इतर दुष्परिणाम: सारखे सारखे जादा मात्रेमधून (0.3 ग्रॅम/किलो/प्रतितास)

डेक्स्ट्रोज दिल्यामुळे हायपर ग्लायिसेमिया (जादा रक्तशर्करा होणे), हायपर फॉस्फेटेमिया (जादा फॉस्फेरसयुक्‍ रक्त होणे). शिरेतून सतत डेक्स्ट्रोज दिल्यामुळे स्वल्प काळ रक्तांतील पोटॅशियम (पलाश) लेव्हल कमी होणे, कोरडाचारा खाण्याचे प्रमाण कमी होणे आणि तात्पूरत्या वाढलेल्या दूधानंतर दुधावरील गायींनी दूध देणे एकदम कमी करणे अशा गोष्टी घडतात.

  1. जेनेरिक (औषधाचे) मूळ नाव : व्हिटॅमीन बी-12 कॉम्प्लेक्स (Vitamin B-12 Complex)

मात्रा प्रमाण: 1000 ते 2000 एम.सी.जी. स्नायुमधून टोचणे/दर एक दिवसाआड पाच वेळा. (कमरशिअल प्रॉडक्ट, ज्यात थायमिन हायड्रोक्सेराईड, रिनोप्लॅरीन, नायासिनामाईड, व्हिटामिन बी-12 आणि क्रुड लिव्हर एक्सट्रक्ट आहे) हा प्रॉडक्ट 10 मि.ली. दर दिवसाआड स्नायूतून टोचावा.

सहयोजनेबरोबर होणारी प्रतिक्रिया, काळजी आणि वर्जता (काँट्राइंडिकेशन) :

जनावरांमध्ये अजून नोंदलेली नाही.

इतर दूष्परिणाम: अजून माहित नाहीत.

वर्जता: मेंदूवर दबाव निर्मिनाऱ्या दुसर्या औषधांबरोबर देवू नये.

दुषपरिणाम: मेंदूवर कधी-कधी दुष्परिणाम दिसतात.

दुसरी कोणतीही शिफारस :

  1. विषबाधेच्या स्त्रोतापासून (लॅनटाना झूडूपांपासून) जनावरे दूर (ताबडतोब) करावीत आणि त्याचप्रमाणे विषबाधित जनावरांपासून ही बाधित नसलेली जनावरे अलग करावीत.
  2. कोणती द्रव उपाययोजना वापरायची हे जनावरांच्या प्रत्येक्ष परिस्थितीनुसार ठरेल. जसे की, सलाईन आयसोटोनिक सोल्यूशन @ 2 ते 5 मिली/किलो बॉडीवेट (शिरेतून) आणि रिंजर्स लॅक्टेट सोल्युशन @ 1 ते 4 मिली/किलो बॉडीवेट हे विषबाधा झालेल्या जनावरामधील द्रव तूट भरून काढण्यासाठी वापरता येते.
  3. आवश्यक फॅटीॲसिड्स/अँटि सेफ्टिक्स ही चामडीवरील लक्षणांसाठी उपाय म्हणून वापरता येतील.
  4. जनावरांमधील लक्षणाची जी काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे ॲटिबायोटिक्स/NSAIDS/कॉर्टिकोस्टेरॉइडस शिरेवाटे रक्तातून जनावराच्या शरीरात सोडता येतात आणि योग्य ती औषध मात्राही पोहोचवता येते. अत्यंत गंभीर रूग्णांमध्ये रक्तदाह (सेप्टिसेमिया) टाळण्यासाठी ॲटिबायोटिक्सही देता येतात.
  5. जनावराने खाल्लेली घाणेरी (लँटाना) झुडूपे काढण्यासाठी “रूमिनाटॉमी” ही शस्त्रक्रियाही करता येते.

 

लेखक 

डॉ. देवेंद्र स्वरूप
बि.व्ही.एस.सी. ॲन्ड ए.एच.
एम.व्ही.एस.सी. (व्हेटमेडिसीन)

अनुवादक

डॉ. एस. व्ही. पंडित
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे