जनावरांचे हिवाळ्यातील व्यवस्थापन
पशुपालन व्यवसायासाठी हिवाळा ऋतु पोषक मानला जातो. सरासरी कमी तापमान, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा चारा, वाळलेला चारा, हवेतील मध्यम आद्रता यामुळे जनावरांच्या आरोग्यासाठी हिवाळा ऋतु पोषक ठरतो. जनावरांची प्रजनन क्षमता हिवाळ्यात अधिक चांगली असते. बदलत्या हवामानाचा परिणाम जसा आपल्या शरीरावर जाणवतो तसाच जनावरांमध्ये देखिल दिसून येतो. त्यामुळे त्याचे वेळीच केलेले नियोजन फायदेशीर ठरते.
थंडीमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम
- थंडी जास्त असल्यामुळे जनावरे पाणी कमी पितात. याचा परिमाण त्यांच्या पचनसंस्थेवर होऊ शकतो.
- थंडीमध्ये शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांची जास्त उर्जा खर्च होते.
- हिवाळ्यात जनावरांच्या त्वचेला भेगा पडतात. तसेच त्वचा खरबडीत होते. त्वचेला खाज सुटते.
- सडावर भेगा पडून, दुध काढताना रक्त येण्याची शक्यता असते.
- अति थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात व जनावरे लंगडतात.
- दुधाळ जनावरे पान्हा व्यवस्थित सोडत नाहीत. त्यामुळे दुध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतीवरही परिणाम होतो.
- गोठा सतत ओला राहिल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
उपाययोजना
- जनावरांना रात्री उघड्यावर बांधू नये. त्यांची व्यवस्था गोठ्यात करावी.
- गोठ्यातील वातावरण उबदार असावे. यासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत. जेणेकरून जनावरांना उब मिळेल.
- जनावरांना बसण्यासाठी गोणपाट टाकावे.
- गोठा जास्त उघडा असल्यावर, गोठ्याच्या चारी बाजूनी पडदे बांधावेत. सकाळच्या वेळी हे पडदे उघडावे जेणेकरून गोठ्यामध्ये हवा खेळती राहील आणि ऊन येत राहील.
- हिवाळ्यात जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळेस जनावरांना पाणी पिण्यास द्यावे.
- हिवाळ्यामध्ये जनावरांना शक्यतो कोमट पाणी पिण्यास द्यावे.
- सडांची त्वचा माऊ राहवी, भेगा पडू नयेत यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडातून रक्त येत असल्यास त्वरित उपचार घ्यावेत.
- कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
- जनावरांना संतुलित आहार द्यावा.
- जनावरांची उर्जेची गरज भरून काढण्यसाठी जनावरांच्या आहारात स्निग्ध पदार्थाचा वापर करावा. जास्तीत जास्त पोषक चारा जनावरांना द्यावा.
- वासरांना, करडाना ऊबदार ठिकाणी ठेवावे. शक्य असेल तर रूम हिटर चा वापर करावा किंवा काळजीपूर्वक शेकोटी पेटवावी.
- गोठा ओला राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
- जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्यावेळेस कोमट पाण्याने धुवावीत.
- लाळ्या खुरकुत आजारापासून संरक्षणासाठी जनावरांना लसीकरण करावे.
Read: प्रजनन व्यवस्थापन करिता काही महत्वाच्या बाबी
डॉ. श्रद्धा राऊत
पशुपोषण आहारशास्त्र विभाग,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय, उदगीर, जि. लातूर
ईमेल आयडी : skraut1996@gmail.com