दुग्धव्यवसाय (डेरी फार्मिंग)

आजकाल दुग्धव्यवसाय हे पैसे कमावण्याचे एक चांगले साधन झाले आहे. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हांला कोणत्याही पदवीची गरज पडत नाही, तुमचे कष्ट आणि कौशल्य याच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. एकदा हा व्यवसाय स्थिरावला की यात कोणताही तोटा होत नाही, दिवसेंदिवस नफा वाढतच जातो. हल्ली शेतकरीच नाही तर इतर धंदेवाईक आणि नोकरदार मंडळी इंजिनीयर, डॉक्टर, एमबीए पदवीधर, एनआरआय सुद्धा दुग्धव्यवसाय करताना दिसतात.

ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, त्यांनी या व्यवसायातील काही बाबी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यश मिळविण्यासाठी कोणत्या गायी जास्त दुध देतात, पैसे किती लागतील, गायीचा सांभाळ कसा करायचा आणि स्वच्छता कशी ठेवायची…हे सर्व जाणून घ्यावे लागेल. या सर्व गोष्टींची दक्षता घेतलीत तर महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावता येतील. स्थानिक बाजारात खवा आणि तुप विकून पण पैसे कमावता येतील.

         हे सर्व करण्याआधी आपण या व्यवसायासाठी सक्षम आहोत का, हे जाणणे जास्त महत्वाचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी वाचा आणि स्वतःला विचारा की ‘मी हा व्यवसाय सुरू करू शकतो का?’. 

चला तर जाणून घेऊया त्या गोष्टी….

. स्वतःला विचारा की तुम्हांला गायींविषयी प्रेम वाटते का ?

जर तुम्हांला गायींविषयी प्रेम व आस्था असेल तर बिनधास्त या व्यवसायात उडी मारा.

. घाण काम

यात तुम्हांला अशी पण कामे करावी लागतील,ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल किंवा याआधी कधी केली नसतील,जसे की शेण काढणे,नाले सफाई करणे व जनावरांना घासून आंघोळ घालणे.जर याची तुमची तयारी असेल तर धन्यवाद ! आपण एक पाऊल पुढे आला आहात.

. २४ तास काम

तसं पाहीलं तर या व्यवसायात जास्त काम हे सकाळी आणि संध्याकाळीच असते,पण जर या व्यवसायात उंची गाठायची असेल तर सतत २४ तास दक्ष असणे गरजेचे आहे आणि शारीरिक श्रम करण्याची पण तयारी ठेवावी लागेल.

. भांडवल

जर तुम्ही दोन ते तीन गायींपासून सुरुवात करणार असाल तर या व्यवसायात फार भांडवल गुंतविण्याची गरज पडत नाही,परंतु पाचपेक्षा अधिक गायी पाळण्याच्या असल्यास जास्त पैशांची गरज असते.तुम्हांला बँकेचे कर्ज सुद्धा काढावे लागेल.

. वेळ

जर तुम्ही एखादा व्यवसाय पाहून किंवा नोकरी करून दुग्धव्यवसाय करणार असाल तर तुम्हांला आत्ताच सांगतो की तुमचा हा व्यवसाय तोट्यात जाणार आहे.कोणत्याही व्यवसायाला वेळ हा द्यावाच लागतो,खास करून जर तो जिवंत प्राण्यांसोबत असेल तर.तुमचा वेळ हा या व्यवसायासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे.जर तुम्हांला पुरेपूर वेळ देणे शक्य असेल तरच हा व्यवसाय करा. 

. गोडाऊन

खाद्य गोण्या व वाळलेला चारा आणि मुरघास व हिरवा चारा साठविण्यासाठी चांगल्या मोठ्या जागेची गरज असते.गायींच्या संख्येबरोबर याची गरज वाढत जाते.

. पाणी

पिण्यासाठी आणि रोज जनावरांना धुण्यासाठी पाण्याची फार मोठी आवश्यकता असते.हिवाळ्यात थोडी कमी असते.त्या सोबतच गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याची गरज भासते.स्वच्छता नसेल तर जनावर आजारी पडेल.

. पुरेशी जागा

         व्यवसाय सफलतेसाठी भरपुर जागेची गरज भासेल.जर तुम्हांला वाटत असेल की गायीला एकाच ठिकाणी बांधून दुध काढायचे….तर तो संपुर्ण चुकीचा विचार आहे.मुक्त संचार गोठा हा जास्त फायदेशीर सिद्ध होतोय.जनावर रोगमुक्त राहते व दुध उत्पादन चांगले राहते.परदेशात गायी सतत मुक्त ठेवलेल्या असतात.तिकडे चरण्यासाठी खास गायरान तयार केले जाते.

. अनुभव आणि ज्ञान

सफल व्यवसाय करण्यासाठी काही दिवस दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण घेतले पाहीजे. प्रत्यक्ष गोठ्याना भेटी देऊन तेथील कामकाजाविषयी माहिती घेतली पाहिजे.तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे.सतत नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.सतत शिकत राहीले पाहिजे.ज्यादिवशी तुम्हांला वाटेल की आता तुम्हांला सर्व काही यायला लागले आहे,समजून घ्या तुमचा व्यवसाय उतरणीला लागला आहे.शिक्षण ही निरंतर चालणारी गोष्ट आहे.

१०. श्रम

जर तुम्हांला दोन किंवा तीन गायी पाळायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही पुरेसे आहात परंतु जास्त गायी पाळण्यासाठी तुम्हांला इतरांच्या श्रम शक्तीची गरज भासेल.पगार देऊन माणसे कामावर ठेवावी लागतील व त्यांच्या कामाचे नियोजन करावे लागेल.

डॉ.आरिफ शेख

पशुवैद्यकीय चिकित्सक,
मु. पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
मो.९९२२६२२६०८
Email: shaikharif27@gmail.com