केळीच्या सालीपासून दुभत्या गायींसाठी पर्यायी आहाराची सोय

पूर्वी गरिबाचे अन्न म्हणून केळीकडे पाहिले जायचे. आजही केळीचे ते स्थान आहारात निश्चितपणे आहे. २०१७ साली जगभरात ११७ लाख टन केळीचे उत्पादन झाल्याची नोंद आहे. पैकी ८३० लाख अमेरिकन डॉलर्स किमतीचे ३० लाख टन उत्पादन करणारा भारत हा पहिला देश आहे. विशेष म्हणजे, देशात केळीचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन तामिळनाडूत होते. (पहा – तक्ता क्र. १) असे असले तरी, या एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणाऱ्या फळापैकी २० – ३५ टक्के उत्पादन केवळ योग्य प्रकारची साठवणीची सोय नसल्यामुळे वाया जाते.  वास्तविक पाहता, केळीचा वापर केवळ अन्न वा फळ म्हणूनच नव्हे, तर तिच्यातील तंतुमय घटकांचा (स्टार्च) अनेक कारखान्यांतून विविध प्रकारे उपयोग केला जातो. औद्योगिक क्षेत्रात धागा, मुलांचे खाद्यप्रकार, विविध औषधी व शक्तिवर्धक उत्पादने तयार करण्यासाठी होतो. भारतात केळीच्या वाळवलेल्या पापडांचे (वेफर्स), ‘भुजिया’ सारखी खाद्य उत्पादने लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे केळीच्या विविध स्थितीतील फळाचा वापर केला जातो. पिकलेल्या तसेच, कच्च्या केळीचाही उपयोग अशी खाद्यउत्पादने करण्यासाठी केला जातो. आफ्रिकेत केळीच्या सालची भाजी करून मानवी आहारात वापरली जातात. भारतासह इतर देशांत मात्र केळीचे साल केवळ टाकाऊ पदार्थ म्हणूनच फेकून दिले जाते. नाही म्हणायला जनावरांना केळीची सालपटे खायला घातली जातात.

प्रस्तुत लेखात आपण तोच धागा वापरून, केळीच्या सालीचा उपयोग जनावरांच्या आहारात किती व किती काळपर्यंत प्रमाणात करता येतो व त्याचे फायदे काय होतील याचा परामर्श करणार आहे. त्याची दीर्घकालीन साठवणही करण्याच्या काही पद्धतींचा उल्लेख पाहणार आहोत.

केळीच्या सालींचा जनावरांच्या खाद्यासाठी केलेल्या उपयोगाबद्दल १९६० पासून अनेक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले. केळीच्या सालीत साधारणत: २० टक्के पाणीच असते. केळीच्या सालींपासून करण्यात आलेल्या पशुखाद्याची मक्याच्या घटकांशी तुलना अनेक अभ्यासांतून करण्यात आली.

घटक केळीची साले मुरघास
स्थूल प्रथिने

(क्रूड प्रोटीन्स)

8.2-8.5 7.2 -8
स्थूल तंतुमय घटक

(क्रूड फायबर)

10-12 21.4 – 25
एन डी एफ 47-49 46 – 48
ए डी एफ 29-32 24.6 – 27
इथर अवशेष 6.25 2.5 – 3.0
लीग्निन 10-11 2.9
शर्करा 12-13 0.00
क्षार / खनिजे 12-13 3.7-4.0
पचनजन्य ऊर्जा 9.5 MJ 10.8

केळीच्या सालींचा जनावरांच्या खाद्यासाठी केलेल्या उपयोगाबद्दल १९६० सालीपासून अनेक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले. केळीच्या सालीत साधारणत: २० टक्के पाणीच असते. केळीच्या सालींपासून करण्यात आलेल्या पशुखाद्याची मक्याच्या घटकांशी तुलना अनेक अभ्यासांतून करण्यात आली.

घटक ड्राय मॅटर (%)
ताजी सालपटे १९.८ – २१
आंबवलेली सालपटे २३ – २८
वाळवलेली सालपटे ८४ – ८६
मका मुरघास २८ – ३०

केळीच्या सालीतील पौष्टिक तत्वे :

वरील तक्त्यातील पौष्टिक तत्वांची माहिती ही www.feedipedia.org या संकेतस्थळावरील आहे. त्यात काही स्थानिक परिस्थिती, प्रकार यांच्यानुसार जुजबी फरक पडू शकतात. मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेणाऱ्या व पशुखाद्यासाठी त्यांचा वापर  मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उत्पादनाच्या वाणाची छाननी करून घ्यावी. विशेषत: त्यातील शर्करा (स्टार्च), लिग्निन आणि सॅपोनीन सारख्या घटकांची तपासणी करून घ्यावी. त्यासाठी नजिकच्या अन्न व खाद्य प्रयोगशाळेशी अथवा पशुवैद्यक संस्थेशी संपर्क करावा. www.indiancattle.com या आपल्या संकेतस्थळावरही ही माहिती आहे.

वरील तक्त्यातील माहितीचा तुलनात्मक अभ्यास केला असता, हे दिसून येते, की केळीच्या सालींचा वापर चारा व मुरघास यांनाही पर्यायी खाद्य म्हणून करता येणे शक्य आहे. केळीची सालीतही मक्यापासून केलेल्या मुरघासाप्रमाणे कमी प्रथिने (८ टक्के) असतात. त्यामुळे मुरघासाप्रमाणेच केळीच्या सालीचा वापर केला तर त्यासोबत सरकी, चुन्नी यांसारख्या प्रथिनयुक्त खाद्याचाही अंतर्भाव आहारात करावा. त्याचप्रमाणे केळीच्या सालीत लिग्निन, सॅपोनीन, ऑक्झेलेट्स आणि क्षाराचे प्रमाण असल्यामुळे केवळ आणि केवळ केळीच्या सालींचाच पशुआहारात करून चालणार नाही. त्यापेक्षा त्यांचा वापर पन्नास टक्क्यापर्यंतच – निम्म्यापुरताच करावा व उरलेले पन्नास टक्के खाद्य हे मुरघास (मका अथवा ज्वारीपासून केलेला) किंवा उपलब्ध असल्यास हिरव्या चाऱ्यासह मिसळून करावा.

केळ्यांच्या सालींचा गायींसाठी खाद्य म्हणून कसा विनियोग करता येतो ?

बहुसंख्य ठिकाणी केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते, पण ते विशिष्ट हंगामात. मुबलक प्रमाणात केळ्याचे उत्पादन होत असेल अशा ठिकाणी सूर्यप्रकाशात त्यांचे वाळवणे सर्वात फायदेशीर व सहज करता येण्यासारखा पर्याय आहे. त्याची भुकटीही केली जाते आणि टिकण्याच्या दृष्टीने भुकटी करण्यासारखा उत्तम पर्याय नाही. शिवाय, जनावरे थेट टाकलेल्या ताज्या सालांपेक्षाही भुकटी आवडीने खातात. त्याचप्रमाणे भुकटीचा मुरघास वा अन्य प्रकारच्या खड्यात मिश्रणासाठीही सहज वापर करता येतो. खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन व उपलब्धता असल्यास केळीच्या सालींचे सौरऊर्जेच्या साह्याने वाळवण्याच्या पद्धती व यंत्रेही वापरली जातात.

विशेष म्हणजे, ज्या पद्धतीने आपण मुरघास तयार करतो, अगदी त्याच पद्धतीने केळीच्या सालींचेही ‘निर्वात आंबवण’ करता येते. त्यासाठी सालींचे योग्य आकाराचे तुकडे करणे आवश्यक आहे. चाऱ्याप्रमाणेच केळीच्या सालींचेही यंत्राच्या साह्याने तुकडे करता येतात. सहसा केळीच्या सालीचे मुरघास, ज्वारी अथवा मक्याच्या धाटांचे निम्म्या निम्म्या मिश्रणाने करणे योग्य असते. केळीच्या सालींचे अल्प शर्करायुक्त उसाच्या वाड्यांसोबत अथवा भाजीपाल्यासोबतही मिश्र-मुरघास करता येते. केळीच्या सालीमध्ये १३ टक्के कर्बोदके (शर्करायुक्त) असल्यामुळे त्यांचे आंबवण उशिराच्या स्थितीतील चाऱ्यासोबत केलेले योग्य ठरते. दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीने मिश्र-मुरघासात आम्लांश (pH) हा एक महत्वाचा घटक असतो. गायींना रोज ताज्या साली २५ किलो किंवा वाळवलेल्या साली ६ – ६.५ किलो किंवा मिश्र-मुरघास ३० किलो या प्रमाणात खाद्य द्यावे.

सरतेशेवटी एवढे निश्चितपणे सांगता येईल, की हा विषय तसा प्रायोगिक असून तो निश्चित फायदेशीर आहे. मात्र त्यासाठी जागरूक व निरीक्षणशील राहून वापर करणे आवश्यक आहे. तसेच केळीच्या सालींचे विविध चारा-खाद्याशी मिश्रण करून आवश्यकतेपेक्षा थोडेसे कमी प्रमाण सावधपणे देत देत ठरवले पाहिजे. त्यातील प्रथिने, ऊर्जा, एडीएफ, एनडीएफ अशा चाचण्यांचे निष्कर्ष व इतर कसोट्या लक्षात घेत वापर केला पाहिजे. विचारपूर्वक दक्षतेने वापर केल्यास विशेषत: भूमिहीन व अल्पभूधारक तसेच संसाधनहीन पशुपालकांसाठी केळीच्या सालींचे पशुखाद्य वरदान ठरू शकते.


अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर