यांत्रिकी पद्धतीने मुरघास निर्मिती
सध्या दुगधव्यवसाय मुरघास ही अत्यंत महत्वाची बाब झाली आहे. सातारा जिल्ह्यातील विडणी येथील अजित अभंग यांनी हीच गरज व संधी ओळखून चार पिकांची कट्टी करणारी आधुनिक यंत्रे घेत त्यात गुंतवणूक केली आहे. आपल्या दुग्ध व्यवसायासाठी त्याचा वापर होतोच. शिवाय शेतकऱ्यांकडे जाऊन मका कापणी, कुट्टी करणे व त्याच्या बॅग्ज भरून देण्यापर्यंतची सेवा देण्याचा व्यवसाय त्यांनी शोधला व सुरु केला आहे. आदर्श दुग्ध व्यवसायातही अभंग यांनी नाव मिळवले आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक फलटण तालुक्यात दुधाचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातील विडणी हे साधारण १८ हजार लोखसंख्येचे गाव आहे. पाण्याची उपलबध्दता असल्याने ऊस तसेच दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याच गावातील उच्चशिक्षित अजित हरिदास अभंग हे प्रगतशील शेतकरी आहेत. एम. ए. चे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीचा मागे न लागता त्यांची शेती आणि वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीच्या छोटेखानी असलेल्या गोठ्यात चार गायीचे संगोपन केले जायचे. त्यावेळी मुक्त संचार गोठ्यांची संकल्पना फारशी रुजली नव्हती. त्यामुळे बंदिस्त गोठा पद्धतीचा वापर व्हायचा. हा व्यवसाय वाढवायचा या दृष्टीने अजित अभंग यांनी टप्याटप्याने गायीच्या संख्येत वाढ करण्यास सुरवात केली.
मुक्तसंचार गोठा
गायीचे दूध फलटण येथील गोविंदा मिल्क डेअरीला दिले जायचे. येथील सरव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी मुक्त संचार गोठ्याची समजावून दिली. कमी श्रम, जनावरांना कमी व्याधी, वाढीव दूध उत्पादन आदी फायदे असल्याने मुक्तसंचार गोठा करण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरा शेजारीच ८० बाय ४० फुटाचा सोयीसुविधांनी युक्त व खेळती हवा राहील असा गोठा बांधला केला. सध्या १२ गायी व सात कालवडी आहेत. बहुतांश सर्व गायी एचएफ जातीच्या आहेत. दोन म्हशींचेही संगोपन केले जात आहे. जनावरांसाठी पाण्याची सोय, उन्हाळ्यात गारवा राहावा यासाठी फॉगर्स, फॅन्स बसविण्यात आले आहेत. आपल्या सहा एक जमिनीत दोन ते अडीच एकरांत पाच ते सहा प्रकारचा चार घेण्यात येतो. उर्वरित ऊसाचे पीक असते. चाऱ्यासाठी मका, कडवळ या पिकांचे वर्षभराचे नियोजन केले जाते.
दुग्ध व्यवसायतील महत्वाचा बाबी
- गोठ्यात स्वच्छता ठेवण्याचा भर दिला जातो.
- लसीकरण वेळेत केले जाते.
- धारा काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो.
- प्रति जिन १०० ते १२० लिटर दूध उत्पादन होते.
- लॉकडाउन पूर्वी लिटरला साधारणपने ३२ ते ३५ रुपये दर मिळत होता. सध्या तो २२ ते २५ रुपये मिळतो.
- खर्च वजा जाता सुमारे २० ते २५ हजार नफा मिळतो.
- अजून एक पूरक म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरु करण्यात आला असून सध्या दहा शेळ्या आहेत.
मुरघास निर्मिती
मुक्तसंचार गोठा उभारल्यानंतर चाऱ्यावरील खर्च कमी व्हावा तसेच जनावरांना वर्षभर पोषक चारा मिळावा यासाठी अजित अभंग यांनी मक्यापासून यांत्रिकी पद्धतीने मुरघास तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २७ बाय २० फूट आकाराचा खड्डा काढून त्याचे बांधकाम केले आहे. या युनिट ची क्षमता ६० टनाची आहे. वर्षातून दोनवेळा मुरघास तयार केले जाते. दिवसातून दोन वेळा जनावरांना त्याचा वापर केला जातो.
व्यवसायाची संधी शोधली
- तालुक्यात सर्वाधिक दुग्धव्यवसाय केला जात असल्याने मुरघास निर्मिती करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. अजित अभंग यांनी नेमकी हीच संधी ओळखली. अन्य शेतकऱ्यानंसाठी हा व्यवसाय सुरु करून त्याची सेवा देता येईल का असा विचार त्यांनी केला.
- त्यानुसार कामांची आखणी सुरु केली. मोठे बंधू अतुल यांची साथ मिळाली. त्यांच्याकडे ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर व कट्टी करणारे यंत्र वापरात होतेच. शेतकऱ्यांचा शेतात जायचे. आपल्या मजुरांची मदत घेऊन मक्याची कापणी करायची. तो मका ट्रॉलीत भरून शेतापासून ते गोठ्यापर्यंत वाहून न्यायचा. शेतकऱ्याच्या गरजेनुसार तो बॅगेत किंवा खड्यात भरून द्यायचा अशी सेवा देण्यास सुरवात केली.
- हा व्यवसाय सुरु करून एक वर्ष झाले आहे. सुमारे शंभर शेतकऱ्यांना व एकूण शंभर एकरांवर ही सेवा दिली आहे.
- प्रति बॅगेत ८०० ते ९०० किलो मुरघास बसतो. प्रति टन ९०० ते एक हजार शुल्क या सेवेसाठी आकारले जाते. या व्यवसायातून १५ ते २० जणांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. मागणीनुसार मुरघासाची विक्री केली जाते. व्यवसायाची मुख्य जबाबदारी अतुल पाहतात.
वीस लाखांची गुंतवणूक
आता शेतकऱ्यानंकडून मिळणार प्रतिसाद पाहून मोठ्या क्षमतेचा ट्रॅक्टर (७५ एचपी) व आधुनिक कटरची खरेदी केली आहे. यासाठी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. कटरची किंमत साडेपाच लाख रुपयापर्यंत आहे. पूर्वीच्या कटरची क्षमता तासाला १० ते १५ टन होती. सध्याच्या कटराची क्षमता तासाला २५ टन कुट्टी करण्याची आहे.
मदत व मार्गदर्शन
आई कांताबाई, वडील हरिदास यांच्यासह पत्नी मोनाली, भावजय ज्योती यांची मदत होत असते. गोविंद मिल्कचे डॉ. शांताराम गायकवाड, विकास जाधव, दत्तात्रय सोनकांबळे यांचेही सहकार्य लाभले आहे. भविष्यात गोठ्याचा विस्तार करण्याचा विचार असून सुमारे ५० गायीच्या संगोपनाचे उद्दिष्ट असल्याचे अजित अभंग सांगतात.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा : अजित अभंग, ९५७९६८३२४५
हेही वाचायला आवडेल तुम्हाला : पशुपालकांनो जरा आपल्याही चुका जाणून घ्या…