यशस्वी दुग्धोत्पादनासाठी मूलमंत्र
यशस्वी दुग्ध उत्पादन (Dairy Production)
शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक देशाच्या वाढत्या लोकसंखेनुसार आहारात पुरेसे घटक मिळणे अत्यावश्यक आहे. स्वच्छ दुध हे एक प्रकारचे परीपूर्ण अन्न आहे, जे आयुर्वेदिक काळापासून सर्वमान्य आहे आपल्या आरोग्याचा विचार करता त्याची निर्मिती आणि हाताळणी स्वच्छ अवस्थेत होणे आवश्यक आहे. निरोगी व स्वच्छ गाईच्या कासेतून येणारे दुध हे प्रथमतः स्वच्छ असते. ज्या वेळी त्याचा अस्वच्छ किंवा दुषित वातावरणाशी संबंध येतो त्यावेळी जंतूंचा शिरकाव होऊन ते लवकर खराब होते. खराब दुध शरीरास व आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतेच पण ते जास्त वेळ टिकून राहत नसल्याने त्याची प्रतवारी घसरते आणि मागणीही कमी होते. म्हणूनच स्वच्छ दुग्धोत्पादन (Dairy Production) हि आवश्यक बाब आहे.
दुधामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जंतू असल्यास ते दुधाला लवकरात लवकर आंबट बनवितात कारण दुधातील साखरेवर आम्ल तयार करणारे जंतू कार्यरत असतात. त्यापासून लेक्टिक आम्ल तयार होते. त्यापासून दुधाला आंबट चव येते. जेवढे जंतू जास्त तेवढेच आम्लाचे प्रमाण अधिक अशा रीतीने आम्लाचे प्रमाण दुधामध्ये वाढत गेले तर ते दुध लवकरच नासते. म्हणून स्वच्छ, शुद्ध व हानिकारक जंतूविरहित दुधाकरिता दुधाळ जनावरे, त्याच्या संबंधात येणारी माणसे, भांडी नेहमी स्वच्छ व निर्जंतुक असावयास हवीत.
स्वच्छ दुध म्हणजे नेमके काय?
स्वच्छ दुध म्हणजे निरोगी जानावरापासून काढलेले तसेच काडीकचरा विरहित निर्जंतुक दुध. स्वच्छ दुध आपण दूरवरच्या बाजारात विक्रीसाठी नेऊ शकतो. बाजारभावही चांगला मिळतो. नफा चांगला मिळाला म्हणून शेतकरी वर्गही आनंदी व समाधानी असतो.
भारतातील कच्या दुधाचे जीवनुजानिक प्रमाणीकरण
स्वच्छ दुध निर्मितीसाठी लक्षात ठेवावयाचे मुद्दे
- जनावरे रोगांपासून मुक्त असावी. वेळोवेळी पशुवैद्याकीयांमार्फत सांसर्गिक रोगांसाठी तपासून घ्यावीत. उदा. टी. बी.
- गोठ्यासभोवातालचा परिसर नेहमी स्वच्छ असावा. धार काढतेवेळी जनावर बांधावे व जनावारासमोर पुरेसे खाद्य द्यावे जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होणार नाही.
- गोठ्या सभोवतालच्या परिसरात पाणी साठू देऊ नये. तसेच डास, माश्या, गोचीड, किडे यांवर कीटकनाशक फवारणी करून बंदोबस्त करावा.
- दुध काढणारी व्यक्ती निरोगी, निर्व्यसनी असावी. त्याच्या हाताला कोणत्याही प्रकारच्या जखमा नसाव्यात, नखे लहान असावीत, कपडे स्वच्छ असावेत आणि दुध काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असावेत.
- दुध काढण्यापूर्वी शेण, काडीकचरा, मलमूत्र, घाण काढून गोठा स्वच्छ करावा.
- गायीला एक ते दोन वेळा नारळाच्या काथ्याने किंवा हाताळीने खरारा करावा त्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
- दुध काढण्यापूर्वी व नंतर जनावरांची कास, सड, मांड्या इत्यादी निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करावे.
- दुध काढणी पद्धतीत ‘हात पद्धत’ व ‘मशीन पद्धतीचा’ अवलंब केला जातो. हात पद्धतीत पूर्ण मुठ पद्धत हे फायदेशीर आहे कारण त्यामुळे सडाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. त्यामुळे स्तनदाह रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फार कमी असते. जास्त दुध देणाऱ्या गायीकरिता मशीन पद्धत अवलंबणे योग्य असते.
- दुध काढल्यानंतर ते स्वच्छ भांड्यात काढून थंड जागी ठेवावे. त्यामुळे दुध खराब होत नाही. जंतूंची वाढ खुंटते तसेच १०० से. तापमानाला साठवावे. त्यामुळे दुधाची योग्यता चांगली राहते.
- दुध काढताना जनावराचे मागचे पाय ग्घात्ता बांधावे, म्हणजे शेपटीच्या हालचालीमुळे दुधात घाण पडणार नाही.
- जनावर पान्हावल्यावर प्रत्येक सडतील धारा कासेच्या स्तनदाह रोगोच्या चाचणीकरिता कपमध्ये काळ्या रांगाच्या काचपट्टीवर घ्याव्यात दुधाचे निरीक्षण करावे. जर काचपट्टीवर दुधाच्या गुठळ्या दिसल्या तर असे दुध इतर दुधात मिसळू नये. व गायी – म्हशीला स्तनदाह (कासेच रोग) रोगावरील उपचार करावा.
- गायीला मिळणाऱ्या खाद्याचा त्यांच्या दुधावरही परिणाम होतो त्यासाठी गायीला धारेच्या वेळी किंवा त्याआधी किमान दोन ते तीन तास मुरघास देऊ नये. भाजीपाल्यांपैकी कांदा, कोबी, खावर, लसून, इत्यादीचा पाला खाऊ घातल्यास दुधात त्याचा दर्प उतरतो.
- कधी कधी दुध काढण्याकरिता सडांना व्हेस्लीन किंवा तेल लावतात, असे करणे म्हणजे रोगाला आमंत्रण देणे होय. दुध काढताना कास नेहमी कोरडे असावेत.
- दुध हे जंतुना खाद्य पुरवणारे माध्यम आहे. दुध जर योग्य रीतीने हाताळले नाही तर जीवाणूंची वाढ झपाट्याने होते. म्हणून स्वच्छ दुध चांगल्या स्थितीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
- गोठ्यात सांडपाणी वाहून जाण्याची सुयोग्य व्यवस्था असावी. शेण मूत्राचा बारीक ठार बसला असल्यास तो खरडून गोठा पूर्णपणे साफ करावा. गोठ्यातील गव्हाण्या, गटारी, चत इत्यादी भाग स्वच्छ असावेत.
- गोठ्याची सर्व साफसफाई झाल्यावर गोठ्यातील भिंती वर्षातून किमान दोन वेळा चुना लावून रंगवून घ्याव्यात.
दुधाच्या भांड्यांचे निर्जन्तुकीकरनाच्या वेळी घ्यावयाची काळजी
- दुधाची भांडी हि तुटलेली नसावीत किंवा कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नसावेत.
- भांडे पूर्णतः स्वच्छ गोत नाही तोपर्यंत त्याचे निर्जंतुकीकरण करावे.
- भांडी निर्जंतुक करण्यासाठी गरम पाणी व जन्तुनाशाकाचा वापर करावा.
- भांडी निर्जंतुक करताना भांड्यांच्या पृष्ठभागाला चिकटलेले दुधाचे कण काळजीपूर्वक स्वच्छ करावेत अन्यथा दुध खराब होते.
- निर्जंतुकीकरण करत असताना हाताना रासायनिक घटकांमुळे इजा होऊ नये म्हणून हांड ग्लोवेस वापरावेत.
- निर्जान्तुकीकारानासाठी आपण सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रोक्साईड, सोडियम फोस्फेट या रासायनिक घटकांचा वापर करू शकतो.
दुधाला खराब वास येण्याची कारणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय
दुधाला असणारा वास व चव यांवरून दुधाची प्रतवारी ठरवली जाते व त्यानुसारच त्याच्या विक्रीचा दर ही ठरतो त्यामुळे ग्राहकास ताजे व स्वच्छ दूध पुरविणे अत्यावश्यक बाब आहे. साधारणपणे दुधात समजून येईल असा वेगळा वास नसावा. नेहमीसारखे दृष्टीत पडते तसे आकारमान असावे व किंचित जाडसर असून पिल्यानंतर गोडसर चवीमुळे आल्हाददायक वाटावे अशी त्याची मधुरता असावी. निरोगी गायीच्या दुधास अशी चव व सुगंध असतो. परंतु बहुतेक वेळा जीवाणू, रसायने, निकृष्ट दर्जाचे खाद्य, चारा किंवा जनावरांची अस्वच्छता यांमुळे दुधास खराब वास येतो त्याची कारणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पुढीलप्रमाणे,
खाद्याला असणारा दर्प (वास)
कारणे: खाद्यात मुरघास दिल्यामुळे, कुरणात चरतांनी भाजीपाला, कंद, कांदे, इत्यादी.
प्रतिबंधक उपाय : मुरघास दूध काढून झाल्यानंतर देण्यात यावे. गायीला कुरणातून चरून आधी आणावे तसेच वास येणारी खाद्ये देऊ नयेत. गव्हानीतून पहिल्यांदा दिलेले खाद्य किंवा त्याचा अंश काढून घेणे. सरासरी आठवड्याला गव्हाण्या व्यवस्थित स्वच्छ कराव्यात.
तण व वनस्पतींचा दर्प :
कारणे : खाद्यात जंगली कांदे, लसून व इतर अनेक वनस्पतींचा वापर
प्रतिबंधक उपाय : कुरणातून शक्यतो अशा वनस्पती काढून टाकाव्यात फवारून नाहीश्या कराव्यात किंवा अशा प्रकारचे मजुरांकडून तण काढून घ्यावे
गायी, गोठे व इत्यादींचा दर्प :
कारणे :अस्वच्छ गायी, जनावरे, गोठ्यात साठविलेले शेण, घाणेरडी भांडी, कास पुसण्यासाठी वापरले जाणारे खराब कापड
प्रतिबंधक उपाय : जनावरांची स्वच्छता ठेवावी. गोठे हे स्वच्छ व हवेशीर ठेवावेत. भांडी धुवून जंतूविरहीत करावे. कास पुसण्याचे कापड स्वच्छ असावेत व रोगी दूध वापरू नये
खारट चव:
कारणे: स्तनदाह किंवा स्तनदाह रोगाची लागण व दूधकाळाचे शेवटचे दिवस
प्रतिबंधक उपाय : रोगी जनावरे कळपात ठेवू नयेत अशा जनावरांचे दूध पिण्यासाठी उपलब्ध करून देऊ नये तसेच प्रसूतीजवळ आलेल्या जनावराचे दूध वापरात आणू नये
सडलेली किंवा कडू चव
कारणे : दूध फार ढवळले तर किंवा अतिजलद थंड, अतिथंड करणे
प्रतिबंधक उपाय : दूध ढवळू नये, दुधाची भांडे स्वच्छ धुवून कोरडे करावीत म्हणजेच निर्जंतुक करावीत. दूध काढल्यानंतर दोन तासात ४ अंश से. पर्यंत थंड करून ठेवावे, दूध गोठण्याच्या स्थितीत ठेवू नये. दूध काळाचे शेवटचे दिवस असलेल्या जनावराचे दूध वापरत आणू नये
बेचवपणा :
कारणे: दुधात कमी स्निग्धांश व घनपदार्थ असल्यास
प्रतिबंधक उपाय : ज्या जनावरांच्या दुधात स्निग्धांश व घनपदार्थ कमी आहेत अशा जनावरांना कळपातून काढून टाकावे व व तसेच त्यांच्या संतुलित आहाराकडे लक्ष द्यावे
धातूची चव किंवा करपलेली चव :
कारणे : तांबे किंवा गंजलेल्या भांड्याचा संपर्क, आहारात दिला जाणारा कोरडा चारा, तीव्र सूर्यप्रकाश किंवा कृत्रीम सूर्यप्रकाश
प्रतिबंधक उपाय : हिरवा चारा द्यावा, स्टेनलेस स्टील, प्लास्टिक, रबराची भांडी झाकून ठेवावीत
आंबटपणा :
कारणे : घाणेरडी वापरात आणलेली भांडी, दूध अर्धवट किंवा हळू थंड केले गेले, नासण्याच्या स्थितीत आलेले दूध
प्रतिबंधक उपाय : घाणेरडी भांडी असल्यास व्यवस्थित धुवून जंतूविरहीत करावीत, दूध काढल्यानंतर ४ अंश से. पर्यंत २ तासात थंड करावे, खराब प्रतीचे दूध वापरात आणू नयेत
अनैसर्गिक :
कारणे: औषधे, कीटकनाशके, जंतुनाशके याच्या संपर्कामुळे
प्रतिबंधक उपाय : औषधे शक्यतो रंगविरहीत व दर्पविरहीत वापरावीत, जंतू नाशक द्रावण किंवा त्याचाह अंश दुधात मिसळणार याची दक्षता घ्यावी सर्व दूध साठवणूक करण्यापूर्वी भांड्यात असणारे पाणी काढून टाकावे .
दुधापासून पसरणारे रोग
- गायीच्या शरीरातून आणि घाणीमार्फत रोगजंतूंचा शिरकाव होतो आणि दुधामार्फत ते रोग पसरतात. उदा. टी. बी., माल्टाज्वर, अन्दुलेटिंग ताप.
- माणसापासुनही गायीला संसर्गाच्या माध्यमांतून रोग होतात ते दुधाच्या माध्यमातून पसरतात. उदा. घशाचे रोग, डीफ्थेरिया, स्कार्लेट ज्वर
- माणसांच्या संपर्काने दुध बाधित होणे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा ताप येतो आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. उदा. विषमज्वर, हगवण, लिस्तेरिओसिस
- माणसाच्या संपर्काने काही वेळा दुधातून अप्रत्यक्षरीत्या आजार पसरले जातात. उदा. घशाचे रोग, डीफ्थेरिया, स्कार्लेट ज्वर, विषमज्वर, हगवण, लिस्तेरिओसिस, इत्यादी.
म्हणूनच स्वच्छ दुधाची निर्मिती हि काळाची गरज आहे कारण दुध हे पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते. वरील प्रमाणे सर्व प्रकारची काळजी घेतल्यास दुभत्या जानावराभोवती आरोग्यदायी वातावरण राहून स्वच्छ दुग्धोत्पादनास मदत होईल.दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने जर व्यवसाय करावयाचा असेल तर खालील बाबींचा शास्रोक्त पद्धतीने विचार करणे फायद्याचे ठरते.
गाई-म्हशींची निवड
दुग्धोत्पादनासाठी गाई / म्हशीची निवड करतांना पुढील मुद्दे विचारात घेणे योग्य ठरेल.
- गाय / म्हैस ज्या जातीची खरेदी करावयाची आहे, त्या जातीचे गुणधर्म, रंग, रूप, शरीराची बांधणी पहावे तसेच वंशावळ पाहणे योग्य ठरेल.
- गाई / म्हशींची खरेदी पशुपालकाकडून करणे योग्य ठरेल शक्यतो आठवडी बाजारांतून खरेदी करणे टाळावे. कारण पशुपालकाकडे जनावरांच्या नोंदी उपलब्ध असतात. जसे जन्म, गाभणकाळ, वेतातील अंतर, सरासरी दूध उत्पन्न, पहिला माज, दिलेल्या वासरांची संख्या, लसीकरण, इत्यादी.
- दलालामार्फत बऱ्याचदा फसवणूक होते तसेच त्यांकडे कोणत्याही प्रकारच्या नोंदी नसतात म्हणून दलालाकडून जनावरांची विक्री टाळावी
- गाय / म्हैस हे निरोगी असावे तसेच त्वचा मऊ व चमकदार असावी. नाकपुडी हि ओलसर असावी, यांवरून जनावराला कोणत्याही रोगाची लागण नाही असे निदर्शनास येते
- गाय / म्हशींचे चार हि सड सारख्या आकाराची असावीत व हातात धरून दूध काढण्यास योग्य असावीत. जर चार पेक्षा जास्त सड असेल तर असे जनावर घेणे टाळावे.
- चारही सडातून दूध येते का ? जनावर दूध काढतांना त्रास देते का ? हे तपासून घेणे आवश्यक ठरेल. जनावरांची कास मऊ असावी तसेच लोंबणारी नसावी.
- गाई-म्हशींच्या काही वेगळ्या सवयी असतील तर पशुपालकांकडून त्यासंबंधी माहिती करून घेणे फायद्याचे ठरते. जसे, दुध काढण्याच्या वेळा, दिला जाणारा खुराक ई.
- गाय / म्हशींची खरेदी करत असतांना त्या गाभण किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या घ्याव्यात. सरासरी त्यांचे वय हे चार वर्षांपर्यंत असावे.
- जनावरांचे डोळे हे कायम चकचकणारे शुभ्र, पाणीदार, पांढरे असावेत. त्वचेला जर स्पर्श केला असता त्याक्षणी त्वचा मऊ गरम लागायला हवे
- निरोगी जनावर हा कायम कान टवकारून, लक्ष वेधून, चाणाक्षपणे बसलेला असतो तसेच कमरेची हाडे दूर असावीत त्यामुळे गर्भाची वाढ व प्रसूती व्यवस्थित होते
- निरोगी जनावर हे मस्त, हुंदळत चालते तर रोगी जनावर मंद स्थितीत एकाच जागेवर बसून राहते
- जनावर खरेदी करण्यापूर्वी थोडे अंतर चालवून पहावे जेणेकरून पायांत किंवा चालण्यात काही दोष असेल तर तो निदर्शनास येईल
- पुढील दोन पायांमध्ये व छातीजवळ योग्य व भरपूर अंतर असावेत मागील पायांतही कासेच्या योग्य ठेवणीसाठी भरपूर अंतर असावेत
- चारही पायांचे खुर समतोल, रुंद व सपाट असावेत. खुरे वाढलेली नसावीत
- कोणत्याही संसर्गजन्य रोगाची साथ चालू असतांना बाजारातून गाय – म्हशींची खरेदी करणे टाळावे.
- एकाच बाजारात जास्त संख्येने गायी / म्हशी खरेदी करण्याची योग्य वेळ म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत असतो कारण या कालावधीत गाय-म्हशी जास्त प्रमाणामध्ये वितात आणि विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात
निवारा :
- हवामानाचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीनुसार भारतात विषमता जाणवते. स्थानिक, भौगोलिक परिस्थिती व हवामान या तिहेरी घटकांचा विचार करून दुभत्या गाई / म्हशींना निवारा उपलब्ध करणे अत्यावश्यक असते.
- गोठा बांधतांना भविष्यातील गाई-म्हशींची संख्या याचा विचार करून आराखडा तयार करावा. तोंडासमोर तोंड किंवा शेपटीकडे शेपटी अशा दोन पद्धतीने गोठ्याची बांधणी करता येते तसेच गाई-म्हशींना व्यायामासाठी मोकळी जागा असावी व गोठयाजवळच कुंपण घालून आवार तयार करावे त्यासाठी चौकटी जाळी वापरावी, काटेरी तार वापरू नये जेणेकरून जनावरांस इजा होणार नाही
संतुलित आहार :
- दुग्धव्यवसायात जनावरांना दिला जाणारा आहार व त्याची गुणवत्ता योग्य असेल तरच गाई / म्हशी सुदृढ व निरोगी राहतील. त्यांना आहारात हिरवा चारा, सुकी वैरण व पशुखाद्य हे गरजेनुसार दिले गेले पाहिजे. गाई-म्हशींची शुष्क आहाराची दैनंदिन गरज त्यांच्या शारीरिक वजनाच्या २.५ ते ३ टक्क्यांपर्यंत असते. आहाराचे नियोजन करतांना त्यातील पचनीय पदार्थांचे प्रमाण, त्यांची चव, त्यांतील अन्नघटक यांचा तसेच बाजार भावाचा विचार करावयाला हवा. त्यांत प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, क्षार, व जीवनसत्वे या सर्वांचा समावेश असावा.
- गाईचे वजन जर ४०० किलो असेल तर शुष्क आहार १२ किलोपर्यंत द्यावा. त्यांपेकी दोन तृतीयांश भाग हिरवा चाऱ्याच्या स्वरुपात तर एक तृतीयांश भाग वैरणीच्या स्वरुपात दिला गेला पाहिजे. चारा हा कुट्टी करूनच दिला गेला पाहिजे, जेणेकरून चाऱ्याचा अपव्यय होणार नाही म्हणजेच चारा वाया जाऊन नुकसान होणार नाही.
- गाई-म्हशीच्या प्रत्येक लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्याची गरज असते. दुभत्या गाई-म्हशीच्या दुधातून दररोज केल्शियम, फॉसरस बाहेर पडतो त्यामुळे त्याची भरपाई खाद्यासमवेत ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देऊन केली पाहिजे.
आहार देण्याच्या वेळा
दुभत्या गाई-म्हशींना दिवसातून चार ते पाच वेळा चारा, वैरण घालावी व पशुखाद्य सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळेस धारा काढतांना दुध उत्पादनाच्या प्रमाणानुसार दिले गेले पाहिजे. आहारातील क्षारांची गरज भागविण्यासाठी गोठ्यात क्षारांच्या चाटणविटा खुंट्याना लावून गव्हाणीजवळ ठेवाव्यात
निरीक्षण :
जनावरांचे पशुपालकाकडून दररोज दोन वेळा गोठ्यात निरीक्षण केले गेले पाहिजे. जेणेकरून कळपातील जनावरांच्या लक्षणावरून बऱ्याचशा गोष्टींचे निदान होते. जसे, माजाच्या लक्षणांवरून जनावर माजावर आहे असे समजते. जनावर जर आजारी असेल तर खाद्य – पाणी व्यवस्थित सेवन करत नाही तसेच मंद स्थितीत एकाच जागेवर बसून राहते.
लसीकरण :
जनावरांना रोगाची लागण होऊ नये याकरिता वेळेअगोदरच लसीकरण केले गेले पाहिजे. मुख्यत्वेकरून जनावरांत घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकत, फाशी(काळ पुळी), ब्रुसेलोसीस, आय. बी. आर, थायलेरियासीस हे रोग होऊ नये म्हणून लसीकरण करणे गरजेचे असते. नाहीतर आजाराला बळी पडून दुग्धोत्पादनावर त्याचा फार मोठा परिणाम घडून येतो.
पशुवैद्यकीय सल्ला :
कोणत्याही आजाराचे लक्षण निदर्शनास आल्यास तसेच एखाद्या जनावराचे विसंगत लक्षण जाणवल्यास ताबडतोब पशुवैद्यकीयांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे अत्यावश्यक असते. वरील दिलेल्या बाबींचा विचार करून दुग्धव्यवसायाची सांगड घातलीत तर चांगले, दर्जेदार दुग्धोत्पादन पशुपालकाला मिळविता येऊ शकते.
याव्यतिरिक्त :
भारतामध्ये अतिप्राचीन काळापासूनच दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, ई. पदार्थ बनविले जातात व मानवी आहारात त्याचा वापर केला जातो साधारणत: दूध उत्पादनातील ८० टक्के दुधाची द्रव स्वरुपात दैनंदिन उपयोगासाठी विक्री होते तर सुमारे १५ ते २० टक्के दुधाचे विविध पदार्थ तयार करून त्यांची विक्री केली जाते. जसे खवा, क्रीम, लोणी, छन्ना, पनीर, तूप, चक्का, श्रीखंड, दही, ताक, चीज, ई.
दुधातील खनिजे व त्याचे मानवी आहारातील महत्व
दुध आहारात का असावे असे बऱ्याच वेळा विचारले जाते ? त्याकरिता पुढील माहिती …
दुधाला जर ५०० अंश से. तापमानापर्यंत उष्णता दिली असता(मफल फर्नेसमध्ये) दुधाची राख मिळते. या राखेमध्ये खनिजे अस्तित्वात असतात. काही खनिजे जनावरांच्या रक्तातून येतात. खनिजे हि असेन्द्रीय पदार्थ आहेत, दूधामध्ये खनिजांचे प्रमाण सरासरी ०.७५ टक्क्यांपर्यंत असते त्यामध्ये केल्शियम, फॉस्फरस, क्लोरीन, सल्फर, कोबाल्ट हे महत्वाची खनिजे आढळतात. याशिवाय दुधात झिंक, सिलीकोन, बोरॉन हे अत्यल्प प्रमाणात आढळतात.
केल्शियम:
दूधामध्ये केल्शियमचे प्रमाण ०.१२ टक्क्यांपर्यंत एवढे असते. केल्शियम दूधामध्ये केल्शियम फोस्फेट किंवा केल्शियम केसिनेट यांच्या स्वरुपात आढळून येते ज्यामध्ये केल्शियम सायट्रेट नावाचे खनिज सर्वाधिक आढळते
महत्व:
केल्शियम हे हाडे व दात मजबूत करण्यासाठी मदत करतात. रक्त गोठविण्यासाठी मदत करत असते. स्नायू व मज्जातंतू यांना संवेदनक्षम ठेवत असते. शरीरातील द्रव्याचा सामू स्थिर ठेवण्यास मदत करते.
फॉस्फरस :
दुधामध्ये फॉस्फरसचे प्रमाण सरासरी ०.१५ टक्क्यांपर्यंत असते व तो फॉस्फरस(पेंटाओक्साइड) या स्वरुपात आढळून येतो. फॉस्फरस हा प्रथिनांबरोबर आढळतो. पाण्यांमध्ये द्राव्य किंवा विद्राव्य अशा दोन्ही स्वरुपात आढळते.
महत्व :
हाडे व दात मजबूत करण्याच्या कार्यात केल्शियम बरोबर भाग घेत असतो. फॉस्फरस अप्रत्यक्षपणे चयापचयाच्या क्रियेत भाग घेत असतो.
सोडियम:
दुधामध्ये सोडीयमचे प्रमाण ०.१५ टक्क्यांपर्यंत एवढे असते. सोडियमची राख पाण्यामध्ये अविद्राव्य असते
महत्व :
सोडियम स्नायूंच्या आकुंचन व प्रसरण कार्यामध्ये मदत करत असतो. सोडीयमच्या अभावी प्रथिनांची चयापचय क्रिया मंदावते, तसेच पुनरुत्पादन क्षमता कमी होते
पोटेशियम:
दुधामध्ये या घटकाचे प्रमाण ०.१५ टक्क्यांपर्यंत असते. पोटेशियम हा सोडियम क्लोराईड व सोडियम बायकार्बोनेट या स्वरुपात आढळते. पोटेशियमची राख पाण्यामध्ये विद्राव्य आहे
महत्व :
पोटेशियम हा प्राण्यांच्या शरीरात संवेदनक्षमता, उत्सर्जन या महत्वाच्या क्रियेत भाग घेत असतो. तसेच पोटेशियमच्या कमतरतेमुळे चयापचय क्रिया मंदावते
फ्लोराईड :
दुधामध्ये फ्लोराईडचे प्रमाण ०.१८ टक्क्यांपर्यंत एवढे असते. चीकामध्ये याचे प्रमाण जास्त असते. स्तनदाह झालेल्या जनावरांच्या दुधामध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त असते. फ्लोराईडची राख हि पाण्यामध्ये द्राव्य आहे.
महत्व :
फ्लोराईडच्या उपस्थितीत पेशी व द्राव्य यांचे संतुलन योग्य राखण्यास मदत करते, तसेच शरीरातील सामुचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत करते.
मेग्नेशियम :
दुधामध्ये मेग्नेशियमचे प्रमाण ०.१ टक्क्यांपर्यंत उपलब्ध असते.
महत्व:
व हाडे बनविण्यासाठीच्या कार्यात केल्शियम व फॉस्फरस यांच्या समवेत कार्य करण्यास मदत करते
सल्फर (गंधक):
दुधामध्ये सल्फरचे प्रमाण ०.०२९ टक्क्यांपर्यंत एवढे असते. गंधकाचे बरेचसे प्रमाण प्रथिनांच्या स्वरुपात आढळते. चयापचय क्रीयेमध्येही सल्फर मदत करत असते
याव्यतिरिक्त, सायट्रिक आम्ल दुधामध्ये सरासरी ०.२ टक्क्यांपर्यंत मुळत: उपलब्ध असते. तसेच याशिवाय दुधामुळे ब्रोमिन, झिंक,कॉपर, कोबाल्ट ई. खनिजे हि कमी जास्त प्रमाणात आढळतात. आहारामध्ये कोबाल्टचे प्रमाण कमी असल्यास अन्नाची क्षमता कमी होते. कोबाल्ट हा व्हिटामिन बी-१२ याचा घटक आहे. झिंकचे महत्व आहाराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. हा घटक अप्रत्यक्षपणे चयापचयाच्या क्रियेत सक्रीय सहभाग घेतो. कॉपर अनेक विकारांचा घटक आहे काही विकारांना उत्तेजित करण्याचे हि कार्य तो करत असतो.
दुधातील खनिजांचे प्रमाण कमी जास्त होण्यासाठी आम्लता, उष्णता, जनावरांचा आहार, जनावरांचे आरोग्य, ऋतूतील फरक, जीवाणूंची दुधातील क्रिया, जनावरांना दिले जाणारे औषधे या सर्व गोष्टींचा फरक पडत असतो.
Read: जनावरांतील स्तनदाह रोगाची माहिती अत्यावश्यक
श्री. अजय गवळी
मोबाइल नंबर: ८००७४४१७०२