कमी खर्चात सुमारे शंभर टन मुरघास निर्मितीची क्षमता – मच्छिंद्र वाघ
अलीकडील काळात चारा अत्यंत महाग झाला आहे. ही समस्या लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील सांगवी येथील मच्छिंद्र वाघ या तरुण शेतकऱ्याने कमी खर्चात सुमारे शंभर टन मुरघास निर्मितीची क्षमता आपल्या गोठ्यात तयार केली आहे. सोबत मुक्तसंचार गोठ्याची जोड देत सुमारे २५ गायींचा दुग्धव्यवसाय फायदेशीर केला आहे. सुमारे एक किलोमीटरवर जिथे सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते, अशा सांगवी गावात (ता. बारामती, जि. पुणे) दुग्ध व्यवसाय करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. गावातील युवा शेतकरी मच्छिंद्र दादासो वाघ पतसंस्थेतील नोकरी सांभाळून शेती आणि दुग्ध व्यवसाय करायचे. घरची साडेतीन एकर शेती. यात ऊस, हंगामी व चारा पिके घेतली जायची. हळूहळू गायींच्या संख्येत वाढ होत गेली. दोन गायींवरून २००७ मध्ये पाच गायी झाल्या. बंदिस्त स्वरूपाचा छोटा गोठा केला. अनेकदा दुष्काळी परिस्थिती आली तरी गायींचे संगोपन कायम ठेवले. पतसंस्थेद्वारे दुग्धोत्पादकांना कर्जपुरवठा केला जायचा. यातून अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांची ओळख होत त्यांच्या व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी माहीत होत गेल्या.
मुक्तसंचार गोठा
मच्छिंद्रचे वडील दादासो व पत्नी स्वाती यांच्या मदतीने गोठ्याचे व्यवस्थापन पाहतात. पूर्वी बंदिस्त गोठ्यात मजूरटंचाई, चारा, गायींचे आजारपण या प्रमुख समस्यांमुळे दुग्धोत्पादन कमी होत होते. यामुळे २०१४ मध्ये घरापासून काही अंतरावर बांबू तसेच तारेचा आधार घेत मुक्तसंचार गोठा उभारला. यात गायींना हवे तेव्हा पाणी मिळावे यासाठी पाइपद्वारे पाण्याची सोय केली. चारा देण्यासाठी सिमेंट पाइपची गव्हाण उभारली. जनावरांना सावलीसाठी मुक्तसंचार गोठ्यात नारळाची दोन व अन्य झाडे लावली. आज मच्छिंद्र सुमारे २५ मोठ्या गायींचे व्यवस्थापन सांभाळतात. मुक्तसंचार गोठा केल्याने मजुरीवरील खर्च कमी होऊ लागला. घरातील सर्व सदस्यांच्या मदतीने व्यवस्थापन सुलभ होऊ लागले.
चारा समस्या
गायींची संख्या वाढत असल्याने चाऱ्याची मागणी व त्यावरील खर्च वाढत होता. दुष्काळी भाग असल्याने चाऱ्यास उन्हाळ्यात दर तेजीत असतात. यामुळे शिल्लक कमी रहात होती. कडब्याचा अपवाद वगळता अन्य चारा स्टाॅक करूनही ठेवता येत नव्हता. घरच्या शेतातील चारा पुरत नव्हता. बाहेरून तो आणताना दर तसेच वाहतुकीवरील खर्च वाढत होता. काहीवेळा कमी दर्जा असलेला चारा घ्यावा लागे. गायींना पौष्टिक चारा वर्षभर मिळावा यासाठी काही तरी केले पाहिजे असे वाटू लागले. यातून मुरघास चाऱ्याचा पर्याय पुढे आला.
मुरघास निर्मिती
दिवाळीच्या काळात गोविंद डेअरीतर्फे पंजाब येथे आयोजित सहलीत पाचशे ते तीन हजार जनावरांचे गोठे व हजार टन चारानिर्मितीचे युनिट्स पाहायला मिळाले. त्यातूनच मुरघास विस्ताराची दिशा व आत्मविश्वास मिळाला. परिसरातील काही शेतकरी मुरघास तयार करीत होते. त्याची पाहणी मच्छिंद्र यांनी केली. तसेच, फलटण येथील गोविंद डेअरीच्या अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी केलेला मुरघास त्यांनी पाहिला परंतु एवढा मोठा मुरघास करवयाचे धाडस होत नव्हते. एवढा मौल्यवान चारा आपण जमिनीत पुरून ठेवायचा व तो चांगला कसा राहील याची शंखा कुटुंबियांच्या मनात होती. त्यामुळे त्यांच्याकडून अश्या गोष्टीस विरोध होता. त्यामुळे सुरुवातीस लहान स्वरुपात असणाऱ्या ९५ x ९५ x १०० सेंटीमीटर आकाराच्या एचडीपीई या पिशवीत मुरघास करावयाचे ठरले. या पिशव्यांना आतून प्लास्टिकचा पेपर असल्याने आपणास हवाबंद वातावरण तयार करण्यास मदत होते. फुलोऱ्यात असणारी मका एक दिवस अगोदरच कापल्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण हे आपल्या आवश्यकतेनुसार कमी आले होते.
आकृती:- पहिला मुरघास उघडल्यानंतर त्याची गुणवत्ता पाहून झालेला आनंद.
आकृती:- गुणवत्ता युक्त मुरघास
जनावराच्या गोठ्याजवळच अशी पिशवी ठेऊन त्यात चाऱ्याची कुट्टी भरण्यास सुरवात केली अश्याप्रकारे एक ते दीड फुट चाऱ्याचा थर झाला कि चारा चागल्या प्रकारे दाबला जायचा. चारा पायाने दाबण्यासाठी आत पिशवीमध्ये एक व्यक्तीची निवड केली होती. चार्याचा याप्रमाणे एकावर एक थर टाकला जात होता व तो चांगल्या पद्धतीने दाबलाही जात होता. अश्या प्रकारच्या चार्यात सुरुवातीस काहीच टाकले नाही. चारा पूर्ण भरल्यानंतर पुन्हा चागला दाबला व आतील प्लास्टिकच्या कागदाला चागले बांधून हवाबंद करण्यात आले त्यानंतर बाहेरील पिशवीसुद्धा दाब देऊन बंद करण्यात आली. नंतर त्यावर वजन ठेऊन हवेचा आणि दाब तयार करण्यात आला. अश्या प्रकारे बाघ यांनी सन २०१५ मध्ये प्रति एक टनाच्या पाच पिशव्या मुरघास तयार केला. त्यातील चार पिशव्यांचा वापर ४५ दिवसांनी केला. पहिली पिशवी उघडली त्यावेळी मनात शंका होती खर्च आपला मुरघास चांगला निघेल का ? बर्याच वेळेस आपण अशी कामे आपल्या कुटुंबियांचा विरोध असताना करतो त्यावेळी आपणास तो यशस्वी होतो किंवा नाही याची काळजी नक्कीच वाटते आणि तसेच यावेळी झाले. परंतु केलेली मेहनत व गोविंद विस्तार अधिकारी श्री. चव्हाण साहेब यांचे तंत्रशुध्द मार्गदर्शनाची चांगली पद्धत यामुळे मुरघास अगदी पिवळसर रंगाचा व कवठाच्या वासाचा तयार झाला.
जनावरांना हा मुरघास खायला दिल्यांनतर त्यांनी अगदी आवडीने खाल्ला व मनावरील दडपण कमी झाले त्यानंतर एकदोन दिवसातच मुरघासाचे चांगले फायदे लक्षात आले. पहिले म्हणजे जनावरे आवडीने सर्व चारा खाऊ लागली त्यामुळे जनावराचे आहारचे प्रमाण वाढले. त्याच बरोबर शेण सुधा जरा घट्ट येऊ लागले. दुध व दुधाच्या गुणवत्तेत वाढ झाली. दररोज बाहेरून चारा कमी आणावा लागत असे त्यामुळे कमी कष्ट झाले होते. एकंदरीत परिणाम चांगला दिसू लागला. अश्या प्रकारे चार पिशव्या वापरल्या व नंतर राहिलेली एक पिशवी ६ महिन्यांनी वापरली.
खड्ड्यातील मुरघास निर्मिती
आकृती:- जंबो कुट्टी यंत्राचा वापर
पिशवीतील मुरघासामुळे आता मुरघासाचे फायदे लक्षात आले होते व पुन्हा मुरघास करावयाचा होता. परंतु जनावरांची संख्या जास्त असल्यामुळे पिशवीमधील मुरघास करणे जास्त खर्चाचे व जास्त जागा व्यापणारा विषय होता. तसेच पिशवी मधील मुरघासास मजूर खर्च सुद्धा जास्त लागतो. त्यामुळे आता पीत मध्ये मुरघास करावयाचे ठरले. परंतु पीत बांधकामासाठी जास्त पैसे लागणार होते व यावेळी नव्हते. हि एक नवी अडचण होती परंतु हि अधन दूर करण्यासाठी मुरघास जमिनीत खड्डा घेऊन त्यात करावयाचे ठरले. त्यामुळे १२ x २५ x ३ फुट अनुक्रमे रुंदी लांबी व उंचीचा खड्डा तयार करण्यात आला. खड्ड्यात खाली माती कडक असल्याने त्यात पांचट टाकून त्यावर प्लास्टिकचा कागद टाकला जेणेकरून चारा दाबताना कागद फाटू नये. यामध्ये चारा टाकून नंतर ट्रेक्टरच्या सहाय्याने दाबला नंतर खड्डा पूर्ण भरल्यानंतर प्लास्टिकच्या कागदाने पूर्णपणे हवाबंद केला. त्यानंतर त्यावर मातीचा एक फुट थर दिला. सुमारे ५० दिवसांनी त्यातील चारा देण्यास सुरवात केली. या मुरघासाचा भरपूर फायदा झाला. मुक्तसंचार गोठा पद्धतीने काम कमी झाले होते व आता राहिले होते काम ते फक्त दररोज उन असू पाउस असू रानात जाऊन चारा आणावयाचा त्रास. हा त्रास या खड्ड्यातील मुरघासामुळे पूर्ण कमी झाला होता आता फक्त या ठिकाणावरून चारा उचलायचा व गव्हाणीत टाकावयाचा. या मुरघास पद्धतीने खर्चात कपात होऊन उत्पनात वाढ झाली होती त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यानुसार आता खड्ड्यातील मुर्घसावरून कायम स्वरूपी बांधकाम असलेल्या पीट तयार करावयाचे ठरले. अश्याप्रकारे या मुरघासाचे फायदा लक्षात आलेने वर्षभर पुरेल असा मुरघासचे नियोजन करण्यास सुरवात केली.
पुढील टप्पा मुरघास पिट पद्धत
आकृती:- ३५ – ३५ टनाचे दोन जमिनीवर बांधकाम करून तयार केलेले पीट
खड्ड्यातील काही अडचणी व आर्थिक परीस्थित चांगली असल्याने मुरघासाठी जमिनीवरील पिट बांधकाम करून मुरघास करण्याचे ठरले. यामध्ये आता दोन पिट बांधले व त्यासाठी एक लाख पंधरा हजार रुपये खर्च आला. या पिटचा आकार रुंदी १५x लांबी ३५ x उंची ४ फुट असा होता. यामध्ये सर्वसाधारणपणे आज तीनही बाजूंनी भिंत व एक बाजू रिकामी ठेवलेली आहे. यामध्ये प्रत्येकी ३५ टनाचे असे एकूण ७० टन क्षमतेचे युनिट उभे केले आहे. त्या व्यतिरिक्त खड्ड्यातील ३० टन क्षमतेचे एक असे युनिट तयार केले आहे. असा यातील एकूण १०० टन चारा यंदाच्या पावसाळ्यात उपलब्ध होईल, अशा रीतीने शंभर टन चारानिर्मितीची क्षमता तयार झाली आहे.
किती काळ चारा पुरेल?
मच्छिंद्र म्हणतात, की ३० गायींना एक वेळ याप्रमाणे दररोज चारा दिल्यास २५ टन चारा दोन महिने पुरेल. त्यांनी खड्ड्यातील मुरघास निर्मिती कमी खर्चात केली आहे. तसेच, बांधीव युनिटला एक लाख १५ हजार रुपये खर्च आला.
मुरघास व्यवस्थापनातील टिप्स
- खड्डा करताना चढावरील जागा निवडावी, जेणेकरून पाणी साठणार नाही. चारा मक्याची कणसे चिकात असताना घ्यावा.
- मका काढणी करून एक दिवस तसाच शेतात ठेवून दुसऱ्या दिवशी कुट्टी करावी.
- युनिट हवाबंद होण्यासाठी जास्तीत जास्त ‘प्रेस’ करावे.
मुरघास व मुक्त गोठ्याचे झालेले फायदे – गायींना उन्हाळ्याच्या काळात पुरेसा व पौष्टिक चारा मिळू लागल्याने दुग्धोत्पादनात वाढ झाली.- चाऱ्याचा दर पावसाळ्यात टनाला १५०० ते १७०० रुपये असताना त्याकाळात तो घेऊन त्याचा मुरघास केला. हाच चारा उन्हाळ्यात किमान २७०० रुपयांना घ्यावा लागला असता. दुग्धव्यवसायातील खर्चात सुमारे ३५ टक्के बचत झाली.
उत्पादन मदत व मार्गदर्शनदुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात- मच्छिंद्र यांनी सहा महिन्यांपूर्वी नोकरी सोडून पूर्णवेळ दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. प्रतिदिन १६० ते १७० लिटर दुधाचे उत्पादन, दूध गोविंद डेअरीस दिले जाते. प्रतिलिटर दर साडे २८ रुपये महिन्याला दीड ते पावणेदोन लाख रुपयांची उलाढाल – मित्र दत्तात्रेय वाघ यांचेही मार्गदर्शन.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा : मच्छिंद्र वाघ – ९९२१४९७०१५
Read: हिरालाल सस्ते – Successful Dairy Farmer