हिरालाल सस्ते, हरहुन्नरी दुग्ध व्यवसायिक
हिरालाल सस्ते (Dairy Farmer)
भारत हा तसा कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे त्यामुळे शेती व त्यास पूरक व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. आपला शेती व्यवसाय जास्त करून पाण्यावरच अवलंबून आहे, तसे पाहिले तर खात्रीशीर एवढे उत्पन्न मिळेलच असे नाही. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांची मुले हि पुढे शेती हा आपला व्यवसाय न निवडता कमी पगाराची का होईना परंतु नोकरी पाहिजे असे म्हणतात. अश्याच विचारने मी वडिलोपार्जित शेती एवजी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. परंतु नोकरीत मन रमत नव्हते त्यामुळे पुन्हा दोन वर्षांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीला जोडूनच पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुद्धा चालू केला. पुन्हा या व्यवसायातील काबाडकष्ट पाहून हा व्यवसाय नकोसा वाटू लागला. या मध्ये काम जास्त करायला लागायचे व त्याप्रमाणे त्याचा मोबदला मिळत नव्हता. जनावराचे दुध उत्पादन व त्याची गुणवत्ता याची कायम अडचण असत असे. जनावराचे आजारपण यासाठी जाणारा वेळ, होणारा खर्च व त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम हा जास्त होता. एकंदरीत या व्यवसायातील अनेक अडचणी एका पाठोपाठ एक समोर आल्याने या व्यवसायात फारसा मनामध्ये विचार आला कि, मोठ मोठे व्यवसायिक आपण पाहतो त्यांना सुद्धा त्यांचा व्यवसाय सोपा वाटतो का ? तर मग ते काय करतात याचा मागोवा घेतला तर उत्तर दिसले कि यातील प्रत्येक यशस्वी व्यवसायिक (Dairy Farmer) हा आपल्या व्यवसायात वेळेनुसार बदल करत असतो. यामुळे बाजारातील अवाढव्य स्पर्धेत ते त्यांचे वास्तव्य टिकवत असतात व त्यांच्या व्यवसायाची वाढ करत असतात. आपल्याकडे आपला हा दुग्ध व्यवसाय असा आहे कि जे वडील करत होते तेच आपण करत आहोत त्यात नाविन्य असे फार काही नाही. वातावरण, आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, बाजाराची गरज अश्या बऱ्याच गोष्ठीमध्ये झपाट्याने बदल होताना आपणास दिसत आहे. आपला जो पिढीजात दुग्ध व्यवसाय आहे यामध्ये फारसा नफा दिसत नव्हता.
मी जो व्यवसाय करत होतो त्यामध्ये फार असे नाविन्य नव्हते वडिलोपार्जित जी व्यवसाय पद्धती आहेत तीच मी पुढे चालवत होतो. त्यात वडील शेण काढत होते दररोज चारा आणत होते आगदी त्याच प्रकारे आज मी सुद्धा काम करत असून माझी मुले सुद्धा याच पद्धतीने काम करणार आहेत. यामुळेच आज शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो कि मला छोटी नोकरी असली तर चालेल परंतु वडील करत असलेला हा शेणाचा व्यवसाय (Dairy Farmer) मात्र नको. हीच नेमकी आपली मानसिकता होऊन बसली आहे व त्यामुळे आपल्याकडे शेती व शेती पूरक व्यवसायात उद्योजकता वाढीसाठी एवढी संधी उपलब्ध आहे त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आज जर आपण इस्राइल सारख्या देशाचा विचार केला तर त्यांनी शेती व पूरक व्यवसायात व्यवसायात व्यावसायिकता निर्माण केली आहे. आपणाकडे सुद्धा अश्या गोष्टी करणे शक्य असून फक्त आपण जास्त खर्चाचा किंवा हायफाय गोष्टींचा विचार न करता आपल्याकडील साधनसामग्रीचा वापर करून आपण कमी खर्चात हे सर्व तंत्रज्ञान आपल्याकडे जर राबविले तर ते आपल्याकडील सर्वसामान्य शेतकर्यालाही करता येईल व आपण आपल्या नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला तर इस्राइल बरोबर बरोबरी नाही तर त्यांना सुद्धा मागे टाकून आपण आपली प्रगती करू शकतो. यासाठी आवश्यक आहे ते आपल्या मानसिकतेत बदल करून कायम काही ना काही प्रयोग करून पुढे जाण्याची धमक आपल्यात पाहिजे.
काही दिवसापूर्वी असाच मी डॉक्टरसाहेबांच्या कार्यालयात बसलो होतो आमची अश्याच प्रकारच्या विकास कामाबाबत चर्चा चालू होती आणि त्यावेळी एक चांगली उच्च शिक्षित व्यक्ती आली व त्यांनी सांगितलेल्या माहितीने मी तर आश्चर्यचकित झालो. परंतु त्याच बरोबर अंगामध्ये एका नवीन शक्तीने प्रवेश केल्यासारखे मला वाटू लागले. कारण त्या व्यक्तीने सांगितले कि मी एक संगणक अभियंता असून पुढील आठवड्यात मी माझी मासिक सत्तर हजार रुपयाची नोकरी सोडून मला आता दुग्ध व्यवसाय करावयाचा आहे व आपल्याकडे कमी खर्चातील बरेच प्रयोग झाले असून त्याची माहिती घेण्यासाठी मी येथे आलो आहे. ते पुढे म्हणाले कि आपल्याकडे आपण जो वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय करतो तो एक शेणाचा व्यवसाय म्हणून आपल्याकडील तरून पिढी यात काम करायला तयार नाही. परंतु यातील बारकावे जर पाहिले तर या व्यवसायात आपणास फार मोठे काम करता येईल. आपणास माहित आहे कि बऱ्याच व्यवसायात आपण वेगवेगळ्या पदार्थ तसेच उपपदार्थ यांचे मूल्यवृद्धी केले, तर या मध्ये आपण दुग्ध उत्पादन त्याच बरोबर भुसंवर्धक सेंद्रिय खत आणि चांगल्या वासारांची पैदास यांची जोड आपण देऊ शकतो. तसेच आजकाल आपली तरून पिढी या व्यवसायात येत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे आज दुग्धव्यावसायाकडे प्रतिष्ठीत व्यवसाय न समजता त्याची गणना शेणाचा व्यवसाय म्हणून केली जाते व परंतु आता आपण या व्यवसायाकडे शेणाचा व्यवसाय न पाहता यामध्ये आधुनिक कमी खर्चातील स्थानिक साधनसामग्रीचा वापर केलेले तंत्रज्ञान विकसित करून या व्यवसायास शेणाचा व्यवसाय असे न संबोधता हा हि एक प्रतिष्ठीत अशी कंपनी म्हणून चालविली पाहिजे कि ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या व्यावसायिकतेचा विचार केला जाईल. असे या उच्च शिक्षित तरुणाचे विचार मला समजल्यावर आपणही यामध्ये काही करू शकतो अश्या नवीन विचारांचा संचार माझ्या मनात झाला व अश्या प्रकारे कमी खर्चातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून वर्ग-१ अधिकाऱ्यास जो मासिक वेतन मिळते त्यापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न मला माझ्या व्यवसायातून झाली पाहिजे अशी इर्षा मनात बांधून काम सुरु केले आणि आज जवळपास ४ ते ५ वर्षाची वाटचालीचा अभ्यास केला तर जे विचार त्यावेळेस मी केले होते ते प्रत्यक्षात आल्याचे आज दिसते आहे याचे मला समाधान आहे.
ज्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे मला या सर्व गोष्टी शक्य झाल्या त्यामध्ये मुक्तसंचार गोठा यामुळे माझ्या शेणाच्या व्यवसायाला एका कंपनीचे व प्रतिष्टा असलेल्या व्यवसायात रुपांतर झाले कारण यामध्ये मला दररोज शेन काढावयाचे नाही कि जनावरे धुण्याची कि गोठा साफ करण्याचे काम करावे लागत नाही. भूसंवर्धक सेंद्रिय जीवाणू खत निर्मिती (Organic Fertilizer), आज आपण जे शेणखत विकतो त्याची गुणवत्ता जर आपण पाहिली तर बाजारात त्याचे मूल्य हे २ ते ४ रुपये यापेक्षा जास्त नाही तेच आता या शेणखताचे मुक्तसंचार गोठा पद्धतीमुळे जे मूल्यवर्धन झाले आहे ते आज १० रुपयापासून ते ३० रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात झाले आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादन (Hydroponic Fodder Production), हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेवर हा चांगला पर्याय असून आज कमी खर्च, कमी पाणी, कमी श्रम, कमी वेळ व कमी जागेत सुद्धा मला चांगला हिरवा चारा मिळाला. अझोला उत्पादन (Azolla Production), वाढीव पशुआहार खर्चात काटकसर करून चांगली दुधाची गुणवत्ता मिळविण्यासाठी मला कमी खर्चातील अझोला उत्पादनाचा चांगला फायदा झाला. घरच्या घरी संतुलित आहार निर्मिती, माझ्या शेतात तयार होणारी मका व बाहेरून काही कच्चा माल आणून मी संतुलित आहार तयार करतो कि ज्यामुळे मला कमी खर्चात अधिक गुणवत्ता नियंत्रित करता येते. सेंद्रिय दुध उत्पादन (Organic Milk Production), वरील सर्व गोष्टींचा वापर केल्याने आपोआपच जनावराचे आजार कमी व सर्व सेंद्रिय नियम पाळत असल्याने यामुळे मला जास्त फायदा झाला आहे. बायोगॅस निर्मिती, स्वयंचलीत गोठ्यातील तापमान नियंत्रक जास्त दुध देणाऱ्या जनावरांना उन्हाळ्यातील अति तपमानात पूर्ण क्षमतेने दुध उत्पादन देता यावे म्हणून हे कमी खर्चातील तंत्रज्ञान अवलंबिले. चाऱ्याची समस्या काय सोडविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मुरघास पद्धतीचा अवलंब केला व त्याचा जास्त फायदा झाला. अश्या अनेक प्रकारच्या आधुनिक कमिं खर्चातील तंत्रज्ञान वापरून आज मि हे साध्य केले आहे. शून्यातून विश्व निर्मितीचा ध्यास हा फार महत्वाचा आहे त्यास पाहिजेत फक्त विचार, जिद्द व काम करण्याची चिकाटी या फार महत्वाच्या गोष्टी आहेत.
आज या ४ ते ५ वर्षाच्या कालखंडात व्यवहारिक व कौटुंबिक जीवनात जरी मला बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी सुद्धा या अडचणींना त्याच नवीन उमदीने आव्हान देत आज मी पूर्णपणे या व्यवसायात स्थिर झालो आहे. या कालखंडात मी २५ लक्ष रुपये खर्च करून माझ्या जुन्या शेतीलगतच विकण्यास निघालेली १.५ एकर जमीन मी विकत घेतली कि जे माझ्या नोकरीच्या उभ्या आयुष्यात शक्य झाले नसते. आज मी माझ्या व्यवसाय वाढविला, त्यासाठी काढलेले बँकेचे कर्ज फेडले, नवीन घराचे बांधकाम केले, चार चाकी गाडीचे घरच्यांचे स्वप्नही यातूनच पूर्ण झाले. या सर्व गोष्ठी आज या व्यवसायात नवीन पद्धतीने व्यावसायिकतेची जोड दिल्यामुळेच होऊ शकल्या हे मात्र नक्की आहे.
आज मला या ठिकाणी नव युवकांना हेच सांगावयाचे आहे कि आपणास चांगली नोकरी मिळाली तर जरूर करा. परंतु आपले शिक्षण झाले व नोकरी नाही म्हणून रडण्या पेक्षा एक नव निर्मितीचा ध्यास घेऊन आपण हा व्यवसाय करा. कमीत कमी खर्चात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कायम प्रयोगशील राहून आपला व्यवसाय कायम फायदेशीर करत राहा व त्याच बरोबर होणारा पक्का माल हा सुद्धा इतरांपेक्षा आपण कसा सरस तयार करू व त्याचे महत्व इतरांना सांगून त्यातून सुद्धा जास्त उत्पन्न मिळवून आपल्या शेणाच्या व्यवसायाचे एका कंपनीत रुपांतर करा व माझ्यासारखे यशस्वी व्हा (Successful Dairy Farmer).
एक आशादायी व प्रयोगशील नवयुवक शेतकरी