स्वच्छ दूध उत्पादन एक काळाची गरज
भारत देश हा दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे सध्याचे दूध उत्पादन 164.5 दशलक्ष टन एवढे आहे. परंतु दुर्दैवाने दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ निर्यात मध्ये आपला देश बराच मागे असून जागतिक स्तरावर अत्यंत कमी प्रमाणात निर्यात करतो. आपल्या देशातील दुध उत्पादनापैकी सुमारे 70 ते 80 टक्के दूध हे ग्रामीण भागातीलदूध उत्पादक तयार करतात परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त माहितीचा अभाव, उत्पादनाबाबत निष्काळजीपणामुळे दुधाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. शास्त्रोक्त पद्धतीने दूध निर्मिती केल्यामुळे दुधाची प्रत वाढतेच शिवाय अनेक (कासदाह सारख्या) आजारालाही आळा घातला जाऊ शकतो. तसेच अशा दुधापासून बनवलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता सुद्धा निकृष्ट दर्जाची असते. स्वच्छ दूध (Clean Milk Production) म्हणजे डोळ्यांना दिसणार्या आणि न दिसणार्या अशुद्धी पासून मुक्त असलेले दूध.
स्वच्छ दूध उत्पादनाचे फायदे
दुधाची प्रत चांगली होऊन ते आधिकाधिक काळ टिकवता येते. अश्या दुधात जीवणूंचे प्रमाण खूप कमी असते म्हणून ते मानवी आरोग्यास चांगले असते. तसेच ह्या दुधापासून बनवलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची असते.
स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी
दुभत्या जनावरांची स्वच्छता
धारा काढण्यापूर्वी जनावरांची कास व सड स्वच्छ पाण्याने जंतुविरहित करावीत. दूध देणारी गाय किंवा सर्वप्रथम निरोगी असावी. त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग झालेला नसावा. या रोगांमध्ये मुख्यतः कासदाह, क्षय इ. अशा रोगांचा समावेश अशू शकतो. अशा रोगांचे जिवाणू दुधाच्या माध्यमातून प्रसार पावतात त्यासाठी नियमित पणे जनावरांची तज्ञ पशुवैद्यकाकडून (Veterinarian) नियमित तपासणी करून घ्यावी. रोगी जनावरांचे दूध पिण्यासाठी वापरू नये. नेहमीच दूध उकळून व थंड करून प्यावे असे केल्याने दुधातून प्रस्थ होणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर आळा बसतो व त्याचा प्रसार थांबवण्यास मदत होते.
जनावरांची स्वच्छता दुभते जनावरे फक्त निरोगी असून चालत नाही तर त्यांची स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे त्यासाठी धारा काढण्यापूर्वी एक तास अगोदर जनावरास स्वच्छ धुवून घ्यावे. धारा काढण्यापूर्वी कास व सड सोम्य पोटॅशियम परमॅग्नेट (Potassium permanganate) च्या पाण्याने निर्जंतुक करावे.
जनावरांचे गोठे
परिसर व जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. जनावरांचा गोठा स्वच्छ असावा व तसेच तेथील हवा खेळती असावी. दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडीकचरा काढून नियमित साफसफाई करावी. गोठ्यात माश्या, डास गोचीड इत्यादी कीटकांचा शिरकाव प्रसार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. गोठ्याच्या भिंती पक्या असाव्यात म्हणजे त्याच्या उत्पादनाला जागा मिळणार नाही. भिंतींना नेहमीत चुना मारून घ्यावा.
दूध काढणारी व्यक्ती
धारा काढणारी व हाताळणारी व्यक्ती निरोगी सुदृढ व संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा. अन्यथा त्याला जडलेल्या रोगांचे जिवाणू दुधातून प्रसार पावतात व इतरांस अशा दुधामधून संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. दूध काढणाऱ्या व्यक्तीने नेहमीत नखे व केस कापावी. स्वछ कपडे परिधान करावा. डोक्यावर शक्यतो रुमाल बांधवा. दूध काढणार्यांना शिंका येणे, खोकणे व धूम्रपान करणे यासारखे सवयी असू नयेत. दूध काढण्यापूर्वी हात साबणाने धुवून कोरडी करून घ्यावी. दुधाची भांडी – दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी शक्यतो योग्य आकाराची व स्टेनलेस स्टीलची असावी. ती स्वच्छ धुतलेली व जंतुविरहित असावीत. दुधाची भांडी धुण्याकरता स्वच्छ पाणी असावे. जर मिल्किंग मशीन (Milking Machine) वापरत असाल तर ते स्वच्छ, कोमट पाण्याने धुतलेले व नेहमीत जंतुविरहित करावे. भांडी धुवून झाल्यानंतर ती कोरडी करण्यासाठी पालथी करून ठेवावीत. शक्यतो निमुळत्या तोंडाची भांडी दूध काढण्यासाठी वापरावी.
दूध काढण्याची पद्धत
सर्वसामान्यपणे शेतकरी हाताने दूध काढतात कारण त्यांना आपला कमी जनावरांसाठी यंत्राने दूध काढणे परवडत नाही मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात त्यात चिमटा पद्धत, पूर्ण हात पद्धत, नकलिंग म्हणजेच अंगठा पद्धत. यात पूर्ण हात पद्धत ही सर्व उत्तम मानली जाते. या पद्धतीत संपूर्ण हाताच्या पाचही बोटात सड पकडून खालच्या बाजूने ओढून दाब दिला जातो. ही पद्धत सर्वात जास्त योग्य व सुरक्षित आहे. पूर्ण हात पद्धत ही बोटांनी किंवा अंगठ्याने दूध काढण्याच्या पद्धती पेक्षा उत्तम आहे कारण याला वेळोवेळी हात बदलावा लागत नाही. या पद्धतीने वासराने दूध ओडल्याप्रमाणे दूध काढले जाते. तसेच सडांवर सारखा दाब टाकला गेल्यामुळे कासदाह सारख्या आजारास जनावर कमी प्रमाणात बळी पडते.
सडास मसाज करण्याने, वासरच्या सड चोखण्याने किंवा धारा काढण्याच्या वेळीच्या नेहमीच आवाजामुळे जनावरे पाना सोडतात. जनावरांने पाना सोडल्यानंतर पाच ते सात मिनिटात दूध काढणे आवश्यक असते सुरुवातीच्या काही धारा भांड्यात घेऊ नये, कारण यामध्ये अपायकारक जिवाणू असतात. जनावरच्या शेवटच्या धारेमध्ये जास्त प्रमाणात स्निग्धांश असतो म्हणून शेवटचे दूध नीट काढून घ्यावे. धारा पाच ते सात मिनिटात पूर्ण कराव्या. दूध काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर संकलन केंद्रावर पोहच करावे आणि ते शक्य नसेल तर 5-10 °C साठवून ठेवावे
यंत्राच्या साह्याने दूध काढणे
या पद्धतीचा उपयोग सरकारी संस्था किंवा मोठे फार्म मोठ्या प्रमाणात करतात. ही पद्धत शक्यतो जास्त जनावरांच्या दूध काढण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीत सड्याला मालिश होते. यामुळे कासेला इजा होत नाही. शक्य असेल तर शेतकर्यांनी ही पद्धत अमलात आणावी. या पद्धतीत जलद दूध काढता येऊन मनुष्यबळ वाचते आणि जनावरांची एकंदर उत्पादकता समजते.
स्वच्छ दूध उत्पादन (Clean Milk Production) घेणे हे काळाची गरज बनली आहे. कारण, फक्त जागतिक बाजारात आपल्या दुधाला स्थान मिळवणे हेच नसून तर यातून एक प्रकारे आपण, एक कुटुंब, समाज, आणि देश स्वच्छ दूध उत्पादनामुळे निरोगी आणि क्रियाशील राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात स्वच्छ दूध उत्पादनावर भर देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डॉ. अमोल आडभाई
राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, दक्षिणीय विभागीय, बंगळुरु (कर्नाटक)
Mo: 8805660943
Email: amoladbhai.943@gmail.com