प्रजनन व्यवस्थापन करिता काही महत्वाच्या बाबी
- अधिक दूध उत्पादनासाठी दुधाळ जनावरांतील प्रजनन प्रक्रिया योग्य असणे गरजेचे आहे. पशु पालन व्यवसायात वर्षाला वासरू हि संकल्पना महत्त्वाची आहे व त्यानुसार आधुनिक व्यास्थापनाची कास धरणे आवश्यक आहे. सद्यस्थिती पाहिली तर दुधाळ जनावरांची संख्या फार मोठ्या प्रमणात आहे व प्रती दुधाळ जनावरांचे दूध उत्पन्न फार कमी आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रजनन नियमण व कार्य सुरळीतपणे चालत नाही. तर त्यामध्ये अनेक प्रजनन अडथळे असतात.
- कालवडी वेळेत माजावर न येणे, वारंवार उलटणे,गाभण न राहणे, वंधत्व, वार अडकणे, दोन माजतील व दोन वेतातील अंतर वाढते, चुकीची कृत्रिम रेतन पद्धत व इतर अनेक प्रजनन अडथळे असतात व यामुळे एकंदरीत दूध उत्पादन कमी होते आणि पशु पालकांचे आर्थिक नुकसान होते.
१. कालवड योग्य वेळी माजावर न येणे
कालवडी लवकर माजावर येणे फायदेशीर दूध व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संतुलित आहार व चांगले व्यवस्थापन असल्यास संकरीत कालवडी वयाच्या १२ ते १५ महिन्यात गर्भधारनायोग्य माज दाखवतात.
- गाय व्याल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत वासराला त्याच्या वजनाच्या १/१० एवढा चिक पाजणे गरजेचे आहे.
- योग्य प्रमाणात शरीराच्या वजन वाढीसाठी उच्च प्रथिनयुक्त संतुलित पशुआहार द्यावा.
- पशुआहारासोबत खनिज मिश्रण व जीवनसत्वे योग्य प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीराच्या वाढीसोबत गर्भाशयाची वाढ होऊन शरीरामध्ये योग्य प्रमाणात संप्रेरके निर्माण होतात व कालवड योग्य वयात गर्भधारनायोग्य माज दाखवते.
- जंतनिर्मूलन: लहान वासरामध्ये जंताचा प्रादुर्भाव होऊन त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनिर्मूलन करावे.
- गोचीड निर्मूलन: गोचिड,पिसवा या सारख्या परोपजीवीपासून वासरे मुक्त ठेवावीत.
2) गाय व्याल्यानंतर योग्य वेळेत माजावर न येणे
- सर्वसामान्यपणे गाय व्याल्यानंतर ६० दिवसानंतर माजावर येणे अपेक्षित आहे परंतु व्यवस्थापनातील दोष, प्रसुतीवेळी येणाऱ्या समस्या, वार अडकणे, गर्भाशयदाह, इतर आजार इत्यादी कारणामुळे गायी माजावर येण्यास विलंब होतो व त्यामुळे भाकड काळात वाढ होते व दुग्धव्यवसाय तोट्यात जातो. तरी पशुपालकांनी गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये तंज्ञ पशुवैद्यकाकडूनच उपचार करून घ्यावेत.
- जास्त दुग्धोत्पादन असणाऱ्या गायी मध्ये दुधाचा ताण निर्माण होतो. अशावेळी पशूनां दुधाच्या प्रमाणात उच्च प्रथिने व उर्जायुक्त संतुलित पशुआहार व सोबत क्षार मिश्रण, जीवनसत्वे तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत.
- गाय व्याल्यानंतर ६० दिवसापेक्षा जास्त काळ जर नैसर्गिकरीत्या माजावर न आल्यास पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन कृत्रिमरीत्या माजावर आणण्यासाठी उपचार करून घ्यावेत.
३) गायी वारंवार माजावर येणे:
- दर्जेदार व्यवस्थापनाचा अभाव असणाऱ्या गोठ्यामध्ये ही समस्या आढळते.
- तसेच प्रजननविषयक आजार उदा. गर्भाशय दाह, स्त्रीबीज संबधी आजार, संप्रेरकाचा अभाव.
- या समस्येवर उपाय म्हणजे जर गायी मध्ये ३ वेळा कृत्रिम रेतन केल्यानंतरही गर्भधारना होत नसेल तर पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन आहार व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करून, रोगनिदान व औषधोपचार करून घेणे.
- गाय व्याल्यानंतर वार पूर्णपणे व्यवस्थित न पडल्यावर गर्भाशयदाह ही समस्या निर्माण होते त्यावेळी योग्य त्या ओषधीचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा.
- दुधाच्या प्रमाणात समतोल आहार न दिल्यास, कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण झाल्यास ही समस्या निर्माण होते.
४) प्रसुती संबधित अडथळा:
- प्रसूतीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून बारकाईने लक्ष द्यावे. कोणत्या प्रकारचा स्त्राव बाहेर येत आहे का? किती वेळापासून गाय कळा देत आहे. वासराचा कोणता भाग जसे खुर, तोंड बाहेर आला आहे का, याची खात्री करावी.
- अर्धशिक्षित अथवा अप्रशिक्षित लोकांची मदत घेऊ नये त्यामुळे समस्येतील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.
- सर्वसाधारणपणे वासराची स्थिती सामान्य असताना पुढचे पाय अगोदर बाहेर येतात व नंतर तोंडाचा भाग दृष्टीक्षेपात येतो त्यावेळी वासराचे दोन्ही पाय बाहेर ओढून वासरू बाहेर काढणे गरजेचे असते.
- बऱ्याचदा कष्ट्प्रसुतीची कारणे ही वासराची विकृत स्थिती किंवा जनन मार्गातील अडथळे यामुळेच असतात अशावेळी तज्ञ पशुवैद्यकाकडून प्रसूती करून घ्यावी.
५) वार आडकणे :
- सर्व साधारणपणे गाय व्याल्यानंतर ४ ते ८ तासा मध्ये वार पडणे अपेक्षित आहे परंतु काही कारणामूळे जसे गर्भपात, गर्भधारणेचे दिवस पूर्ण न होणे, जूळी वासरे जन्म घेणे, मृत वासरू बाहेर येणे, शरीरामध्ये कॅलशीयम, फॉस्फोरस किंवा इतर पोषक तत्वांचा अभाव असणे, अशक्तपणा इत्यादी.
- वार अडकल्यानंतर तज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करुन घेणे आवश्यक असते कारण अप्रशिक्षित अथवा अर्धशिक्षित व्यक्तिकडून अपूर्ण अथवा चुकीचे उपचार होण्याची जास्त शक्यता असते व त्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
- या समस्येचे प्रमाण कमी करण्यासाठी गाभण काळातील शेवटचे तीन महिने उच्च प्रथिने व उर्जायुक्त समतोल आहार व सोबत खनिज मिश्रण, जीवनसत्वे इ. योग्य प्रमाणात द्यावेत.
डॉ. अनिल दि. पाटील
सहाय्यक प्राध्यापक
पशुप्रजननशात्र विभाग
पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर – ४१३ ५१७
भ्रमणध्वनी: ७५८८०६२५५६